Thursday, January 30, 2025

४. कालनिर्णय (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ३२५)

पहिल्याच लेखाचं 'आपत्तींची उत्क्रांती' हे शीर्षक वाचून पोटात गोळा आला. अर्थात वर्तमानपत्रात रोजच ह्याबद्दल काही ना काही छापून येतं. आणि बाकी सगळ्या छानछान बातम्या वाचायचं सोडून असल्या वास्तवदर्शी बातम्याच वाचायची खोड असल्याने वाचलं जातं त्यामुळे लेखात काय असेल ह्याचा थोडाफार अंदाज होताच. पण ह्या बाबतीत देशातच काय पण विदेशातही सर्वांचा मौनीबाबा झालाय. जे बाकीच्यांचं होणार तेच आपलं अशी 'जे बदलता येत नाही ते सहन करण्याची शक्ती दे' ह्या प्रार्थनेनुसार भूमिका ठेवली आहे. तरी जे वाचलं त्याने हादरून जायला झालंच. 'दो बिघा जमिनीत' मधल्या ज्या गाण्याच्या ओळी लेखाच्या शेवटी उद्धृत केल्या आहेत त्यातली 'कौन कहे इस ओर तू फिर आये ना आये' ही ओळ समस्त मानवजातीला उद्देशून आहे असंच वाटलं. 

समुद्राची सोबत असलेल्या मुंबईत जन्म झालेला असूनही समुद्रापेक्षा नेहमीच जंगल आणि पर्वत ह्यांचं आकर्षण मला कायम राहिलं. 'भाकरीचा चंद्र' शोधायची अपरिहार्यता शहरात राहायची मजबुरी आहे. त्यामुळे मेळघाटावरच्या सुनील लिमयेंच्या लेखाच्या सुरुवातीचा जंगलाचा फोटो पाहून जीव अगदी एव्हढा एव्हढा झाला. लेख सुरेख आहे पण त्यांनी अजून लिहायला हवं होतं असं वाटलं. कालनिर्णयच्या ह्या वर्षीच्या अंकातसुद्धा त्यांचा लेख वाचायला आवडेल. 'किल्ला' ह्या विषयावर अंक निघू शकतात तर 'जंगल' ह्या विषयावर सुद्धा कोणीतरी दिवाळी अंक काढायला हवा.

'द न्यू यॉर्क बुक ऑफ रिव्ह्यूज' बद्दल मला वाटतं लोकसत्ताच्या 'बुकमार्क' सदरात वाचलं. रॉबर्ट सिल्व्हर्स' ह्या त्याच्या संपादकाची ओळख करून देणारा लेख निळू दामले ह्यांनी लिहिलाय. १९६३ ते २०१७ म्हणजे जवळपास ५४ वर्ष ह्या माणसाने ही जबाबदारी निभावली हे वाचून तर मी मनोमन त्याला दंडवतच घातला. अगदी मृत्यूपर्यंत त्यांनी काम केलं हे वाचून आणखी एक दंडवत. नाहीतर कट्टयावर बसून राजकारणी लोकांवर निरर्थक चर्चा करणारे सिनियर सिटिझन्स रोज पार्कात दिसतातच की.

लावणीची आणि माझी ओळख लहानपणी टीव्हीवर लागलेल्या जुन्या तमाशाप्रधान चित्रपटांतून झालेली. त्यामुळे ह्या कलाप्रकाराबद्दल फारसं चांगलं मत असायचं काही कारण नव्हतं. पण मग लावणीची वेगळी ओळख करून देणारे लेख वाचनात आले आणि मत बदलायला सुरुवात झाली. तरी बैठकीची लावणी ह्या प्रकारची फारशी माहिती नव्हती. ही लावणी सादर करणाऱ्या यमुनाबाई वाईकर ह्यांच्यावर प्रकाश खांडगे ह्यांनी लिहिलेल्या लेखातून ती झाली. 

शास्त्रीय संगीत हा अस्मादिकांच्या घोर अज्ञानाचा आणखी एक प्रांत. त्यामुळे मारुबिहाग आणि प्रभा अत्रे ह्यांच्यावर लिहिलेला अमरेंद्र धनेश्वर ह्यांचा लेख कितपत झेपेल ही धागधुग घेऊनच वाचला. लेखात १९५५ च्या आसपास आलेल्या एका ध्वनिमुद्रिकेवर असलेल्या तरुण प्रभा अत्रेंचा फोटो फार सुरेख आहे.

'नाकमोठा नायक आणि अनुवादित बालसाहित्य' ह्या पंकज भोसले ह्यांच्या लेखात १९९० नंतर मराठी बालसाहित्याची पीछेहाट कशी झाली त्याचा आढावा घेतला आहे. तो वाचून मला 'नंदूचा यांत्रिक माणूस' आणि 'नंदू उडाला आकाशी' ही पुस्तकं शोधण्याचा खटाटोप आठवला. लहानपणी वाचलेली चिनी, जपानी परीकथांची पुस्तकं ज्यांची नावं आठवत नाहीत पण आतल्या कथा आठवतात तीही ह्या निमित्ताने आठवली. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. ह्या लेखात कितीतरी अश्या बालपुस्तकांचा उल्लेख आहे जी मी माझ्या बालपणीसुद्धा वाचली नव्हती :-( मन खंतावलं. 

'म्युनिक बर्लिन पेरीस' (जयराज साळगावकर), 'टेरेन्टीनो इज फन' (महेंद्र तेरेदेसाई), 'तिबेटमधील मुद्रणतंत्राचा सुवर्णइतिहास' (मुरली रंगनाथन), 'आठवणी दळवी यांच्या' (रविप्रकाश कुळकर्णी) हे आणखी काही आवडलेले लेख.

कविता फारशी कळत नसूनही खास आवडलेल्या कविता म्हणजे जबाबदारी (प्रशांत असनारे), बुडत्या गोष्टी मला आतून खुडून टाकतात (संदीप शिवाजीराव जगदाळे), ज्याची त्याची पायरी (वीरा राठोड) आणि फुलपाखरू (नामदेव कोळी). लघुकथा सेक्शनमधल्या आवडलेल्या कथा म्हणजे होरा (सोनाली करमरकर), बोन्साय (भरती मेहता), वारी (डॉ. कृष्णकांत नाबर), घर (वर्षा गव्हाणे), आरे रे (अमोल जडे) आणि वटपौर्णिमा (सुषमा पोतदार). तरी ह्यातल्या काही कथा अधिक चांगल्या पद्धतीने लिहिता आल्या असत्या असं वाटलं. किरण येलेंची 'मुंडू' आवडली. 

प्रशांत कुलकर्णी ह्यांची 'घुसखोरी पेंटिंग्जमधली' ही व्यंगचित्रं खूप आवडली. मात्र 'कुटुंब रंगलंय पाककृतीत' मधल्या विजेत्या पाककृती काही अपवाद वगळता खास वाटल्या नाहीत. 

No comments: