"इराणी गाथा" वाचल्यानंतर लगेहाथ 'तुर्कनामा' वाचायचं कारण जवळपास तेच - ह्या देशात कधी जाईन असं वाटत नाही तेव्हा पुस्तक वाचूनच माहिती मिळवावी. खरं तर तुर्कस्तान बद्दल माहिती म्हणजे टर्किश लिरा, बाथ, कॉफी आणि आतातुर्क. पैकी शेवटल्या आतातुर्कने ह्या देशाचा कायापालट करायला बरेच कष्ट घेतले असं कुठेतरी वाचल्याचं अंधुकसं आठवत होतं. पण ते किती वर्षांपूर्वी आणि ह्या देशाची सध्याची स्थिती काय ह्याबाबत मी पूर्णपणे कोरी. इथेही ते हिजाब आणि चादोर प्रकरण आहे की काय ह्याचीही काही कल्पना नाही. ह्या देशात मशिदी सोडून आणखी काय पहाण्यासारखं असणार आहे ह्या भावनेने पुस्तक वाचायला घेतलं आणि स्वत:च्या अज्ञानाची अतीव कीव आली.
नेमरुतचे ३० फुट उंच पुतळे, तिथला सूर्यास्त, अंकारा म्युझियम, अनित कबिर आणि म्युझियम, गोर्डीओन, युर्गुपचे गरम पाण्याचे झरे, अंडरग्राउन्ड सिटी आणि सराई, व्हर्लिंग दरवेश, गोरेमेचा सनसेट पोईंट, बलून राईड, ओपन एयर म्युझियम, डेमरेचं सेंट निकलस Cathedral, केकोव्हाची sunken city, ऑलिम्पस गावाची शिमेरा, फेतीएची गॉर्ज, दालीयानची महाकासवं, पामुक्कलेचा सनसेट, पर्गामा प्रिझन, दिदिम, मिलेतूस, इफेसुस, चानक्कले, गेलीपोली, Troy, चूनुक बेअर. आणि खुद्द इस्तंबुलमध्ये सुलेमानिया मशीद, तोपकापी राजवाडा, आय्या सोफिया, ब्लू मॉस्क, कोरा चर्च, म्युझियम, मेहेर ताकिमी, पेरा पेलेस हॉटेल मधली एगाथा ख्रिस्टीची खोली, पाण्याचा भुयारी साठा, दोल्बामाचे राजवाडा, Grand Bazar, Archaeological Museum. बाप रे! प्रत्येक गोष्ट पहाण्याजोगी. इथे जायचं म्हणजे भलीमोठी सुट्टी पाहिजे. सिम्पली अमेझिंग!
इथेही बायकांनी बुरखे घालायला सुरुवात केली आहे हे वाचून मात्र चिंता वाटली. असं झालं तर आमच्यासारख्यांना हे देश कसे पहायला मिळणार? हिजाब आणि चादोर वगैरे घालून पहायला जाणं मला काही जमायचं नाही :-( असो. पुस्तकात सर्व प्रेक्षणीय स्थळांचं वर्णन मस्त केलंय. तिथल्या जनतेची मतं तसंच त्यांची जीवनसरणी ह्याचंही छान दर्शन होतं. पण एक गोष्ट मात्र खटकली. 'केस झाक' म्हणून दरडावणारया माणसाला मीना प्रभुंनी जसं खडसावलं तसं कारण नसताना उगाच हिंदुस्थानला नावं ठेवणाऱ्या त्या गाईडला का हासडलं नाही? कधीकधी असे अनुभव येतात' असा बोटचेपा पवित्रा घेऊन का गप्प बसल्या? :-( ह्यांच्या पुस्तकांबद्दलची माझी नेहमीची तक्रार - ज्या देशात जातात तिथले खाद्यपदार्थ आणि संगीत ह्यांचं वर्णन अभावानेच येतं - ह्याही पुस्तकाबाबत आहे.
अर्थात मी कधीकाळी तुर्कस्तानला जायचं ठरवलंच तर 'तुर्कनामा' बरोबर घेऊन जाणार हे नक्की.