गेली काही वर्षं महाअनुभवचा दिवाळी अंक घेते आहे. ह्या वर्षीही मॅजेस्टिकमध्ये गेले तेव्हा अनुक्रमणिका चाळून पाहिली. कथा-कविता ह्यांपेक्षाही ज्ञान वाढवणारे लेख असतील असा अंक घेण्याकडे माझा कल असतो. त्या कसोटीत हा अंक पुरेपूर उतरेल असं वाटलं म्हणून विकत घेतला.
अंक वाचायला घेतला तेव्हा निर्णय योग्य असल्याची खात्री पटली. मुकुंद कुलकर्णींचा त्यांच्या करोना आजाराविषयीचा लेख वाचून त्यांचं कौतुक वाटलं. साधं डोकं दुखलं तर आपण किती बेचैन होतो. पण करोनातून बरं होऊन म्युकरमायकोसिसमुळे कवटीचा काही भाग काढून टाकण्याचं ऑपरेशन करावं लागलं त्या सर्व काळाचं वर्णन त्यांनी किती सहजतेने केलं आहे. विनोदबुद्धी शाबूत असल्यानेच ते ह्यातून सहीसलामत बाहेर पडले असंच वाटलं. सुचिता पडळकर ह्यांचा मधमाश्या पालनावरचा लेख वाचून त्यांच्या चिकाटी ची दाद द्यावीशी वाटली. मधमाश्या पालनाबद्दल खूप मनोरंजक माहिती मिळाली.
चित्रकला हा माझ्या शाळेतल्या नावडत्या विषयांपैकी एक कारण त्यात अजिबात गती नव्हती. ज्यांना देवाने चित्र काढायची देणगी दिली नाही त्यांचा वेळ ह्या वर्गात फुकट का घालवतात असं मला तेव्हा वाटायचं आणि आजही माझं तेच मत आहे. पण लोकसत्तात गेले वर्षभर सुभाष अवचट चालवत असलेलं सदर मी आवडीने वाचलं. त्यामुळे त्यांचा 'सेल्फ पोर्टेट' वरचा लेख आवर्जून वाचला. डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांचा 'जन्मरहस्याची जन्मकहाणी' हा लेख मानवी जीवाची वाढ कशी होते हे साध्या सोप्या शब्दात समजावून देतो. ही प्रक्रिया किती गुंतागुंतीची असते ते वाचून अवाक व्हायला होतं. वर्षानुवर्षं हे चक्र अविरत चालू राहण्यामागे कुठली शक्ती असेल असाही विचार मनात येतोच. राजकारण - मग ते देशांतर्गत असो वा विदेशी - हा मला एक अतिशय इंटरेस्टिंग विषय वाटत आलाय. त्यामुळे निळू दामलेंचा अँगेला मर्केलवरचा लेख फार आवडला. 'द वायर' ह्या न्यूज पोर्टलबद्दल माहीत नव्हतं. ती माहिती नितीन ब्रम्हेच्या लेखातून मिळाली. हे पोर्टल चेक करून सबस्क्राईब करायला आवडेल.
'माणसं' विभागातले लेखही उत्तम. पैकी एगथा ख्रिस्ती माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक. तिच्यावर राजेश्वरी देशपांडे ह्यांनी लिहिलंय. डिआन अरबसबद्दल कधी ऐकलं नव्हतं. ती माहिती नितीन दादरावाला ह्यांच्या लेखातून मिळाली. पॉल सॅलोपेकचं नाव ऐकलं नव्हतं त्यामुळे अश्मयुगीन मानवाच्या स्थलांतराच्या वाटेवरून तो करत असलेल्या प्रवासाचीही काही माहिती नव्हती. https://www.nationalgeographic.org/projects/out-of-eden-walk/ वर जमेल तसं ह्याबाबत वाचणार आहे. जग फिरायचं स्वप्न आता स्वप्नच राहतंय का काय अशी शंका आजकाल येते. पण देवाजीच्या कृपेने संधी मिळालीच तर ह्या लेखात उल्लेख केलेली स्थळं - रिफ्ट व्हॅलीतलं गोना (जिथे २६ लाख वर्षांपूर्वीची उपकरणं सापडली आहेत), जॉर्डनमधलं घोर-अल-साफी (जगातली सगळ्यात कमी उंचीवरची जागा आणि तिथली पाचव्या शतकातली मॉनेस्ट्री) आणि वादी -अल -रमचं वाळवंट, वादी -हाफीर, वादी - नातुफ अझरबैजानमधलं गोबुस्थान नेशनल पार्क, खिवा-बुखारा-समरकंद ही शहरं, रेशीम कारागिरांचं मार्गिलन गाव - त्या यादीत जाऊन बसली आहेत.
'ललित' मधले सगळे लेख छान आहेत. कथा विभागातल्या रन -आउट (प्रदीप चंपानेरकर) आणि पॉपअप (मेघश्री दळवी) आवडल्या. गंगोचं पोर (भीष्म सहानी) आणि डान्स बार (मानसी) जराश्या चाळलया तेव्हा ट्रॅजेडी वाटल्या. अश्या कथा वाचायला नको वाटतात म्हणून स्किप केल्या.