आजकाल कुठलाही Apocalyptic म्हणजे जगाच्या विध्वंसावरचा चित्रपट पाहायचं मी सोडून दिलंय. जगाच्या कानाकोपऱ्यात जे चाललंय ते पाहून हा भविष्यकाळ फार दूर नाही अशी भीती वाटते.
लोकप्रभाच्या अंकातील सुरुवातीचाच 'निकोबार बांधता येईल?' हा लेख वाचून ह्या विनाशाची सुरुवात आपल्या देशापासूनच होतेय का काय अशी भीती वाटायला लागली आहे. किती उच्चकोटीचे बिनडोक निर्णय कुठलंही सरकार घेऊ शकतं हे हा लेख वाचून कळतं. प्रवाळ मूळ ठिकाणापासून उखडून काढून दुसरीकडे लावायची ही योजना वाचून तर डोक्याला हात लावावासा वाटला. उत्तराखंडमध्ये ह्या विकासाच्या हव्यासापायी ओढवलेला विनाश पाहूनही ही योजना रेटली जात असेल आणि त्याला विरोध होत नसेल तर आणखी काय बोलणार? मन फार उदास झालं हे वाचून. 'युध्दस्य कथा न रम्या' हा लेख वाचून हीच भावना झाली. दोन महायुद्धातला विनाश पाहूनही आपण माणूस म्हणून शहाणे झालो नाही. आपल्यासारख्याच हाडामांसाच्या माणसांना मारताना, त्यांचा छळ करताना आपल्याला काहीही वाटत नाही. माणूस म्हणून हा आपला पराजय आहे.
बुद्धिबळ हा खेळ खेळणाऱ्या लोकांबद्दल मला खूप आदर वाटतो. रिटायर्ड झाल्यावर मजा म्हणून का होईना पण हा खेळ शिकावा हे यादीत आहे. त्यामुळे दोमाराजू गुकेशवरचा लेख उत्सुकतेने वाचला आणि आवडला. नक्षलवादी चळवळीवरचा देवेंद्र गावंडे ह्यांचा लेख ह्या समस्येचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य सांगतो. ७/११ च्या मुंबईतल्या बॉम्बस्फोटांवरचा निशांत सरवणकर ह्यांचा लेख ह्या घटनेचा सविस्तर उहापोह करतो.
ईशान्य भारत पाहून यायचा ही इच्छा अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मणिपूरच्या बराक नदीवरचा लेख आवडला. चिनी स्त्रियांनी एकमेकांत संपर्क साधण्यासाठी विकसित केलेल्या प्राचीन नु शू लिपीवरचा लेखसुद्धा खूप मनोरंजक आहे. डॉ. उज्ज्वला दळवी ह्यांनी 'रंग' ह्या सामान्य विषयावर खूप मस्त माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. रंगांधळेपणाबद्दल वाचलं होतं. पण त्याची शास्त्रीय माहिती ह्या लेखात खूप सोप्या पद्धतीने दिली आहे. रंग सृष्टीत नसून आपल्या दृष्टीत असतात त्यामुळे एकच रंग दोन लोकांना वेगळा दिसू शकतो हे वाचून खरंच अवाक झाले. डॉक्टरी पेशातल्या लोकांनी अधिक लिहिलं पाहिजे. मग वैद्यकशास्त्र सामान्य जनतेलाही परिचयाचं होईल. दिवंगत डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांची ह्या निमित्ताने आठवण झाली. अशाच एका दिवाळी अंकात त्यांनी गर्भारपणावर खूप सोप्या भाषेत माहिती दिली होती.
आशुतोष उकिडवे ह्यांचा विदेशातील मेट्रोवरचा लेख छान आहे. मल्याळममधल्या पहिल्या चित्रपटाच्या नायिकेबद्दलचा, पी. के. रोझीवरचा लेख, दखनी भाषेवरचा डी. के. शेख ह्यांचा लेख, फुलपाखरांवरचा सृष्टी अजय देशपांडे ह्यांचा लेख एरव्ही आपल्या वाचनात येणार नाहीत अश्या विषयावरची माहिती देतात. डॉ. राधिका टिपरे ह्यांचा गोठणगावाच्या वाघिणीवरचा छोटा लेख आवडला. त्यांनी अधिक विस्ताराने लिहायला हवं होतं.
'जत्रा' ह्या कथेतली चित्रं पाहून ती बालकथा असेल असं वाटलं होतं पण ती शोकांतिका निघाली आणि मन आणखी उदास करून गेली :-(

No comments:
Post a Comment