खरं तर गेल्या काही दिवाळीपासून नवलसोबतच धनंजयचे अंक घ्यायचं मी बंद केलं होतं. कारण मला त्यातल्या कथा फारश्या आवडल्या नव्हत्या आणि काही काही तर उगाच अस्वस्थ करणाऱ्या वाटून गेल्या होत्या. पण ह्या यावर्षी लोकसत्तामधलं परीक्षण वाचून अंक आणून बघायचा ठरवलं.
अंक भरगच्च दिसत होता तरी पहिली काही पानं जाहिरातींनी भरलेली पाहून वैतागच आला. अंकाची व्यावसायिक आणि आर्थिक गणितं सांभाळायला हे गरजेचं आहे ते पटतं. पण तरी मजकुरापेक्षा जाहिराती जास्त होऊ नयेत असं वाटतंच. ह्यांनंतर मात्र तितकीच भरगच्च अनुक्रमणिका पाहून बरं वाटलं. अंकातल्या कथा एकूण १५ विभागात विभागल्या आहेत.
'हनीट्रॅप' (बाळ फोंडके) वैज्ञानिकदृष्ट्या संभवनीय तरी थोडी अतिशयोक्तीपूर्ण वाटली. 'नजर' (किरण क्षीरसागर), काळोखाचे विश्व (सुशील अत्रे) अस्वस्थ करणाऱ्या कथापैकी. 'राणीचा चंद्रहार' (गिरीश देसाई) ही कथा पटली नाही. कुठल्याही संशोधनाची वैज्ञानिक जगात व्यवस्थित चिकित्सा होते. कुठल्याही क्षेत्रात कोणाच्याही नावाचा दबदबा असल्यामुळे ते म्हणतात ते काही चिकित्सा न करता मान्य होईल हेच मुळात पटत नाही.
'केतन काळेचं कोणी काय केलं?' (सागर कुलकर्णी) प्रेडिक्टेबल होती तरी आवडली कारण कथेच्या शीर्षकात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं लेखकाने टाळलंय. प्रत्येक वाचकाने आपल्याला हवा तो शेवट करावा. किंवा एकापेक्षा जास्त शेवट कल्पावेत. आजकाल बऱ्याचदा कथेत नक्की काय होणार आहे ह्याचा अंदाज वाचकाला लवकर येतो. पण अश्या ओपन एंडेड कथा असतील तर आपण आपली कल्पनाशक्ती लावू शकतो.
'पाठवणी' (बशीर मुजावर) आवडली. तरी वाड्यात नक्की काय झालंय ह्याचा अंदाज असूनही लोक तिथे कामावर यायला तयार होतात हे पटलं नाही. शेवटी 'सर सलामत तो पगडी पचास'. 'त्यानंतर' (मेघश्री दळवी) थोडी किचकट वाटली. 'गज सैरंध्री' (अरुण हेबळेकर) ही अरण्यकथा रहस्यमयी कथांसाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या अंकात कशी समाविष्ट झाली हे गूढ काही उकललं नाही. 'अरण्यकथा' हा विषय घेऊन गुढकथा होऊ शकते. तीच गोष्ट 'कृष्णपर्यटन' (डॉ. संजीव कुलकर्णी) ह्या कथेची. 'लव्ह एन्ड डेथ इन द आफ्टरनून ' (अरुण नेरुरकर) ही कथा 'मोसाद' या पुस्तकातून साभार घेतली आहे असा उल्लेख आहे. ही अनुवादित कथा अंकात घेण्याचं प्रयोजनसुद्धा कळलं नाही.
'सूर तेचि छेडीता' (संजय काळे), मुंग्या (माधव गोविंद धारप), 'राधानाथ चाकलादार यांची अखेरची रात्र' (चंचलकुमार घोष), इन्क्वीझिसाव (मेघा मराठे). मेजवानी (शैलेंद्र दिनकर शिर्के), 'अधिवास' (प्रतिभा सराफ), 'काट्यानं काटा' (र. अ. नेलेकर), 'शिटीफुक्या' (रवींद्र भयवाल). 'समांतर तपास' (अमोल भिमरावजी सांडे), 'अबाधित' (रामदास खरे). 'रात्र पावसाळी' (अपर्णा देशपांडे), 'द सक्सेसफुल फेल्युअर' (सुनील जावळे) आणि 'गाळवणकर चाळ' (शरद पुराणिक) ह्या कथा आवडल्या.
'धनंजय' (पुरुषोत्तम रामदासी) ही कथा रहस्यकथेपेक्षा जास्त रोमँटीक आणि थोडी फिल्मी टाईप्स वाटली. 'बहुरूपी' (असीम अमोल चाफळकर) वाचून मिशन इम्पॉसिबल चित्रपटाची आठवण झाली. ' चलो रतन' (आशिष महाबळ) वाचून असं वाटलं की धर्माच्या नावाखाली बजबजपुरी माजविणाऱ्या सगळ्या संतमहंतांना अशी सद्बुद्धी झाली तर किती बरं होईल. 'देशी व्हाया फॉरेन' (मुकुंद नवरे) ह्या कथेतून लेखकाला नक्की काय सांगायचं होतं ते निदान मला तरी कळलं नाही. 'रक्त तहान' (राजीव तांबे) कळली नाही. 'सुखवितो मधुमास हा' (गिरीश केशव पळशीकर) आणि 'अवतार मोहन बाबा' (डॉ. प्रमोद कोलवाडकर), 'वशीकरण' (मिलिंद जोशी) पटल्या नाहीत. 'मॉस्को शहरातील एना' (मूळ लेखक लूक वेसन) काही खास वाटली नाही.
'बंदी' (स्मिता पोतनीस) वाचून शहारायला झालं. करोनानंतर साथीच्या रोगांवर आधारित कथानक असलेले हॉलिवूडचे चित्रपट पाहायला नको वाटायचं तसंच वाटलं. हवामानात वेगाने होणारे बदल पाहता पाण्याखाली जाणारी शहरं ही विज्ञानकथातली कल्पना ना राहता सत्यघटना होऊही शकते ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. 'पासवर्ड' (डॉ. सुनील विभुते), 'रूम नंबर ६९' (विनय खंडागळे), 'त्रयस्थ' (राजश्री बर्वे) प्रेडिक्टेबल वाटल्या. 'दृश्यम' (श्रीराम बापट) आणि 'ललित बाबुराव डहाणूकर' (अजय गोविंद जयवंत) प्रेडिक्टेबल असूनही आवडल्या.
'पाच गूढ चोऱ्यांचं प्रकरण' ही अनुवादित कथा मूळची अल्फ्रेड हिचकॉकची आहे हे वाचून धक्का बसला इतकी ती सरधोपट आहे. बहुरूप्यांचा राजा (मूळ लेखक रॉबर्ट क्लिंटव) ही कथाही मला फारशी आवडली नाही. 'मोक्ष' (राजश्री राजवाडे काळे), 'लोभ: पापस्य कारणम' (श्रीनिवास शारंगपाणी). 'रोझीमामीचा आरसा' (मृणालिनी केळकर). 'उष:काल होता होता' (अरुण मनोहर), 'कॅंसर वॉर्ड' (वासंती फडके) ठीकठाक वाटल्या.
'हंगल साहेब थोडं हसा ना' (मूळ लेखक हरी मृदुल) आवडली नाही. एखाद्या कलाकाराच्या आयुष्यातल्या शेवटच्या दिवसातल्या त्याच्या केविलवाण्या अवस्थेचं आणि त्याचं भांडवल करणाऱ्या निगरगट्ट समाजाचं चित्रीकरण करायचंच होतं तर त्यासाठी ए. के. हंगल ह्या खऱ्याखुऱ्या कलाकाराला वापरलं नसतं तर बरं झालं असतं असं वाटून गेलं. 'मार्जाराख्यान' (मूळ लेखक एच. पी. लव्हक्राफ्ट) ह्या कथेच्या सुरुवातीच्या भागानेच इतकं अस्वस्थ केलं की मी बाकीची कथा सरळ स्किप केली.
ह्या वर्षीचा अंक एकूणात आवडला हे खरं असलं तरी तरी पुढल्या वर्षी लोकसत्तातलं परीक्षण वाचल्याशिवाय अंक घेणार नाही हेही तितकंच खरं.