खरं तर दर वर्षी दिवाळी अंकांच्या वाचनाची सुरुवात लोकसत्ताच्या अंकाने करायची हा नेम झालाय. पण ह्या वर्षी मॅजेस्टिकमधून प्रथम आणलेले अंक कपाटावर ठेवले त्यात लोकसत्ताचा अंक आहे. जेव्हा वाचायला सवड झाली तेव्हा दुसर्या खेपेला आणलेले अंक खालीच होते ते आधी काढले. लोकप्रभा दिसला आणि तोच वाचायला घेतला. अंक वाचून एक महिन्याच्या वर होऊन गेलाय. त्यामुळे तो वाचून संपवला तेव्हा काय प्रतिक्रिया होती ती नेमकी आठवणं कठिण आहे. तरी काहीच न लिहिण्यापेक्षा बरं.
चित्रकलेचं आणि माझं शाळेतल्या दिवसांपासून वाकडं. ज्यांची चित्रकला चांगली आहे त्यांना मनमुराद चित्र काढू द्यावी पण ज्यांना धड माणूस नीट काढता येत नाही त्यांना दुसरं काहीतरी आवडीचं करण्यात तो वेळ घालवू द्यावा वगैरे विचार त्या काळात नसल्याने कोणते दोन रंग मिसळले की तिसरा तयार होतो, उष्ण रंग आणि शीत रंग कोणते अशी थिअरी शिकण्यात आणि एक पेला, एक बशी वगैरे ठेवून त्यांची हुबेहूब चित्र काढण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यात आयुष्याचे काही तास वाया गेले. असो. त्यामुळे विनायक परब ह्यांचा 'सहजतेतील सौंदर्यशोध' हा लेख वाचला. पण त्यातलं फार काही आत झिरपलं नाही किन्वा हाती लागलं नाही. त्या मानाने डॉ. उज्ज्वला दळवी ह्यांचा 'गोष्ट मनुष्यप्राण्याची' हा माणसाच्या उत्क्रांतीवरचा लेख बराच मोठा असूनही आवडला.
मी सोशल मीडियापासून दूर असल्याने फेसबुकचा आणि माझा दुरान्वयानेही संबंध नाही. तरी 'हे मेटाव्हर्स आहे तरी नक्की काय प्रकरण' ह्या उत्सुकतेतुन 'मेटा मनमर्जीया' हा दिलीप टिकले ह्यांचा लेख वाचला. ज्यांना ही उत्सुकता आहे त्यांनी नक्की वाचावा. 'चिअरगर्ल' म्हटलं की नाही म्हटलं तरी एक विशीष्ट प्रतिमा डोळयांसमोर उभी राहाते. त्यामुळे 'चिअरगर्ल संशोधक होते तेव्हा' हे डॉ. विनया जंगले ह्यांच्या लेखाचं शीर्षक वाचून थोडी उडालेच. खोटं का बोला? मादागास्करमधली सगळ्यात लहान माकडाची जात शोधून काढली हे वाचून ह्या मिरेया मेयर नावाच्या स्त्रीला मी मनोमन सलाम केला. किती चिकाटी लागली असेल ह्या कामाला. कल्पनादेखील करवत नाही. नेशनल जिओग्राफिक वरचे तिचे कार्यक्रम पाहायला हवेत कधीतरी असं वाटून गेलं.
'हाssल्यू वर स्वार' हा प्राची साटम ह्यांचा साऊथ कोरियाशी निगडित के-द्रामा, के-फूड, के-ब्युटी ह्या एकंदरीत प्रकाराबद्दल लेख वाचनीय आहे. मागच्या वर्षीही ह्यावर कुठल्याश्या दिवाळी अंकात वाचल्याचं स्मरतंय.
शेती ह्या विषयावर आजकाल बरंच बोललं-लिहिलं जातंय. मग ते ऑर्गेनिक शेतीबाबत असो, वाढत्या खत-वापराबद्दल असो किंवा त्यासंबंधीच्या कायद्याबद्दलच्या आंदोलनाबद्दल असो. नव्या वाणाच्या पिकांमुळे देशी वाणाची पिकं मागे पडताहेत किंवा नामशेष होताहेत हेही वाचनात आलेलं. डॉ. संजीव कुलकर्णी ह्यांची 'नॉट विदाउट अ फाईट' त्याच विषयावर आधारित आहे. थोडी भाबडी वाटते. गोष्टीचा इतका आशादायक शेवट पाहायची सवय नाही राहिली आता. पण हे असंच व्हायला पाहिजे असं वाटायला लावते. अगदी आपला ह्यावर तीळभरही कंट्रोल नाही हे पक्के ठाऊक असतानाही.
जंगलं, पर्वत वगैरे माझ्या खास आवडीचे. त्यामुळे डॉ. राधिका टिपरे ह्यांचा 'मानसच्या जंगलात' हा लेख खूप आवडला. पूर्वांचलमधलं एक काझीरंगा आणि दुसरं पाके ऐकून माहीत होतं. जोडीला मानस, ओरँग, नामेरी हीसुद्धा आहेत हे ऐकून जीव दडपला. कधी होणार हे सगळं पाहून?
नर्मदा परिक्रमेबद्दल जे काही वाचलंय त्यावरून हे प्रकरण आपल्याला झेपणारं नाही ह्याचा अंदाज आला. पण तरी नर्मदेच्या किनाऱ्यावरच्या गावातल्या लोकांच्या जीवनावर प्रसाद निकते ह्यांनी लिहिलेला 'नर्मदेच्या किनारी' हा लेख आवडला. एव्हरेस्टवरच्या हृषीकेश यादव ह्यांच्या लेखाने 'निदान बेस केम्पपर्यंत तरी जाऊन येण्याच्या' माझ्या स्वप्नाची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
हजारो ख्वाहिशें ऐसी.........