लोकसत्ताच्या अंकातले चॅटजीपीटीवरचे लेख फारसे आवडले नव्हते. त्यामुळे ह्या अंकाची सुरुवातच तब्बल ११ लेख असलेल्या 'एआयचं जग' ह्या विभागाने झाली हे पाहून थोडी निराशाच झाली. नेटाने काही लेख वाचले खरे पण नंतर नंतर मात्र प्रयत्न सोडून दिला आणि काही लेख चक्क स्किप केले.
सतीश तांबे ह्यांची 'अब्रह्मण्यम ' थोडी वेगळ्या धाटणीची वाटली. पण खरं सांगायचं तर लेखकाला काय म्हणायचं आहे ते आपल्याला पूर्ण कळलेलं नाही असंच अजून वाटतं आहे. तेच 'भर माध्यान्ही' ह्या कथेबद्दल. 'मणिपूरची फाळणी' हा पार्थ एम. एन. ह्यांचा रिपोर्ताज अस्वस्थ करणारा. हे असं काही आपल्या देशात घडलं आणि काही दिवस कोणाला त्याचा पत्ताही लागला नाही हेच मुळात भयंकर अस्वस्थ करणारं आहे. आपण कुठे चाललोय ह्याचा विचारही करवत नाही. :-(
'मॅडपणा नुसता' हा गजू तायडे ह्यांनी लिहिलेला लेख व्यंगचित्रकार Al Jaffee ह्यांची ओळख करून देतो. फोल्ड-इन व्यंगचित्र ही कल्पनाच भारी वाटते, लेखात दिलेले 'snappy answers to stupid questions' चे नमुने खूप आवडतात आणि 'मॅड' चे जुने अंक कुठे वाचायला मिळतील का हा विचार डोक्यात येऊन जातो. व्हिएतनामवरचा हेमंत कर्णिक ह्यांचा रिपोर्ताज आवडला.
'सण' ही वासिम मणेर ह्यांची कथा एक चांगला विचार मांडते. पण त्यातल्या पात्रांच्या तोंडी जी शिवराळ भाषा आहे ती वाचून अगदी नको नको होतं. पात्रांची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी अधोरेखित करायला ती कदाचित गरजेची असेलही पण तरी भातातल्या खड्यांसारखी वाक्यावाक्याला टोचत राहते.
शरणकुमार लिंबाळे हे नाव ऐकून माहीत आहे. पण एकूणात वास्तववादी काही पाहायची किंवा वाचायची हिंमत माझ्यात सध्यातरी नसल्यामुळे त्यापलीकडे त्यांच्या लिखाणाशी माझा परिचय नाही. तो थोड्याफार प्रमाणात संजय पवार ह्यांचा लेख वाचून झाली. वाढत्या वयानुसार ही हिंमत पुढेमागे गोळा करता आलीच तर त्यांची पुस्तकं नक्की वाचेन.
समीर गायकवाड ह्यांचे काही लेख 'मायबोली' ह्या साईटवर वाचले होते. इथे 'काही' हा शब्द महत्त्वाचा. हेही लिखाण वाचायची हिंमत सध्या नाही. मुळात हे असं वाचून त्यातून जी भयानक अस्वस्थता येते आणि पुढे दिवसचे दिवस वाचलेला मजकूर आठवून अधूनमधून जाणवत राहाते ती सोसायची तयारी नाही. सध्या कोशात जगणं मान्य केलेलं आहे. पण तरी त्यांनी संस्करण केलेल्या 'कविता वेश्यांच्या' ह्या सदरातल्या सगळ्या कविता वाचल्या. त्यांचं भयानक दु:ख आणि आयुष्य अक्षरश: डोळयांपुढे उभं राहातं. ह्यापुढे आणखी काय सांगायचं? :-(
'शेजारी देशांमधले मुसलमान' हा पाकिस्तानमधले अहमदिया, म्यानमारमधले रोहिंग्या आणि चीनमधले उइघुर ह्यांच्यावरच्या अन्यायाबद्दल माहिती देणारा लेख सध्या अप्रिय असणाऱ्या विषयावर भाष्य करणारा. लोकेश शेवडेंचा 'ब्रूसली चा प्रश्न' हा रिपोर्ताज आवडला.
जाफर पनाही ह्या इराणी दिग्दर्शकाबद्दल आणि त्याच्या चित्रपटांबद्दल मीना कर्णिक ह्यांनी लिहिलं आहे. पैकी The White Balloon बद्दल वाचलं होतं. वेळ काढून हे सर्व चित्रपट बघणार ही खूणगाठ मनाशी पक्की केली आहे.
'वैखरी' ही डॉ. संतोष पाठारे ह्यांची कथा आवडली अश्यासाठी की ती आपल्याला कथा वाचताना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शेवटपर्यंत देतच नाही.
अंजली चिपलकट्टी ह्यांचा 'बेलेईव्हचे पाळतू कोल्हे' हा रिपोर्ताज देशातल्या सद्य स्थितीवर परखड भाष्य करणारा. प्रदीप चंपानेरकर ह्यांचा 'नेहरू आणि मी' आज देशात ज्यांचं विस्मरण होतं आहे त्या विचारांची आठवण करून देतो.
'निरोप' ही शिल्पा पाठक ह्यांची कथा मात्र मला खूप आवडली. नवरा सोबत असताना दर सुट्टीत ritual म्हणून जी गोष्ट करत होतो तीच गोष्ट तो सोबत नसताना आपण करू शकतो की नाही ह्याची खात्री नसताना करत स्वतःच स्वतःला गवसत जाणारी ही स्त्री आहे.
प्रकाश अकोलकर ह्यांनी 'चारचौघे' मध्ये सुधीर नांदगावकर, जयंत धर्माधिकारी, वि.वि. करमरकर आणि कमलाकर नाडकर्णी ह्यांच्याबद्दल लिहिलं आहे. पण ह्याबद्दल अधिक विस्ताराने वाचायला आवडलं असतं. डॉ. ऋषिकेश रांगणेकर ह्यांनी नेहमीपेक्षा थोडं हटके राशिभविष्य लिहिलं आहे ते वाचण्यासारखं.