Saturday, March 1, 2025

७. महाअनुभव (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये २५०)

कधीकधी अंकाच्या सुरुवातीचा लेख पूर्ण अंक वाचण्याचा मूड ठरवतो. असं होऊ नये पण माझ्याबाबतीत होतं खरं. सुदैवाने ह्या अंकाची सुरुवात सुहास पळशीकर ह्यांच्या 'मिथ्याकथनाच्या विळख्यात' ह्या लेखाने झाली आहे. टीव्ही, इंटरनेट, वर्तमानपत्रं ह्यातून आजकाल जो असत्य, दुही माजविणाऱ्या माहितीचा भडीमार चालू आहे त्यावर ह्या लेखात सखोल चिंतन आहे. ते वाचून डोकं शाबूत असलेला कोणताही माणूस काळजीत पडेल.

टेलर स्विफ्टबद्दल बरंच काही ऐकून असले तरी मी तिची गाणी काही ऐकलेली नाहीत. राजेश्वरी देशपांडेंचा 'टेलर स्विफ्ट नावाचं जांभळं धुकं' हा लेख वाचून ती गाणी एकदा ऐकून पाहावी असं वाटलं. 'जनुकं जेव्हा कात्रीत सापडतात' हा लेख वैद्यकीय पार्श्वभूमी नसलेल्या वाचकांना क्लिष्ट वाटू शकेल. मी खूप वाचायला घेतला पण अर्धवट सोडून दिला. क्लिष्ट वैद्यकीय माहिती सोपी करून सांगणाऱ्या डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांची आठवण झाली. काही वर्षांपूर्वी त्यांचा गर्भाच्या वाढीच्या प्रवासाचा लेख वाचून अवाक व्हायला झालं होतं. असो.

उत्तराखंडमधल्या वनगुज्जरांबद्दल कधी काही वाचनात आलं नव्हतं. ह्या भटक्या लोकांच्या आयुष्याचं त्यांच्या सोबत प्रवास करून, राहून दस्तावेजीकरण करणाऱ्या मायकल बेननाव्हचं खूप कौतुक वाटलं. विटा ह्या सांगलीतल्या दुष्काळी भागातल्या लोकांनी सोनं गाळायच्या व्यवसायात शिरून आपली आणि गावाची भरभराट कशी केली ते 'विटा दुष्काळी झळा ते सुवर्णझळाळी' ह्या लेखात वाचायला मिळतं. मराठी माणूस धंद्याला कसा नालायक हे वाचून वाचून वैताग येतो. त्यामुळे हा लेख वाचून नाही म्हटलं तरी बरं वाटलं :-)

नवऱ्याचं कौतुक करणारे 'आमचे हे' छाप लेख वाचायची सवय झाल्याने 'विमल आणि मी' हा नरेंद चपळगावकर ह्यांनी त्यांच्या 'ही' वर लिहिलेला लेख वाचून सुखद धक्का बसला.

अस्मिता पोतदार ह्यांची भरतकाम करून काढलेली चित्रं पाहून अक्षरश: अवाक व्हायला होतं. देव काय कला ठेवतो एकेकाच्या हातात. पण ह्या कलाकृतींना किंमत नाही हे वाचून वाईट वाटलं. 

यशोदा वाकणकर ह्यांचा वडील अनिल अवचट ह्यांनी अनेक वर्षांपूर्वी बिहार दुष्काळाच्या वेळेस केलेल्या पूर्णिया प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी केलेल्या प्रवासावरचा लेख आवडला. माझी आई जेव्हा तिचं बालपण जिथे गेलं त्या जागांविषयी सांगते तेव्हा तिथे जाण्याचा मोह होतोच. अगदी त्या जागा आता ओळखू न येण्याइतक्या बदलल्या असतील हे माहीत असूनसुद्धा. त्यात अन्न न मिळाल्याने जिथे अन्न मिळू शकत होतं त्या घराच्या दरवाज्याबाहेर मरण पावलेल्या एका गरीब महिलेबद्दल वाचून कसंतरीच होतं.

कोकणातल्या पेशंटवरचा डॉ. मिलिंद कुलकर्णी ह्यांचा लेख छान जमलाय. ह्या वर्षीही त्यांचा लेख वाचायला आवडेल.

इटालीतल्या माफिया युद्धात बळी गेलेल्या लोकांचं आणि ह्या भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या सर्वसामान्य लोकांचं आयुष्य आपल्या केमेर्यात बंदिस्त करणाऱ्या लेंटिसीया बतालया वर नितीन दादरवाला हयांनी लिहिलेला लेख वाचून एव्हढी रिस्क घेऊन हे काम करणाऱ्या ह्या बाईची कमाल वाटते. तिने काढलेले काही फोटो ह्या लेखात आहेत. ते पाहून तेव्हाच्या तिथल्या भीषण परिस्थितीची कल्पना येते.

ह्या वर्षीही दिवाळीत हा अंक घेईन बहुतेक. 

No comments: