मला वाटतं 'अक्षरगंध' चा अंक मी ह्याआधी कुठल्याही दिवाळीला घेतला नव्हता. अर्थात आता मागच्या वर्षींच्या अंकांबद्दलच्या पोस्टस शोधून तपासून पहायचा कंटाळा आलाय. मॅजेस्टिक दालनात जाऊन घेतलेल्या अंकांपैकी हा एक अंक. तसा संध्याकाळी उशीरच झाला होता. दिवाळीची बाकीची खरेदी करायची होती आणि ती रानडे रोडवरच्या वाहणार्या गर्दीत करोनाकाळात करायचं दडपण मनावर होतं. त्यामुळे दिवाळी अंकांची खरेदी थोडी घाईत उरकली गेली म्हणून असेल. किंवा असंही असेल की अनुक्रमणिकेत बर्याच परिचित लोकांवरचे लेख आहेत हे वाचून अंक घेतला गेला असेल. पण अंक वाचायला सुरुवात केली तेव्हा एकाच व्यक्तींविषयीचे अनेकांनी लिहिलेले लेख वाचणं किंवा अपरिचित व्यक्तींवरचे लेख वाचणं - ए़कूणात व्यक्तिचित्रं वाचणं हे आपलं काम नाही, ते आपल्याला आवडत नाही हे प्रकर्षाने जाणवलं.
ह्याचा अर्थ असा नाही की हा अंकाचा दोष आहे. अंक सर्वार्थाने खरंच परिपूर्ण आहे. ज्यांना हे लिखाण आवडतं त्यांच्यासाठी माहितीचा खजिना आहे. डॉ. जयंत नारळीकर, भास्कर चंदावरकर (ह्यांच्याविषयी मला खरंच काही माहिती नव्हती ह्याचा विषाद वाटला), दुर्गा खोटे, किशोरी आमोणकर, कनक रेळे, सुधा मूर्ती, डॉ. राणी बंग, शाहीर साबळे, प्रा.वसंत देव, मंगेश पाडगांवकर, डॉ. श्रीराम लागू ह्यांच्यासारख्या मला माहित असलेल्या अनेक मान्यवरांबद्दल ह्या लेखांत वाचायला मिळालं. पण ज्योत्स्ना कदम, डॉ. बाळ भालेराव, डॉ. नरगुंद, डॉ. सातोस्कर, डॉ. भांडारकर ह्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांचीही ओळख झाली. अर्थात काही लेख चित्रकला, गायन, नृत्य ह्या माझ्यासाठी फारसं ज्ञान नसलेल्या विषयावरचे असल्याने कंटाळवाणे वाटले ह्यात दोष सर्वस्वी माझा. ह्या विषयांत रुची आणि ज्ञान असलेल्यांसाठी ते माहितीपूर्ण ठरतील ह्यात वादाचा मुद्दा नसावा.
किरण पुरंदरेंचा 'नागझिर्याच्या अंगणात' हा लेख मात्र खूप आवडला. तसंच एके ठिकाणी सई परांजपेंनी दिग्दर्शित केलेल्या बालचित्रपटांच्या उल्लेखात 'जादूचा शंख' आणि 'सिकंदर' ह्या चित्रपटांची नावं वाचून मन एकदम अनेक वर्षं मागे गेलं. 'एक मुछंदर चार बिलंदर, हम सबका सरताज सिकंदर' हे गाणं तर किती वर्षांनी आठवलं. त्यामानाने 'अच्छे बच्चे नही जागते' ह्या अंगाईगीताच्या ओळी इतकी वर्षं झाली तरी स्मरणात होत्या. हे चित्रपट नेटवर शोधून पुन्हा पाहिले पाहिजेत. :-)
पुढच्या दिवाळीला ह्या अंकावरचं परिक्षण वाचूनच विकत घेईन.