ह्या वर्षीचा वाचायला घेतलेला दुसरा दिवाळी अंक म्हणजे 'दुर्ग'. अंकाची अनुक्रमणिका पाहिल्यावरच मोगँबो खुश हुआ :-)
अंकाची सुरुवात झाली ती अमोल सांडे ह्यांच्या ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरच्या लेखाने. किल्ल्याचा इतिहास आणि त्यात असलेल्या अनेक वास्तूंबद्द्ल इत्यंभूत माहिती ह्यात आहे. खरं तर अंकातल्या बर्याच लेखांत ही बाब प्रामुख्याने जाणवते. दुर्गप्रेमींनी हे दुर्ग पहावेत ह्या कळकळीपोटी किल्ल्यावर कसं जावं, काय क्रमाने आणि काय काय पहावं इथपासून ते पाणी कुठे मिळेल, ट्रेक करताना काय काय काळजी घ्यावी आणि आजूबाजूला पहाण्यासारखी आणखी कोणती ठिकाणं आहेत ह्याची सविस्तर माहिती अनेक लेखांतून काहीही हातचं न राखता लेखकांनी दिलेली आहे.
पुढच्या लेखातल्या बारडगड आणि विवळवेढे ह्या किल्ल्यांबद्दल मी कधीही ऐकलं नव्हतं. ह्या किल्ल्यांच्या शोधाबद्द्ल खूप छान माहिती ह्या जगदीश धानमेहेर ह्यांच्या ह्या लेखातून मिळते. मराठा इतिहासात महत्त्वाच्या असलेल्या वडगावच्या लढाईबद्द्ल संतोष जाधव ह्यांनी विस्ताराने लिहिलेलं आहे. शिवछत्रपतींचा राज्यव्यवहारकोश आणि शस्त्रवर्ग ह्याबद्दल गिरिजा दुधाट ह्यांनी छोटासाच पण उत्कंठावर्धक लेख लिहिला आहे. चंद्रगड ते आर्थरसीट (डॉ. राहुल वारंगे), घनचक्कर ट्रेक (डॉ. हेमंत बोरसे) आणि आडवाटेवरून प्रतापगड (अंबरीश राघव) हे लेख वाचून हे ट्रेक्स आपणही करावेत असं वाटून जातं. महाराष्ट्रातल्या जलसंस्कृतीचा आढावा घेणारा विहीर हा डॉ. प्रा. जी. बी. शहा ह्यांचा आणि जुन्नर शहरावरचा संदीप परांजपे ह्यांचा लेख दोन्ही विषयांवरची साद्यंत माहिती देतात.
हिंदवी स्वराज्याचा भाग असलेले किल्ले आयुष्यात एकदा तरी पहावेत अशी इच्छा मनी बाळगून असलेल्या प्रत्येकासाठी अशेरी (श्रीकांत कासट), कोकणदिवा (संकेत शिंदे), अंकाई टंकाई (नितीन जाधव), कुरुमबेडा (प्रसाद बर्वे), पद्मदुर्ग (डॉ.संग्राम इंदोरे), शिवगड (शिवप्रसाद शेवाळे), भूषणगड (अजय काकडे), उदगीर (प्रा. संगमेश टोकरे), पारगड (अरविंद देशपांडे), रांगणा (अॅड. फिरोज तांबोळी), नारायणगड (तुषार कुटे), महिपत-सुमार-रसाळ (तुषार कोठावदे) आणि बितनगड (अंकुर काळे) अशी किल्यांच्या माहितीची भरगच्च शिदोरी ह्या अंकात आहे.
थोडक्यात काय तर हाही अंक किल्ल्यांवरच्या बाकी अंकांसोबत कपाटात जाऊन बसलेला आहे. आता २०२१ मध्ये किल्ल्यांच्या भ्रमंतीचा मुहूर्त लागला की गंगेत घोडं न्हालं. :-)