खरं तर वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सुट्टीवर जाताना दुर्गांच्या देशातून आणि किल्ला हे दोन्ही अंक सोबत नेले होते. दोन्ही एकदमच वाचायला सुरुवात केली. पण एकही अंक वाचून पूर्ण झाला नाही :-) मुंबईला परत आल्यावर 'दुर्गांच्या देशातून' आधी वाचून पूर्ण झाला. विकांताला किल्ला वाचून झाला.
ह्या अंकाचं मुखपृष्ठ नेहमीच देखणं असतं. २०२२ चा अंकही अपवाद नाही. मुखपृष्ठावरील हे प्रकाशचित्र किल्ले रामशेजच्या महादरवाज्याचं आहे. चित्रावर नजर अगदी खिळून राहिली. ती मुश्किलीने सोडवून घेऊन अंक उघडला. अनुक्रमणिका पाहताच पहिला लेख मंदिरावर आणि शेवटला नाण्यांवर म्हणजे सोनेपे सुहागा. 'संपादकीय' वाचून कळलं की महाराष्ट्रातल्या ज्या १४ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून तत्त्वत: मान्यता दिली आहे त्या सर्वावर ह्या वर्षी लेख असणार होते. पण सहाच लेख मिळाल्याने ते ह्या अंकात समाविष्ट आहेत. उरलेले आठ पुढल्या वर्षी कव्हर होतील.
हे सहा किल्ले म्हणजे शिवनेरी, राजगड, रांगणा, सिंधुदुर्ग, किल्ले कुलाबा आणि किल्ले लोहगड. ह्यातला प्रत्येक लेख मन लावून वाचावा, आणि मुख्य म्हणजे ह्या किल्ल्यांना भेट देताना न विसरता सोबत ठेवावा असाच आहे. बाय द वे, किल्ल्याच्या उल्लेख 'किल्ले' असा अनेकवचनी का करतात ह्या कोड्याचं उत्तर अजून मिळालेलं नाहीये :-)
सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरावर डॉ. गो. बं. देगलुरकर ह्यांनी लिहिलं आहे. देगलुरकरांचं लिखाण मी फारसं वाचलेलं नसलं तरी त्यांचं नाव परिचित आहे. ह्या लेखाने थोडी निराशा केली. कारण लेखात माहिती तर भरपूर आहे. पण ती ज्यांना ह्यातलं आधीच बरंच माहीत आहे त्यांना तिचा उपयोग. उदा. मंदिराला ३ प्रक्षेप आहेत किंवा द्वारमार्ग पंचशाखा प्रकारचा आहे हे वाचून माझ्यासारख्या वाचकाला काय अर्थबोध होणार? त्यापेक्षा मंदिरबांधणीतल्या ह्या संज्ञांची मुळातून ओळख करून देणारी लेखमाला असेल तर तिचा बऱ्याच जणांना उपयोग होईल असं वाटतं. असो.
जॉर्डन नदीच्या खोऱ्यात वसलेल्या जेरिकोबद्दल एड. सीमंतिनी नुलकर ह्यांनी लिहिलेला लेख ज्या प्रदेशात पहिल्या मानवनिर्मित भिंती उभारल्या गेल्या त्या प्रदेशाची छान माहिती देतो. आता इथेही जावं लागणार :-)
भुवनेश्वरच्या उदयगिरी लेण्यांवर अशोक गोपाळ परब ह्यांनी सविस्तर लिहिलंय. लेखासोबतचे फोटोज पाहून लेणी पाहायची प्रबळ इच्छा होते.
दुर्गांच्या देशातूनमध्ये विश्वास पाटील ह्यांनी छोटासा लेख लिहिला होता. ह्याच विषयावर संदीप तापकीर ह्यांनी थोडं विस्ताराने लिहिलं आहे.
अंकातला शेवटचा लेख तंजावरच्या मराठी नाण्यांवर आहे. नाण्यांचे ३०-३१ फोटोज पाहूनच मस्त वाटतं. सोबत दिलेली माहिती वाचून नाणी नीट पाहायचा प्रयत्न केला. पण फोटो म्हणावे तितके स्पष्ट नसतील म्हणा किंवा नाण्यांच्या झिजेमुळे ते स्पष्ट आले नसतील म्हणा - काही नाण्यांवरची अक्षरं नीट लागली नाहीत. माहिती मात्र खूप इंटरेस्टिंग आहे. विशेषतः तंजावरच्या 'सरस्वती महाल' ह्या ग्रंथालयात अनेक कागदपत्रं आणि रेकॉर्ड्स मोडी लिपीत आहेत पण मोडी लिपी वाचू शकणारे मिळत नसल्याने त्यांचं वाचन पूर्ण झालेलं नाही हे वाचून रिटायर्ड झाल्यावर मोडीचा काही वर्षांपूर्वी केलेला अभ्यास पूर्ण करून इथे काही मदत करता येईल का असा विचार मनात येऊन गेलाच.
कधीकाळी कुठल्या किल्ल्यावर गेल्यावर एखादं तरी नाणं आपल्याला सापडावं अशी एक सुप्त इच्छा आहे :-) पूर्वीच्या काळी किल्ला सर केल्यावर अशी नाणी उधळायची पद्धत होती आणि अशी नाणी अजूनही झाडाझुडपांत अडकलेली सापडतात असं कुठेतरी वाचनात आल्यापासून तर ही इच्छा अधिकच बळावली आहे.
असेल नशीब जोरावर तर मिळेलही एखादं. कोणी सांगावं. उम्मीदपे दुनिया कायम है :-)
No comments:
Post a Comment