दुर्गाच्या ह्या अंकातले सगळ्यात आवडलेले लेख म्हणजे अमित मराठे ह्यांचा 'काळ खोऱ्यातील भटकंती आणि तेथील माणुसकी' आणि अलंग-मदन-कुलंग वरच्या ट्रेकबद्दचा डॉ. हेमंत बोरसे ह्यांचा लेख. आपल्या मित्राने किंवा ऑफिसमधल्या सहकार्याने सहज गप्पा मारता मारता त्याच्या विकेंड ट्रेकबद्दल सांगावं अश्या भाषेत हे लेख लिहिलेत. लेखात बोलण्याच्या ओघात माहितीही बरीच दिली आहे. हे लेख मी खूप एन्जॉय केले. ट्रेकिंग किंवा किल्ला ह्यावरचे लेख कसे असावेत ह्याचा मला हे लेख खूप चांगले नमुना वाटले. सगळयांनाच लिहिता येतं असं नाही हे खरं आहे. पण लेखकाकडून मिळालेले लेख संपादन करणे किंवा त्यावर संस्करण करणे ही कामं झाली तर ह्या विषयाला वाहिलेल्याअंकातल्या लेखांचं माहिती आणि मनोरंजन मूल्य वाढेल.
पुढल्या लेखात राजगडाच्या संजीवनी माचीवर विवेक काळे ह्यांनी विस्तारपूर्वक लिहिलंय. हा किल्ला बघायला जाणाऱ्या प्रत्येकाने तो बरोबर ठेवायलाच हवा म्हणजे किल्ल्यावर जाणं ही एक सहल न होता किल्ला डोळसपणे पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळेल. असे लेख ह्या अंकांतून अधिक संख्येने यायला हवेत.
संभाजीराजांच्या गोवा स्वारीबद्दल मला ऐकूनही माहीत नव्हतं. संदीप मुळीक ह्यांचा लेख वाचून हा इतिहास व्यवस्थित समजला. मोडी लिपी शिकूनही कृष्णाजी कंकाना संभाजीराजांनी दिलेली बक्षिसाची मोईन अजिबात वाचता आली नाही ह्याचं फार वाईट वाटलं. सराव न राहिल्यामुळे पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी वाया चालली आहे हेच खरं :-( संभाजीराजांच्या जंजिरा मोहिमेवर संतोष जाधव ह्यांनी लिहिलेला लेखही बराच इतिहास सांगतो.
अरविंद देशपांडे ह्यांचा कोरीगडावरचा लेख गडावर भेट देणाऱ्यांसाठी माहितीपूर्ण ठरेल असाच. वागीनगोरा ह्या औरंगजेबाच्या दक्षिणेतल्या शेवटच्या लढाईबद्दल प्रांजल वाघ ह्यांनी लिहिलं आहे. ह्याबद्दलही इतिहासाच्या पुस्तकात वाचल्याचं आठवत नाही. 'डोंगरधारेवरून सिंहगड ते भुलेश्वर' हा साईप्रकाश बेलसरे ह्यांचा लेख वाचून आपणही त्या ट्रेकवर असल्यासारखं वाटतं. मधु मकरंदगड परिक्रमेवरचा जितेंद्र बंकापुरे ह्यांचा छोटेखानी लेख आवडला.
जुनागढचे वैभव उपरकोट (अमोल सांडे), किल्ले सुधागड (डॉ. संग्राम इंदूरे), किल्ले गंभीरगड (श्रीकांत कासट), वऱ्हाडातला भुईकोट गोधनापूर (प्रा. डॉ. किशोर वानखेडे), शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार कांचन (प्रा. नितीन जाधव), टिपागड (ओंकार केळकर), माणदेशाची दुर्गजोडी संतोषगड वारुगड (अमित निंबाळकर), सुतोंडा (अंकुर काळे) आणि महिमतगड (डॉ. मुकुंद पाटील) हे लेख ह्या किल्ल्यांची छान ओळख करून देतात. हे सगळे लेख वाचून हे अंक जपून ठेवायचा माझा निर्णय अगदी योग्य होता ह्याची खात्री पटली. आता फक्त किल्ले बघायचा योग कधी येतो त्याची वाट पाहायची. एखाद्या देवाचं दर्शन घडायला देवाने बोलवावं लागतं असं म्हणतात. कदाचित किल्ल्यांबद्दलसुद्धा असंच असेल.
अंकातील शेवटचा लेख इतिहास संशोधक द. ब. पारसनीस ह्यांची ओळख करून देतो. हा लेख मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. दर वर्षीच्या अंकात वेगवेगळ्या इतिहास संशोधकांबद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल वाचायला आवडेल.
अंकाचा समारोप जागतिक वारसास्थळांत समावेश झालेल्या १२ गडांच्या सुंदर पोस्टरने केलाय हे खूप संयुक्तिक वाटलं. पुढच्या अंकात एक वर्षात ह्या गडांवर काय नव्या सोयी झाल्या आहेत (किंवा नाहीत!) ह्याबद्दल वाचायला आवडेल.

No comments:
Post a Comment