किल्लाच्या दिवाळी अंकाचं दरवर्षीचं मुखपृष्ठ छानच असतं. पण ह्या वर्षीचं मुखपृष्ठ मला खास आवडलं. किल्ल्याचं प्रवेशद्वार आणि त्यातून दिसणारा धुक्याने आच्छादलेला पलीकडचा भाग. त्यात घडून गेलेल्या इतिहासाइतकाच गूढ आणि रहस्यमय. संपादकीयातून हा किल्ला साल्हेरचा आहे हे कळलं. तसंच यंदाच्या अंकात एकूण १४ लेख आहेत हेही कळलं. त्यापैकी खास आवडलेल्या लेखांबद्दल थोडंसं.
किल्ल्यांवरच्या जलव्यवस्थापनाबद्दल डॉ. अरुणचंद्र पाठक हयांनी लिहिलेला लेख माहितीपूर्ण तर आहेच पण एखाद्या किल्ल्यावर गेल्यावर कायकाय पाहावं ह्याविषयीसुद्धा ही माहिती उपयुक्त ठरेल अशी आहे. एका किल्ल्याची साद्यन्त माहिती देणारे लेख ही किल्ला अंकाची विशेषता. ह्यावेळी अभिजित बेल्हेकर ह्यांनी पुरंदरवर लिहिलंय. पुरंदर म्हटलं की मराठ्यांचा इतिहास शिकलेल्या कोणालाही मुरारबाजी देशपांडे आठवणारच. पण त्याच्याही पलिकडे जाऊन पायथ्याचं गाव, त्यातलं नारायणेश्वराचं मंदिर, किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या औषधी वनस्पती, किल्ल्याच्या नावाच्या उत्पत्ती, गडावरचे दरवाजे, वास्तू, माची, तट, बालेकिल्ला, स्वराज्यात येण्याआधीचा ते इंग्रजांच्या हाती १८१८ साली जाईतो पुरंदरचा इतिहास असा भरभक्कम ऐवज ह्या लेखात आहे. सरकारच्या अनास्थेतून आणि काळाच्या तडाख्यातून वाचून हे गड उभे आहेत तोवर ते एकदा फिरून यायची मनीषा आहे ती देवाजी पुरी करेल तेव्हा ह्या लेखांचा संदर्भच कामी येणार आहे.
रायलसीमामधल्या गुत्तीच्या किल्ल्याचं निदान मी तरी कधी नाव ऐकलं नव्हतं. होयसाळ आणि विजयनगर साम्राज्याच्या इतिहासात लष्करी ठाणं असलेल्या ह्या किल्ल्याचा परिचय यशोधन जोशी हयांनी करून दिलाय.
ह्या एतद्देशीय किल्ल्यांसोबतच फोर्ट नायगारा वर अमित सामंत हयांनी लिहिलं आहे. ह्या लेखात असलेलें क्यू आर कोड स्कॅन करून मस्केट रायफलचं प्रात्यक्षिक सुद्धा पाहून घेतलं. श्रीलंकेतल्या अलकमांदा किल्ल्यावर एडव्होकेट सीमंतिनी नूलकर ह्यांनी लिहिलेला लेखही छान आहे. ह्या किल्ल्याला रावणाचा किल्ला म्हणतात म्हणे. कारण सिंहली लोकांच्या मते ५००० वर्षांपूर्वी हा किल्ला कुबेराने बांधला आणि तो रावणाचा भाऊ. श्रीलंकेला जाईन तेव्हा हा किल्ला बघायचं लक्षात ठेवायला हवं.
शिवाजी महाराजांच्या वैचारिक वारशाची आपण कशी वाट लावली आहे ह्याचं उत्तम विवेचन डॉ. दीपक पवार ह्यांच्या लेखात केलंय. ते वाचून लोकसत्ता ज्यांना "समाजमाध्यमी अर्धवटराव" म्हणतो तश्या लोकांना काही अक्कल आली तरी पुरे. पण अश्या लोकांतले किती हा अंक वाचायची तसदी घेतील हा प्रश्नच आहे.
राजांच्या निवाड्यांवर डॉ. अनुराधा कुलकर्णी ह्यांनी लिहिलेल्या लेखात मूळ मोडी कागदपत्रांचे नमुने आहेत. मोडी लिपी शिकून खूप वर्ष झाली. आता काही एक वाचता येत नाही ह्याची नव्याने खंत वाटली. ट्रेकिंग बद्दल खूप काही वाचलंय. कधी काळी जाण्याची इच्छा आहे. आपल्याला जमेल की नाही ह्याची धाकधूक आहे. ट्रेकिंग करणाऱ्या तमाम भटक्यांचं कौतुक आहे. त्यामुळे 'ट्रेक नावाची थेरपी' हा मुकेश माचकर ह्यांचा लेख उत्सुकतेने वाचला.
पुरुषोत्तम भार्गवे ह्यांचा शिवराई वरचा लेख वाचून एखाद्या गडावर आपल्यालाही असं शिवकालीन नाणं मिळावं असं पुन्हा एकदा वाटून गेलं :-)
गडावर गेल्यावर काय पाहायचं ह्याबद्दल डॉ. मुकुंद कुळे ह्यांच्या 'गडरक्षक दैवतं' ह्या लेखातूनही उत्तम माहिती मिळते. हे सगळं वाचून आता वाटतंय की मी फारसे गड-किल्ले ह्याआधी पाहिले नाहीत तेच बरं आहे. ते कसे पाहायचे त्याची थोडीतरी अक्कल आता आली आहे. तरी एखाद्या अंकात पदर, नाळ वगैरे खास दुर्गांच्या बाबतीत वापरले जाणारे शब्द समजावून देणारा एखादा लेख वाचायला मिळावा असं वाटतं. असो.
ऋषिकेशला गेले तेव्हा फार तरुण होते. वाराणसी, गंगेची आरती वगैरे करायचं खूप मनात आहे. गिरीजा देशमुख ह्यांचा नेमक्या ह्याच विषयावरचा लेख खूप आवडला. नीती मेहेंदळेचा जिर्णोद्धारीत मंदिरांवरचा लेखही वाचनीय आहे.
अंकाच्या शेवटी 'दुर्गरंग' मध्ये वसईच्या किल्ल्याची संजय शेट्ये हयांनी काढलेली सुरेख चित्रं आवडली. नाही म्हटलं तरी आपल्याला चित्रकला ह्या विषयात गती नाही ह्याची खंत वाटलीच. काही गोष्टी माणूस जन्माला येताना सोबत घेऊन येतो. त्याला इलाज नाही. ह्या जन्मी नाही तर पुढल्या जन्मी पाहू :-)
No comments:
Post a Comment