गेली १-२ वर्षं महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांबद्दल मला जरा उत्सुकता वाटू लागली आहे. तसं पाहायला गेलं तर प्रतापगड, सिंहगड आणि रायगड हे तीन किल्ले पाहिलेत. पण ती नुसतीच पायपीट होती. त्यात किल्ल्याविषयी, त्याच्या इतिहासाविषयी जाणून घ्यायचा मी प्रयत्न केलाच नव्हता. डोळसपणे पाहणं नव्हतंच मुळी ते. आता हे लक्षात आलं आहे तर निदान चढायला सोपे असे काही किल्ले पाहून यावेत अशी फार इच्छा असली तरी त्याबाबत सध्या तरी काही ठोस पावलं उचललेली नाहीत. तशी संधी मिळेस्तोवर निदान त्याबद्दल काही वाचावं अश्या उद्देशाने 'किल्ला' आणि 'दुर्गांच्या देशातून' हे अंक दर दिवाळीला आवर्जून घेतेय. ही पोस्ट 'दुर्गांच्या देशातून' च्या २०१७ च्या अंकाबद्दल.
अंकात एकूण २६ लेख आहेत. पैकी 'वॉकिंग ओन द एज' ह्या मोहिमेबद्दल आधीच्या एका अंकात वाचलं असल्याने त्यातून नवं असं फारसं हाती लागलं नाही. ‘विदर्भाची दुर्गसंपदा' हा लेख खूप माहितीपूर्ण पण थोडा रुक्ष वाटला. संदर्भसूची म्हणून मात्र तो फार उपयोगी आहे. ‘५७ व्या वर्षातला विक्रम' लेखकाच्या आत्मप्रौढीमुळे वाचताना कंटाळवाणा झाला. ५७ व्या वर्षी ४० दिवसात ५१ किल्ले पाहणं कौतुकास्पद आहे पण कोणी स्वत:ची टिमकी फार वाजवली की माझं अत्यंत प्रतिकूल मत होतं त्या व्यक्तीबद्दल. लेख वाचताना असंही वाटून गेलं की नुसता विक्रम करायच्या हव्यासापोटी किल्ल्याला भोज्ज्या करून येणं हे त्याच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. असो. ज्याचा त्याचा दृष्टीकोन. काही वर्षांपूर्वी एव्हरेस्टवरचा लेख वाचून निदान बेस केंपपर्यंत तरी जाऊन यावं अशी एक अशक्य इच्छा माझ्या मनात आहे. पण हिमालयातली मोहीम म्हणजे काय चीज आहे ते 'माझं अधुरं स्वप्न – एव्हरेस्ट' ह्या लेखावरून पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं. Historic Forts Of Goa हा लेख इंग्रजीत असण्याचं प्रयोजन कळलं नाही पण ह्या निमित्ताने गोव्यात किल्ले आहेत हे कळलं. ‘पन्हाळा ते राजगड व्हाया विशाळगड' वाचून पन्हाळा ते विशाळगड हा प्रवास आपणही केला पाहिजे असं वाटू लागलंय. हजारो ख्वाहिशे ऐसी......
‘भीमाशंकरच्या जटात आणि नाणेघाटाच्या ओठांत' वाचून घाटवाटाबद्दल मस्त माहिती मिळाली. इतिहासाच्या पुस्तकातून लाल महालातल्या नामुष्कीनंतर शाहिस्तेखान गायब झाला होता. त्याच्या बंगालमधल्या कारकिर्दीबद्दल 'शाहीस्ताखानाने बांधलेला लालबाग दुर्ग' मधून सुरेख माहिती मिळते. ‘इतिहासमय आगळावेगळा फेसबुक समूह' वाचून '’इतिहासाच्या पाऊलखुणा' हा ग्रुप जॉईन करायला तरी फेसबुकवर अकाऊंट ओपन करावा का असा प्रश्न पडला. एकाइतिहासविषयक व्होट्सप ग्रुपचा भाग असल्याने डॉ. श्रीदत्त राऊत ह्यांच्याबद्दल ऐकलं होतं. पण किल्ल्यांच्या सफाईचं काम किती जिकिरीचं असतं ते ‘दुर्गसंवर्धनाचा किमयागार' वाचून कळलं. आपल्या देशात इतिहासाविषयी किती अनास्था आहे हे वाचून खेद वाटतोच. ‘ट्रेकिंगवरील अपघातांवरचे प्रथमोपचार' हे लेख प्रत्येक भटक्याने वाचावा असाच.
'छत्रपती शिवराय आणि आरमार', ‘शासकीय भूमिकेतून दुर्गसंवर्धन', ‘शिवराईचा प्रवास', ‘अकोल्याची दुर्गभ्रमंती', ‘सिधोजीराव निंबाळकरांची पराक्रमगाथा', ‘चालुक्यांची राजधानी कल्याणी', ‘स्कीची यशोगाथा', ‘मावळातील दोन पहारेकरी', ‘अतिकठीण चढाईचा मनसंतोषगड', ‘तीन प्रसिद्ध किल्ले - भास्करगड, हर्षगड, अंजनेरी', 'प्रस्तरारोहणाचे शास्त्र', 'इंदापूरची मालोजीराजांची गढी' हे लेखही चांगली माहिती देतात. ’कविता' ह्या साहित्यप्रकारात फारसं गम्य नसल्याने अंकाच्या शेवटी असलेल्या दोन कवितांबद्दल काही मत बनवता आलं नाही.
‘प्रवास शिवरायांच्या पालखीचा' ह्या लेखाचं अंकातलं प्रयोजन कळलं नाही. प्रत्यक्ष पालखी नेतानाचे अनुभव लेखात नाहीतच, नुसतं ह्या कामी ज्यांची मदत झाली त्यांचा उदोउदो आहे.
प्रस्तावनेतून हा अंक सहावा असल्याचं कळलं. तसंच महाराष्ट्रात आता दुर्गभ्रमंतीविषयी पुरेशी जागृती झाल्याने हा अंक काढायचं प्रयोजन फारसं उरलं नाही, त्यामुळे कदाचित हा शेवटचा अंक असू शकेल असंही म्हटलं होतं. अंक काढणं ही जिकिरीची बाब आहे म्हणून अंक काढणार नसतील तर कबूल आहे. पण केवळ दुर्गभ्रमंती आता दुर्लक्षित राहिली नाही म्हणून अंकाचं प्रयोजन नाही हे कारण पटत नाही. उलट ज्यांना नव्याने ह्या क्षेत्रात आवड उत्पन्न झाली आहे अश्यांसाठी तरी हा अंक निघायलाच हवा. आशा आहे की ह्या वर्षीच्या दिवाळीला सुध्दा हा अंक मिळेल.