दरवर्षीप्रमाणेच मागल्या वर्षीही हा अंक घेतला. अंकाच्या सुरुवातीलाच 'संपादकीय' मध्ये 'किमान ह्या वर्षीचा तरी अंक काढू या असं ठरवून हा अंक मार्गी लावला आहे' हे वाक्य वाचून वाईट वाटलं. दरवर्षी नवेच लेखक असायला हवेत हा अट्टाहास का आहे ते कळलं नाही. लेख दर्जेदार असले म्हणजे झालं. असो. ह्या वर्षी दिवाळीला हा अंक वाचायला मिळेल ही आशा आहे.
पहिलाच लेख 'अष्टदशकातला भीमपराक्रम'. ८० व्या वर्षी ८ महिन्यात ८० किल्ले करणं कौतुकास्पद आहे हे खरंच . पण म्हणून त्याला स्वतः:च 'भीमपराक्रम' म्हणणं थोडं विचित्र वाटलं. तरी लेख वाचायला सुरुवात केल्यावर अरविंद दीक्षित ह्यांचा 'मी इतिहास संशोधक नाही किंवा किल्ल्यातलं मला फारसं काही कळत नाही. किल्ल्यांना भेट द्यायचा थरार अनुभवायचा होता' हा प्रांजळपणा आवडला. किल्ल्यापर्यंतचा प्रवास हा थोडातरी खडतर हवा ह्या त्यांच्या मताशी तर मी अगदी सहमत. ८१ होण्यापूर्वीच (तेव्हढं जगेन की नाही काय माहित!) ८१ किल्ले पाहून होतील का हा विचार डोक्यात आलाच. मला मात्र किल्ला माहिती घेत पाहायला आवडेल. खूप फोटो काढून ती माहिती टिपून ठेवायला आवडेल. असो.
ह्यापुढल्या लेखावरचं 'विश्वास पाटील' हे नाव वाचून अगदी सरसावून बसले. पण लेख सुरु व्हायच्या आधीच संपल्यासारखा वाटला. शिवाजीमहाराजांच्या बसरूरच्या आरमारी मोहिमेवर अधिक वाचायला आवडलं असतं.
'शिवछत्रपतींचे शिलेदार आणि गडकोट' ह्या लेखात पन्हाळगड, विशाळगड, पुरंदर ह्या परिचयाच्या गडांसोबत साल्हेर आणि कुर्डूगड ह्या तुलनेने मला कमी माहिती असलेल्या किल्याबद्दल माहिती मिळाली. तशीच भरपूर माहिती कंधार ह्या नांदेडजवळील किल्ल्याबाबत डॉ. सुनील पुरी ह्यांच्या लेखातून मिळते. गोवा म्हणजे देवस्थानं - मग ती मंदिरं असोत वा चर्चेस - आणि बीचेस ह्या समीकरणाला छेद देणारा डॉ. विनय मडगांवकर ह्यांचा छोटेखानी लेख कोलवाळच्या किल्ल्याबद्दल आहे. असेच छोटे लेख फलटणजवळच्या वारुगड आणि संतोषगडवर (डॉ. दत्तात्रय देशपांडे), वसंतगडवर (विक्रमसिंग मोहिते) ह्यांचे आहेत.
गड-किल्ल्याबद्दल नसलेला पण गिर्यारोहण ह्या तेव्हढयाच रोमहर्षक विषयाला स्पर्श करणारा विवेक वैद्य ह्यांचा मलेशियातलया किनाबालु वरचा लेख फार आवडला.
ट्रेकिंग, गिर्यारोहण म्हटलं की अपघातांची शक्यता आलीच. अपघात घडण्याच्या ३ प्रमुख कारणांबद्दल आणि ते टाळण्याच्या उपायांवर वसंत वसंत लिमये ह्यांनी खूप महत्त्वपूर्ण लेख लिहिला आहे.
'गढी' हा शब्द मी ऐकलेला असला तरी त्याचा नक्की अर्थ काय ते मला अजूनही माहित नाही. तरी ह्यावरचा प्रवीण हरपळे ह्यांचा लेख वाचून थोडीफार कल्पना येते. महाराष्ट्रात किती आणि काय काय पाहण्यासारखं आहे ते जाणवून अगदी दडपून जायला होतं. पुन्हा एकदा हजारो ख्वाहिशें ऐसी ची आठवण झाली. मला हे सगळं पाहायचा मुहूर्त लागेस्तोवर ह्यातलं काय काय टिकून राहतं ही चिंता मात्र लागली.
'गडकिल्ल्यांचा चित्रकार' ह्या लेखात हरेश पैठणकर ह्यांनी किल्ल्यांची चित्रं काढायच्या आपल्या अनुभवावर लिहिलं आहे. चित्रकला आणि माझा ३६ चा आकडा असल्याने बरंच काही डोक्यावरून गेलं. पण ही चित्रं पाहायला नक्की आवडेल.
दुर्गांशी निगडित पण ट्रेकिंग किंवा गिर्यारोहण वगैरेंशी संबंध नसलेला एक लेख ह्या मांदियाळीत आहे - डॉ. लता मुळे-पाडेकर ह्यांचा. श्री ज्ञानेश्वरी मधल्या किल्ल्यांच्या उल्लेखाबाबत सांगणारा. 'एक तरी ओवी अनुभवावी' म्हणून दिलेल्या ओळींचा अर्थ वाचायच्या आधी मी आपल्या परीने तो लावायचा प्रयत्न केला खरा. पण ते काही जमलं नाही :-)
असाच आणखी दोन वेगळे लेख आहेत. पहिली, ओंकार ओक ह्यांचा 'गणेशपुराण'. नावावरून मला वाटलं की किल्ल्यात आढळणार्या गणेशाच्या प्रतिमा, मूर्ती ह्यावर असेल. मी काही ट्रेकिंग करत नाही. त्यामुळे गणेश गीध हे नाव मला माहित असायचं काही कारण नाही. पण ह्या रॉक क्लाइम्बर आणि रेस्क्यू टीमचा सदस्य असलेल्या अवलियाच्या जगावेगळ्या गोष्टीत आवर्जून वाचावं असं बरंच काही आहे. दुसरा लेख उणंपुरं १३ वर्षं वयोमान असलेल्या पण दहाव्या वर्षीच १०० हुन अधिक किल्ले पाहिलेल्या साई कवाडे ह्या सह्याद्रीपुत्राने लिहिलेला.
रायगडाचे स्थापत्यविशारद हिरोजी इंदलकर ह्यांच्यावर त्यांचे वंशज असलेल्या अशोक इंदलकर ह्यांनी लिहिलेला लेख आवर्जून वाचण्यासारखा. राजधानीचा गड उभारायला ज्याने आपला राहता वाडा आणि शेती विकायला मागेपुढे पाहिलं नाही त्याने बक्षीस मागायची वेळ आली तेव्हा फक्त जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीच्या एका दगडावर आपलं नाव कोरायची परवानगी मागितली. कसल्या मातीचे बनले होते हे लोक? नाहीतर इथे आमदार निधीतून (स्वतः:च्या खिशातुन नव्हे!) हजार वेळा दुरुस्त केलेल्या फुटपाथच्या फरश्या (पुन्हा फुटण्यासाठी) बदलतात आणि मोठ्ठाले बेनर्स लावून त्याची जाहिरात करतात. कालाय तस्मै नम:! दुसरं काय?
किल्ले म्हटलं की बालेकिल्ल्याचा उल्लेख अपरिहार्य. पण हा बालेकिल्ला नक्की असतो तरी काय आणि तो किल्ल्याच्या कारकिर्दीत किती मोलाची कामगिरी बजावतो हे 'बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याचं हृदय' ह्या कृष्णा घाडगेंच्या लेखातून समजतं.
अंकातले शेवटचे ५-६ लेख दुर्गसंवर्धनासाठी निरनिराळ्या संस्था करत असलेल्या कामाची माहिती देतात. पण खरं सांगायचं तर हे वाचून हे सगळं करावं लागतंय ह्यात एक समाज म्हणून आपलं किती अपयश आहे हे जाणवून खिन्न व्हायला होतं. सरकार महत्त्वाच्या कामांकडे लक्ष देत नसेल तर ते तिथे वेधून घेऊन ती कामं पूर्ण करून घेणं हे एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. पण आपण नुसती जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न. Quality, not Quantity हे आपल्या गावीही नाही. असो. हेही नसे थोडके.
दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही अंक जपून ठेवला आहे. पुढल्या वर्षी आणि त्यापुढली अनेक वर्षं अंक असाच मिळत राहो ही आशा.