Thursday, January 30, 2025

४. कालनिर्णय (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ३२५)

पहिल्याच लेखाचं 'आपत्तींची उत्क्रांती' हे शीर्षक वाचून पोटात गोळा आला. अर्थात वर्तमानपत्रात रोजच ह्याबद्दल काही ना काही छापून येतं. आणि बाकी सगळ्या छानछान बातम्या वाचायचं सोडून असल्या वास्तवदर्शी बातम्याच वाचायची खोड असल्याने वाचलं जातं त्यामुळे लेखात काय असेल ह्याचा थोडाफार अंदाज होताच. पण ह्या बाबतीत देशातच काय पण विदेशातही सर्वांचा मौनीबाबा झालाय. जे बाकीच्यांचं होणार तेच आपलं अशी 'जे बदलता येत नाही ते सहन करण्याची शक्ती दे' ह्या प्रार्थनेनुसार भूमिका ठेवली आहे. तरी जे वाचलं त्याने हादरून जायला झालंच. 'दो बिघा जमिनीत' मधल्या ज्या गाण्याच्या ओळी लेखाच्या शेवटी उद्धृत केल्या आहेत त्यातली 'कौन कहे इस ओर तू फिर आये ना आये' ही ओळ समस्त मानवजातीला उद्देशून आहे असंच वाटलं. 

समुद्राची सोबत असलेल्या मुंबईत जन्म झालेला असूनही समुद्रापेक्षा नेहमीच जंगल आणि पर्वत ह्यांचं आकर्षण मला कायम राहिलं. 'भाकरीचा चंद्र' शोधायची अपरिहार्यता शहरात राहायची मजबुरी आहे. त्यामुळे मेळघाटावरच्या सुनील लिमयेंच्या लेखाच्या सुरुवातीचा जंगलाचा फोटो पाहून जीव अगदी एव्हढा एव्हढा झाला. लेख सुरेख आहे पण त्यांनी अजून लिहायला हवं होतं असं वाटलं. कालनिर्णयच्या ह्या वर्षीच्या अंकातसुद्धा त्यांचा लेख वाचायला आवडेल. 'किल्ला' ह्या विषयावर अंक निघू शकतात तर 'जंगल' ह्या विषयावर सुद्धा कोणीतरी दिवाळी अंक काढायला हवा.

'द न्यू यॉर्क बुक ऑफ रिव्ह्यूज' बद्दल मला वाटतं लोकसत्ताच्या 'बुकमार्क' सदरात वाचलं. रॉबर्ट सिल्व्हर्स' ह्या त्याच्या संपादकाची ओळख करून देणारा लेख निळू दामले ह्यांनी लिहिलाय. १९६३ ते २०१७ म्हणजे जवळपास ५४ वर्ष ह्या माणसाने ही जबाबदारी निभावली हे वाचून तर मी मनोमन त्याला दंडवतच घातला. अगदी मृत्यूपर्यंत त्यांनी काम केलं हे वाचून आणखी एक दंडवत. नाहीतर कट्टयावर बसून राजकारणी लोकांवर निरर्थक चर्चा करणारे सिनियर सिटिझन्स रोज पार्कात दिसतातच की.

लावणीची आणि माझी ओळख लहानपणी टीव्हीवर लागलेल्या जुन्या तमाशाप्रधान चित्रपटांतून झालेली. त्यामुळे ह्या कलाप्रकाराबद्दल फारसं चांगलं मत असायचं काही कारण नव्हतं. पण मग लावणीची वेगळी ओळख करून देणारे लेख वाचनात आले आणि मत बदलायला सुरुवात झाली. तरी बैठकीची लावणी ह्या प्रकारची फारशी माहिती नव्हती. ही लावणी सादर करणाऱ्या यमुनाबाई वाईकर ह्यांच्यावर प्रकाश खांडगे ह्यांनी लिहिलेल्या लेखातून ती झाली. 

शास्त्रीय संगीत हा अस्मादिकांच्या घोर अज्ञानाचा आणखी एक प्रांत. त्यामुळे मारुबिहाग आणि प्रभा अत्रे ह्यांच्यावर लिहिलेला अमरेंद्र धनेश्वर ह्यांचा लेख कितपत झेपेल ही धागधुग घेऊनच वाचला. लेखात १९५५ च्या आसपास आलेल्या एका ध्वनिमुद्रिकेवर असलेल्या तरुण प्रभा अत्रेंचा फोटो फार सुरेख आहे.

'नाकमोठा नायक आणि अनुवादित बालसाहित्य' ह्या पंकज भोसले ह्यांच्या लेखात १९९० नंतर मराठी बालसाहित्याची पीछेहाट कशी झाली त्याचा आढावा घेतला आहे. तो वाचून मला 'नंदूचा यांत्रिक माणूस' आणि 'नंदू उडाला आकाशी' ही पुस्तकं शोधण्याचा खटाटोप आठवला. लहानपणी वाचलेली चिनी, जपानी परीकथांची पुस्तकं ज्यांची नावं आठवत नाहीत पण आतल्या कथा आठवतात तीही ह्या निमित्ताने आठवली. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. ह्या लेखात कितीतरी अश्या बालपुस्तकांचा उल्लेख आहे जी मी माझ्या बालपणीसुद्धा वाचली नव्हती :-( मन खंतावलं. 

'म्युनिक बर्लिन पेरीस' (जयराज साळगावकर), 'टेरेन्टीनो इज फन' (महेंद्र तेरेदेसाई), 'तिबेटमधील मुद्रणतंत्राचा सुवर्णइतिहास' (मुरली रंगनाथन), 'आठवणी दळवी यांच्या' (रविप्रकाश कुळकर्णी) हे आणखी काही आवडलेले लेख.

कविता फारशी कळत नसूनही खास आवडलेल्या कविता म्हणजे जबाबदारी (प्रशांत असनारे), बुडत्या गोष्टी मला आतून खुडून टाकतात (संदीप शिवाजीराव जगदाळे), ज्याची त्याची पायरी (वीरा राठोड) आणि फुलपाखरू (नामदेव कोळी). लघुकथा सेक्शनमधल्या आवडलेल्या कथा म्हणजे होरा (सोनाली करमरकर), बोन्साय (भरती मेहता), वारी (डॉ. कृष्णकांत नाबर), घर (वर्षा गव्हाणे), आरे रे (अमोल जडे) आणि वटपौर्णिमा (सुषमा पोतदार). तरी ह्यातल्या काही कथा अधिक चांगल्या पद्धतीने लिहिता आल्या असत्या असं वाटलं. किरण येलेंची 'मुंडू' आवडली. 

प्रशांत कुलकर्णी ह्यांची 'घुसखोरी पेंटिंग्जमधली' ही व्यंगचित्रं खूप आवडली. मात्र 'कुटुंब रंगलंय पाककृतीत' मधल्या विजेत्या पाककृती काही अपवाद वगळता खास वाटल्या नाहीत. 

३. किल्ला (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ५००)

 किल्लाच्या दिवाळी अंकाचं दरवर्षीचं मुखपृष्ठ छानच असतं. पण ह्या वर्षीचं मुखपृष्ठ मला खास आवडलं. किल्ल्याचं प्रवेशद्वार आणि त्यातून दिसणारा धुक्याने आच्छादलेला पलीकडचा भाग. त्यात घडून गेलेल्या इतिहासाइतकाच गूढ आणि रहस्यमय. संपादकीयातून हा किल्ला साल्हेरचा आहे हे कळलं. तसंच यंदाच्या अंकात एकूण १४ लेख आहेत हेही कळलं. त्यापैकी खास आवडलेल्या लेखांबद्दल थोडंसं.

किल्ल्यांवरच्या जलव्यवस्थापनाबद्दल डॉ. अरुणचंद्र पाठक हयांनी लिहिलेला लेख माहितीपूर्ण तर आहेच पण एखाद्या किल्ल्यावर गेल्यावर कायकाय पाहावं ह्याविषयीसुद्धा ही माहिती उपयुक्त ठरेल अशी आहे. एका किल्ल्याची साद्यन्त माहिती देणारे लेख ही किल्ला अंकाची विशेषता. ह्यावेळी अभिजित बेल्हेकर ह्यांनी पुरंदरवर लिहिलंय. पुरंदर म्हटलं की मराठ्यांचा इतिहास शिकलेल्या कोणालाही मुरारबाजी देशपांडे आठवणारच. पण त्याच्याही पलिकडे जाऊन पायथ्याचं गाव, त्यातलं नारायणेश्वराचं मंदिर, किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या औषधी वनस्पती, किल्ल्याच्या नावाच्या उत्पत्ती, गडावरचे दरवाजे, वास्तू, माची, तट, बालेकिल्ला, स्वराज्यात येण्याआधीचा ते इंग्रजांच्या हाती १८१८ साली जाईतो पुरंदरचा इतिहास असा भरभक्कम ऐवज ह्या लेखात आहे. सरकारच्या अनास्थेतून आणि  काळाच्या तडाख्यातून वाचून हे गड उभे आहेत तोवर ते एकदा फिरून यायची मनीषा आहे ती देवाजी पुरी करेल तेव्हा ह्या लेखांचा संदर्भच कामी येणार आहे. 

रायलसीमामधल्या गुत्तीच्या किल्ल्याचं निदान मी तरी कधी नाव ऐकलं नव्हतं. होयसाळ आणि विजयनगर साम्राज्याच्या इतिहासात लष्करी ठाणं असलेल्या ह्या किल्ल्याचा परिचय यशोधन जोशी हयांनी करून दिलाय. 

ह्या एतद्देशीय किल्ल्यांसोबतच फोर्ट नायगारा वर अमित सामंत हयांनी लिहिलं आहे. ह्या लेखात असलेलें क्यू आर कोड स्कॅन करून मस्केट रायफलचं प्रात्यक्षिक सुद्धा पाहून घेतलं. श्रीलंकेतल्या अलकमांदा किल्ल्यावर एडव्होकेट सीमंतिनी नूलकर ह्यांनी लिहिलेला लेखही छान आहे. ह्या किल्ल्याला रावणाचा किल्ला म्हणतात म्हणे. कारण सिंहली लोकांच्या मते ५००० वर्षांपूर्वी हा किल्ला कुबेराने बांधला आणि तो रावणाचा भाऊ. श्रीलंकेला जाईन तेव्हा हा किल्ला बघायचं लक्षात ठेवायला हवं. 

शिवाजी महाराजांच्या वैचारिक वारशाची आपण कशी वाट लावली आहे ह्याचं उत्तम विवेचन डॉ. दीपक पवार ह्यांच्या लेखात केलंय. ते वाचून लोकसत्ता ज्यांना "समाजमाध्यमी अर्धवटराव" म्हणतो तश्या लोकांना काही अक्कल आली तरी पुरे. पण अश्या लोकांतले किती हा अंक वाचायची तसदी घेतील हा प्रश्नच आहे. 

राजांच्या निवाड्यांवर डॉ. अनुराधा कुलकर्णी ह्यांनी लिहिलेल्या लेखात मूळ मोडी कागदपत्रांचे नमुने आहेत. मोडी लिपी शिकून खूप वर्ष झाली. आता काही एक वाचता येत नाही ह्याची नव्याने खंत वाटली. ट्रेकिंग बद्दल खूप काही वाचलंय. कधी काळी जाण्याची इच्छा आहे. आपल्याला जमेल की नाही ह्याची धाकधूक आहे. ट्रेकिंग करणाऱ्या तमाम भटक्यांचं कौतुक आहे. त्यामुळे 'ट्रेक नावाची थेरपी' हा मुकेश माचकर ह्यांचा लेख उत्सुकतेने वाचला. 

पुरुषोत्तम भार्गवे ह्यांचा शिवराई वरचा लेख वाचून एखाद्या गडावर आपल्यालाही असं शिवकालीन नाणं मिळावं असं पुन्हा एकदा वाटून गेलं :-)

गडावर गेल्यावर काय पाहायचं ह्याबद्दल डॉ. मुकुंद कुळे ह्यांच्या 'गडरक्षक दैवतं' ह्या लेखातूनही उत्तम माहिती मिळते. हे सगळं वाचून आता वाटतंय की मी फारसे गड-किल्ले ह्याआधी पाहिले नाहीत तेच बरं आहे. ते कसे पाहायचे त्याची थोडीतरी अक्कल आता आली आहे. तरी एखाद्या अंकात पदर, नाळ वगैरे खास दुर्गांच्या बाबतीत वापरले जाणारे शब्द समजावून देणारा एखादा लेख वाचायला मिळावा असं वाटतं. असो. 

ऋषिकेशला गेले तेव्हा फार तरुण होते. वाराणसी, गंगेची आरती वगैरे करायचं खूप मनात आहे. गिरीजा देशमुख ह्यांचा नेमक्या ह्याच विषयावरचा लेख खूप आवडला. नीती मेहेंदळेचा जिर्णोद्धारीत मंदिरांवरचा लेखही वाचनीय आहे. 

अंकाच्या शेवटी 'दुर्गरंग' मध्ये वसईच्या किल्ल्याची संजय शेट्ये हयांनी काढलेली सुरेख चित्रं आवडली. नाही म्हटलं तरी आपल्याला चित्रकला ह्या विषयात गती नाही ह्याची खंत वाटलीच. काही गोष्टी माणूस जन्माला येताना सोबत घेऊन येतो. त्याला इलाज नाही. ह्या जन्मी नाही तर पुढल्या जन्मी पाहू :-)

Sunday, January 26, 2025

२. लोकप्रभा (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ५०)

दरवर्षीच्या शिरस्त्यानुसार लोकसत्ताबरोबरच लोकप्रभाचा अंकही वाचला. मी जास्त करून माहितीपर लेख असलेले अंक विकत घेते कारण वर्षभर फक्त रोजचं वर्तमानपत्र, पर्सनल फायनान्सची सबस्क्राईब केलेली मासिकं (काय हे माझं इंग्रजाळलेलं मराठी!) वगैरेच वाचलं जातं. त्यात विचार करायला लावणारं फारसं काही नसतं आणि असलं तरी रोजच्या धकाधकीत असला भुंगा डोक्याला लावून घेणं परवडणारं नाही. त्यामुळे किमान दिवाळीत तरी थोडं विचार करायला लावणारं वाचावं  हा ह्यामागचा विचार. असो. 

पहिला लेख विजया जांगळे ह्यांचा पश्मीनाच्या उद्योगातल्या समस्यांविषयी. एखादी समस्या उग्र रूप धारण करू लागल्याखेरिज आपण का लक्ष देत नाही? मान्य आहे की देश मोठा आहे, समस्या खूप आणि गुंतागुंतीच्या. पण समस्या आहे हे तरी मान्य करा. नाहीतर त्या सोडवल्या कश्या जाणार? एक देश म्हणून आपले प्रश्न काय आहेत आणि ते सोडून आपण कशावर चर्चा करतोय? एक समाज म्हणून आपलं हे किती मोठं अपयश आहे :-(

ह्यापुढला अमोल परांजपे ह्यांचा लेख सोप्या भाषेत अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मर ह्यांच्या समस्यांबद्दल माहिती देतो. 

महेश सरलष्कर ह्यांचं 'लालकिल्ला' हे सदर मी दर सोमवारी आवर्जून वाचते. त्यांनी लोकसभा निवडणुकीतून पहिल्यांदाच संसदेत पोचलेल्या चंद्रशेखर आझाद ह्यांच्याबद्दल 'मै आजाद हूं' हा लेख लिहिलाय. मी ह्या आझाद ह्यांच्याबद्दल ऐकलं किंवा वाचलं नव्हतं. एकुणात राजकारणी ह्या विषयावर माझं फारसं चांगलं मत नाही. त्यातून 'सगळ्यांचे पाय मातीचेच' ह्यावर ठाम विश्वास. त्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या जनतेचा भ्रमनिरास होऊ नये एव्हढीच इच्छा. 

बलुचिस्तान हा पाकिस्तानचा एक भाग ह्यापलीकडे त्याबद्दल माहिती असायचं काही कारण नाही. त्यामुळे तिथल्या सरकारी दडपशाहीविरोधात रस्त्यावर उतरलेल्या महिलांचं नेतृत्व करणाऱ्या डॉ. माहरांग बद्दल वैशाली चिटणीस ह्यांनी लिहिलेला लेख आवजून वाचावा असाच. गोवा मुक्तिसंग्रामात जंगलात राहून भूमिगत रेडिओ चालवणाऱ्या लिबिया लोबो किशोर अर्जुन ह्यांच्या 'गोंयाच्या सोडवणेचो आवाज' ह्या लेखातून भेटतात. खरं तर इतिहासाच्या पुस्तकातून सुद्धा कधी न भेटलेल्या अश्या व्यक्तींवर बायोपिक व्हायला हवा. तरच त्यांच्या कार्याची माहिती सर्वाना होईल. 

अमुक एका वर्षापर्यंत नक्षलवाद संपवणार वगैरे बातम्या मधूनमधून वाचनात येतात. कुठलाही 'वाद' असा मुळापासून संपवणं खरंच शक्य होतं? पण हे जोवर होत नाही तोवर जीव धोक्यात घालून ह्या भागातल्या घडामोडी लोकांपर्यंत पोचवणारे लोक कश्याकश्यातुन जातात ह्याबाबत देवेंद्र गावडे ह्यांनी लिहिलंय तेही वाचण्यासारखं. 

आदिवासी, भटक्या जमाती कसे दागदागिने घडवतात आणि वापरतात त्यावरचा आशुतोष उकिडवे ह्यांचा लेख, एडवर्ड  डी वुड ह्या हॉलिवूडच्या सर्वात वाईट मानला गेलेल्या दिग्दर्शकावरचा धात्री श्रीवत्स ह्यांचा लेख, पाकिस्तानी मालिकांवरचा निमा पाटील ह्यांचा लेख, पॉंडिचेरीमधल्या ऑरोव्हिलवरचा आदित्य निमकर ह्यांचा लेख आवडले. अंकाच्या शेवटी राधिका टिपरे ह्यांचा हिमालयातल्या तपकिरी अस्वलांवरचा लेख वाचून आणखी एका गोष्टीची टुडू लिस्टमध्ये नोंद झाली :-)

१. लोकसत्ता (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये २००)

 २०२४ चे  दिवाळी अंक वाचायला ऑक्टोबरमध्ये सुरुवात केली. खरं तर आता हेही आठवत नाहीये की आधी लोकसत्ता वाचला का लोकप्रभा. लोकसत्ता वाचला असं गृहीत धरून आधी त्याबद्दल. अंकाची सुरुवात होते 'ग्रीड' ह्या एरीक व्हॅन स्ट्रोहेम नावाच्या दिग्दर्शकाच्या चित्रपटावरील लेखाने. आताशा कुठलाही पिक्चर पाहायची सहनशक्ती उरलेली नाही. आणि त्यातून ट्रॅजेडी टाईपचे चित्रपट पाहायला अज्जीबात आवडत नाही. त्यामुळे मी हा चित्रपट पाहायची शक्यता जवळपास शून्य पण त्याबद्दल वाचायला मजा आली. चित्रपटाची मूळ आवृत्ती साडेनऊ तासांची म्हटल्यावर मी तर डोक्याला हातच लावला. अर्थात त्याच्या २ तासाची एक आणि ४ तासाची एक अश्या २ आवृत्त्या युट्युबवर उपलब्ध आहेत म्हणे. जिज्ञासूंनी पाहून खात्री करावी :-)

त्यापुढच्या लेख फिनलँडमधल्या जोडगावातल्या आर्ट टाऊनवरचा. शिल्पकला, चित्रकला वगैरे मधलं माझं ज्ञान यथातथाच म्हणजे अमुक एक चित्र कळतंय आणि अमुक एक कळत नाही. चांगलं किंवा वाईट हे दोनच गट. तरीही ह्या गावात राहायचा अनुभव घेता आला तर असं मनात आलंच. 'इतिहास वर्तमान भविष्य' ह्या लोकेश शेवडे ह्यांच्या पुढच्या लेखात जर्मनी आपला इतिहास आणि त्यात झालेल्या चुका काहीही न लपवता शालेय अभ्यासक्रमातूनच भावी पिढीपुढे कसा ठेवतोय ते वाचून खरोखर भरून आलं. नाहीतर आजकाल आपल्या इथे 'कधीकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता' छाप इतिहासाची पुर्नमांडणी करायची स्पर्धा चालू आहे. त्या सोन्याच्या धुराचा आता काय उपयोग? रुपया घसरतोच आहे. पण काही शिकायचंच नाही म्हटलं की प्रश्नच मिटला. असो. 'उजव्या दृश्यकलेची वाटचाल धीमीच' हा अभिजित ताम्हाणे ह्यांचा लेख साधारण त्याच विषयावरचा. ह्यापुढला अध्यात्मावरचा हेमंत राजोपाध्ये ह्यांचा लेख बाउन्सर गेला. 

नाटक हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे रवींद्र पाथरे ह्यांचा 'नाटक आणि असहिष्णुता' हा लेख उत्सुकतेने वाचला. 'उजव्या वाटेवरील सिनेमा' हा डॉ. संतोष पाठारे ह्यांचा लेखही वाचनीय.

५ लेखांचं पुढलं सेक्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आहे. त्यातले सर्वच लेख ह्या संघटनेविषयी कुतूहल असलेल्या सर्वानीच वाचावे असे - मग ते भाजपाचे समर्थक असोत वा नसोत. तरी शेवटचा राहुल भाटिया ह्यांचा 'मला माहिती आहे ते कुणालाच माहिती नाही' हा लेख वाचावाच एव्हढं सांगितलं तरी पुरे.

श्याम मनोहर ह्यांचं लेखन मला आवडतं पण 'ह्यांच्यात आपल्याला जगायचंय' ही कथा डोक्यावरून गेली :-( मिलिंद बोकील ह्यांची 'जोहार' आवडली. 

फणीश्वरनाथ रेणू वर लिहिलेला आसाराम लोमटे ह्यांचा लेख वाचून आपण भारतीय लेखकांचं काहीही लिखाण वाचलेलं नाहीये ही दरवर्षी होणारी जाणीव पुन्हा ह्या वर्षीही झाली. अर्थात भाकरीचा चन्द्र शोधणे ही प्रायोरिटी असल्याने त्याबाबत सध्या तरी काही करता येणं शक्य नाहीये ही वस्तुस्थिती सध्या स्वीकारलेली आहे. 

कविता विभागात दासू वैद्य ह्यांची 'वेलू गेला उकंड्यावरी' ही कविता सद्य स्थितीचं हुबेहूब वर्णन करते. पुन्हा एकदा अस्वस्थ, असहाय वाटलं. कल्पना दुधाळ ह्यांची 'निरुत्तर' सुद्धा अशीच अस्वस्थ करून गेली. आपल्याला अजूनही अस्वस्थ होता येतं हे जाणवून कुठेतरी बरं वाटलं.

प्रशांत कुलकर्णीची 'हवापालट' मधली व्यंगचित्रं सुरेख. दरवर्षीप्रमाणे माझ्या आणि जवळच्या माणसांच्या राशीत काय आहे ते 'वार्षिक राशिभविष्य' मध्ये पाहायचा प्रयत्न केला. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक राशीत जेमतेम मार्च-एप्रिल पर्यंत पोचले. आपल्या राशीचं जानेवारी ते डिसेंबर भविष्य वाचू शकणाऱ्या आणि वाचणाऱ्या माणसांना दंडवत :-)