२०२४ चे दिवाळी अंक वाचायला ऑक्टोबरमध्ये सुरुवात केली. खरं तर आता हेही आठवत नाहीये की आधी लोकसत्ता वाचला का लोकप्रभा. लोकसत्ता वाचला असं गृहीत धरून आधी त्याबद्दल. अंकाची सुरुवात होते 'ग्रीड' ह्या एरीक व्हॅन स्ट्रोहेम नावाच्या दिग्दर्शकाच्या चित्रपटावरील लेखाने. आताशा कुठलाही पिक्चर पाहायची सहनशक्ती उरलेली नाही. आणि त्यातून ट्रॅजेडी टाईपचे चित्रपट पाहायला अज्जीबात आवडत नाही. त्यामुळे मी हा चित्रपट पाहायची शक्यता जवळपास शून्य पण त्याबद्दल वाचायला मजा आली. चित्रपटाची मूळ आवृत्ती साडेनऊ तासांची म्हटल्यावर मी तर डोक्याला हातच लावला. अर्थात त्याच्या २ तासाची एक आणि ४ तासाची एक अश्या २ आवृत्त्या युट्युबवर उपलब्ध आहेत म्हणे. जिज्ञासूंनी पाहून खात्री करावी :-)
त्यापुढच्या लेख फिनलँडमधल्या जोडगावातल्या आर्ट टाऊनवरचा. शिल्पकला, चित्रकला वगैरे मधलं माझं ज्ञान यथातथाच म्हणजे अमुक एक चित्र कळतंय आणि अमुक एक कळत नाही. चांगलं किंवा वाईट हे दोनच गट. तरीही ह्या गावात राहायचा अनुभव घेता आला तर असं मनात आलंच. 'इतिहास वर्तमान भविष्य' ह्या लोकेश शेवडे ह्यांच्या पुढच्या लेखात जर्मनी आपला इतिहास आणि त्यात झालेल्या चुका काहीही न लपवता शालेय अभ्यासक्रमातूनच भावी पिढीपुढे कसा ठेवतोय ते वाचून खरोखर भरून आलं. नाहीतर आजकाल आपल्या इथे 'कधीकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता' छाप इतिहासाची पुर्नमांडणी करायची स्पर्धा चालू आहे. त्या सोन्याच्या धुराचा आता काय उपयोग? रुपया घसरतोच आहे. पण काही शिकायचंच नाही म्हटलं की प्रश्नच मिटला. असो. 'उजव्या दृश्यकलेची वाटचाल धीमीच' हा अभिजित ताम्हाणे ह्यांचा लेख साधारण त्याच विषयावरचा. ह्यापुढला अध्यात्मावरचा हेमंत राजोपाध्ये ह्यांचा लेख बाउन्सर गेला.
नाटक हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे रवींद्र पाथरे ह्यांचा 'नाटक आणि असहिष्णुता' हा लेख उत्सुकतेने वाचला. 'उजव्या वाटेवरील सिनेमा' हा डॉ. संतोष पाठारे ह्यांचा लेखही वाचनीय.
५ लेखांचं पुढलं सेक्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आहे. त्यातले सर्वच लेख ह्या संघटनेविषयी कुतूहल असलेल्या सर्वानीच वाचावे असे - मग ते भाजपाचे समर्थक असोत वा नसोत. तरी शेवटचा राहुल भाटिया ह्यांचा 'मला माहिती आहे ते कुणालाच माहिती नाही' हा लेख वाचावाच एव्हढं सांगितलं तरी पुरे.
श्याम मनोहर ह्यांचं लेखन मला आवडतं पण 'ह्यांच्यात आपल्याला जगायचंय' ही कथा डोक्यावरून गेली :-( मिलिंद बोकील ह्यांची 'जोहार' आवडली.
फणीश्वरनाथ रेणू वर लिहिलेला आसाराम लोमटे ह्यांचा लेख वाचून आपण भारतीय लेखकांचं काहीही लिखाण वाचलेलं नाहीये ही दरवर्षी होणारी जाणीव पुन्हा ह्या वर्षीही झाली. अर्थात भाकरीचा चन्द्र शोधणे ही प्रायोरिटी असल्याने त्याबाबत सध्या तरी काही करता येणं शक्य नाहीये ही वस्तुस्थिती सध्या स्वीकारलेली आहे.
कविता विभागात दासू वैद्य ह्यांची 'वेलू गेला उकंड्यावरी' ही कविता सद्य स्थितीचं हुबेहूब वर्णन करते. पुन्हा एकदा अस्वस्थ, असहाय वाटलं. कल्पना दुधाळ ह्यांची 'निरुत्तर' सुद्धा अशीच अस्वस्थ करून गेली. आपल्याला अजूनही अस्वस्थ होता येतं हे जाणवून कुठेतरी बरं वाटलं.
प्रशांत कुलकर्णीची 'हवापालट' मधली व्यंगचित्रं सुरेख. दरवर्षीप्रमाणे माझ्या आणि जवळच्या माणसांच्या राशीत काय आहे ते 'वार्षिक राशिभविष्य' मध्ये पाहायचा प्रयत्न केला. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक राशीत जेमतेम मार्च-एप्रिल पर्यंत पोचले. आपल्या राशीचं जानेवारी ते डिसेंबर भविष्य वाचू शकणाऱ्या आणि वाचणाऱ्या माणसांना दंडवत :-)
No comments:
Post a Comment