भवतालचे देवराई आणि जलव्यवस्था अंक मागल्या दोन
वर्षी वाचले होते. त्यामुळे ह्या वर्षी अंकाकडून अपेक्षा बऱ्याच वाढल्या होत्या.
पण अंकाने जराशी निराशाच केली.
तज्ञ मंडळी जेव्हा एखाद्या विषयाबद्दल
सर्वसामान्य लोकांनी वाचायच्या प्रकाशनात लिहितात तेव्हा सर्वसामान्य लोकांना
समजेल अश्या भाषेत लिहिणं अपेक्षित असतं. मग त्यात फार शास्त्रीय परिभाषा टाळणे,
इंग्रजी शब्द लोकांच्या परिचयाचे असतील तर उगा मराठीतले जड प्रतिशब्द न वापरता
इंग्रजी शब्द वापरणे, लेखात माहितीचा पसारा न मांडता थोडे मुद्दे घेऊन पण त्यावर
विस्ताराने लिहिणे, एकंदर लिखाणाचा बाज आटोपशीर आणि सहज आकलन होण्यासारखा ठेवणे
अशी अनेक व्यवधानं सांभाळण गरजेचं असतं. पण इथे दुर्लक्ष झालं तर ते लिखाण रुक्ष,
कंटाळवाणे आणि नीरस होऊन बसतं. ‘महाराष्ट्राच्या मातीतील जीवांचा पट उलगडून
दाखवणारा विशेषांक’ अशी थीम असलेल्या ह्या वर्षीच्या अंकातल्या काही लेखांचं दुर्दैवाने
नेमकं तेच झालंय.
त्या लेखांचा उहापोह करायच्या भानगडीत न पडता जे
लेख माहितीपूर्ण, रंजक आणि समजण्यास सोपे आहेत त्यांच्याविषयी लिहिते. पहिला लेख ‘दख्खनचे
जागतिक बंध उलगडताना’. ह्या लेखात वरदा खळदकर ह्यांनी आता जिकडेतिकडे दिसते ती
महाराष्ट्रीय अस्मिता म्हणजे नेमकं काय हे प्राचीन काळातील पिकं, प्राणी आणि
खाद्यसंस्कृती ह्या सर्वांचा आधार घेऊन स्पष्ट केलंय. प्राचीन महाराष्ट्रात
आढळणाऱ्या चित्रकला आणि शिल्पकला ह्यावरचा श्रीकांत प्रधान ह्यांचा लेख नक्कीच
वाचण्याजोगा. नाणी आणि शिलालेख हा माझा अत्यंत आवडता विषय. डॉक्टर पद्माकर प्रभुणे
ह्यांचा लेख म्हणूनच मी मोठ्या उत्सुकतेने वाचला. खरं तर त्यांनी अधिक विस्ताराने
लिहायला हवं होतं असं वाटलं. ‘वनस्पतींचे कुळ आणि मूळ’ हा लेख तर माहितीचा खजिना
आहे कारण त्यात भाज्या, धान्य, फुलं, औषधी वनस्पतीं आणि फळं ह्या पाच वर्गांत कोणती
देशी आणि विदेशी पिकं आहेत त्याचं विस्तृत विवेचन आहे. आणि एव्हढं असूनही हा लेख
अजिबात रटाळ झालेला नाही हे विशेष. बागकामात आणि शेतीत रुची असणाऱ्यांना हा लेख
नक्की आवडेल असाच आहे.
वेरूळच्या लेण्यातल्या भित्तीचित्राच्या
गिलाव्याच्या एका तुकड्यावरून त्यात कोणते घटकपदार्थ आहेत ह्याच्या घेतलेल्या
शोधाबद्दल डॉक्टर मिलिंद सरदेसाई ह्यांनी एक छोटेखानी लेखात सांगितलं आहे. अशीच एक
शोधकथा सुनील भोईटे ह्यांनी लिहिलेय - ‘पत्थरचाटू’ किंवा ‘पालमासा’ ह्या नावाने
ओळखला जाणाऱ्या माशाच्या शोधाची.
डॉक्टर योगेश शौचे ह्यांनी महाराष्ट्रात
राहणाऱ्या जीवाणूंची ओळख ‘जीवाणूंच्या विश्वात’ ह्या लेखात करून दिली आहे. कधी
कोणाचं लक्षही जाणार नाही अश्या सर्वसामान्य गवतातही किती प्रकार दडलेले आहेत
ह्याबद्दलची मनोरंजक माहिती प्रा. डॉक्टर श्रीरंग यादव ह्यांच्या ‘गवतांचे असणे’
मध्ये मिळते. पश्चिम घाटाच्या प्रदेशनिष्ठ पक्ष्यांवर धर्मराज पाटील ह्यांनी तर
प्राण्यांवर डॉक्टर संजीव नलावडे ह्यांनी छान लेख लिहिलेत. हे दोन्ही लेख अधिक
विस्तृत असते तरी चाललं असतं. महाराष्ट्रात आढळणाऱ्या काही वैशिष्ट्यपूर्ण देवराया
आणि त्यातल्या अनोख्या वृक्षांची माहिती विनया घाटे ह्यांच्या ‘अधिवासी देवराया’
मध्ये मिळते.
तुम्ही महाडी, डांगी, तिवश्या ह्या तांदळाबद्दल ऐकलंय?
सावा, भादली, बरटी ही तृणधान्ये माहित आहेत? इरवड आणि माळीव ह्या मिश्र पीक
पध्दतीबद्दल काही माहिती? मलाही हे काही माहित नव्हतं. तांदूळ म्हणा, गहू म्हणा की
कुठलं दुसरं अन्नधान्य. काही जाती सोडता आपल्याला त्यातला फरक कळत नाही. पण ह्या
अन्नधान्यांच्या दर्जेदार स्थानिक वाणांबद्द्ल आणि ती टिकवण्याच्या प्रयत्नांबद्दल
जाणून घ्यायचं असेल तर विजय सांबरे ह्यांचा ‘गावरान वाण’ हा लेख वाचावा असाच आहे. नुसती
पिकंच नव्हेत तर बैल, घोडा, गाय, शेळ्या-मेंढ्या ह्यासारख्या प्राण्यांच्या देशी
जातीबद्दलसुध्दा ह्या लेखात वाचायला मिळतं. बदलतं हवामान माणसाच्या शारीरिक आणि
सामाजिक परिस्थितीत कसा बदल घडवत गेलं ते डॉक्टर सुभाष वाळिंबेनी आपल्या ‘माणसाच्या
पाऊलखुणा’ ह्या लेखात फार छान समजावून दिलंय. त्यापुढला डॉक्टर शौनक कुलकर्णीचा
लेख गोंड, कोरकू, वारली, भिल्ल आदी आपल्याला माहित असलेल्या आणि मल्हार कोळी,
दुबळा, पावरा अश्या कधी नावंही न ऐकलेल्या आदिवासी जमातींची आणि त्यांच्या
रीतीभाती, सणांची ओळख करून देतो.
मूळच्या इथल्या नसलेल्या आणि स्थानिक वृक्षांना
घातक ठरणाऱ्या झाडांची लागवड कशी धोकादायक ठरू शकते ते केतकी घाटेंचा लेख वाचून
लक्षात येतं. तर ‘परदेशी वनस्पती सरसकट वाईट असं म्हणणं चुकीचं आहे. त्यांचा
अतिरेकी वापर टाळला आणि त्या बेफाट वाढणार नाहीत एव्हढी काळजी घेतली म्हणजे झालं’
असा विचार मांडणाऱ्या विनया घाटे ह्यांच्या लेखाने अंकाची सांगता होते.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अंकातले पहिले काही
लेख वाचून निराशा झाली खरी पण नेट धरून बाकीचा अंक वाचल्याने मनोरंजन आणि
ज्ञानप्रबोधन असं दुहेरी समाधान पदरात पडलं.