अंकाच्या संपादकीयात ग्रेसांची 'पाऊस आला पाऊस आला' कविता वाचली आणि मन एकदम खूप वर्षं शाळेच्या दिवसांत गेलं. संध्याकाळी घरी आल्यावर 'सांजधारा' मध्ये लागणारी गाणी आठवली. शैलेंद्रची 'दो बिघा जमीन' मधली 'मौसम बीता जाये' वाचून गाव सोडून जाणारा बलराज सहानी डोळ्यांसमोर आला. एक दिवस मुंबईच्या बाहेर जावं लागलं तर जीव कासावीस होतो मग आपली पाळंमुळं उपसून दुसरीकडे जाताना कसं वाटत असेल ह्याची कल्पनासुद्धा करावीशी वाटत नाही. त्याही पुढे जाऊन ज्यांची घरं, गावं, शहरं उध्वस्त झाली असतील आणि मागे परत फिरण्यासाठी सुद्धा काही उरलं नसेल त्यांचं काय? आपल्यासाठी त्या बातम्या पण त्यांच्यासाठी वास्तव. असो. आपण काय करू शकतो ह्याबाबत :-( त्या मानाने बॉब डिलनचं And it's a hard rain's a-gonna fall अनोळखी आणि कळायला दुर्बोध - निदान माझ्यासाठी तरी. Sad, dead, crooked, graveyard असे शब्द असलेलं हे गाणं अमेरिकन लोकांना जगण्याची उमेद घेऊन गेलं म्हणे. असेल. माझी गाण्याची समज फार नाही. कधीतरी वेळ काढून ह्या गाण्याविषयी गुगलबाबाला विचारेन.
तर आता अंक आणि त्यातल्या लेखांविषयी.
पहिलं पण इतिहासाचं - १९४६ साली भारतीय नौदलात झालेल्या उठावाचं ज्यामुळे ब्रिटिशांना आपल्याला इथून गाशा गुंडाळावा लागणार ह्याची जाणीव झाली. शाळेत ह्याबद्दल वाचल्याचं आठवत नाही. सोबतची साहिरची कविता सुन्न करून गेली. ह्या बंडात सहभागी झालेल्या लोकांना नंतर ना नोकऱ्या मिळाल्या ना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा आणि त्याचे लाभ मिळाले हे वाचून तर अस्वस्थ व्हायला झालं. अश्या किती लोकांनी बलिदान करून मिळवलेल्या स्वातंत्र्याची आज आपण अक्षरश: माती करतोय :-(
रोज दारात येऊन पडणारा पेपर असो किंवा हातात असलेला दिवाळी अंक असो. त्याची छपाई कुठे आणि कशी होते त्याची उठाठेव करायची गरज किंवा तेव्हढा वेळ कोणाकडेच नाही. त्यामुळे 'औंध संस्थानचा प्रिटिंग प्रेस' हा आणि त्यापुढला 'जावजी दादाजींचा निर्णयसागर प्रेस' हा असे दोन्ही लेख खूप आवडले. त्यामानाने Times Roman किंवा Sans Serif पासून सुरु झालेले फॉन्ट्स परिचयाचे असूनही युनिव्हर्स हा पहिला फॉन्ट डिझाईन करणाऱ्या एड्रीयन फ्रुटीगर ह्यांच्यावरचा लेख थोडा किचकट आणि रटाळ वाटला.
थरारपट पाहायची आवड असल्याने डेव्हिड फिन्चर वरचा लेख आवडला. त्याचे चित्रपट कितपत झेपतील हा भाग अलाहिदा. वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील ह्यांचा लेख वाचून पर्यटन व्यवसायात किती अडचणी येतात ह्याची कल्पना आली. 'युरोपची होरपळ', 'पत्रकार ते अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन', 'इराणी गणगोत', 'मधुमीलनात ह्या' हे लेख माहितीपूर्ण वाटले.
पाकनिर्णय मधल्या बऱ्याचशा पाककृती 'काहीही' ह्या सदरात मोडणाऱ्या वाटल्या :-) उदा. कच्च्या केळ्याची व्हेज अंडाकरी, केळफुलाचे कुरकुरे आणि बनाना lasagna. करणारे धन्य आणि खाणारे त्याहून महान.
अंकातली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे शैलेश मदियानी ह्यांच्या 'अर्धांगिनी' ह्या कथेचा अनुवाद. मी ती दोन वेळा वाचली. सुदैवाने हिंदी कळत असल्याने ह्या लेखकाच्या कथा मुळातून वाचता येतील ह्याचा आनंद वाटला. आता भाकरीचा चन्द्र शोधण्याच्या व्यापातून कधी वेळ मिळेल ते उपरवाला जाने किंवा ना जाने :-)
No comments:
Post a Comment