महाअनुभवचा अंक मी दर दिवाळीला घेत असले तरी ह्या वर्षी अनुक्रमणिका पाहून अंक वाचायच्या आधीच खुश झाले. निळू दामले, डॉ. शंतनू अभ्यंकर, प्रीति छत्रे, उमेश झिरपे अशी अनेक परिचयाची नावं दिसली ना.
पहिलाच लेख निळू दामले ह्यांचा 'कुंपणच जेव्हा शेत खातं. लोकशाहीच्या बुरख्याआडची हुकूमशाही'. शीर्षक वाचूनच लेख कश्याबद्दल असणार ह्याची कल्पना आली. इराण, रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि अर्थात मायभूमी भारत इथल्या सरकार आणि एकुणात शासनव्यवस्थेचा उहापोह करणारा हा लेख रोजची पेपरातली चिखलफेक वाचून व्यथित होणाऱ्या कोणाही सुजाण माणसाला पटावा असाच.
डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांचा एक लेख आधीच्या वर्षीच्या कुठल्या तरी दिवाळी अंकात वाचला होता. मूल जन्माला येताना काय गुंतागुंतीची प्रक्रिया घडून यावी लागते त्याचं अतिशय सोपं वर्णन त्यांनी त्या लेखात केलं होतं. नंतर लोकसत्तामध्ये उत्क्रान्तीचा डार्विनचा सिध्दांत मोडून काढून त्याऐवजी सकल सृष्टीचा कोणी कर्ताकरविता आहे असा सिध्दांत मांडणाऱ्या - ज्याला छद्मविज्ञान म्हटलं जातं अश्या एका पुस्तकाचा खडसून समाचार घेणारा त्यांचा लेखही वाचनात आला. पुन्हा ह्या अंकातल्या त्यांच्या लेखाचं शीर्षकसुद्धा 'आपुले मरण पाहिले म्या डोळा'. (ते 'आपुले मरण पाहिले मी म्या डोळा' असं असायला हवं होतं खरं तर!) पण लेख वाचून हादरायला झालं. क्षणभर हे जे लिहिलंय ते अभ्यंकर ह्यांच्यासोबत खरोखर झालंय का कल्पित कथा आहे असंही वाटून गेलं. रोज संध्याकाळी येणारा बारीक ताप आणि थकवा ते फुफ्फुसाच्या कॅंसरचं निदान ह्या प्रवासातल्या आपल्या विविध अवस्थांचं त्यांनी ह्या लेखात वर्णन केलंय. हे नुसतं वाचूनच आपल्याला कसंतरी होतं ते ह्या माणसाने कसं निभावलं असेल ह्याचं आश्चर्य आणि कौतुक वाटतं. पुन्हा ह्यात त्यांनी आपली विनोदबुद्धी शाबूत ठेवली आहे. हा लेख वाचून असं वाटलंच की ते डॉक्टर असल्याने अनेक डॉक्टर मित्रांची त्यांना अचूक निदान होण्यात म्हणा किंवा एक सपोर्ट सिस्टीम उभी करण्यात म्हणा खूप मदत झाली. ज्याचां वैद्यकीय क्षेत्रांत कोणीही ओळखीचं नाही अश्या लोकांना मात्र हा अनुभव दुरापास्तच. पूर्वीच्या काळी फेमिली डॉक्टर हे जसा आधार वाटायचे तशी सोय आता नाही. जवळपास सगळेच डॉक्टर पेशंटसंबंधी सहअनुभूती दाखवत नाहीत. मग कारण काहीही असो. तसा एखादा डॉक्टर मिळालाच तर तुमचं नशीब जोरावर म्हणायचं.
'सोनपावसाचं ऐतिहासिक गाव' (इथे लेखाच्या शीर्षकात 'ऐतिहासिक' ह्या शब्दात एक मात्रा अधिक छापली गेली आहे) हा प्रणव पाटील ह्यांचा कोल्हापूरजवळच्या कसबा बीड गावाबद्दलचा लेख आवडला. शिलाहार राजांच्या काळातली नाणी इथे सापडतात. त्या काळातल्या वीरगळी आणि अजून बऱ्याच खुणा तिथे आहेत. कधीतरी जायला हवं इथे असं वाटून गेलं. 'भारत विकास ग्रुप' ह्या उद्योगाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड ह्यांच्यावरचा आनंद अवधानी ह्यांनी लिहिलेला लेख वाचून मस्त वाटलं. एका मराठी माणसाने एकट्याने एव्हढा पसारा उभा केला ह्याचं कौतुक वाटल्यावाचून राहात नाही. आधी हा लेख कदाचित स्पॉन्सर्ड असावा असं वाटून मी वाचायचं टाळणार होते. पण वाचला हे बरं झालं.
मेघश्री दळवी ह्यांच्या तिन्ही कथा सगळीकडे रोषणाई आणि जमिनीची तोडफोड करून मेट्रो बांधणं एव्हढीच मुंबईच्या विकासाची कल्पना डोक्यात असणाऱ्या सर्व राजकारणी लोकांना वाचायला द्यायला हव्यात. ह्या अश्या कथा वाचून भयानक भीती वाटते. कारण अवकाळी पाऊस, बिघडलेली हवा अश्यासारखे अनेक धोक्याचे इशारे केव्हापासूनच दिसायला लागलेले आहेत. हे भविष्य खूप नजीकचं तर नाही?
लेवीसन वुडवरचा प्रीति छत्रे ह्यांचा लेख वाचून पृथ्वी उभीआडवी पालथी घालणाऱ्या ह्या अवलियाला मनोमन सलाम केला. विशेषतः कुठल्याश्या आदिम जमातीतले लोक केसाला केशरी रंग द्यायला त्यावर एक विशिष्ट राख फासून शॉवरखाली आंघोळ केल्यासारखे डायरेक्ट गोमूत्राची धार अंगावर घेतात म्हटल्यावर ह्या पठ्ठ्याने तेही केलं हे वाचून तर मी उडालेच. गोमातेचा उठता बसता जयजयकार करणारे किती हिंदुत्ववादी लोक हे स्नान करायला तयार होतील हा मजेशीर प्रश्न मनात डोकावून गेला. Walking The Himalayas हे नाव टीव्हीगाईड मध्ये पाहिलं होतं. पण लेवीसन वुडच्या भटकंतीवर तो आहे हे ठाऊक नव्हतं. भारत-पाकिस्तान सीमेवरची त्याची भटकंती पाहायला डिस्कव्हरी प्लस पाहिलं पाहिजे आता.
'यात्रा अपघातांची' हा एक लोको पायलट असलेल्या गणेश मनोहर कुलकर्णी ह्यांनी लिहिलेला लेख सुन्न करणारा. टेनिस क्रिकेट हा शब्द मी कधी ऐकलाही नव्हता. मग तिथेही अनेक संघ आहेत, त्यांच्या देश-विदेशात मालिका खेळलया जातात आणि खूप लोक ह्या खेळाचे, खेळाडूंचे चाहते आहेत हे ठाऊक असणार तरी कसं. तुषार कलबुर्गी ह्यांचा लेख मात्र ह्यावर सविस्तर माहिती देतो. माहिती अक्षरश: एका क्लिकवर उपलब्ध असायच्या काळातसुद्धा आपल्याला किती गोष्टी माहित नसतात. सुझन मेसेलस ह्या फोटोग्राफरवरचा 'अस्वस्थ काळाची फोटोग्राफर' हा लेख वाचूनसुद्धा असंच वाटलं.
आयुष्यात प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते - करून बघायच्या गोष्टींची. त्यात बहुतेक साऱ्या असाध्य असतात म्हणा. माझ्या बकेट लिस्टमध्येही एव्हरेस्टच्या बेस केम्पपर्यंत जाऊन यायचं अशी एक एंट्री आहे. त्यामुळे भारतातला अव्वल गिर्यारोहक असलेल्या मिंग्मा शेर्पावरचा लेख मोठ्या उत्सुकतेने वाचला. ह्याही बाबाला माझा सलाम आहे. 'कोकणातला कातळखजिना' हा सुहास गुर्जर ह्यांचा लेख वाचून हे सगळं आपण बघायचा मुहूर्त लागायच्या आधी नष्ट तर होणार नाही ना असा एक भुंगा डोक्याला लागला. पुन्हा एकदा 'हजारो ख्वाहिशें ऐसी' वगैरे....
अगोचर, द मिस्ट्री रूम, छर्रा ह्या कथा फारश्या आवडल्या नाहीत. त्यामानाने 'सगळ्याचा मिळून पांढरा किंवा काळा' ही कथा खूप भावली. विशेषतः: त्यातलं 'सगळ्यात पांढराच खरा! सुरुवातबी तो करून देतोय न शेवटाला बी तोच हात देतोय' हे वाक्य अगदी पटलं.