मागच्या महिन्यात सहज म्हणून चेक केलं तर 'किल्ला'चे जवळपास मागचे ८-१० दिवाळी अंक संग्रहात आहेत. त्यामानाने दुर्ग आणि दुर्गांच्या देशातूनचे कमी अंक आहेत. मात्र का ते लक्षात येत नाहीये. २०२४ पासून हे दोन्ही दिवाळी अंक सुद्धा जपून ठेवायचे ठरवलं आहे.
'किल्ला' चा अंक वाचताना लक्ष न गेलेली एक गोष्ट इथे लक्षात आली ती म्हणजे बहुतांश लेख पुण्याच्या लेखकांचे आहेत. नाशिक आणि इतर ठिकाणच्या मंडळींनी सुद्धा लिहिलंय पण मुंबईमधलं कोणी नाही. मुंबईमधूनसुद्धा ट्रेकिंगला जाणारे बरेच लोक आहेत की. पण त्यांचा एकही लेख नाही. ह्याचं कारण काय असावं कळत नाही. असो. २०२४ च्या दिवाळी अंकात एकूण २१ लेख आहेत.
पैकी पहिला अमित मराठे ह्यांनी लिहिलेला लेख कुठल्याही गड-किल्ल्यावर नसून महाबळेश्वरच्या दक्षिणेला असलेल्या कांदाटच्या जंगलाच्या भटकंतीवर आहे. छान माहिती असलेला हा लेख आपणही ही भटकंती करून यावी असंच वाटायला लावतो. झाशीच्या राणीबद्दल आपण सर्वानीच ऐकलं-वाचलेलं असतं. पण किल्ल्याची माहिती फारशी नसते. अमोल सांडे ह्यांचा लेख राणी लक्ष्मीबाईंच्या आधीपासूनचा झाशीचा इतिहास आणि प्रत्यक्ष किल्ला ह्याबद्दल साद्यन्त माहिती देतो. महाराष्ट्रातले किल्ले बघायला अजून मुहूर्त सापडला नाही तर हे बाकीच्या भारतातले किल्ले कधी पाहणार हा विचार नाही म्हटलं तरी डोक्यात येऊन गेलाच. इलाज नाही :-(
किल्ला म्हटलं की चढायला कितपत सोपा हा विचार आधी मनात येतो. अंकुर काळे ह्यांच्या लोहगडावरच्या लेखात गडाच्या महाद्वाराचा फोटो पाहूनच गडाच्या प्रेमात पडायला झालं. रतनगडाचा उल्लेख आधी वाचनात आलेला असला तरी मृगगड आणि सोनगिरी ह्याबद्दल राज मेमाणे ह्यांच्या लेखातून प्रथमच वाचायला मिळालं. मोडी कागदपत्रांचा अभ्यास करताना ह्या गडांच्या इतिहासाबद्दल त्यांना माहिती मिळाली. आपण मोडीचा अभ्यास सुरु ठेवला नाही ह्याचा पुन्हा एकदा खेद वाटला.
महाबळेश्वरजवळच्या प्रतापगडाविषयी वाचलं होतं आणि जावळीचे खोरं शिवाजी महाराजांनी मोरयांना घडवलेल्या अद्दलीबद्दल वाचून माहीत होतं. पण विदर्भातसुद्धा एक प्रतापगड आहे ही माहीती नवीन. त्यामुळे विनीत दाते ह्यांचा लेख उत्सुकतेने वाचला. त्यातला गडाच्या वाटेवरच्या जंगलाचा फोटो एव्हढा सुरेख आहे की तो पाहूनच तिथे जायचा मोह व्हावा. गम्मत म्हणजे महाबळेश्वरजवळच्या प्रतापगडाविषयी साईप्रकाश बेलसरे ह्यांनी सुद्धा एक लेख लिहिलेला आहे. भूतकाळात होऊन गेलेल्या राजवटींनी पाडलेली नाणी हा कायमच कुतूहलाचा विषय. निखिल दीक्षित ह्यांनी नाण्यावरच नाही तर दुर्ग-किल्ल्यांवर असलेल्या टांकसाळीवर माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. मला तर सगळी नाणी सारखीच दिसत होती. :-) वेगळी कशी ओळखतात ते लेखात दिलं होतं तरी बरीच चिन्हे निदान मला तरी नाण्यांवर दिसली नाहीत :-(
रवळ्या-जवळ्याचा फक्त उल्लेख आधीच्या अंकांत वाचला होता. पण टाकीरा आणि चौंगावचा किल्ला ह्यांचा उल्लेख आठवत नाही. म्हणून ह्या सगळ्या किल्ल्यांवरचे लेख वाचायला मजा आली. मोहनगड आणि पारमाची नाळ ट्रेक चा लेख (ओंकार ओक) वाचून आपणच तो ट्रेक केल्यासारखं वाटलं. प्रचितगडाची प्रचिती (डॉ. हेमंत बोरसे) एका फसलेल्या ट्रेकची गोष्ट सांगतो. 'पदरगडाशी झटापट' हा अरविंद देशपांडेंचा लेख वाचून तर त्यांना खरोखर साष्टांग नमस्कार घालावयास वाटला. एव्हढं धाडस काही आपल्याच्यानं झालं नसतं.
किल्ले बाणकोट (शलाका वारंगे) आणि वसंतगड (रेणुका काळे) हे लेख लिहीणार्या लेखिका आहेत हे वाचून सुखद धक्का बसला. नाहीतर हे बहुतांश लेख पुरुष ट्रेकर्सनीच लिहिलेले असतात. त्याबद्दल अर्थातच काही तक्रार नाही. पण तरी एक स्त्री म्हणून ह्या स्त्रियांचे लेख वाचून आनंद वाटला हे कबूल करायलाच हवं :-)
मुडागड (शिवप्रसाद शेवाळे), मिरजन (मिलिंद आमडेकर), तळा-घोसाळगड (संकेत शिंदे) बद्दल सुद्धा कधी ऐकलं नव्हतं. चिपळूण तालुक्यातल्या नवतेदुर्ग, कासारदुर्ग आणि माणिकदुर्गची ओळख राहुल वारंगे करून देतात. संतोष जाधव हयांनी नाणेघाटाजवळच्या निमगिरीवर लिहिलं आहे. त्या लेखातल्या फोटोत किल्ल्याकडे जाणाऱ्या उभ्या पायऱ्या बघून छाती दडपते. अपरिचित दुर्गांबद्दल डिटेल माहिती देणारे असे लेख हे गड-किल्ल्यांना वाहून घेतलेल्या साऱ्याच अंकांचं वैशिष्ट्य आहे.
अंकाच्या शेवटी रियासतकारांवरचा छोटेखानी लेख नंदन वांद्रे ह्यांनी लिहिलाय. मराठी रियासत (हिचे ८ खंड असावेत असं लेखाच्या शेवटच्या जाहिरातीवरून कळतं), ब्रिटिश रियासत, मुसलमान रियासत (ह्यांचे किती खंड आहेत देव जाणे) हे सगळे वाचायची इच्छा झाली.
आता खरोखर 'हजार ख्वाहिशें ऐसी' च्या वर ख्वाहिशें झाली आहेत :-) बाकी मनोरथ तडीस नेण्याचं काम देवाजीचं! आपण काय रंगमंचकी कठपुतलिया!