Saturday, March 1, 2025

६. ऋतुरंग (दिवाळी अंक २०२४) (किंमत रुपये ३००)

अंकाच्या सुरुवातीलाच गुलजारांचा फोटो पाहून खुश झाले. पण पुढचाच विभाग कवितांचा आहे म्हटल्यावर 'अरे बाप रे!' अशीही प्रतिक्रिया झाली कारण कविता बहुतकरून समजत नाहीत असाच अनुभव आहे :-)

पण वसंत आबाजी डहाके ह्यांचा गुलजारच्या कवितेवरचा लेख समजला आणि आवडला देखील. सुरुवात तर चांगली झाली म्हणायची. मग ह्या मालिकेतले पुढले सारेच लेख आवडले. मी कवितेवर एव्हढा खोल विचार करतच नाही हेही जाणवलं. शब्दाचे वरवरचे अर्थ लावून सोडून द्यायची सवय लागली आहे. पण कविता ह्याहून अधिक वेळ आणि विचार मागते. 

मी हिंदी सिनेमा फारसा पाहत नाही. पण 'स्त्री' युनिव्हर्स मधले 'मुंज्या' सोडला तर बाकीचे सारे चित्रपट आवडले होते. नुकताच 'स्त्री २' पहिला. खरं तर तो एव्हढा आवडला नाही. पण त्यातलं पंकज त्रिपाठीचं काम आवडलं होतं. 'तोच क्षण होता' हा 'मनामनातले आवाज' ह्या विभागातला त्यांचा पहिलाच लेख आवडला. ह्या विभागातले बाकीचे लेखही आवर्जून वाचण्यासारखे. 

सोनम वांगचुक ह्यांनी त्यांच्या उपोषणावरचा आणि धीरज अकोलकर ह्यांचा महायुद्धामुळे जन्मलेल्या मुलांच्या मानवाधिकार न्यायालयात लढलेल्या लढाईवरचा लेख वाचून सुन्न व्हायला झालं.

'असहमतीचा आवाज' ह्या विभागात अनेक जणांनी आयुष्यात कोणाशी असहमत व्हायचे क्षण आले त्याबद्दल लिहिलं आहे. बहुतेकांचा सूर जे केलं ते योग्यच होतं असा होता . एखादा असा किस्सा वाचायला आवडला असता ज्यात हा निर्णय चुकीचा निघाला. पण चुकांची जाहीर कबुली द्यायला कोणाला आवडतं म्हणा असो.

'आतला आवाज' विभागात रॉजर फेडररने हॅनोव्हरमधल्या एका कॉलेजात पदवीदान समारंभाच्या वेळी जून २०२४ मध्ये केलेल्या भाषणाचा अनुवाद वाचायला मिळाला. टेनिस कळत नसूनही ह्या माणसाबद्दल मला फार आदर आहे. हे भाषण मूळ इंग्रजीतून वाचायचं ठरवलंय.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ह्यांच्या भाषणाचा अनुवादही वाचण्यासारखा आहे. 

मला आणखी खूप आवडलेला विभाग म्हणजे 'संतवाणी'. संत तुकाराम, रामदास, एकनाथ, कबीर आणि शेख महंमदमहाराज ह्यांच्या  रचना उलगडून सांगणारे लेख ह्या सदरात आहेत. संतवाङमय वाचायला वेळ काढायला हवा हे जाणवून गेलं.

'आवाज कोणाचा' ह्या विभागातला सर्वात आवडलेला लेख मृदुला-दाढे जोशी ह्यांचा किशोरकुमारवर लिहिलेला. किशोर इतका ऐकूनही समजून उमजून ऐकलंच नाही ही जाणीव ह्या लेखाने दिली. 

एकुणात जे लेख आवडले त्यांनी निखळ वाचनआनंदापेक्षाही अधिक काही पदरात टाकलं.

No comments: