दीपावलीचा अंक मी निदान मागच्या दिवाळीला तरी घेतला नव्हता. ह्या वर्षी लोकसत्तामधलं परीक्षण वाचून आणला.
अंकाची सुरूवात झालेय ती सुहास बहुळकर ह्यांच्या श्रीशिवकाव्य ह्या पोथीवरच्या लेखाने. लेखात खूप माहिती आहे. पण काही चित्रांचे क्रमांक आणि माहिती ह्यात गल्लत झालेय. काही चित्रांबद्दल माहिती आहे पण ती चित्रं लेखात समाविष्ट केली गेलेली नाहीत. त्यामुळे वाचताना थोडा हिरमोड होतो.
भारतीय संगीतातलं - मग ते शास्त्रीय असो की लोकसंगीत - मला फारसं कळत नाही. त्यामुळे कुमार गंधर्व आणि त्यांची गायकी ह्याबद्दल नुसतं ऐकून आहे. तरी ह्यावरच अरुण खोपकर ह्यांचा 'शिवपुत्राचे इंद्रधनुष्य' हा लेख उत्सुकतेने वाचला. ह्यात त्यांनी कुमारांच्या 'गीतवर्षा' ह्या पावसाशी संबंधित लोकगीतांवरच्या कार्यक्रमाबद्दल विस्ताराने लिहिलं आहे. संगीतावर किती खोल विचार केला जाऊ शकतो ह्यासोबत एक रसिक बनायला किती आणि काय काय माहीत असावं लागत त्याची जाणीव हा लेख करून देतो. लेख वाचून युट्युबवर सर्च केलं तेव्हा ह्याची काही रेकॉर्डिंग सापडली. वेळ काढून ती ऐकायला हवीत. 'गंधवार्ता' हा डॉ. बाळ फोंडके ह्यांचा गंधांच्या दुनियेवरचा लेख थोडा शास्त्रीय भाषेतला असला तरी इंटरेस्टिंग आहे. 'मणिपूर आणि मेंदू' मधून मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यावरचा एका वेगळ्या अंगाने केलेला विचार सुबोध जावडेकर ह्यांनी मांडलाय. पण लेखाच्या शेवटचं 'स्त्रियांकडे व्यक्ती म्हणून बघायला शिकलं पाहिजे' हे विधान किती वाचून असलं तरी ते कितपत शक्य होतील ह्याची शंका वाटते.
'जेआरडींची पत्रं' ह्या लेखातून अंबरीश मिश्र ह्यांनी टाटांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू त्यांच्या आयुष्यातल्या काही घटनासहित उलगडून दाखवले आहेत. लेख वाचून जेआरडींचं चरित्र आणि हे 'लेटर्स' हे पुस्तक वाचायच्या पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झालं.
'केमेरा' ही मिलिंद बोकील ह्यांची कथा वाचून जे आपलयाला समजलंय तेच लेखकाला सांगायचं होतं का आणखी काहीतरी हा प्रश्न पडला. विवेक गोविलकरांची 'स्वीकार' कळलीही नाही आणि आवडलीही नाही. गणेश मतकरींची 'थाप' मात्र आवडली. 'शेरलॉक होम्स आणि कसब्यातला हस्तसामुद्रिक' ही हृषीकेश गुप्ते ह्यांची दीर्घकथा आवडली. पण एव्हढे मराठमोळे शेरलॉक आणि वोटसन आर्थर कोनन डॉयल सोडाच पण दस्तुरखुद्द पुणेकरांनासुद्धा किती चालतील हा प्रश्न आहे :-) असीम चाफळकर ह्यांची 'ड्रोनाचार्य' ठीक वाटली. 'यंक्याच्या आईचे रहस्य' गोष्टीच्या सुरुवातीसच लक्षात आलं होतं तरीही किरण क्षीरसागर ह्यांची ही कथा आवडली. 'लाव्हा आणि फुलं' (उज्ज्वल राणे) विज्ञानकथा म्हणून ठीक वाटली.
'कविता' विभागाने मात्र सुखद धक्का दिला. कवितेचं आणि माझं फारसं जमत नाही. पण ह्या विभागातल्या बऱ्याच कविता कळल्या आणि त्यामुळे आवडल्या देखील. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो पुढील कवितांचा - चित्र आणि नाटक (हेमंत जोगळेकर), इमारत (उत्तम कोळगावकर), झाडं (वसंत आबाजी डहाके), मित्रा (नीरजा), सीतेने लिहिलेलं पात्र (किरण येले), सापडणं (कल्पना दुधाळ, इतकेच पुरेसे आहे (प्रतिभा सराफ), गझल (चंद्रशेखर सानेकर), गोष्ट शहाण्या सश्याची (हर्षदा सुंठणकर) आणि आईचा रस्ता (ऐश्वर्य पाटेकर).
'धर्माचा रंग काळा' हा डॉ. प्रतिभा राय ह्यांच्या लेखाचा राधा जोगळेकर ह्यांनी केलेला अनुवाद वाचून सुन्न झाले. लेखिकेचं ओडिया भाषेतलं आत्मचरित्र अनुवादित असेल तर वाचायला आवडेल. पुरीच्या जगन्नाथ मंदिरात जायची इच्छा मात्र आता होईल असं वाटत नाही. दाग देहलवी ह्या शायरावरचा नंदिनी आत्मसिद्ध ह्यांचा लेख आवडला. शेरोशायरी हा एक रिटायर झाल्यावर अभ्यास करायच्या यादीत टाकलेला विषय आहे ह्याची पुन्हा एकदा जाणीव ह्या लेखाच्या निमित्ताने झाली. पहिल्या व्यवसायीक स्त्री डॉक्टर कोण ह्यावर लिहिलेला अंजली कीर्तने ह्यांचा लेख आवडला. 'क्रेझी हॉर्स' ह्या अमेरिकेतल्या बनत असलेल्या मॉन्युमेंटवरचा अरुणा गर्गे ह्यांचा छोटेखानी लेख माहितीपूर्ण. मला ह्याबद्दल काहीच माहीत नव्हतं.
'आहे लोकशाही तरीही...' हे शीर्षक वाचून ह्या विभागात काय लेख असतील ह्याचा अंदाज आला. पैकी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी, मोहन हिराबाई हिरालाल, दीपक करंजीकर आणि उत्पल व. बा. ह्यांचे लेख वाचले. डॉ. भालचंद्र मुणगेकर ह्यांचा लेख मला झेपला नाही. त्यामुळे तो वरवर वाचला हे लिहायला लाज वाटतेय. 'मोदीविरोध आणि वैचारिक अस्पृश्यता' असलं शीर्षक असलेला लेख विनय सहस्त्रबुध्दे ह्यांनी लिहिला आहे. ह्यांचे लोकसत्तातले लेख वाचून लेखात काय असेल ह्याचा पक्का अंदाज असल्याने सरळ स्किप केला.
'किचनक्रांती' ही प्रशांत कुलकर्णी ह्यांची व्यंगचित्रं खूप आवडली.
एकुणात काय तर परीक्षण वाचून अंक आणल्याचं चीज झालं.