लोकमतचे जुने दिवाळी अंक जपून न ठेवल्याचा मला कधीकधी जाम पश्चात्ताप होतो. अभ्यासपूर्ण, विचार करायला लावणारे, 'रिपोर्ताज' प्रकारात मोडतील असे लेख हे ह्या अंकाचं वैशिष्ट्य. अर्थात शहरात राहून हे असे किती अंक जपून ठेवता येतील ह्याला जागेच्या मर्यादा असतात. आधीच किल्लाचे सगळे अंक, कधीतरी ट्रेकिंगला जाताना उपयोग होईल म्हणून ठेवलेत. अजूनतरी ते वापरण्याचा योग आलेला नाही. पण ठेवण्याचा मोह आवरत नाही हे खरं.
ह्या वर्षीच्या अंकाची सुरुवात डॉ. श्रीकांत दातार ह्यांच्या 'नोइंग, डुईंग आणि बिईंग' ह्या लेखाने झालेय. आपापला व्यवसाय / नोकरी करताना आपणा सर्वानाच किती गोष्टींचा साकल्याने विचार करावा लागणार आहे ह्याबद्दल ह्या छोटेखानी लेखात उत्तम विवेचन केलंय. ते बदलत्या काळाशी जुळवून घ्यायची लवचिकता असणाऱ्या सर्वांनीच मुळात वाचावंसं आहे. पुढचा 'काहीतरी गुप्त घडतंय' हा भालचंद्र नेमाडेंचा लेख सद्य परिस्थितीवर अचूक आणि परखड भाष्य करतो.
तिसरा लेख मेघना ढोके ह्यांचा. हिंदू- मुस्लिम संघर्षाचं प्रतीक म्हणावं अश्या शहरावरचा - अयोध्येवरचा - हा रिपोर्ताज. वर्तमानपत्रातले लेख वाचून, टीव्हीवरच्या बातम्या पाहून, सोशल मीडियातलया उलटसुलट पोस्ट्स वाचून ह्या शहराबद्दलची बनलेली आपली सगळी मतं निकालात काढणारा. अयोध्येला मुद्दाम जावं असं माझ्या कधी चुकूनही मनात आलं नव्हतं पण हा लेख वाचून लेखिकेला जशी अयोध्या दिसली तशी आपल्याला दिसते का ते पडताळून पाहण्याचा मोह होतोय. अर्थात आपलं बेत करणं वेगळं आणि तो तडीस जाणं वेगळं. त्यामुळे माझी पावलं अयोध्येला लागेस्तोवर ते शहर कदाचित मुळातून बदललेलं असेल. ते चांगलं का वाईट हे मात्र सांगता येणार नाही.
'शहाण्याने कोर्टाच्या पायऱ्या चढू नये म्हणतात' तसंच 'पोलीस' म्हटलं की चार हात दूरच बरे असंच आपल्या सामान्य लोकांचं मत असतं. हिंदी चित्रपटात सगळी मारामारी, खून वगैरे झाल्यावर शेवटी 'पुलिसने तुम्हे चारो तरफसे घेर लिया है' म्हणत लुटुपुटुची पिस्तुलं घेऊन हजर होणारे पोलीस हा तर चेष्टेचा विषय. पण करोनाकाळात लोकांचा जीव वाचावा, कायदा-सुव्यवस्थेचं राज्य राहावं म्हणून जीवाचं रान करणारे पोलीस सर्वांनीच पाहिले. ह्या पोलिसांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाची दुसरी बाजू दाखवणारा 'पोलीस' हा रवींद्र राऊळ ह्यांचा लेख म्हणूनच वाचनीय.
दक्षिण कोरियाने निर्माण केलेल्या पॉपबॅंडचं जग आणि त्या अनुषंगाने भारतात आलेल्या त्यांची भाषा, खाणं, सौंदर्यप्रसाधनं ह्याविषयीच्या लाटेबद्दल आपलयाला माहिती मिळते वंदना अत्रे ह्यांचा 'के पॉप' ह्या लेखातून. 'पॉर्न' हा विशेषतः सध्याच्या काळात 'अब्रह्मण्यम' ठरलेला विषय. आपल्यातल्या बऱ्याचश्या लोकांना केवळ ऐकून माहित. ह्या जगात नेमकं चालतं काय हे मनोज गडनीस ह्यांचा लेख उलगडून दाखवतो. ज्याला गिऱ्हाईक असतं तेच जास्त विकलं जातं. त्यामुळे ह्याबाबतीत नुसता कंठशोष करणाऱ्या तथाकथित संस्कृतीरक्षक वगैरे लोकांनी ह्यावर खरोखर विचार आणि उपाययोजना करायची इच्छा असेल तर हा आणि ह्यापुढला इटुकला 'द न्यू नेकेड' हा मुक्ता चैतन्य ह्यांचा असे दोन्ही लेख जरूर वाचावेत.
ह्यापुढलं सेक्शन म्हणजे ५ कथांचा / लेखांचा समूह आहे. पहिली 'सरल्यावर जे उरतं' हा लेख अरुणा ढेरे ह्यांचा. महाभारताचं महासंहारकारी युध्द्व संपल्यावरची उरलेली कहाणी सांगणारा. कधीकधी तर मला वाटतं महाभारताची खरी गोष्ट युद्धानंतरच सुरु होते. कारण फक्त दुष्टांचा पाडाव आणि सत्याचा जय एव्हढंच उरत नाही. जेत्यांच्या जवळपास सर्व नव्या पिढीचा नाश होऊन हे युद्ध संपतं. जिंकूनही ह्या बाबतीत पांडव हरलेले. निर्भेळ म्हणावं असं हे यश नाहीच. ज्या राज्याची धुरा खांद्यावर घेतली त्यातही जिथेतिथे मृत्यूचं थैमान. जवळचे सगळे नातेवाईक गमावल्याचं दु:ख. जगावं का असा प्रश्न कोणाही शहाण्यासुरत्या माणसाला पडावा. हा असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यावर पडतोच. करोनाकाळात तर प्रकर्षाने जाणवला. तेव्हा ही कहाणी खरी महत्त्वाची.
करोना आला तेव्हा स्पेनिश फ्लूसोबत पुण्याच्या प्लेगबद्दलही लिहिलं गेलं. ह्या प्लेगबद्दल सुकृत करंदीकर ह्यांच्या 'पुण्यात जेव्हा मेले उंदीर' ह्या लेखात वाचायला मिळतं. 'हा जगाचा शेवटही नाही' हा मेघना भुस्कुटे ह्यांचा लेख अमेरिकन-पत्रकार लेखक जॉन स्टाईनबेकच्या 'ग्रेप्स ऑफ राथ' ह्या कादंबरीची ओळख करून देतो. 'से येस टू लाईफ' मधून हिटरलच्या छळछावणीत आपलं सगळं कुटुंब गमावूनही केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तगून राहिलेल्या आणि केवळ तेव्हढंच न करता 'लोगोथेरपी' ही मानसोपचाराची नवी पद्धत जन्माला घालणाऱ्या डॉ. व्हिकटोर फ्रॅन्कल ह्यांची अशक्यप्राय वाटणारी कहाणी वैशाली करमरकर आपल्याला सांगतात. ह्यापुढला निळू दामले ह्यांचा 'सोसणं' हा लेख जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी युद्धातून वाचून बेघर, निर्वासित झालेल्यांच्या कर्मकहाण्या आपल्यासमोर ठेवतो. कुठे खुट्ट झालं की पाकिस्तानवर हल्ला करा, चीनला धडा शिकवा म्हणून बोंबलणाऱ्या आपल्या इथल्या गेहेशूर लोकांना हे दोन्ही लेख रोज वाचायला लावले पाहिजेत.
हॉटडॉग, झालमुरी, चाट ह्यासारखे जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ युद्धकाळात जन्माला आले हे व्हॉट्सएपवर वाचलं असतं तर मी अजिबात विश्वास ठेवला नसता. पण हे सत्य आहे हे मेघना सामंत ह्यांचा 'पोटात काय? गोगलगाय' हा लेख वाचून कळतं.
'निर्मनुष्य चित्रं' (चंद्रमोहन कुलकर्णी), 'तळघर' (दिलीप कुलकर्णी) आणि 'सिनोझी आणि बारुख' (अनंत सामंत) हेही लेख वाचनीय.
म्हणून तर म्हणतेय की लोकमतचे दिवाळी अंक संग्रही ठेवायचा जाम मोह होतो. दरवर्षी.