Sunday, January 26, 2025

२. लोकप्रभा (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ५०)

दरवर्षीच्या शिरस्त्यानुसार लोकसत्ताबरोबरच लोकप्रभाचा अंकही वाचला. मी जास्त करून माहितीपर लेख असलेले अंक विकत घेते कारण वर्षभर फक्त रोजचं वर्तमानपत्र, पर्सनल फायनान्सची सबस्क्राईब केलेली मासिकं (काय हे माझं इंग्रजाळलेलं मराठी!) वगैरेच वाचलं जातं. त्यात विचार करायला लावणारं फारसं काही नसतं आणि असलं तरी रोजच्या धकाधकीत असला भुंगा डोक्याला लावून घेणं परवडणारं नाही. त्यामुळे किमान दिवाळीत तरी थोडं विचार करायला लावणारं वाचावं  हा ह्यामागचा विचार. असो. 

पहिला लेख विजया जांगळे ह्यांचा पश्मीनाच्या उद्योगातल्या समस्यांविषयी. एखादी समस्या उग्र रूप धारण करू लागल्याखेरिज आपण का लक्ष देत नाही? मान्य आहे की देश मोठा आहे, समस्या खूप आणि गुंतागुंतीच्या. पण समस्या आहे हे तरी मान्य करा. नाहीतर त्या सोडवल्या कश्या जाणार? एक देश म्हणून आपले प्रश्न काय आहेत आणि ते सोडून आपण कशावर चर्चा करतोय? एक समाज म्हणून आपलं हे किती मोठं अपयश आहे :-(

ह्यापुढला अमोल परांजपे ह्यांचा लेख सोप्या भाषेत अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मर ह्यांच्या समस्यांबद्दल माहिती देतो. 

महेश सरलष्कर ह्यांचं 'लालकिल्ला' हे सदर मी दर सोमवारी आवर्जून वाचते. त्यांनी लोकसभा निवडणुकीतून पहिल्यांदाच संसदेत पोचलेल्या चंद्रशेखर आझाद ह्यांच्याबद्दल 'मै आजाद हूं' हा लेख लिहिलाय. मी ह्या आझाद ह्यांच्याबद्दल ऐकलं किंवा वाचलं नव्हतं. एकुणात राजकारणी ह्या विषयावर माझं फारसं चांगलं मत नाही. त्यातून 'सगळ्यांचे पाय मातीचेच' ह्यावर ठाम विश्वास. त्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या जनतेचा भ्रमनिरास होऊ नये एव्हढीच इच्छा. 

बलुचिस्तान हा पाकिस्तानचा एक भाग ह्यापलीकडे त्याबद्दल माहिती असायचं काही कारण नाही. त्यामुळे तिथल्या सरकारी दडपशाहीविरोधात रस्त्यावर उतरलेल्या महिलांचं नेतृत्व करणाऱ्या डॉ. माहरांग बद्दल वैशाली चिटणीस ह्यांनी लिहिलेला लेख आवजून वाचावा असाच. गोवा मुक्तिसंग्रामात जंगलात राहून भूमिगत रेडिओ चालवणाऱ्या लिबिया लोबो किशोर अर्जुन ह्यांच्या 'गोंयाच्या सोडवणेचो आवाज' ह्या लेखातून भेटतात. खरं तर इतिहासाच्या पुस्तकातून सुद्धा कधी न भेटलेल्या अश्या व्यक्तींवर बायोपिक व्हायला हवा. तरच त्यांच्या कार्याची माहिती सर्वाना होईल. 

अमुक एका वर्षापर्यंत नक्षलवाद संपवणार वगैरे बातम्या मधूनमधून वाचनात येतात. कुठलाही 'वाद' असा मुळापासून संपवणं खरंच शक्य होतं? पण हे जोवर होत नाही तोवर जीव धोक्यात घालून ह्या भागातल्या घडामोडी लोकांपर्यंत पोचवणारे लोक कश्याकश्यातुन जातात ह्याबाबत देवेंद्र गावडे ह्यांनी लिहिलंय तेही वाचण्यासारखं. 

आदिवासी, भटक्या जमाती कसे दागदागिने घडवतात आणि वापरतात त्यावरचा आशुतोष उकिडवे ह्यांचा लेख, एडवर्ड  डी वुड ह्या हॉलिवूडच्या सर्वात वाईट मानला गेलेल्या दिग्दर्शकावरचा धात्री श्रीवत्स ह्यांचा लेख, पाकिस्तानी मालिकांवरचा निमा पाटील ह्यांचा लेख, पॉंडिचेरीमधल्या ऑरोव्हिलवरचा आदित्य निमकर ह्यांचा लेख आवडले. अंकाच्या शेवटी राधिका टिपरे ह्यांचा हिमालयातल्या तपकिरी अस्वलांवरचा लेख वाचून आणखी एका गोष्टीची टुडू लिस्टमध्ये नोंद झाली :-)

No comments: