Tuesday, May 12, 2026

१०. लोकमत दीपोत्सव (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ३९९)

हा अंक मी दरवर्षी शेवटी वाचायला राखून ठेवते. मागच्या वर्षी असाच राखून ठेवला आणि वाचायचा राहून गेला. शेवटी म्हटलं ह्या वर्षीचे दिवाळी अंक येतील तोवर वाचायला राहायला नको म्हणून वाचायला घेतला.

खरं सांगायचं तर २०२५ च्या अंकाने थोडी निराशा केली. दरवर्षीच्या अंकात रिपोर्ताज असतात ते वाचायला खूप मजा येते, बरीच वेगळी माहिती मिळते. पण २०२५ च्या अंकाची सुरुवात चॅटजीपीटीने झालेली पाहून वैताग आला खरं तर. ह्या एआय टूल्सचं अजीर्ण झाली आजकाल. तसं म्हटलं तर सेलिब्रिटीजने प्रश्न विचारावेत आणि उत्तरं चॅटजीपीटीने द्यावी ही कल्पना छान आहे. पण पहिले काही सवाल-जवाब वाचले आणि पुढे वाचायची इच्छा झाली नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतीच्या विकासासाठी काय करता येईल हा प्रश्न चॅटजीपीटीला विचारलेला पाहून माझंच काय पण चॅटजीपीटीचंसुद्धा मनोरंजन झालं असेल :-) तस्मात काय तर हा "माणूस, मशीन आणि मॅजिक" विभाग मी अजिबात वाचला नाही.

त्यामानाने 'उलटसुलट' हा विभाग अधिक आवडला. खास आवडलेले लेख म्हणजे 'पिकलेला फणस' (वंदना अत्रे), 'डायपरपासून डायपरपर्यंत' (धनंजय जोशी) हे असिस्टेड लिव्हिंग फेसिलिटीजवरचे लेख, 'मायोंग' (मेघना ढोके) हा आसाममधल्या जादूटोणा वगैरेसाठी (कु)विख्यात गावावरचा लेख, 'युरोपातील चेटूक' (वैशाली करमरकर) हा युरोपमधल्या चेटकिणींवरचा लेख, 'घ्या वापरा फेका' (माधुरी पेठकर/भक्ती बिसुरे) हा फास्ट फेशनचे धोके सांगणारा लेख, 'सॅन्टा फे' (नीरजा पटवर्धन) हा सॅन्टा फे ह्या ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्युम शॉपवरचा लेख, 'एका जहाजाचा मृत्यू' (समीर मराठे) हा गुजरातच्या अलंग मधल्या जहाजाच्या शिप ब्रेकिंग व्यवसायावरचा लेख, आणि 'एका गाडीचा जन्म' (श्रीनिवास नागे) ह्यांचा महिंद्राच्या चाकण इथल्या ऑटोमॅटिक असेम्ब्ली लाईन असलेल्या प्लांटवरचा लेख. हे सगळे खूप माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारे वाटले. 

२०२६ च्या दिवाळी अंकात हे असेच माहितीपूर्ण लेख वाचायला मिळतील ही अपेक्षा.

Tuesday, February 3, 2026

९. भवताल (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ३५०)

भवतालचा अंक दरवर्षी महाराष्ट्राच्या बाबतीतल्या अनेक विषयांचं दस्तऐवजीकरण करतो. २०२५ च्या दिवाळी अंकाचा विषय 'वाटा-रस्ते-मार्ग' असा असला तरी तो केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. कदाचित राहू शकलाही नसता. गुगल नव्हतं तेव्हाच्या काळात समग्र माहिती देणारे लेख होते. पण आताच्या काळात जी माहिती वाचकांना स्वतः शोधता येते ती लेखातून मांडण्याचं प्रयोजन नाही. वाचक कशाला स्वतःहून अशी माहिती शोधतील हा प्रश्न संयुक्तिक आहे. पण ज्यांना इंटरेस्ट आहे ते शोधतीलही. ज्यांना तो नाही ते लेखसुद्धा वाचणार नाहीतच. माहिती द्यायचीच असेल तर ती मनोरंजक पद्धतीने मांडता यायला हवी. आणि माहितीचा ओव्हरडोस नसावा ही किमान अपेक्षा. अंकातले काही लेख ती पूर्ण करत नाहीत.

सह्याद्री हा महाराष्ट्रात जन्माला आलेल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. साईप्रकाश बेलसरे ह्यांचा घाटवाटांवरचा लेख छोटेखानी असला तरी चांगली माहिती देतो. लेखकाने ह्यावर अधिक लिहायला हवं होतं. वाटांवर बदलणाऱ्या भाषांवरचा डॉ. मानसी केळकर ह्यांचा लेख वाचून सुद्धा ह्यावर लेखिकेने अजून लिहायला हवं होतं असंच वाटलं. पुणे ते मुंबई ह्या कोविडकाळात केलेल्या प्रवासावरचा संग्राम गायकवाड ह्यांचा लेख वाचून ओसाड पडलेले रस्ते पुन्हा एकदा आठवले. गर्दी नकोशी वाटत असली तरी एवढी शांतता अंगावर यायची.

लेणी हा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय. त्यातली शिल्पं, लेख वगैरेवर एकापेक्षा अधिक लेख असते तरी दस्तऐवजीकरण अधिक चांगलं झालं असतं. रस्त्यांवरच्या व्यवस्थेवर डॉ. देवकुमार अहिरे ह्यांचा लेख आवडला. किल्ल्यांवरच्या वाटांवर डॉ. सचिन जोशी ह्यांनी लिहिलेला लेख किल्ल्यावर प्रेम असलेल्या आणि त्यांच्याबद्दल उत्सुकता असलेल्या कोणालाही आवडेल. 

'एका जिल्ह्याच्या आडवळणी नोंदी' मध्ये धाराशिवचे कलेक्टर म्हणून काम केलेल्या कौस्तुभ दिवेगावकर ह्यांनी आपले अनुभव लिहिलेत. एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा लेख प्रथम वाचायला मिळाला. आणखी अधिकाऱ्यांनी असं लिहायला हवं म्हणजे ते करत असलेल्या कामांची ओळख लोकांना होईल. 

वाट म्हटल्या की संरक्षक देवता आल्या. डॉ. गोपाळ जोगे ह्यांनी त्यावर विस्ताराने लिहिलंय. काशी यात्रा आणि त्यात लागणारे परवाने म्हणजे दस्तक ह्यावरच डॉ. गिरीश मांडके ह्यांचा लेख माहितीपूर्ण. डॉ. मोहसीना मुकादम हे नाव आणि 'वाटेवरची खाद्यसंस्कृती' हे लेखाचं नाव वाचून भरपूर माहिती मिळेल असं वाटलं पण लेख त्रोटक वाटला.

समोर दिसेल त्या बसमध्ये बसायचं आणि शेवटल्या ठिकाणी उतरायचं हे मला अजून बेस्ट बसने सुद्धा जमलं नाहीये. एसटी मध्ये बसून ते जमवणाऱ्या सुहास जोशींचं कौतुक वाटलं. अंबेजोगाईच्या हत्ती लेणींबद्दल प्रथमच वाचायला मिळालं. उदगीरच्या बस स्टॅन्डवर जो फलक होता त्यातलं एकही गाव लेखकाला ओळखता आलं नाही. त्यावर तो म्हणतो या गावांच्या वाटेवर कधी जाईन ते माहित नाही'. हे वाक्य कायम लक्षात राहील. शिखर मोहिमांवर लेख वाचलेले असल्याने उमेश झिरपे हे नाव परिचयाचं आहे. त्यांनी सह्याद्री आणि हिमालयातल्या वाटांवर छान लेख लिहिलाय. महाराष्ट्राचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दरवर्षीची वारी. त्यावर पावलस मुगुटमल ह्यांनी लिहिलेला लेख वाचून खूप माहीत मिळाली. त्यातला वारकर्यांना घरी जेवायला बोलावणाऱ्या छोट्या पोरांचा किस्सा वाचून भरून आलं. शेवटी एक वारकरी त्यांच्या घरी जेवायला गेला हे वाचून मी हुश्श केलं. जातपात पाहू नये हा वारीचा संदेश आजच्या काळात मोलाचा आहे. वारीसोबत काही अंतर तरी चालून जायचा बेत कधी तडीस जाणार ते तो विठोबाच जाणे. 

'भटक्यांच्या वाटा' भटक्या जमातींच्या वाटांवरून आपल्याला फिरवून आणतो. 'सागरी मार्ग' ह्या विषयावर अजून वाचायला आवडलं असतं. केप्टन सनत भाटे ह्यांचा लेख ह्या विषयाबद्दल उत्सुकता वाढवणारा.

'वाटा' ह्या विषयाच्या अनुषंगाने आणखी काही लेख अंकात समाविष्ट करता आले असते - उदा. नकाशावाचन, वाळवंटातील रस्तावाचन, अंतराळ मोहीमा, स्कुबा डायव्हिंग, ट्रेकिंगचे अनुभव, एव्हरेस्टच्या बेस केम्पपर्यंत नेणारी वाट, जुन्या प्रवासाच्या नोंदी - असं वाटून गेलं.

Saturday, January 24, 2026

८. कालनिर्णय (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ३००)

अंकाच्या संपादकीयात ग्रेसांची 'पाऊस आला पाऊस आला' कविता वाचली आणि मन एकदम खूप वर्षं शाळेच्या दिवसांत गेलं. संध्याकाळी घरी आल्यावर 'सांजधारा' मध्ये लागणारी गाणी आठवली. शैलेंद्रची 'दो बिघा जमीन' मधली 'मौसम बीता जाये' वाचून गाव सोडून जाणारा बलराज सहानी डोळ्यांसमोर आला. एक दिवस मुंबईच्या बाहेर जावं लागलं तर जीव कासावीस होतो मग आपली पाळंमुळं उपसून दुसरीकडे जाताना कसं वाटत असेल ह्याची कल्पनासुद्धा करावीशी वाटत नाही. त्याही पुढे जाऊन ज्यांची घरं, गावं, शहरं उध्वस्त झाली असतील आणि मागे परत फिरण्यासाठी सुद्धा काही उरलं नसेल त्यांचं काय? आपल्यासाठी त्या बातम्या  पण त्यांच्यासाठी वास्तव. असो. आपण काय करू शकतो ह्याबाबत :-(  त्या मानाने बॉब डिलनचं And it's a hard rain's a-gonna fall अनोळखी आणि कळायला दुर्बोध - निदान माझ्यासाठी तरी. Sad, dead, crooked, graveyard असे शब्द असलेलं हे गाणं अमेरिकन लोकांना जगण्याची उमेद घेऊन गेलं म्हणे. असेल. माझी गाण्याची समज फार नाही. कधीतरी वेळ काढून ह्या गाण्याविषयी गुगलबाबाला विचारेन.

तर आता अंक आणि त्यातल्या लेखांविषयी.

पहिलं पण इतिहासाचं - १९४६ साली भारतीय नौदलात झालेल्या उठावाचं  ज्यामुळे ब्रिटिशांना आपल्याला इथून गाशा गुंडाळावा लागणार ह्याची जाणीव झाली. शाळेत ह्याबद्दल वाचल्याचं आठवत नाही. सोबतची साहिरची कविता सुन्न करून गेली. ह्या बंडात सहभागी झालेल्या लोकांना नंतर ना नोकऱ्या मिळाल्या ना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा आणि त्याचे लाभ मिळाले हे वाचून तर अस्वस्थ व्हायला झालं. अश्या किती लोकांनी बलिदान करून मिळवलेल्या स्वातंत्र्याची आज आपण अक्षरश: माती करतोय :-( 

रोज दारात येऊन पडणारा पेपर असो किंवा हातात असलेला दिवाळी अंक असो. त्याची छपाई कुठे आणि कशी होते त्याची उठाठेव करायची गरज किंवा तेव्हढा वेळ कोणाकडेच नाही. त्यामुळे 'औंध संस्थानचा प्रिटिंग प्रेस' हा आणि त्यापुढला 'जावजी दादाजींचा निर्णयसागर प्रेस' हा असे दोन्ही लेख खूप आवडले. त्यामानाने Times Roman किंवा Sans Serif पासून सुरु झालेले फॉन्ट्स परिचयाचे असूनही युनिव्हर्स हा पहिला फॉन्ट डिझाईन करणाऱ्या एड्रीयन फ्रुटीगर ह्यांच्यावरचा लेख थोडा किचकट आणि रटाळ वाटला. 

थरारपट पाहायची आवड असल्याने डेव्हिड फिन्चर वरचा लेख आवडला. त्याचे चित्रपट कितपत झेपतील हा भाग अलाहिदा. वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील ह्यांचा लेख वाचून पर्यटन व्यवसायात किती अडचणी येतात ह्याची कल्पना आली. 'युरोपची होरपळ', 'पत्रकार ते अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन', 'इराणी गणगोत', 'मधुमीलनात ह्या' हे लेख माहितीपूर्ण वाटले.

पाकनिर्णय मधल्या बऱ्याचशा पाककृती 'काहीही' ह्या सदरात मोडणाऱ्या वाटल्या :-) उदा. कच्च्या केळ्याची व्हेज अंडाकरी, केळफुलाचे कुरकुरे आणि बनाना lasagna. करणारे धन्य आणि खाणारे त्याहून महान.

अंकातली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे शैलेश मदियानी ह्यांच्या 'अर्धांगिनी' ह्या कथेचा अनुवाद. मी ती दोन वेळा वाचली. सुदैवाने हिंदी कळत असल्याने ह्या लेखकाच्या कथा मुळातून वाचता येतील ह्याचा आनंद वाटला. आता भाकरीचा चन्द्र शोधण्याच्या व्यापातून कधी वेळ मिळेल ते उपरवाला जाने किंवा ना जाने :-)

Saturday, January 3, 2026

७. दुर्ग (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ३५०)

दुर्गाच्या ह्या अंकातले सगळ्यात आवडलेले लेख म्हणजे अमित मराठे ह्यांचा 'काळ खोऱ्यातील भटकंती आणि तेथील माणुसकी' आणि अलंग-मदन-कुलंग वरच्या ट्रेकबद्दचा डॉ. हेमंत बोरसे ह्यांचा लेख. आपल्या मित्राने किंवा ऑफिसमधल्या सहकार्याने सहज गप्पा मारता मारता त्याच्या विकेंड ट्रेकबद्दल सांगावं अश्या भाषेत हे लेख लिहिलेत. लेखात बोलण्याच्या ओघात माहितीही बरीच दिली आहे. हे लेख मी खूप एन्जॉय केले. ट्रेकिंग किंवा किल्ला ह्यावरचे लेख कसे असावेत ह्याचा मला हे लेख खूप चांगले नमुना वाटले. सगळयांनाच लिहिता येतं असं नाही हे खरं आहे. पण लेखकाकडून मिळालेले लेख संपादन करणे किंवा त्यावर संस्करण करणे ही कामं झाली तर ह्या विषयाला वाहिलेल्याअंकातल्या लेखांचं माहिती आणि मनोरंजन मूल्य वाढेल.

पुढल्या लेखात राजगडाच्या संजीवनी माचीवर विवेक काळे ह्यांनी विस्तारपूर्वक लिहिलंय. हा किल्ला बघायला जाणाऱ्या प्रत्येकाने तो बरोबर ठेवायलाच हवा म्हणजे किल्ल्यावर जाणं ही एक सहल न होता किल्ला डोळसपणे पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळेल. असे लेख ह्या अंकांतून अधिक संख्येने यायला हवेत.

संभाजीराजांच्या गोवा स्वारीबद्दल मला ऐकूनही माहीत नव्हतं. संदीप मुळीक ह्यांचा लेख वाचून हा इतिहास व्यवस्थित समजला. मोडी लिपी शिकूनही कृष्णाजी कंकाना संभाजीराजांनी दिलेली बक्षिसाची मोईन अजिबात वाचता आली नाही ह्याचं फार वाईट वाटलं. सराव न राहिल्यामुळे पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी वाया चालली आहे हेच खरं :-( संभाजीराजांच्या जंजिरा मोहिमेवर संतोष जाधव ह्यांनी लिहिलेला लेखही बराच इतिहास सांगतो.

अरविंद देशपांडे ह्यांचा कोरीगडावरचा लेख गडावर भेट देणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण ठरेल असाच. वागीनगोरा ह्या औरंगजेबाच्या दक्षिणेतल्या शेवटच्या लढाईबद्दल प्रांजल वाघ ह्यांनी लिहिलं आहे. ह्याबद्दलही इतिहासाच्या पुस्तकात वाचल्याचं आठवत नाही. 'डोंगरधारेवरून सिंहगड ते भुलेश्वर' हा साईप्रकाश बेलसरे ह्यांचा लेख वाचून आपणही त्या ट्रेकवर असल्यासारखं वाटतं. मधु मकरंदगड परिक्रमेवरचा जितेंद्र बंकापुरे ह्यांचा छोटेखानी लेख आवडला.  

जुनागढचे वैभव उपरकोट (अमोल सांडे), किल्ले सुधागड (डॉ. संग्राम इंदूरे),  किल्ले गंभीरगड (श्रीकांत कासट), वऱ्हाडातला भुईकोट गोधनापूर (प्रा. डॉ. किशोर वानखेडे), शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार कांचन (प्रा. नितीन जाधव),  टिपागड (ओंकार केळकर), माणदेशाची दुर्गजोडी संतोषगड वारुगड (अमित निंबाळकर), सुतोंडा (अंकुर काळे) आणि महिमतगड (डॉ. मुकुंद पाटील) हे लेख ह्या किल्ल्यांची छान ओळख करून देतात. हे सगळे लेख वाचून हे अंक जपून ठेवायचा माझा निर्णय अगदी योग्य होता ह्याची खात्री पटली. आता फक्त किल्ले बघायचा योग कधी येतो त्याची वाट पाहायची. एखाद्या देवाचं दर्शन घडायला देवाने बोलवावं लागतं असं म्हणतात. कदाचित किल्ल्यांबद्दलसुद्धा असंच असेल.

अंकातील शेवटचा लेख इतिहास संशोधक द. ब. पारसनीस ह्यांची ओळख करून देतो. हा लेख मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. दर वर्षीच्या अंकात वेगवेगळ्या इतिहास संशोधकांबद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल वाचायला आवडेल.

अंकाचा समारोप जागतिक वारसास्थळांत समावेश झालेल्या १२ गडांच्या सुंदर पोस्टरने केलाय हे खूप संयुक्तिक वाटलं. पुढच्या अंकात एक वर्षात ह्या गडांवर काय नव्या सोयी झाल्या आहेत (किंवा नाहीत!) ह्याबद्दल वाचायला आवडेल. 

Friday, January 2, 2026

६. किल्ला (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ५००)

ह्या वर्षीच्या 'किल्ला'ची सुरुवात चंद्रशेखर बुराडे ह्यांच्या 'द्रष्टा दुर्गस्थापत्यकार' ह्या लेखाने झाली आहे. लेखाचे शीर्षक आणि लेखकाचा आर्किटेक्ट हा पेशा वाचून लेखात त्या अनुषंगाने सविस्तर विश्लेषण वाचायला मिळेल असं वाटलं होतं. पण लेखात यंदा जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळालेल्या १२ किल्ल्यांचा जुजबी उल्लेख आहे आणि बाकीची माहितीसुद्धा विस्कळीत वाटली. खरं तर ह्यातल्या प्रत्येक किल्ल्याच्या बांधणीवर आर्किटेक्चरच्या बाबतीत एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. नाळ, नेढे, पदर असले शब्द ट्रेकर्सच्या परिचयाचे असले तरी सामान्य लोकांना त्याबद्दल कमीच माहिती असते. किल्ल्यावरच्या विहिरी, मंदिरं, भुयारे, देवड्या, वास्तू, बुरुज ह्यांच्या बांधकामावर बरंच काही लिहिता येऊ शकतं. आशा आहे की दुर्ग, किल्ला किंवा दुर्गांच्या देशातूनचे संपादक ह्यावर विचार करतील.

मराठी साम्राज्याच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता दिली आहे ह्याचं प्रतिबिंब 'किल्ला' ह्या विषयाला वाहिलेल्या सगळ्या अंकांत ह्या वर्षी पडणार हे सांगायला कुठल्या ज्योतिष्याची गरज नाही. पण 'दुर्गांच्या देशातून' मध्ये ह्यावरची सविस्तर मुलाखत आधीच वाचली असल्याने आणि 'मराठा लष्करी स्थापत्य - महाराष्ट्र धर्माच्या प्रतीकांचा आंतरराष्ट्रीय गौरव' हे शीर्षक वाचून एड. आशिष शेलार ह्यांचा लेख संपूर्णपणे वाचायची अजिबात इच्छा झाली नाही. शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य उभं केलं ते हिंदुस्थानात राहणाऱ्या सर्वांसाठी होतं. त्यांच्या स्वतः:च्या सैन्यात, शासनात अनेक धर्मांचे लोक होते. हिंदू धर्म असलेल्या लोकांनी गैरवर्तणूक केली तर त्यांना कठोर शिक्षा झाली. त्यात 'आपला तो बाब्या' असला प्रकार कधीच नव्हता. पण इतिहासातलं सोयीस्कर तेव्हढंच उचलायचं आणि जे सोयीस्कर नाही त्याचा वेगळा नेरेटिव्ह सेट करायचा हाच पायंडा पडलाय. लेख चाळला तेव्हा किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत शासन बरंच काही करणार आहे असं कळलं. ही बोलाची कढी ठरू नये म्हणजे मिळवलं. नाहीतर राज्याची सध्याची स्थिती म्हणजे तिजोरीत खडखडाटाचीच आहे. बाकी ह्या वारसायादीत नसलेल्या अनेक किल्ल्यांची अवस्था काय आहे हे सुद्धा ह्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी अंकातले बाकीचे लेख वाचून जाणून घेतलं असेल अशी आशा करू यात. त्यांनासुद्धा चांगले दिवस आणा म्हणावं आता. असो.

पुढल्या अनेक लेखांतून कधी न ऐकलेल्या अनवट किल्ल्यांविषयी खूप छान माहिती मिळाली - कालिंजर (यशोधन जोशी), पुराना किला (डॉ. प्रसाद बर्वे), रिअल फेलीफ (अमित सामंत), साजरा गोजरा (अनिकेत वाघ) आणि बेतूल / खोलगड (संदीप मुळीक). जुनागड (संदीप तापकीर) आणि जिंजी (अमर श्रीरंग साळुंखे) हे लेख वाचून ह्या किल्ल्यांबद्दलसुद्धा बरंच काही नव्याने कळलं. 

किती किल्ले पाहायचे राहिलेत हे लक्षात येऊन छाती दडपून गेली. त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे किल्ले डोळसपणे पाहता यावेत म्हणून किती वाचावं आणि समजून घ्यावं लागणार आहे त्याचीही कल्पना आली. ह्या विषयात नवख्या असणाऱ्याने कशी तयारी करावी ह्यावर एखाद्या अंकात वाचायला आवडेल. 

'पोळेदुर्ग' हा एड. सीमंतिनी नूलकर ह्यांचा मधमाश्यांची पोळी आणि किल्ले ह्यातलं साम्य उलगडून दाखवणारा, 'हो ची मिन्ह सिटी'तल्या सैन्याने अमेरिकन सैन्याशी दिलेल्या कडव्या झुंजींबद्दल सांगणारा राजीव खांडेकर ह्यांचा, आसाममधील तोफांच्या वापराबद्द्लच्या इतिहासावरचा डॉ. तेजस गर्गे ह्यांचा आणि शिवराई नाण्यांवरचा पुरुषोत्तम भार्गवे ह्यांचा हे लेख सुरेख आहेत.

Wednesday, December 31, 2025

५. दुर्गांच्या देशातून (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ४००)

'दुर्गांच्या देशातून' चा ह्या वर्षीचा दिवाळी अंक 'एव्हरेस्ट विशेषांक' आहे हे पाहून मस्त वाटलं. 

संपादकांनी प्रस्तावनेत लिहिलंय की जरी त्यांनी एव्हरेस्ट सर केलेल्या अनेक लोकांना लेख लिहिण्याबद्दल संपर्क केला होता तरी त्यांना फार थोडे लेख मिळाले. सगळयांना लिहायचा उत्साह असतोच असं नाही आणि असला तरी ते जमेलच असंही नाही. अंकातले काही लेख वाचून ते कोणीतरी संपादित करायला हवे होते असं वाटलं. लेख म्हणजे नुसता माहितीचा पुरवठा नव्हे. अश्या लेखांना काही वर्षांपूर्वी महत्त्व होतं पण हवी ती माहिती एका बटणाच्या क्लिकवर मिळायच्या हल्लीच्या जमान्यात ती वाचणं रटाळ वाटू शकतं. एव्हरेस्ट सर करताना आलेल्या अनुभवांविषयी वाचताना उत्सुकता असते ती तयारी कशी केली, काय अडचणी आल्या, त्यावर मात कशी केली, प्रत्यक्ष चढाईच्या वेळी काय अनुभव आले, मन:स्थिती कशी होती ह्याविषयी.

त्या दृष्टीने गणेश मोरे, द्वारका डोखे, मिलिंद रासकर, कुंतल जोईशेर, चंद्रकला गावित आणि उमेश घेवरीकर ह्यांचे लेख विशेष आवडले. शिवकाळातल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित केलं त्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देणारी विकास खरगे ह्यांची डॉ. लता पाडेकर ह्यांनी घेतलेली मुलाखत माहितीपूर्ण आहे.

संपादकांनी सर्व लेखकांची ओळख प्रस्तावनेत न करता प्रत्येक लेखाच्या आधी द्यायला हवी हे दर वर्षीप्रमाणेच ह्याही वर्षी जाणवलं. 

बेस केम्पपर्यंत ट्रेक करायचा म्हटलं तरी किती तयारी करायला लागेल ह्याची अंधुकशी जाणीव हा अंक वाचून झाली. आणि पुढल्या १-२ वर्षात काही करून हे जमावायलाच हवं हे भान आलं :-(

4. ऋतुरंग (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ३००)

अंकाची सुरुवात 'त्यांना काही सांगायचंय' ह्या विभागातल्या गुलजार, विनोदकुमार शुक्ल, खुशवंत सिंग, भीष्म सहानी, शरद जोशी, मंटो , इस्मत चुगताई ह्यांनी लिहिलेल्या कथांनी झालेय. पुन्हा एकदा आपण हिंदी साहित्यातलं काही म्हणजे काही वाचलेलं नाहीये हे प्रकर्षाने जाणवलं. दरवर्षी हे नव्याने लक्षात येतं आणि मग कामाच्या धबडग्यात राहून जातं :-(

'अनुभवांची पटकथा' विभागात नवाजुद्दीन सिद्दीकी, शबाना आझमी, बोमन इराणी ह्यांच्यासारख्या चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींनी आपले अनुभव लिहिलेत. मारुती चितमपल्ली, नारायण सुर्वे ह्यासारख्या साहित्यिकांनी, हरिहरन, उषा उत्थुप ह्यांच्यासारख्या गायकांनी लिहिलंय. अशोक हांडे, गिरीश कुलकर्णी, मल्लिका अमर शेख ह्यांच्या आठवणी आहेत. त्याचसोबत संदीप वासलेकर, मिलिंद जोशी, ईश्वरचन्द्र हलगे ह्या निदान मला तरी माहीत नसलेल्या व्यक्तींचे अनुभवसुद्धा आहेत. आपली ओळख हरवून बसलेल्या निराधार व्यक्तींसोबत काम करताना डॉ. राजेंद्र धामणे ह्यांना आलेले अनुभव मन विषण्ण करून जातात. 

'मला उमजलेला माणूस' ह्या विभागात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, राज कपूर, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, झाकीर हुसेन अश्या अनेक प्रसिध्द्व व्यक्तींवरचे लेख आहेत. 'विशेष लेख' विभागातले जीवनानंद दास ह्यांच्या 'वनलता सेन' ह्या कवितेवरचा लेख आणि 'नेहरू गेले त्यावेळची गोष्ट' हा नारायण सुर्वे ह्यांचा लेख विशेष आवडले. 

'सांगण्यासारखे' ह्या विभागातल्या लेखांत सुशीलकुमार शिंदे, अच्युत पालव, धरिकांत बोजेवार, शुभदा चौकर ह्यांच्यासोबत आणखी अनेक व्यक्तींच्या आठवणींचा कोलाज आहे. 

ह्या व्यक्तींच्या आठवणी म्हणजे त्या त्या काळातल्या घटनांचं आणि पर्यायाने त्या काळाचंसुद्धा एक डॉक्युमेंटेशन आहे. फक्त आपल्याच अनुभवातून शिकायचं म्हटलं तर हे आयुष्य थोडं आहे. म्हणून हे अनुभव वाचणं एक वाचक म्हणून आणि एक माणूस म्हणून समृद्ध करून जाणारंच. 

Sunday, November 16, 2025

३. महा अनुभव (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये २५०)

'महा अनुभव' च्या ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या सुरुवातीला सुहास पळशीकर ह्यांचा लेख आहे. त्यांचं वृत्तपत्रातलं लिखाण मी वाचलंय. पण खरं सांगायचं तर लेखाच्या 'ज्ञानव्यवहारांवरील आक्रमण' ह्या शीर्षकाने मला बुचकळ्यात टाकलं. मराठी असूनही एव्हढं मराठी मला झेपण्यापलीकडलं. क्लिष्ट का होईना पण मराठी शब्दच वापरायचे हा आग्रह (का दुराग्रह!) संपादकांचा का लेखकाचा ते कळायला मार्ग नाही. पण मला भाषेचा सार्थ अभिमान असूनही असं म्हणावंसं वाटतं की अर्थ समजण्यास अडचण येणार असेल तर मराठीऐवजी मूळ इंग्रजी शब्द वापरायला हरकत नसावी. शेवटी भाव समजणं महत्त्वाचं. असो. एकंदरीत आजच्या काळातल्या  ज्ञान, अभ्यास, व्यासंग, संशोधन इत्यादी गोष्टींवर जे आक्रमण होऊ लागलं आहे, मेंदू बाजूला ठेवून फॉरवर्ड होईल त्यावर विश्वास ठेवायची जी वृत्ती बोकाळली आहे त्यावर हा लेख विस्ताराने भाष्य करतो. तरीही क्लिष्ट मराठी शब्द टाळता आले असते आणि लेख थोडा अधिक आटोपशीर करता आला असता असं वाटलं.

मीडियामध्ये आफ्रिकन देशांबद्दल फारसं लिहून येत नाही. आणि त्याबद्दल मुद्दाम काही जाणून घ्यावं इतका वेळ आणि उत्साह नसतोच आपल्याकडे. ह्या देशांचा इतिहास आणि सध्या तिथे काय चाललंय ह्याबद्दलचा मोहन द्रविड ह्यांचा लेख वाचनीय आहे. 

पुरातत्त्वशास्त्र हा माझ्या उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे. 'अर्ली इंडियन्स' ह्या टोनी जोसेफ ह्यांच्या पुस्तकाचा उल्लेख वाचून वाचायच्या पुस्तकांच्या यादीत हे नाव टाकतेय. तूर्तास भारतीय म्हणजे कोण, कुठून आले आणि कसे अश्या प्रश्नांचा उहापोह करणारी त्यांची ह्या अंकातली मुलाखत डोळे उघडणारी आणि खूप रंजक माहिती देणारी. 

काय खावं आणि काय खाऊ नये ह्याबद्दल आजकाल सगळीकडे लिहून येत असतं. त्यात बऱ्याचदा विसंगत माहिती असते. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस गोंधळून जातो. ह्यात एक sane voice म्हणता येईल अश्या ऋजुता दिवेकर. त्यांच्या ह्या विषयांवरच्या मतांवर लिहिलेला राजेश्वरी देशपांडे ह्यांचा लेख आपल्या आहाराविषयी जागरूक असणाऱ्या सर्वानी वाचण्यासारखा. अभिजित बेनर्जी ह्यांनी खाद्यसंस्कृतीवर दोन पुस्तकं लिहिली आहेत हे मला ह्या लेखातून समजलं.

मारुती चितमपल्ली ज्यांना माहीत आहेत त्यांना माधवराव पाटील हे नावसुद्धा परिचयाचं असणार. माझ्याही होतं. त्यांच्या आयुष्यावर विस्ताराने लिहिणारा रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ह्यांचा लेख वाचून ह्या कुटुंबाला भेटून यायला हवं असंच वाटतं. 

भारतीय रागसंगीत आपुलकीने शिकणाऱ्या परदेशी मंडळींबद्दल वाचून आपल्याला ह्याबाबत काहीच माहिती नाही ह्याचं पुन्हा एकदा वैषम्य वाटलं. 'मी पाहिलेला संघ' हा मुकुंद कुलकर्णी ह्यांचा लेख वाचून कुठल्याही शाखेत पाय न ठेवताही आपलं संघाविषयी मत योग्य आहे ह्याची खात्री पटली. अर्थात सध्याचा संघ पाहता एकनाथ रानडे ह्यांच्यासारखी विचारसरणी असणारे लोक कधीकाळी संघात होते ह्याचंच आश्चर्य वाटलं. सायबर फ्रॉड ह्याबद्दल, बिहार, झारखंड इथल्या sophisticated cells वर बरंच काही लिहून आलंय. तरी रवी आमले ह्यांचा ह्यावरचा लेख चक्रावून टाकतोच. 

'परबची अजब कहाणी' ही  मुकुंद प्रभुदेसाई ह्यांची कथा आवडली पण श्याम मनोहर ह्यांची 'एका गुंडाची आत्महत्या आणि जीवनाची गोष्ट' ही कथा पूर्णपणे डोक्यावरून गेली. मेघश्री दळवी ह्यांच्या ३ भविष्यवेधी कथा आवडल्या. रॉय किणीकरांचं अप्रकाशित साहित्य मला तरी झेपलं नाही.

एकूणात मनोरंजन आणि बौद्धिक खाद्य दोन्हीचा खुराक अंकातून भरपूर मिळाला :-)

Early Indians - Tony Joseph

Chhaunk - Abhijit Banerjee

Cooking to save your life - Abhijit Banerjee

२. लोकप्रभा (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये ५०)

आजकाल कुठलाही Apocalyptic म्हणजे जगाच्या विध्वंसावरचा चित्रपट पाहायचं मी सोडून दिलंय. जगाच्या कानाकोपऱ्यात जे चाललंय ते पाहून हा भविष्यकाळ फार दूर नाही अशी भीती वाटते.

लोकप्रभाच्या अंकातील सुरुवातीचाच 'निकोबार बांधता येईल?' हा लेख वाचून ह्या विनाशाची सुरुवात आपल्या देशापासूनच होतेय का काय अशी भीती वाटायला लागली आहे. किती उच्चकोटीचे बिनडोक निर्णय कुठलंही सरकार घेऊ शकतं हे हा लेख वाचून कळतं. प्रवाळ मूळ ठिकाणापासून उखडून काढून दुसरीकडे लावायची ही योजना वाचून तर डोक्याला हात लावावासा वाटला. उत्तराखंडमध्ये ह्या विकासाच्या हव्यासापायी ओढवलेला विनाश पाहूनही ही योजना रेटली जात असेल आणि त्याला विरोध होत नसेल तर आणखी काय बोलणार? मन फार उदास झालं हे वाचून. 'युध्दस्य कथा न रम्या' हा लेख वाचून हीच भावना झाली. दोन महायुद्धातला विनाश पाहूनही आपण माणूस म्हणून शहाणे झालो नाही. आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसांना मारताना, त्यांचा छळ करताना आपल्याला काहीही वाटत नाही. माणूस म्हणून हा आपला पराजय आहे. 

बुद्धिबळ हा खेळ खेळणाऱ्या लोकांबद्दल मला खूप आदर वाटतो. रिटायर्ड झाल्यावर मजा म्हणून का होईना पण हा खेळ शिकावा हे यादीत आहे. त्यामुळे दोमाराजू गुकेशवरचा लेख उत्सुकतेने वाचला आणि आवडला. नक्षलवादी चळवळीवरचा देवेंद्र गावंडे ह्यांचा लेख ह्या समस्येचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य सांगतो. ७/११ च्या मुंबईतल्या बॉम्बस्फोटांवरचा निशांत सरवणकर ह्यांचा लेख ह्या घटनेचा सविस्तर उहापोह करतो. 

ईशान्य भारत पाहून यायचा ही इच्छा अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मणिपूरच्या बराक नदीवरचा लेख आवडला. चिनी स्त्रियांनी एकमेकांत संपर्क साधण्यासाठी विकसित केलेल्या प्राचीन नु  शू लिपीवरचा लेखसुद्धा खूप मनोरंजक आहे. डॉ. उज्ज्वला दळवी ह्यांनी 'रंग' ह्या सामान्य विषयावर खूप मस्त माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. रंगांधळेपणाबद्दल वाचलं होतं. पण त्याची शास्त्रीय माहिती ह्या लेखात खूप सोप्या पद्धतीने दिली आहे. रंग सृष्टीत नसून आपल्या दृष्टीत असतात त्यामुळे एकच रंग दोन लोकांना वेगळा दिसू शकतो हे वाचून खरंच अवाक झाले. डॉक्टरी पेशातल्या लोकांनी अधिक लिहिलं पाहिजे. मग वैद्यकशास्त्र सामान्य जनतेलाही परिचयाचं होईल. दिवंगत डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांची ह्या निमित्ताने आठवण झाली. अशाच एका दिवाळी अंकात त्यांनी गर्भारपणावर खूप सोप्या भाषेत माहिती दिली होती. 

आशुतोष उकिडवे ह्यांचा विदेशातील मेट्रोवरचा लेख छान आहे. मल्याळममधल्या पहिल्या चित्रपटाच्या नायिकेबद्दलचा, पी. के. रोझीवरचा लेख, दखनी भाषेवरचा डी. के. शेख ह्यांचा लेख, फुलपाखरांवरचा सृष्टी अजय देशपांडे ह्यांचा लेख एरव्ही आपल्या वाचनात येणार नाहीत अश्या विषयावरची माहिती देतात. डॉ. राधिका टिपरे ह्यांचा गोठणगावाच्या वाघिणीवरचा छोटा लेख आवडला. त्यांनी अधिक विस्ताराने लिहायला हवं होतं.

'जत्रा' ह्या कथेतली चित्रं पाहून ती बालकथा असेल असं वाटलं होतं पण ती शोकांतिका निघाली आणि मन आणखी उदास करून गेली :-( 

Sunday, November 2, 2025

Jairam Ramesh’s ‘To the Brink and Back'

Montek Singh Ahluwalia’s ‘Backstage'

Rakesh Mohan’s ‘India Transformed’

C Rangarajan’s ‘Forks in the Road: My Days at RBI and Beyond’

Prof. Suresh Tendulkar and Prof. Bhavani’s ‘Understanding Reforms: Post 1991 India’ 

‘Strictly Personal’ by Daman Singh


Saturday, October 25, 2025

१. लोकसत्ता (दिवाळी अंक २०२५) (किंमत रुपये २००)

खरं तर ह्या वर्षीच्या अंकात एआय वर स्वतंत्र विभाग आहे हे अंकाच्या जाहिरातीत वाचून अंक घ्यायचा की नाही असा विचार करत होते. एआयचा घरीदारी, ऑफिसमध्ये एव्हढा भडीमार होतोय की आता त्याचं अजीर्ण होईल की काय अशी भीती वाटते. पण अंकातले बाकीचे लेख चांगले वाटत होते. म्हणून अंक घेतला.

पहिला लेख जर्मनीमधल्या टायटेनिक नावाच्या विनोदी मासिकावर. आपल्याला मोकळेपणाने शेरेबाजी करायची सवय नाही आणि विनोदाचे प्रकार समजून घ्यायची पात्रता नाही हे लेखक प्रशांत कुलकर्णी ह्यांचं मत अगदी मान्य. किंबहुना मी तर म्हणेन की त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करायला हवेत हेही आपल्या गावी नाही. सगळे कश्या ना कश्याने तरी आपल्या भावना दुखावून घ्यायला आणि त्याबद्दल शिमगा करायला एका पायावर तयार. असो. लेख खूप रोचक वाटलं. मासिक जर्मनमधून असल्याने आपल्याला वाचता येणार नाही ह्याची खंत वाटली. कारण ही भाषा शिकायचा प्रयत्न काही मी करणार नाही. शब्दातली अर्धी अक्षरं सायलेंट वगैरे प्रकार असला की त्या भाषेपासून दूर राहायचं असं ठरवलंय.

पुढला लेख १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात तिबेटचा प्रवास करून माहिती मिळवणाऱ्या नैनसिंग रावत ह्यांच्याबद्दलचा. मी तरी ह्याबाबत ना आधी कुठे वाचलं ना पाहिलं. आताच्या काळात एव्हढ्या सोयी असून कधी कधी प्रवास जिकिरीचा वाटतो तर तेव्हाच्या काळात असा प्रवास करायला काय चिकाटी लागत असेल. ह्या माणसाचं खूप कौतुक वाटलं. आयुष्यात असं काहीतरी करायला हवं. नाहीतर आम्ही आपले भाकरीचा चन्द्र शोधण्यात जिंदगी बरबाद करतोय. 

ह्यापुढला विभाग एआय वरच्या लेखांचा. स्पष्ट सांगायचं तर मला हा विभाग फारसा आवडला नाही. ह्या विषयावर सगळीकडे लिहून येतंय. इथे वेगळा असा काय विचार असणार होता? बरं विभाग करायचाच होता तर निदान सोप्या शब्दातले लेख हेर. बऱ्याच लेखात जे मराठी शब्द वापरलेत ते वाचून अक्षरश: वैताग आला. हा अट्टाहास लेखकाचा की संपादकांचा ते कळायला मार्ग नाही. काही काही लेख तर एआय वापरूनच लिहिले असावेत इतकी क्लिष्ट भाषा होती. मी काही लेख वाचले आणि उरलेले नुसते चाळले.

'उत्सवाचं डोंगरगाव' हा गिरीश कुबेर ह्यांच्या आगामी पुस्तकातला काही भाग वाचून एडिंबराला जायची इच्छा तर झालीच पण त्यांच्या पुस्तकाविषयीसुद्धा उत्सुकता आहे.

लोकेश शेवडे ह्यांचा पर्ल हार्बर वरचा हल्ला आणि हिरोशिमा आणि नागासाकी वरचा अणुबॉम्बचा हल्ला ह्यामधला घटनाक्रम उलगडून सांगणारा लेख हादरवून टाकतो. नाझी राजवटीने क्रौर्याचा किती कळस गाठला होता ते सर्वानाच माहिती आहे. पण जपानने आपल्या युध्द्वपिपासू वृत्तीपायी काय काय केलं हे वाचून अंगावर शहारे येतात. त्याला जपानी जनतेची बऱ्यापैकी साथ होती हे वाचून आधी आश्चर्य वाटलं. मग आपल्या मायभूतले पाकिस्तानशी युद्ध करावं ह्या मताचे आक्रस्ताळी लोक आठवले. त्यांना हा लेख वाचायला द्यायला पाहिजे. मला आधी ह्याही गोष्टीचं  आश्चर्य वाटायचं की नाझी एव्हढा अत्याचार करत असताना बाकी जग गप्प का होतं? आता इस्त्रायल-गाझा आणि रशिया-युक्रेन मध्ये जे चाललंय ते पाहून जग गप्प का होतं ते कळतंय. तेव्हा तर एव्हढी दळणवळणाची साधनं पण नव्हती. आता जगाच्या एका कोपऱ्यात कुठे खुट्ट झालं की जगभर समजतं तरी काही मूठभर देश वगळता बाकी देशांची अळीमिळी गुपचिळी आहे. युध्द्व हा कधीच कुठल्याही समस्येवर उपाय असू शकत नाही हेच खरं. 

सुधींद्र कुलकर्णी ह्यांचा आरएसएस वरचा लेख वाचू की वाचू नये ह्या दुग्ध्यात होते. उगाच 'ओवाळू आरती' टाईपचा लेख असेल ही भीती अनाठायी ठरली. तरी संघाचा मूळ दृष्टिकोन मुस्लिमविरोधी नाही हे वाक्य पचायला कठीण गेलं. 'हिंदुत्त्व आणि इस्लाम या देशात एकत्र राहू शकतात' हे संघाचे दुसरे सरसंघचालक ह्यांचं विधान असेल तर आजच्या संघाशी संबंधित बऱ्याच लोकांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. 

मी सहसा दिवाळी अंकातल्या कथा वाचायच्या फंदात पडत नाही. पण भारतीय भाषांतल्या कथा सध्या तरी वाचायला वेळ नाही. पण गौरहरी दास हे ओडिया भाषेतले प्रमुख कथाकार म्हणून गणले जातात हे वाचून त्यांची 'कोरापुट' ही कथा वाचली आणि आवडली. तरी हिंदी अनुवाद आणि मराठी अनुवाद हा उल्लेख वाचून ह्या सगळ्यात मूळ कथेतला किती आणि काय काय हरवलं असेल हा विचार मनात आलाच. 'नाममाहात्म्य' ही निखिलेश चित्रे ह्यांची कथासुद्धा हटके वाटली. 

हातमाग-विणकरांच्या जीवनावर लिहिलेला अवंती कुलकर्णी ह्यांचा लेख वाचून वाईट वाटलं. पण एव्हढ्या मोठ्या देशात जिथे पिकतं तिथून थेट विकत कसं घेता येणार? 

विनय सहस्त्रबुध्दे ह्यांचा 'अवघा जन्म इव्हेन्ट झाला' हा लेख वाचून करमणूक झाली. प्रत्येक गोष्ट इव्हेन्ट करणाऱ्या पक्षाशी संबंधित असणाऱ्या माणसाने ह्याबद्दल बोलावं? असो. 

'बाग' हा विजय पाडळकर ह्यांचा लेख खूप आवडला. त्यातल्या काही काही हायकूसुद्धा छान वाटल्या. कविता विभागात मेधा पाटकर ह्यांची 'लक्ष्मीपूजन' आवडली. प्रशांत कुलकर्णी ह्यांची व्यंगचित्रं छान. वार्षिक राशिभविष्य हे सदर वाचायचं नाही असं आता ठरवलंय. १२ महिन्यात काय काय होणार हे कुठे लक्षात राहणार. तेव्हा त्यात वेळ न घालवलेलाच बरा. शेवटी टाइम इज मनी!

Saturday, September 6, 2025

१०. दुर्गांच्या देशातून (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ४००)

अंक उघडला आणि दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा वाटून गेलं की अंकात लेख लिहिलेल्या सगळ्या लेखकांची माहिती एकदम संपादकीय सदरात देण्याऐवजी प्रत्येक लेखाच्या आधी दिली असती तर अधिक सयुक्तिक झालं असतं. एव्हढी सगळी माहिती एकादमात कोणी वाचत असेल का हा प्रश्नच आहे. वाचली तरी प्रत्येक लेख वाचताना त्या लेखकाबद्दल आठवणं कठिण. न आठवलं तरी पुन्हा मागे जाऊन संपादकीय वाचायचा उत्साह आणि वेळ किती जणांकडे असणार? म्हणजे ही माहिती देऊन उपयोग काहीच नाही. 

असो. अंकातील पहिला लेख आग्रा ते राजगड हा १६०० किलोमीटरचा पायी प्रवास २००६ मध्ये ३३ दिवसात पूर्ण केलेल्या कुलदीप देसाई ह्यांचा. तो वाचून मनोमन त्यांना अक्षरश: लोटांगण घातलं. एव्हढी गैरसोय सोसून मी काही ह्या फंदात पडले नसते. वाटेत लागलेल्या गावातल्या एखाद्या छोट्या पण छान मंदिरविषयी त्यांनी लिहिलेलं वाचून वाटतं आता ते मंदिर असेल काय? देसाई आणि त्यांच्या चमूने गावात थांबावं म्हणून आग्रह करणाऱ्या लोकांविषयी वाचून वाटतं असे लोक आता गावातूनही राहिले नसतील. कालाय तस्मै नम:. दुसरं काय म्हणणार?

दरवर्षीप्रमाणे हिमालयातल्या ट्रेकिंगवरचा एखाद लेख वाचला की बेस केम्प पर्यंत ट्रेक करायची इच्छा पुन्हा उचल खाते. संभाजी गुरव आणि लहू उघडे ह्यांचे  लेख वाचून पुन्हा तेच वाटलं. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी वाया चालली असताना हे स्वप्न हिमालयापेक्षाही दुर्गम वाटतंय. असो. पिंडारी ग्लेशिअर ट्रेक वरचा डॉ. लिली जोशी ह्यांचा लेख फार आवडला. विजयदुर्ग, रतनगड, हरिश्चंद्रगड, कंधारचा  किल्ला, पन्हाळगड ते विशाळगड ट्रेक, कोथळीगड आणि तुंगी ह्या किल्ल्यांवरचे लेख खास. उष:प्रभा पागे हे नाव ऐकून होते. पण त्यांच्यावरचा लेख वाचून अधिक माहिती मिळाली. 'पाचशेच्या नोटेची भुताटकी' हा वेगळा लेखसुध्द्दा आवडला. 

'किल्ला' हा माझ्या आवडत्या दिवाळी अंकांपैकी एक. त्याची सुरुवात आणि आजवरची वाटचाल ह्यावरसुद्धा एक छोटेखानी लेख आहे. मराठी माणसं एकमेकांचे पाय ओढण्यासाठी प्रसिध्द्व असताना एका संपादकाने त्याच विषयावरच्या दुसऱ्या अंकावरील लेख आपल्या अंकात समाविष्ट करणं आवडून गेलं.

दुसऱ्या राज्यातल्या किल्ल्यांबद्दलची माहिती हा ह्या अंकाचा विशेष. ह्या वर्षी राजस्थानमधले मेहरानगड, भानगड, हैदराबादचा गोवळकोंडा (हा मी पाहिलाय) आणि उदगीरचा भुईकोट ह्या गडांवर लेख आहेत. 

अन्य सदरांत व्यावसायिक गिर्यारोहण, किल्ल्यांवरील पक्षी आणि प्राणी, संभाजी राजांनी लिहिलेला बुद्धभूषणम, गडकिल्ल्यांचे संवर्धन, गडावर रस्ता चुकलेले ट्रेकर्स  किंवा अपघातात जखमी झालेले किंवा प्राण गमावलेले पर्यटक/गिर्यारोहक ह्यांच्यासाठी राबवलेल्या मोहिमा अश्या अनेक विषयांवरचे लेख आहेत. 

लेखांच्या ह्या विविधतेमुळेच हा अंक संग्राह्य आहे. आता २०२५ च्या अंकाची वाट पाहतेय.

Sunday, August 17, 2025

९. भवताल (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ३००)

भवतालच्या २०२४ च्या दिवाळी अंकात ह्या देशात बाहेरून आलेल्या व्यक्तींकडून पोशाख, अन्न, धर्म, वास्तू, भाषा इत्यादीत झालेल्या देवाणघेवाणीवर आधारित लेख आहेत. सध्याच्या आपल्याला सोयीस्कर असा इतिहास पुन्हा लिहिण्याच्या आणि धर्म-भाषा-संस्कृती-खाणं ह्याबद्दल टोकाचा अभिमान बाळगण्याच्या काळात असा अंक काढण्याचं धाडस केलं म्हणून संपादकांचं आणि आपल्या लेखातून ही अशी देवाणघेवाण समृद्धीकडे नेते म्हणून त्यात कमीपणा नाही तर अभिमान बाळगायला हवा असं ठासून सांगणाऱ्या लेखकांचं अभिनंदन करावं तेव्हढं थोडंच आहे. 

अंकातले सर्वच लेख सुरेख आहेत. पण मला आवडलेले काही खास लेख म्हणजे - महाराष्ट्रात २००० वर्षात आलेल्या लोकांनी इथल्या विविध गोष्टींवर कसा प्रभाव टाकला त्याचं विवेचन करणारा डॉ. अनुजा जोशी ह्यांचा लेख,  कोकणातल्या देवतांवरचा डॉ. दुर्गा काळे ह्यांचा लेख, भारत-इराण मधली सांस्कृतिक देवाणघेवाण उलगडणारा डॉ. अशोक राणा ह्यांचा लेख, मराठी भाषेत निरनिराळ्या संस्कृतीतून, भाषेतून शब्द, म्हणी, वाक्प्रचार कसे आले ते सांगणारा डॉ. केशव देशमुख आणि डॉ. नलिनी जोशी ह्यांचे लेख आणि खाद्यसंस्कृतीत बाहेरून आलेल्या लोकांमुळे कसे बदल झाले ह्यावरचे डॉ. कुरुष दलाल, डॉ. मोहसीन मुकादम आणि डॉ. सागर कारखानीस ह्यांचे लेख. 

बटाटा, मिरची, कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, शेंगदाणा, मका सगळं पोर्तुगीजांनी आणलं तर त्याआधी आपण खात तरी काय होतो असाही प्रश्न पडला. हे सगळं येण्याआधी आपली खाद्यसंस्कृती काय होती त्यावर एक लेख असता तर वाचायला आवडला असता. मुंबईतल्या रेस्टोरंटसवरचा डॉ. मोहसीन मुकादम ह्यांचा लेख तर खूपच आवडला. मराठा स्थापत्यावर इस्लामी आणि युरोपीय शैलीच्या पडलेल्या प्रभावावर डॉ. पुष्कर सोहोनी हयांनी लिहिलेला लेख वाचून मंदिरं, किल्ले ह्या जागा कश्या पाहिल्या पाहिजेत ह्यावर एक लेखमाला कोणीतरी लिहू शकेल असं वाटलं. असं डोळस पर्यटन होणं खूप गरजेचं आहे. 

भारतातलया आध्यात्मिक जीवनावर बाहेरून आलेल्या संस्कृतीने टाकलेल्या प्रभावावर अधिक लेख हवे होते. संगीत, नृत्य, साहित्य, पेहराव, घररचना आदी विषयसुद्धा घेता आले असते. कदाचित एका अंकात मावणारा हा विषयच नाही. 

भवतालच्या प्रत्येक अंकात डोक्याला भरपूर खाद्य देणारा मजकूर असतो. हाही अंक अपवाद नाही. यंदाच्या दिवाळी अंकात काय मजकूर असणार ह्याची आत्तापासूनच उत्सुकता लागली आहे.


Sunday, March 16, 2025

८. उत्तम अनुवाद (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ३५०)

दरवर्षी हा अंक घ्यावा का घेऊ नये असा मला प्रश्न पडतो. मागच्या एका वर्षीच्या अंकातली बरीच भाषांतरं मला कृत्रिम वाटली होती. मूळची कथा त्यामुळे दुर्बोध झाली असावी असंही वाटून गेलं होतं. पण ह्या वर्षी एकदा पुन्हा वाचून पाहावा म्हणून घेऊन आले. पण ह्या वर्षीही तसाच काहीसा अनुभव आला. त्यामुळे फक्त आवडलेल्या कथांबद्दल इथे लिहीते.

त्यातली पहिली गोष्ट ऑस्कर वाईल्डची 'मतलबी राक्षस'. लहान मुलांसाठीच्या गोष्टी वाचूनही अनेक वर्ष झाली आहेत. आता वाचल्या तर बऱ्याच गोष्टी अर्थातच बालिश वाटतात. पण ही गोष्ट आवडली. कदाचित खऱ्या परिकथेची, बालकथेची ओळख हीच असावी का? कुठल्याही वयात वाचली तरी आवडू शकेल अशी?

मला आवडलेली दुसरी गोष्ट डबल्यू सॉमरसेट मॉमची 'आजीवन ऐषोआरामाची कहाणी'. असं वाटलं की वयाच्या ४० किंवा ५० व्या वर्षी रिटायर्ड व्हायचं आहे तर किती सेव्हिंग्ज असावं हा प्रश्न विचारणाऱ्या सगळ्या लोकांनी ती वाचायला हवी.

तिसरी गोष्ट अर्थात एगथा ख्रिस्तीचं 'द माउसट्रॅप' हे नाटक. मुळात इंग्रजीतून वाचायला आवडलं असतं. पण आता समोर आलंच तर वाचून टाकलं. मजा म्हणजे खुनी कोण ह्याचा संशय आधीच आला होता. कदाचित काही वर्षं आधी वाचलं असतं तर आला नसता. आता इतक्या रहस्यकथा वाचनात येतात की 'व्यासोच्छिष्टम जगद सर्वम' का काय म्हणतात त्यातला प्रकार झाला आहे. 

तामिकी हारा ह्यांची 'भग्न अवशेषांमधून' ही हिरोशिमा-नागासाकी वरच्या हल्ल्यानंतरची भयाण परिस्थिती वर्णन करणारी गोष्ट वाचून हादरायला झालं. एकटी अमेरिका अण्वस्त्रसज्ज असताना ही गत तर आता जवळपास प्रत्येक राष्ट्र असली अस्त्रं बाळगून असताना एक ठिणगी पडली तर जगाचं काय होईल हा विचारसुद्धा करवत नाही. एलिस मन्रोची 'मुलगे आणि मुली' ही गोष्ट वाचून 'मुलीची जात' ही कल्पना जगात सगळीकडे थोड्याफार फरकाने तशीच आहे हे जाणवलं. पण शेवटचं वाक्य विचार करायला लावणारं आहे हे निश्चित.

'इकाल आणि त्याची शाळा' (जेव्हीअर पेनालोसा) ही मला आवडलेली आणखी एक गोष्ट. ती सुखांतिका आहे हे आणखी एक विशेष. मला ट्रॅजेडीज आवडत नाहीत.

मला आवडलेली ह्या अंकातली शेवटची कथा म्हणजे सर आर्थर क्किलर काऊचची 'फ्योडोर हिमकॉफने पाठविलेल्या भेटवस्तू'. 

'कविता' विभागातली एक कविता मात्र प्रचंड अस्वस्थ करून गेली. इतकी की 'कोण बाबा हा रमिन मजहर' म्हणून गुगलून पाहिलं. तर मूळचा अफगाणिस्थानचा असलेला आणि आता पेरीसमध्ये राहात असलेला हा कवी आणि पत्रकार. फारसीमधून लिहितो. त्याची 'मी माझ्या मातृभूमीला परत जाऊ शकलो तर' ही कविता अशी:

मी माझ्या मातृभूमीला परत जाऊ शकलो तर

मी माझी पुस्तके गोळा करेन

माझे आवडते कपडे

माझी रोजनिशी, फोटोंचा आल्बम

खिडकीच्या चौकटीत सुकून गेलेली फुले

आणि बरोबर घेईन माझा जन्मदाखला

पण माझ्या मित्रांची थडगी?

Saturday, March 15, 2025

1. Hermann Simon - Hidden Champions of the 21st Century

2. Ralph Wanger - A Zebra in Lion Country

3. Seth Klarman - Margin of Safety: Risk-Averse Value Investing Strategies for the Thoughtful Investor

4. Joel Greenblatt - ‘The Little Book That Still Beats the Market’ and ‘You Can Be a Stock Market Genius'


Saturday, March 1, 2025

७. महाअनुभव (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये २५०)

कधीकधी अंकाच्या सुरुवातीचा लेख पूर्ण अंक वाचण्याचा मूड ठरवतो. असं होऊ नये पण माझ्याबाबतीत होतं खरं. सुदैवाने ह्या अंकाची सुरुवात सुहास पळशीकर ह्यांच्या 'मिथ्याकथनाच्या विळख्यात' ह्या लेखाने झाली आहे. टीव्ही, इंटरनेट, वर्तमानपत्रं ह्यातून आजकाल जो असत्य, दुही माजविणाऱ्या माहितीचा भडीमार चालू आहे त्यावर ह्या लेखात सखोल चिंतन आहे. ते वाचून डोकं शाबूत असलेला कोणताही माणूस काळजीत पडेल.

टेलर स्विफ्टबद्दल बरंच काही ऐकून असले तरी मी तिची गाणी काही ऐकलेली नाहीत. राजेश्वरी देशपांडेंचा 'टेलर स्विफ्ट नावाचं जांभळं धुकं' हा लेख वाचून ती गाणी एकदा ऐकून पाहावी असं वाटलं. 'जनुकं जेव्हा कात्रीत सापडतात' हा लेख वैद्यकीय पार्श्वभूमी नसलेल्या वाचकांना क्लिष्ट वाटू शकेल. मी खूप वाचायला घेतला पण अर्धवट सोडून दिला. क्लिष्ट वैद्यकीय माहिती सोपी करून सांगणाऱ्या डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांची आठवण झाली. काही वर्षांपूर्वी त्यांचा गर्भाच्या वाढीच्या प्रवासाचा लेख वाचून अवाक व्हायला झालं होतं. असो.

उत्तराखंडमधल्या वनगुज्जरांबद्दल कधी काही वाचनात आलं नव्हतं. ह्या भटक्या लोकांच्या आयुष्याचं त्यांच्या सोबत प्रवास करून, राहून दस्तावेजीकरण करणाऱ्या मायकल बेननाव्हचं खूप कौतुक वाटलं. विटा ह्या सांगलीतल्या दुष्काळी भागातल्या लोकांनी सोनं गाळायच्या व्यवसायात शिरून आपली आणि गावाची भरभराट कशी केली ते 'विटा दुष्काळी झळा ते सुवर्णझळाळी' ह्या लेखात वाचायला मिळतं. मराठी माणूस धंद्याला कसा नालायक हे वाचून वाचून वैताग येतो. त्यामुळे हा लेख वाचून नाही म्हटलं तरी बरं वाटलं :-)

नवऱ्याचं कौतुक करणारे 'आमचे हे' छाप लेख वाचायची सवय झाल्याने 'विमल आणि मी' हा नरेंद चपळगावकर ह्यांनी त्यांच्या 'ही' वर लिहिलेला लेख वाचून सुखद धक्का बसला.

अस्मिता पोतदार ह्यांची भरतकाम करून काढलेली चित्रं पाहून अक्षरश: अवाक व्हायला होतं. देव काय कला ठेवतो एकेकाच्या हातात. पण ह्या कलाकृतींना किंमत नाही हे वाचून वाईट वाटलं. 

यशोदा वाकणकर ह्यांचा वडील अनिल अवचट ह्यांनी अनेक वर्षांपूर्वी बिहार दुष्काळाच्या वेळेस केलेल्या पूर्णिया प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी केलेल्या प्रवासावरचा लेख आवडला. माझी आई जेव्हा तिचं बालपण जिथे गेलं त्या जागांविषयी सांगते तेव्हा तिथे जाण्याचा मोह होतोच. अगदी त्या जागा आता ओळखू न येण्याइतक्या बदलल्या असतील हे माहीत असूनसुद्धा. त्यात अन्न न मिळाल्याने जिथे अन्न मिळू शकत होतं त्या घराच्या दरवाज्याबाहेर मरण पावलेल्या एका गरीब महिलेबद्दल वाचून कसंतरीच होतं.

कोकणातल्या पेशंटवरचा डॉ. मिलिंद कुलकर्णी ह्यांचा लेख छान जमलाय. ह्या वर्षीही त्यांचा लेख वाचायला आवडेल.

इटालीतल्या माफिया युद्धात बळी गेलेल्या लोकांचं आणि ह्या भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या सर्वसामान्य लोकांचं आयुष्य आपल्या केमेर्यात बंदिस्त करणाऱ्या लेंटिसीया बतालया वर नितीन दादरवाला हयांनी लिहिलेला लेख वाचून एव्हढी रिस्क घेऊन हे काम करणाऱ्या ह्या बाईची कमाल वाटते. तिने काढलेले काही फोटो ह्या लेखात आहेत. ते पाहून तेव्हाच्या तिथल्या भीषण परिस्थितीची कल्पना येते.

ह्या वर्षीही दिवाळीत हा अंक घेईन बहुतेक. 

६. ऋतुरंग (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ३००)

अंकाच्या सुरुवातीलाच गुलजारांचा फोटो पाहून खुश झाले. पण पुढचाच विभाग कवितांचा आहे म्हटल्यावर 'अरे बाप रे!' अशीही प्रतिक्रिया झाली कारण कविता बहुतकरून समजत नाहीत असाच अनुभव आहे :-)

पण वसंत आबाजी डहाके ह्यांचा गुलजारच्या कवितेवरचा लेख समजला आणि आवडला देखील. सुरुवात तर चांगली झाली म्हणायची. मग ह्या मालिकेतले पुढले सारेच लेख आवडले. मी कवितेवर एव्हढा खोल विचार करतच नाही हेही जाणवलं. शब्दाचे वरवरचे अर्थ लावून सोडून द्यायची सवय लागली आहे. पण कविता ह्याहून अधिक वेळ आणि विचार मागते. 

मी हिंदी सिनेमा फारसा पाहत नाही. पण 'स्त्री' युनिव्हर्स मधले 'मुंज्या' सोडला तर बाकीचे सारे चित्रपट आवडले होते. नुकताच 'स्त्री २' पहिला. खरं तर तो एव्हढा आवडला नाही. पण त्यातलं पंकज त्रिपाठीचं काम आवडलं होतं. 'तोच क्षण होता' हा 'मनामनातले आवाज' ह्या विभागातला त्यांचा पहिलाच लेख आवडला. ह्या विभागातले बाकीचे लेखही आवर्जून वाचण्यासारखे. 

सोनम वांगचुक ह्यांनी त्यांच्या उपोषणावरचा आणि धीरज अकोलकर ह्यांचा महायुद्धामुळे जन्मलेल्या मुलांच्या मानवाधिकार न्यायालयात लढलेल्या लढाईवरचा लेख वाचून सुन्न व्हायला झालं.

'असहमतीचा आवाज' ह्या विभागात अनेक जणांनी आयुष्यात कोणाशी असहमत व्हायचे क्षण आले त्याबद्दल लिहिलं आहे. बहुतेकांचा सूर जे केलं ते योग्यच होतं असा होता . एखादा असा किस्सा वाचायला आवडला असता ज्यात हा निर्णय चुकीचा निघाला. पण चुकांची जाहीर कबुली द्यायला कोणाला आवडतं म्हणा असो.

'आतला आवाज' विभागात रॉजर फेडररने हॅनोव्हरमधल्या एका कॉलेजात पदवीदान समारंभाच्या वेळी जून २०२४ मध्ये केलेल्या भाषणाचा अनुवाद वाचायला मिळाला. टेनिस कळत नसूनही ह्या माणसाबद्दल मला फार आदर आहे. हे भाषण मूळ इंग्रजीतून वाचायचं ठरवलंय.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ह्यांच्या भाषणाचा अनुवादही वाचण्यासारखा आहे. 

मला आणखी खूप आवडलेला विभाग म्हणजे 'संतवाणी'. संत तुकाराम, रामदास, एकनाथ, कबीर आणि शेख महंमदमहाराज ह्यांच्या  रचना उलगडून सांगणारे लेख ह्या सदरात आहेत. संतवाङमय वाचायला वेळ काढायला हवा हे जाणवून गेलं.

'आवाज कोणाचा' ह्या विभागातला सर्वात आवडलेला लेख मृदुला-दाढे जोशी ह्यांचा किशोरकुमारवर लिहिलेला. किशोर इतका ऐकूनही समजून उमजून ऐकलंच नाही ही जाणीव ह्या लेखाने दिली. 

एकुणात जे लेख आवडले त्यांनी निखळ वाचनआनंदापेक्षाही अधिक काही पदरात टाकलं.

Tuesday, February 4, 2025

५. दुर्ग (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ३५०)

मागच्या महिन्यात सहज म्हणून चेक केलं तर 'किल्ला'चे जवळपास मागचे ८-१० दिवाळी अंक संग्रहात आहेत. त्यामानाने दुर्ग आणि दुर्गांच्या देशातूनचे कमी अंक आहेत. मात्र का ते लक्षात येत नाहीये. २०२४ पासून हे दोन्ही दिवाळी अंक सुद्धा जपून ठेवायचे ठरवलं आहे.

'किल्ला' चा अंक वाचताना लक्ष न गेलेली एक गोष्ट इथे लक्षात आली ती म्हणजे बहुतांश लेख पुण्याच्या लेखकांचे आहेत. नाशिक आणि इतर ठिकाणच्या मंडळींनी सुद्धा लिहिलंय पण मुंबईमधलं कोणी नाही. मुंबईमधूनसुद्धा ट्रेकिंगला जाणारे बरेच लोक आहेत की. पण त्यांचा एकही लेख नाही. ह्याचं कारण काय असावं कळत नाही. असो. २०२४ च्या दिवाळी अंकात एकूण २१ लेख आहेत. 

पैकी पहिला अमित मराठे ह्यांनी लिहिलेला लेख कुठल्याही गड-किल्ल्यावर नसून महाबळेश्वरच्या दक्षिणेला असलेल्या कांदाटच्या जंगलाच्या भटकंतीवर आहे. छान माहिती असलेला हा लेख आपणही ही भटकंती करून यावी असंच वाटायला लावतो. झाशीच्या राणीबद्दल आपण सर्वानीच ऐकलं-वाचलेलं असतं. पण किल्ल्याची माहिती फारशी नसते. अमोल सांडे ह्यांचा लेख राणी लक्ष्मीबाईंच्या आधीपासूनचा झाशीचा इतिहास आणि प्रत्यक्ष किल्ला ह्याबद्दल साद्यन्त माहिती देतो. महाराष्ट्रातले किल्ले बघायला अजून मुहूर्त सापडला नाही तर हे बाकीच्या भारतातले किल्ले कधी पाहणार हा विचार नाही म्हटलं तरी डोक्यात येऊन गेलाच. इलाज नाही :-(

किल्ला म्हटलं की चढायला कितपत सोपा हा विचार आधी मनात येतो. अंकुर काळे ह्यांच्या लोहगडावरच्या लेखात गडाच्या महाद्वाराचा फोटो पाहूनच गडाच्या प्रेमात पडायला झालं. रतनगडाचा उल्लेख आधी वाचनात आलेला असला तरी मृगगड आणि सोनगिरी ह्याबद्दल राज मेमाणे ह्यांच्या लेखातून प्रथमच वाचायला मिळालं. मोडी कागदपत्रांचा अभ्यास करताना ह्या गडांच्या इतिहासाबद्दल त्यांना माहिती मिळाली. आपण मोडीचा अभ्यास सुरु ठेवला नाही ह्याचा पुन्हा एकदा खेद वाटला.

महाबळेश्वरजवळच्या प्रतापगडाविषयी वाचलं होतं आणि जावळीचे खोरं शिवाजी महाराजांनी मोरयांना घडवलेल्या अद्दलीबद्दल वाचून माहीत होतं. पण विदर्भातसुद्धा एक प्रतापगड आहे ही  माहीती नवीन. त्यामुळे विनीत दाते ह्यांचा लेख उत्सुकतेने वाचला. त्यातला गडाच्या वाटेवरच्या जंगलाचा फोटो एव्हढा सुरेख आहे की तो पाहूनच तिथे जायचा मोह व्हावा. गम्मत म्हणजे महाबळेश्वरजवळच्या प्रतापगडाविषयी साईप्रकाश बेलसरे ह्यांनी सुद्धा एक लेख लिहिलेला आहे. भूतकाळात होऊन गेलेल्या राजवटींनी पाडलेली नाणी हा कायमच कुतूहलाचा विषय. निखिल दीक्षित ह्यांनी नाण्यावरच नाही तर दुर्ग-किल्ल्यांवर असलेल्या टांकसाळीवर माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. मला तर सगळी नाणी सारखीच दिसत होती. :-) वेगळी कशी ओळखतात ते लेखात दिलं होतं तरी बरीच चिन्हे निदान मला तरी नाण्यांवर दिसली नाहीत :-(

रवळ्या-जवळ्याचा फक्त उल्लेख आधीच्या अंकांत वाचला होता. पण टाकीरा आणि चौंगावचा किल्ला ह्यांचा उल्लेख आठवत नाही. म्हणून ह्या सगळ्या किल्ल्यांवरचे लेख वाचायला मजा आली. मोहनगड आणि पारमाची नाळ ट्रेक चा लेख (ओंकार ओक) वाचून आपणच तो ट्रेक केल्यासारखं वाटलं. प्रचितगडाची प्रचिती (डॉ. हेमंत बोरसे) एका फसलेल्या ट्रेकची गोष्ट सांगतो. 'पदरगडाशी झटापट' हा अरविंद देशपांडेंचा लेख वाचून तर त्यांना खरोखर साष्टांग नमस्कार घालावयास वाटला. एव्हढं धाडस काही आपल्याच्यानं झालं नसतं.

किल्ले बाणकोट (शलाका वारंगे) आणि वसंतगड (रेणुका काळे) हे लेख लिहीणार्या लेखिका आहेत हे वाचून सुखद धक्का बसला. नाहीतर हे बहुतांश लेख पुरुष ट्रेकर्सनीच लिहिलेले असतात. त्याबद्दल अर्थातच काही तक्रार नाही. पण तरी एक स्त्री म्हणून ह्या स्त्रियांचे लेख वाचून आनंद वाटला हे कबूल करायलाच हवं :-)

मुडागड (शिवप्रसाद शेवाळे), मिरजन (मिलिंद आमडेकर), तळा-घोसाळगड (संकेत शिंदे) बद्दल सुद्धा कधी ऐकलं नव्हतं. चिपळूण तालुक्यातल्या नवतेदुर्ग, कासारदुर्ग आणि माणिकदुर्गची ओळख राहुल वारंगे करून देतात. संतोष जाधव हयांनी नाणेघाटाजवळच्या निमगिरीवर लिहिलं आहे. त्या लेखातल्या फोटोत किल्ल्याकडे जाणाऱ्या उभ्या पायऱ्या बघून छाती दडपते. अपरिचित दुर्गांबद्दल डिटेल माहिती देणारे असे लेख हे गड-किल्ल्यांना वाहून घेतलेल्या साऱ्याच अंकांचं वैशिष्ट्य आहे. 

अंकाच्या शेवटी रियासतकारांवरचा छोटेखानी लेख नंदन वांद्रे ह्यांनी लिहिलाय. मराठी रियासत (हिचे ८ खंड असावेत असं लेखाच्या शेवटच्या जाहिरातीवरून कळतं), ब्रिटिश रियासत, मुसलमान रियासत (ह्यांचे किती खंड आहेत देव जाणे) हे सगळे वाचायची इच्छा झाली. 

आता खरोखर 'हजार ख्वाहिशें ऐसी' च्या वर ख्वाहिशें झाली आहेत :-) बाकी मनोरथ तडीस नेण्याचं काम देवाजीचं! आपण काय रंगमंचकी कठपुतलिया!

Thursday, January 30, 2025

४. कालनिर्णय (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ३२५)

पहिल्याच लेखाचं 'आपत्तींची उत्क्रांती' हे शीर्षक वाचून पोटात गोळा आला. अर्थात वर्तमानपत्रात रोजच ह्याबद्दल काही ना काही छापून येतं. आणि बाकी सगळ्या छानछान बातम्या वाचायचं सोडून असल्या वास्तवदर्शी बातम्याच वाचायची खोड असल्याने वाचलं जातं त्यामुळे लेखात काय असेल ह्याचा थोडाफार अंदाज होताच. पण ह्या बाबतीत देशातच काय पण विदेशातही सर्वांचा मौनीबाबा झालाय. जे बाकीच्यांचं होणार तेच आपलं अशी 'जे बदलता येत नाही ते सहन करण्याची शक्ती दे' ह्या प्रार्थनेनुसार भूमिका ठेवली आहे. तरी जे वाचलं त्याने हादरून जायला झालंच. 'दो बिघा जमिनीत' मधल्या ज्या गाण्याच्या ओळी लेखाच्या शेवटी उद्धृत केल्या आहेत त्यातली 'कौन कहे इस ओर तू फिर आये ना आये' ही ओळ समस्त मानवजातीला उद्देशून आहे असंच वाटलं. 

समुद्राची सोबत असलेल्या मुंबईत जन्म झालेला असूनही समुद्रापेक्षा नेहमीच जंगल आणि पर्वत ह्यांचं आकर्षण मला कायम राहिलं. 'भाकरीचा चंद्र' शोधायची अपरिहार्यता शहरात राहायची मजबुरी आहे. त्यामुळे मेळघाटावरच्या सुनील लिमयेंच्या लेखाच्या सुरुवातीचा जंगलाचा फोटो पाहून जीव अगदी एव्हढा एव्हढा झाला. लेख सुरेख आहे पण त्यांनी अजून लिहायला हवं होतं असं वाटलं. कालनिर्णयच्या ह्या वर्षीच्या अंकातसुद्धा त्यांचा लेख वाचायला आवडेल. 'किल्ला' ह्या विषयावर अंक निघू शकतात तर 'जंगल' ह्या विषयावर सुद्धा कोणीतरी दिवाळी अंक काढायला हवा.

'द न्यू यॉर्क बुक ऑफ रिव्ह्यूज' बद्दल मला वाटतं लोकसत्ताच्या 'बुकमार्क' सदरात वाचलं. रॉबर्ट सिल्व्हर्स' ह्या त्याच्या संपादकाची ओळख करून देणारा लेख निळू दामले ह्यांनी लिहिलाय. १९६३ ते २०१७ म्हणजे जवळपास ५४ वर्ष ह्या माणसाने ही जबाबदारी निभावली हे वाचून तर मी मनोमन त्याला दंडवतच घातला. अगदी मृत्यूपर्यंत त्यांनी काम केलं हे वाचून आणखी एक दंडवत. नाहीतर कट्टयावर बसून राजकारणी लोकांवर निरर्थक चर्चा करणारे सिनियर सिटिझन्स रोज पार्कात दिसतातच की.

लावणीची आणि माझी ओळख लहानपणी टीव्हीवर लागलेल्या जुन्या तमाशाप्रधान चित्रपटांतून झालेली. त्यामुळे ह्या कलाप्रकाराबद्दल फारसं चांगलं मत असायचं काही कारण नव्हतं. पण मग लावणीची वेगळी ओळख करून देणारे लेख वाचनात आले आणि मत बदलायला सुरुवात झाली. तरी बैठकीची लावणी ह्या प्रकारची फारशी माहिती नव्हती. ही लावणी सादर करणाऱ्या यमुनाबाई वाईकर ह्यांच्यावर प्रकाश खांडगे ह्यांनी लिहिलेल्या लेखातून ती झाली. 

शास्त्रीय संगीत हा अस्मादिकांच्या घोर अज्ञानाचा आणखी एक प्रांत. त्यामुळे मारुबिहाग आणि प्रभा अत्रे ह्यांच्यावर लिहिलेला अमरेंद्र धनेश्वर ह्यांचा लेख कितपत झेपेल ही धागधुग घेऊनच वाचला. लेखात १९५५ च्या आसपास आलेल्या एका ध्वनिमुद्रिकेवर असलेल्या तरुण प्रभा अत्रेंचा फोटो फार सुरेख आहे.

'नाकमोठा नायक आणि अनुवादित बालसाहित्य' ह्या पंकज भोसले ह्यांच्या लेखात १९९० नंतर मराठी बालसाहित्याची पीछेहाट कशी झाली त्याचा आढावा घेतला आहे. तो वाचून मला 'नंदूचा यांत्रिक माणूस' आणि 'नंदू उडाला आकाशी' ही पुस्तकं शोधण्याचा खटाटोप आठवला. लहानपणी वाचलेली चिनी, जपानी परीकथांची पुस्तकं ज्यांची नावं आठवत नाहीत पण आतल्या कथा आठवतात तीही ह्या निमित्ताने आठवली. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. ह्या लेखात कितीतरी अश्या बालपुस्तकांचा उल्लेख आहे जी मी माझ्या बालपणीसुद्धा वाचली नव्हती :-( मन खंतावलं. 

'म्युनिक बर्लिन पेरीस' (जयराज साळगावकर), 'टेरेन्टीनो इज फन' (महेंद्र तेरेदेसाई), 'तिबेटमधील मुद्रणतंत्राचा सुवर्णइतिहास' (मुरली रंगनाथन), 'आठवणी दळवी यांच्या' (रविप्रकाश कुळकर्णी) हे आणखी काही आवडलेले लेख.

कविता फारशी कळत नसूनही खास आवडलेल्या कविता म्हणजे जबाबदारी (प्रशांत असनारे), बुडत्या गोष्टी मला आतून खुडून टाकतात (संदीप शिवाजीराव जगदाळे), ज्याची त्याची पायरी (वीरा राठोड) आणि फुलपाखरू (नामदेव कोळी). लघुकथा सेक्शनमधल्या आवडलेल्या कथा म्हणजे होरा (सोनाली करमरकर), बोन्साय (भरती मेहता), वारी (डॉ. कृष्णकांत नाबर), घर (वर्षा गव्हाणे), आरे रे (अमोल जडे) आणि वटपौर्णिमा (सुषमा पोतदार). तरी ह्यातल्या काही कथा अधिक चांगल्या पद्धतीने लिहिता आल्या असत्या असं वाटलं. किरण येलेंची 'मुंडू' आवडली. 

प्रशांत कुलकर्णी ह्यांची 'घुसखोरी पेंटिंग्जमधली' ही व्यंगचित्रं खूप आवडली. मात्र 'कुटुंब रंगलंय पाककृतीत' मधल्या विजेत्या पाककृती काही अपवाद वगळता खास वाटल्या नाहीत.