लोकमतचा दीपोत्सवचा अंक वाचणं ही दर दिवाळीला मेजवानी असते. मागच्या दिवाळी अंकाची किंमत काय होती पाहायला हवं. ह्या वर्षीची २९९ रुपये किंमत वाचून हसायला आलं. अमेरिकेतलं ९९ सेंट्सचं खूळ दिवाळी अंकातसुद्धा येईल असं वाटलं नव्हतं. असो.
तर दर वर्षीच्या लोकमतच्या दिवाळी अंकात रिपोर्ताज असतात. खरं तर मला हा अंक एवढा आवडण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. ह्या वर्षीच्या अंकातदेखील कोल्हापूरच्या कुस्त्या आणि त्यातल्या पहिलवानांचं जीवन, स्त्रियांना सोबत आणि इतर बरंच काही पुरवणारे जिगोलोज (हा विषय दिवाळी अंकासाठी बोल्डच म्हणायचा. किती लोकांना चिवड्याचे बोकणे भरताना आणि चकलीचा तुकडा मोडताना ठसका लागला असेल देव जाणे!), हवे ते अमली पदार्थ हवे तेव्हा हवे तेव्हढे अगदी घरपोच आणून देणारे ड्रग पेडलर्स, गावातल्या अनेक गोष्टींची काळजी घेणारे तलाठी, देश-विदेशातल्या लोकांची बॅंक खाती हातोहात साफ करणारे जमतारा आणि आसपासच्या गावातले सायबर गुन्हेगार आणि भारतातलया दूरवर पसरलेल्या दुर्गम खेड्यापाड्यात - जिथे वैद्यकीय सेवा अजून पोचलेली नाही - लोकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या आशा सेविका अश्या नानाविध विषयांवरचे रिपोर्ताज आहेत. मला आठवतं की काही वर्षांपूर्वीच्या एका दिवाळी अंकात ट्रक ड्रायव्हर्सच्या आयुष्यावर वेगवेगळे लेख होते. ह्या वर्षीही अंकात त्यांच्यावर एक लेख आहे.
ह्याखेरीज आपल्या आयुष्यावर रणवीर सिंगने बरंच काही सांगितलंय. गेल्या काही वर्षात भारताला श्रीमंतांची व्याख्या कशी बदलली ह्याबद्दल शोभा डे ह्यांनी लिहिलंय. त्यांचं लिखाण बऱ्याच वर्षांनी वाचनात आलं. ह्या मूळच्या राजाध्यक्ष असूनही लेखाच्या शेवटी 'अनुवाद' वाचून हसावं का रडावं ते कळेना. माणूस मातृभाषेला इतका पारखा होऊ शकतो? असो. पैशाशी भारतीयांच्या असलेल्या लव्ह-हेट रिलेशनशीपबद्दल मंदार भारदे ह्यांनी काही अचूक निरीक्षणं नोंदवली आहेत.
जनरेशन झेडबद्दल अनेकांनी अनेक वेळा लिहून झालंय. पण तरी संजय आवटे ह्यांच्या लेखातून ह्या विषयाबद्दलचे अजून काही पैलू उलगडतात. फाळणीनंतर कधीही आपल्या मूळ गावी परतू न शकलेल्या पण त्या गावाची, तिथल्या माणसांची आठवण मनात जपणारी पिढी आणि आपल्या आजी-आजोबाना व्हर्च्युअली का होईना पण ते गाव दाखवायला धडपडणारी त्यांची नातवंडं ह्यावर शर्मिला फडके ह्यांनी लिहिलंय. विदेशातून भारतात काम करायला येणाऱ्या लोकांचं 'इंडिया सेन्सीटायझिंग' करताना आलेल्या अनुभवांवर वैशाली करमरकर ह्यांनी लिहिलेला लेख वाचनीय आहे. तर भारतातली गावं आणि तिथे राहणारे लोक ह्यांच्याविषयीच्या शहरी लोकांच्या टिपिकल समजुतींना छेद देणारा लेख मिलिंद थत्ते ह्यांनी स्वानुभवातून लिहिलाय. जागतिकीकरणाच्या लाटेत आपल्याकडच्या नानाविध खाद्यपरंपरा कश्या नष्ट होत चालल्या आहेत ह्यावर चिन्मय दामले ह्यांनी लिहिलेला लेख विचार करायला लावतो.
दर वर्षीप्रमाणेच ह्या अंकाने यंदाही उत्तम वाचनीय पण तरीही विचार करायला लावणारा मजकूर दिला आहे ह्यात शंकाच नाही.