ह्या नाटकाबद्दल, खरं तर ह्या संपूर्ण Trilogy बद्दल खूप वाचलं होतं. जेव्हा मुंबईत त्याच्या दोन भागांच्या (वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी) एकत्रित सादरीकरणाच्या जाहिराती यायला लागल्या तेव्हा आधी दोन्ही नाटकं एकदम बघावीत असा विचार केला होता. पण मग लक्षात आलं की कदाचित ते आपल्याला पेलवणार नाही. कारण ह्या नाटकाचा विषय तसा गंभीर आणि माझा पिंड हलकीफुलकी किंवा रहस्यप्रधान नाटकं पहाण्याचा. फारसं विचार करायला लावणारं झेपत नाही म्हणा ना. मग फक्त वाडा चिरेबंदीचं तिकीट काढायचं आणि मग्न तळ्याकाठी पुढेमागे कधीतरी पहायचं असं ठरवलं. नाटकं आत्ताच आली आहेत त्यामुळे प्रयोग लगेच बंद होण्याची भीती नाही.
नाटकाचा विषय फारसा नवा नाही....निदान सध्याच्या काळात तरी. कोकणावरच्या अनेक कादंबर्यातून ह्याआधीही हाताळला गेलाय. एव्हढंच काय तर झी मराठी वरून रोज रात्री १०:३० वाजता प्रसारित होणाऱ्या 'रात्रीस खेळ चाले' मध्ये सुध्दा ह्या व्यक्तिरेखांचं प्रतिबिंब आहे. कोकणातला शंभर-सव्वाशे वर्षं जुना ऐसपैस वाडा, काप गेले आणि भोकं राहिली अशी गत झालेला. सध्याच्या पिढीत त्याची डागडुजी करण्याची आर्थिक क्षमता नाही आणि कदाचित तेव्हढा उत्साहही नाही. घरात वाडवडिलार्जीत सोन्याचे दागिने भरपूर. पण कुळकायद्यात बहुतेक साऱ्या जमिनी गेलेल्या. तरीही जुनीच शान कायम ठेवायची अजिबात परवडत नसलेली केविलवाणी धडपड. वाड्यात राहणाऱ्या मोठ्या भावाचा मुलगा पराग, गावात दहावीच्या पलीकडे शिक्षणाची सोय नाही आणि शहरातल्या मार्कांच्या लढाईत निभाव लागणार नाही म्हणून गावातच राहून वाया गेलेला. त्याची धाकटी बहिण रंजू पिक्चरचं वेड डोक्यात घेऊन बसलेली, दहावी पास झाली की उजवायची एव्हढाच आईवडिलांचा तिच्या भविष्याचा विचार. देशपांडेंचा मोठा मुलगा भास्कर पूर्वीची शान कायम ठेवायचा यथाशक्ती प्रयत्न करतोय पण त्यात आपण कमी पडतोय ही जाणीव आहेच. त्याची बायको, मुलांची काळजी करणारी, तापट नवरा, वाया गेलेली मुलं, विधवा सासू आणि ऐकू येत नसलेली परिस्थितीचं भान नसलेली आजेसासू अशी कसरत सांभाळणारी. भास्करची बहिण प्रभा, इच्छा असूनही वडिलांच्या नसत्या कुळाभिमानापायी शिकण्याची संधी न मिळालेली. सांगून आलेली 'बडा घर पोकळ वासा' अश्या घरातल्या कमी शिकलेल्या, व्यसनी मुलांची स्थळं नाकारल्याने बिनलग्नाची राहिलेली. तिचा भाऊ चंदू, वेगळं दुकान टाकून आपला चरितार्थ चालवायची इच्छा असूनही भावाने नकार दिला म्हणून घरात फुकट राबणारा. आणि भास्कर, प्रभा, चंदू ह्यांची आई - नवरा गेल्यावर आता आपलं ह्या घरातलं कर्त्या स्त्रीचं स्थान संपुष्टात आलंय हे वास्तव सहज स्वीकारणारी, चंदू आणि प्रभा दोघांच्या दु:खाची जाणीव असूनही आपल्याला काही करता आलं नाही ह्याची खंत करणारी. वडील गेल्याचं निमित्त होऊन घरातला मुंबईकर झालेला मुलगा सुधीर पत्नीसह घरी येतो तिथे नाटक सुरु होतं. आणि मग सुरु होतो तो मानवी नात्यांच्या गुंतागुंतीचा खेळ.
सुधीरला राग आहे भास्करने इतकी वर्षं शेतीचं उत्पन्न त्याला वाटा न देता स्वत: खाल्ल्याचा. भास्कर म्हणतो की कुळकायद्यात जमिनी गेल्या आणि उरलेले पैसे वडिलांच्या आजारात गेले. पण त्याने सुधीरच्या शिक्षणाचा खर्च तर केला ना. सुधीर म्हणतो ते पैसे त्याच्या वाटणीच्या जमिनीतून आलेल्या उत्पन्नाचे. प्रभा भावांनी आपल्याला शिकायला मदत केली नाही म्हणून कावलेली तर पराग मुंबईला जायचा हट्ट धरून बसलेला. रंजूला पिक्चर्स सोडून दुसरं काही दिसत नाही. सुधीरची बायको ह्या सगळ्यातून नामानिराळी राहू पहातेय. वडिलांच्या कार्याला गावजेवण घालायचं हा भास्कर आणि त्याच्या बायकोचा परवडत नसतानाही असलेला हेका. त्यात सुधीरने पैशाची मदत करावी ही अपेक्षा. आईचं मत 'त्यांच्यासाठी शेवटचा खर्च करायला हवा' हे तर आटोपशीर करायला काय हरकत आहे हा सुधीरचा सवाल. आपल्याला आपला वाटा मिळायला हवा हेही त्याच्या मनात आहे. एके दिवशी धुमसत असलेल्या ह्या कोंडीचा स्फोट होतो आणि भास्कर आणि सुधीर ह्यांचं वाजतं. चिरेबंदी वाड्याचे चिरे निखळायला सुरुवात होते.
पडदा वर गेल्यावर पहिल्यांदा नजरेत भरतो तो नाटकाचा सेट. अनेक वर्षांपूर्वीच्या कोकणातल्या एकेकाळी वैभवशाली पण आता कळा आलेल्या वाड्याचा अप्रतिम सेट आपल्याला थेट कोकणात घेऊन जातो. कंदिलाची वात हळू केल्यावर किंवा विझवल्यावर झालेला काळोख तर मस्तच. खरं तर सगळ्याच कलाकारांनी जीव ओतून काम केलं आहे. पण मला लक्षात राहिल्या त्या ३ व्यक्तिरेखा - तिन्ही स्त्रियांच्या. मी स्वत: एक स्त्री असल्याने असेल कदाचित. पहिली व्यक्तिरेखा भास्करच्या बायकोची. निवेदिता जोशी सराफना मी आधी कधी नाटकात पाहिलं नव्हतं. त्यातून 'रात्रीस खेळ चाले' तल्या निलीमा आणि सरिता व्यक्तिरेखा पाहून ही वहिनी सुध्दा अशीच स्वार्थी असेल असं वाटलं होतं. पण सुखद धक्का मिळाला. भास्कर आणि सुधीरची आई म्हणते तसं स्वार्थ कोणाला सुटलाय? वहिनी आहे थोडी स्वार्थी, सुधीरने वडिलांच्या कार्यात पैश्याची मदत करावी असं तिलाही वाटतं. परागला मुंबईला शिकायला नेलं नाही म्हणून ती सुधीरवर नाराजही आहे. पण स्वत:च्या नवर्याला दागिने उशाशी ठेवायच्या ऐवजी तिजोरीत ठेवा आणि ज्याचे त्याला देऊन टाका म्हणून स्वच्छ सांगण्याची दानत आणि हिंमत आहे तिच्याकडे. सासरे गेल्यावर घराच्या चाव्या कनवटीला लावल्या तिने, घरातला कारभार हातात घेतला पण त्याबरोबर आलेल्या कर्तव्याची जाण पुरेपूर ठेवली. 'मागे वळून घराकडे पाहू नका. तुमचे पाय अडखळतील' असं सुधीरला सांगताना 'पत्र पाठवा' असंही सांगायला ती विसरत नाही. पेटीतले सगळे दागिने अंगावर घालून तिने म्हटलेला संवाद खास. प्रेक्षकातल्या प्रत्येक सुनेला आणि सासूला त्यात आपला भास झाला असेल हे नक्की. नऊवारी नेसून त्या दिसल्यात सुध्दा गोड. ही वहिनी मला नेहमी लक्षात राहील. ही भूमिका जुन्या नट संचात कोणी केली होती पहायला हवं. अरे हो, नऊवारीवरून आठवलं, आता थोडं पुलं. च्या नानभावजींच्या नाटकातली चटणी कलरची साडी लक्षात राहिलेल्या वहिनीसारखी गत आहे माझी, पण ह्या नाटकातल्या नऊवारी खूप छान होत्या.
दुसरी लक्षात राहणारी व्यक्तिरेखा म्हणजे ह्या सगळ्या भावंडांच्या आईची. आता आपली सद्दी संपली हे तिने शांतपणे कोणताही त्रागा न करता मान्य केलंय. कदाचित सासूचं तसं झालेलं पाहिलं असेल म्हणून असेल कदाचित. 'नंतर हे दागिने माझ्या परागची बायको घालेल' असं म्हणणारया वहिनीच्या तेव्हढ अजून लक्षात आलेलं दिसत नाही हा मानवी स्वभावाचा आणखी एक कंगोरा. प्रभा आणि चंदू दोघांच्या दु:खाची जाणीव त्यांच्या आईला पुरेपूर आहे. त्याबद्दल आपण आतापर्यंत काहीही करू शकलो नाही ह्याची खंत आहे. पण आता मात्र आपण त्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा, मग त्यासाठी भांडावं लागलं तरी बेहत्तर हा निर्धार आहे. 'सोनं गेलं ते बरंच झालं, भांडणाचं मूळ गेलं' असं म्हणण्याइतपत शहाणपण आहे आणि 'ओरडू नकोस, अजून तुला बरंच काही पहायचं आहे' हे सुधीरला ऐकवण्याइतकं द्रष्टेपणसुध्दा आहे. 'तू आणि मी एकत्र राहू' असं ह्या आईला तिची दोनच मुलं म्हणतात - प्रभा आणि चंदू. लग्न झाल्यावर लोकांच्या प्रायोरिटीज कश्या बदलतात हे ह्यावरून कळून यावं. नेहमी घालूनपाडून बोलणाऱ्या नवऱ्याचं 'दिवसपाणी नीट झालं नाही तर मनाला रुखरुख लागून राहील' असं ती जेव्हा म्हणते तेव्हा ही बाई पटत नाही मला, कळत तर नाहीच नाही, तिचा राग येतो पण तरीही तिच्या वाकलेल्या कंबरेपेक्षा तिचा ताठ कणाच दिसतो.
तिसरी व्यक्तिरेखा ह्या सगळ्या भावंडांच्या आजीची. काहीही ऐकू न येणारी, आजूबाजूला काय चाललंय ह्याची जाणीव नसलेली अशी ही आजी. नाटकाचा बहूतेक भाग ही एकतर झोपून असते नाहीतर 'व्यंकटेशा, किती वाजले' एव्हढंच विचारत असते. पण तिच्या स्वत:च्या जगात म्हटलेलं तिचं एक स्वगत मनाला आतून हलवून जातं. कोणाची एव्हढी परवड होऊ नये असं वाटतं. 'सुखी जीव' असं तिचं वहिनीने केलेलं वर्णन पटतं आणि खूप खूप दुखावून जातं.
वैभव मांगले आणि प्रसाद ओक ह्यांनी म्हटलेले काही संवाद ऐकू आले नाहीत एव्हढा एकच दोष काढता येईल. बाकी प्रयोग 'दृष्ट लागण्यासारखा' म्हणतात तसा. नाटकाचा शेवट तर खूपच सुरेख.
'मग्न तळ्याकाठी' बघायची खूप इच्छा आहे पण तो किती अस्वस्थ करेल ह्याची भीती वाटते. पाहू. ठरवू.