भवतालच्या २०२४ च्या दिवाळी अंकात ह्या देशात बाहेरून आलेल्या व्यक्तींकडून पोशाख, अन्न, धर्म, वास्तू, भाषा इत्यादीत झालेल्या देवाणघेवाणीवर आधारित लेख आहेत. सध्याच्या आपल्याला सोयीस्कर असा इतिहास पुन्हा लिहिण्याच्या आणि धर्म-भाषा-संस्कृती-खाणं ह्याबद्दल टोकाचा अभिमान बाळगण्याच्या काळात असा अंक काढण्याचं धाडस केलं म्हणून संपादकांचं आणि आपल्या लेखातून ही अशी देवाणघेवाण समृद्धीकडे नेते म्हणून त्यात कमीपणा नाही तर अभिमान बाळगायला हवा असं ठासून सांगणाऱ्या लेखकांचं अभिनंदन करावं तेव्हढं थोडंच आहे.
अंकातले सर्वच लेख सुरेख आहेत. पण मला आवडलेले काही खास लेख म्हणजे - महाराष्ट्रात २००० वर्षात आलेल्या लोकांनी इथल्या विविध गोष्टींवर कसा प्रभाव टाकला त्याचं विवेचन करणारा डॉ. अनुजा जोशी ह्यांचा लेख, कोकणातल्या देवतांवरचा डॉ. दुर्गा काळे ह्यांचा लेख, भारत-इराण मधली सांस्कृतिक देवाणघेवाण उलगडणारा डॉ. अशोक राणा ह्यांचा लेख, मराठी भाषेत निरनिराळ्या संस्कृतीतून, भाषेतून शब्द, म्हणी, वाक्प्रचार कसे आले ते सांगणारा डॉ. केशव देशमुख आणि डॉ. नलिनी जोशी ह्यांचे लेख आणि खाद्यसंस्कृतीत बाहेरून आलेल्या लोकांमुळे कसे बदल झाले ह्यावरचे डॉ. कुरुष दलाल, डॉ. मोहसीन मुकादम आणि डॉ. सागर कारखानीस ह्यांचे लेख.
बटाटा, मिरची, कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, शेंगदाणा, मका सगळं पोर्तुगीजांनी आणलं तर त्याआधी आपण खात तरी काय होतो असाही प्रश्न पडला. हे सगळं येण्याआधी आपली खाद्यसंस्कृती काय होती त्यावर एक लेख असता तर वाचायला आवडला असता. मुंबईतल्या रेस्टोरंटसवरचा डॉ. मोहसीन मुकादम ह्यांचा लेख तर खूपच आवडला. मराठा स्थापत्यावर इस्लामी आणि युरोपीय शैलीच्या पडलेल्या प्रभावावर डॉ. पुष्कर सोहोनी हयांनी लिहिलेला लेख वाचून मंदिरं, किल्ले ह्या जागा कश्या पाहिल्या पाहिजेत ह्यावर एक लेखमाला कोणीतरी लिहू शकेल असं वाटलं. असं डोळस पर्यटन होणं खूप गरजेचं आहे.
भारतातलया आध्यात्मिक जीवनावर बाहेरून आलेल्या संस्कृतीने टाकलेल्या प्रभावावर अधिक लेख हवे होते. संगीत, नृत्य, साहित्य, पेहराव, घररचना आदी विषयसुद्धा घेता आले असते. कदाचित एका अंकात मावणारा हा विषयच नाही.
भवतालच्या प्रत्येक अंकात डोक्याला भरपूर खाद्य देणारा मजकूर असतो. हाही अंक अपवाद नाही. यंदाच्या दिवाळी अंकात काय मजकूर असणार ह्याची आत्तापासूनच उत्सुकता लागली आहे.