मागच्या वर्षी मी चांगले ७-८ अंक विकत घेऊन वाचले होते. पैकी ३-४ अंकांनी निराशाच केली होती. धनंजय-नवलच्या कथांत आपल्याला रस उरला नाहिये हे मागच्या वर्षीच लक्षात आलं होतं. काही अपवाद वगळता अनुवादित साहित्य असलेल्या अंकातल्या कथासुध्दा भाषांतर निकषावर कमीच पडल्या असं वाटलं. त्यामुळे तसेही अंक ह्या वेळी टाळायचं ठरवलं होतं. लोकसत्ता, लोकप्रभा, किल्ला आणि लोकमत दीपोत्सव एवढेच अंक पेपरवाल्याला आणून द्यायला सांगितले होते. किल्ला आणि लोकमत दीपोत्सवचे मागच्या वर्षीचे अंक फार आवडले होते त्यामुळे ह्या वर्षी त्याचं परिक्षण यायची वाट न पाहताच ते मागवले. हा जुगार कितपत फळलाय ते कळेलच यथावकाश.
पण तरी माझी उत्सुकता काही मला स्वस्थ बसू देत नव्हती. आणखी काही अंक मिळाले तर पाहू म्हणून दिवाळीची धामधूम संपताच मेजेस्तिक दालन गाठलं. चांगला अर्धा तास सगळे अंक चाळले. पण हाती फारसं काही लागेना. कुठल्याही लेखकाच्या कथा वाचण्यात मला इंटरेस्ट नव्हता. पण विचार करायला लावतील असे किंवा नवी माहिती देतील असे, २-४ साईट्स इंटरनेटवर धुंडाळायला लावतील असे लेख असलेला अंक हवा होता. ह्या वर्षी रिकाम्या हाताने जावं लागणार की काय असं म्हणेतो 'अनुभव' चा अंक दिसला. लेखकांची नावं, लेखांचे विषय आवडले. शेवटी तो एकच अंक घेऊन घरी आले. काळ-काम गणित चुकलं की काय असंच वाटलं तेव्हा.
आता अंक वाचल्यावर कळतंय की अंक निवडताना घालवलेला वेळ सत्कारणी लागला होता. रत्नाकर मतकरींची पहिली कथा खूप आवडली. व्हॉटसेप जॉईन केल्यापासून लोकांनी इतिहास नव्याने लिहायची मोहीम उघडली आहे की काय असं वाटावं असे एकेक मेसेजेस येतात. कोणीही काहीही फोरवर्ड करायच्या आधी त्याची शक्यता पडताळून बघायच्या फंदात पडतच नाही. त्यातून हिंदू धर्मावर मेसेज असला म्हणजे तर बघायलाच नको. पण हिंदुत्त्वाचा अतिरेक होऊन खरंच इतिहास घासूनपुसून स्वच्छ करून, आपल्याला हवा तसा लिहिला जायला लागला तर? नेमकी हीच शक्यता मतकरींनी मांडली आहे. ग्यानबाची मेख अशी आहे की वाचून स्वप्नरंजन म्हणून ती सोडून देता येत नाही. असं होऊही शकेल असा भुंगा मागे लागतो.
पुढले काही आवडलेले लेख म्हणजे मुकुंद कुलकर्णी ह्यांचा 'मन रुतले क्षण' - नुकतीच डॉक्टर झालेल्या बायकोसह देशाच्या नॉर्थ-ईस्ट टोकाला जाऊन लेखक राहिला होता तेव्हाच्या आठवणी ह्यात आहेत, राजेश्वरी देशपांडे ह्यांचा 'पोलंड: एका देशाचा प्रवास' आणि साधना शिलेदार ह्यांचा 'कुमारांच्या माळव्यात'. संगीतातलं मला फारसं काही कळत नाही. शास्त्रीय संगीत म्हणजे तर "काला अक्षर भैस बराबर" अशी स्थिती. लोकसंगीत तर जवळपास न ऐकलेलं. कुमार गंधर्वांचं फक्त नाव ऐकलंय. पण त्यांनी काय काम केलंय हे लेख वाचून लक्षात आलं. तरी संगीताची समज नसल्याने हे सर्व आपल्याला अपरिचित आहे आणि कदाचित ह्यापुढेही तसंच राहील ह्याची खंत मात्र जरूर वाटली. एनडीटीव्हीच्या रविश कुमार बद्दल मी कधी ऐकलं नव्हतं. पण श्रीरंजन आवटेचा लेख वाचून एकदा त्याचा कार्यक्रम पहावा असं वाटू लागलं आहे. स्टाईनबर्ग, गुरुजी, सुशील शुक्ल ह्यांचा 'मिजबान आये है' हेही लेख आवडले.
सगळ्यात मनाला भिडला तो 'मीचि मज व्याले' हा प्रशांत खुंटे ह्यांचा लेख - मेहतर समाजात जन्माला आलेल्या आणि म्हणून जगण्याची सोय करण्यासाठी toilets साफ करायला लागलेल्या वैशाली बारये ह्या मुलीची गोष्ट सांगणारा. स्वत:च्या हिमतीवर वैशाली नववीपर्यंत शिकली तरीही तिला हे काम करावं लागलं. पण आता हे काम करावं लागणाऱ्या लोकावर होणाऱ्या अन्यायाला, त्यांना होणाऱ्या त्रासाला ती वाचा फोडायचं काम करतेय. शिक्षणाचं महत्व माहीत असलेल्या, उच्च मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या माझ्यासारखीला तिची गोष्ट मुळापासून हलवून गेली, अंतर्मुख करून गेली, 'अच्छे दिन' यायला ह्या देशात अजून किती अवकाश आहे ह्याची जाणीव देऊन गेली. :-(
चित्रकलेचा आणि माझा ३६ चा आकडा आहे. त्यामुळे अमूर्त चित्रकलेवरचा दीपक घारे ह्यांचा लेख पूर्ण बाउंसर गेला तर त्यात नवल नाही. पण इस्मत चुगताईची अनुवादित 'पवित्र कर्तव्य' डोक्यावरून गेली ह्याचं आश्चर्य वाटतंय. मूळ कथा शोधून वाचावी लागेल.
म्हणजे एकूणात ह्या वर्षीच्या दिवाळी अंक वाचनाची सुरुवात तर छान झाली आहे असंच म्हणावं लागेल.