ह्या ब्लॉगवर एक नजर टाकल्यावर लक्षात आलं की २०२१ मध्ये मी ऋतुरंगचा दिवाळी अंक घेतला नव्हता. २०२० मध्ये घेतला होता. ह्या वर्षीची ह्या अंकांची खरेदी अनुक्रमणिका बघून केली होती.
पैकी बरेचसे लेख शब्दांकित. मग तो सत्यजित रेंवरचा शर्मिला टागोरचा असो किंवा शबाना आझमीवरचा जावेद अख्तर ह्यांचा असो किंवा निसर्गाशी असलेलं स्वतःचं नातं उलगडून सांगणारा दीप्ती नवल ह्यांचा असो. पण ह्यामुळे झालंय काय की शब्दांकन कितीही समजून उमजून केलेलं असलं तरी मूळ लेखाची सर त्याला येत नाही. कुठे ना कुठे तरी एखादा शब्द बोचतोच. कुठे वाक्यरचना उगाचच क्लिष्ट वाटते. दुसरं म्हणजे हे लेख छोटे वाटतात, त्रोटक वाटतात. पण हेही खरंच की शब्दांकन नसतं तर मिंटल मुखिजा, रसिका रेड्डी (ह्यांचा लेख बहुतेक लोकसत्तात आधी वाचला होता), दुर्गा गुडीलू ह्यांच्याबद्दल कळलंच नसतं.
त्यामानाने मराठी माणसाच्या लेखांचं शब्दांकन तितकंसं खटकत नाही. ह्यात कमल परदेशी, मीरा उमप, मीरा बाबर, लक्ष्मण चव्हाण, राजू बाविस्कर, सुरेख कोरडे, शिवराम भंडारी ह्या निदान मी तरी कधी नावं न ऐकलेल्या व्यक्तींच्या आयुष्याच्या प्रेरणादायक कथा आहेत. सुशीलकुमार शिंदे, मुकुंद संगोराम, किशोर मेढे ह्यांचे लेखही वाचनीय आहेत. वसंतदादा पाटील आणि गुलजार ह्यांच्यावरच्या अंबरीश मिश्र ह्यांच्या लेखात सुद्धा ह्या त्रुटी तुलनेने कमी जाणवल्या. भास्करराव पेरे पाटील ह्यांच्या लेखाचा खास उल्लेख करावासा वाटतो कारण सरकार मदत करेल म्हणून वाट बघत न बसता त्यांनी आपल्या गावाचा जो कायापालट केला त्याबद्दल वाचायला फार छान वाटलं. ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतो त्याचा प्रॅक्टिकल वापर केलाय.
ललित भागातले हिमवाटेवरील पहाट (सुरेशचंद्र वारघडे) आणि मायकल पालीनचा जगप्रवास (नीती मेहेंदळे) हे लेख आवडले. अंजली आंबेकर ह्यांच्या लेखातून आदिवासी संगीत पार सातासमुद्रापल्याड नेणाऱ्या नंचयम्मा ह्यांची ओळख होते. मल्हार अरणकल्ले ह्यांचा गावाकडल्या ऋतूबदलांची ओळख करून देणारा 'ही वाट दूर जाते' हा लेखही वाचनीय आहे.
दोन लेख मात्र खटकले. एक नृत्यसाधनेची सहा वर्षं हा डॉ. भाग्यश्री पाटील ह्यांचा. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली आणि ते नेटाने पूर्ण केलं हे कौतुकास्पद आहे ह्यात वादच नाही. पण ह्या नृत्यप्रवासात त्यांना काय अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली ह्याबाबत लेखात फार कमी माहिती आहे. नृत्य लहान वयात शिकायला सुरुवात करावी लागते कारण त्यासाठी लागणार लवचिकपणा तेव्हा शरीरात असतो ही सर्वमान्य समजूत आहे. त्याला छेद देत हा प्रवास त्यांनी केला तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कोणाला जायचं असेल तर त्या व्यक्तीने काय करायला हवं किंवा नको त्याविषयीची माहिती लेखात हवी होती. तसं न होता हा लेख निव्वळ आभारप्रदर्शनाचा झाला आहे. हे टाळता आलं असतं.
दुसरा लेख विनय सहस्र्बुद्धे ह्यांचा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांच्यावर लिहिलेला. सहस्र्बुद्धे ह्यांचं नाव ओळखीचं वाटलं. गुगल केल्यावर त्यांचं लिखाण कुठे वाचलंय आणि गाडी कुठल्या रुळावरून धावणार ह्याचा नेमका अंदाज आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांच्या आयुष्याबद्दल माहिती मिळाली. त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल, त्यांच्या राष्ट्रपती पदावर नेमणूक होण्याआधीच्या कामाबद्दल आदर आहे. पण "त्या कोणालाही गृहीत धरत नाहीत आणि कोणीही त्यांना गृहीत धरू शकत नाही" वगैरे लेखकाची विधानं भाषणात टाळ्या पडाव्या ह्या हेतूने करतात थेट तश्या पद्धतीची वाटली. त्यांची नोकरशाहीवरची पकड आणि अचूक थेट प्रश्न विचारायची सवय वगैरे अजून तरी दिसायची आहे. तूर्तास रबर स्टॅम्प ह्या यशवंत सिंह ह्यांच्या शब्दांची आठवण व्हावी अशीच स्थिती आहे. स्थिती बदलेल अशी आशा करावी का?
असो. पुढल्या वेळी अनुक्रमणिका जरा सावधपणे पाहावी लागेल असं दिसतंय.