खरं तर ह्या वर्षीच्या अंकात एआय वर स्वतंत्र विभाग आहे हे अंकाच्या जाहिरातीत वाचून अंक घ्यायचा की नाही असा विचार करत होते. एआयचा घरीदारी, ऑफिसमध्ये एव्हढा भडीमार होतोय की आता त्याचं अजीर्ण होईल की काय अशी भीती वाटते. पण अंकातले बाकीचे लेख चांगले वाटत होते. म्हणून अंक घेतला.
पहिला लेख जर्मनीमधल्या टायटेनिक नावाच्या विनोदी मासिकावर. आपल्याला मोकळेपणाने शेरेबाजी करायची सवय नाही आणि विनोदाचे प्रकार समजून घ्यायची पात्रता नाही हे लेखक प्रशांत कुलकर्णी ह्यांचं मत अगदी मान्य. किंबहुना मी तर म्हणेन की त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करायला हवेत हेही आपल्या गावी नाही. सगळे कश्या ना कश्याने तरी आपल्या भावना दुखावून घ्यायला आणि त्याबद्दल शिमगा करायला एका पायावर तयार. असो. लेख खूप रोचक वाटलं. मासिक जर्मनमधून असल्याने आपल्याला वाचता येणार नाही ह्याची खंत वाटली. कारण ही भाषा शिकायचा प्रयत्न काही मी करणार नाही. शब्दातली अर्धी अक्षरं सायलेंट वगैरे प्रकार असला की त्या भाषेपासून दूर राहायचं असं ठरवलंय.
पुढला लेख १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात तिबेटचा प्रवास करून माहिती मिळवणाऱ्या नैनसिंग रावत ह्यांच्याबद्दलचा. मी तरी ह्याबाबत ना आधी कुठे वाचलं ना पाहिलं. आताच्या काळात एव्हढ्या सोयी असून कधी कधी प्रवास जिकिरीचा वाटतो तर तेव्हाच्या काळात असा प्रवास करायला काय चिकाटी लागत असेल. ह्या माणसाचं खूप कौतुक वाटलं. आयुष्यात असं काहीतरी करायला हवं. नाहीतर आम्ही आपले भाकरीचा चन्द्र शोधण्यात जिंदगी बरबाद करतोय.
ह्यापुढला विभाग एआय वरच्या लेखांचा. स्पष्ट सांगायचं तर मला हा विभाग फारसा आवडला नाही. ह्या विषयावर सगळीकडे लिहून येतंय. इथे वेगळा असा काय विचार असणार होता? बरं विभाग करायचाच होता तर निदान सोप्या शब्दातले लेख हेर. बऱ्याच लेखात जे मराठी शब्द वापरलेत ते वाचून अक्षरश: वैताग आला. हा अट्टाहास लेखकाचा की संपादकांचा ते कळायला मार्ग नाही. काही काही लेख तर एआय वापरूनच लिहिले असावेत इतकी क्लिष्ट भाषा होती. मी काही लेख वाचले आणि उरलेले नुसते चाळले.
'उत्सवाचं डोंगरगाव' हा गिरीश कुबेर ह्यांच्या आगामी पुस्तकातला काही भाग वाचून एडिंबराला जायची इच्छा तर झालीच पण त्यांच्या पुस्तकाविषयीसुद्धा उत्सुकता आहे.
लोकेश शेवडे ह्यांचा पर्ल हार्बर वरचा हल्ला आणि हिरोशिमा आणि नागासाकी वरचा अणुबॉम्बचा हल्ला ह्यामधला घटनाक्रम उलगडून सांगणारा लेख हादरवून टाकतो. नाझी राजवटीने क्रौर्याचा किती कळस गाठला होता ते सर्वानाच माहिती आहे. पण जपानने आपल्या युध्द्वपिपासू वृत्तीपायी काय काय केलं हे वाचून अंगावर शहारे येतात. त्याला जपानी जनतेची बऱ्यापैकी साथ होती हे वाचून आधी आश्चर्य वाटलं. मग आपल्या मायभूतले पाकिस्तानशी युद्ध करावं ह्या मताचे आक्रस्ताळी लोक आठवले. त्यांना हा लेख वाचायला द्यायला पाहिजे. मला आधी ह्याही गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की नाझी एव्हढा अत्याचार करत असताना बाकी जग गप्प का होतं? आता इस्त्रायल-गाझा आणि रशिया-युक्रेन मध्ये जे चाललंय ते पाहून जग गप्प का होतं ते कळतंय. तेव्हा तर एव्हढी दळणवळणाची साधनं पण नव्हती. आता जगाच्या एका कोपऱ्यात कुठे खुट्ट झालं की जगभर समजतं तरी काही मूठभर देश वगळता बाकी देशांची अळीमिळी गुपचिळी आहे. युध्द्व हा कधीच कुठल्याही समस्येवर उपाय असू शकत नाही हेच खरं.
सुधींद्र कुलकर्णी ह्यांचा आरएसएस वरचा लेख वाचू की वाचू नये ह्या दुग्ध्यात होते. उगाच 'ओवाळू आरती' टाईपचा लेख असेल ही भीती अनाठायी ठरली. तरी संघाचा मूळ दृष्टिकोन मुस्लिमविरोधी नाही हे वाक्य पचायला कठीण गेलं. 'हिंदुत्त्व आणि इस्लाम या देशात एकत्र राहू शकतात' हे संघाचे दुसरे सरसंघचालक ह्यांचं विधान असेल तर आजच्या संघाशी संबंधित बऱ्याच लोकांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.
मी सहसा दिवाळी अंकातल्या कथा वाचायच्या फंदात पडत नाही. पण भारतीय भाषांतल्या कथा सध्या तरी वाचायला वेळ नाही. पण गौरहरी दास हे ओडिया भाषेतले प्रमुख कथाकार म्हणून गणले जातात हे वाचून त्यांची 'कोरापुट' ही कथा वाचली आणि आवडली. तरी हिंदी अनुवाद आणि मराठी अनुवाद हा उल्लेख वाचून ह्या सगळ्यात मूळ कथेतला किती आणि काय काय हरवलं असेल हा विचार मनात आलाच. 'नाममाहात्म्य' ही निखिलेश चित्रे ह्यांची कथासुद्धा हटके वाटली.
हातमाग-विणकरांच्या जीवनावर लिहिलेला अवंती कुलकर्णी ह्यांचा लेख वाचून वाईट वाटलं. पण एव्हढ्या मोठ्या देशात जिथे पिकतं तिथून थेट विकत कसं घेता येणार?
विनय सहस्त्रबुध्दे ह्यांचा 'अवघा जन्म इव्हेन्ट झाला' हा लेख वाचून करमणूक झाली. प्रत्येक गोष्ट इव्हेन्ट करणाऱ्या पक्षाशी संबंधित असणाऱ्या माणसाने ह्याबद्दल बोलावं? असो.
'बाग' हा विजय पाडळकर ह्यांचा लेख खूप आवडला. त्यातल्या काही काही हायकूसुद्धा छान वाटल्या. कविता विभागात मेधा पाटकर ह्यांची 'लक्ष्मीपूजन' आवडली. प्रशांत कुलकर्णी ह्यांची व्यंगचित्रं छान. वार्षिक राशिभविष्य हे सदर वाचायचं नाही असं आता ठरवलंय. १२ महिन्यात काय काय होणार हे कुठे लक्षात राहणार. तेव्हा त्यात वेळ न घालवलेलाच बरा. शेवटी टाइम इज मनी!

No comments:
Post a Comment