Monday, January 24, 2022

५. किल्ला (दिवाळी अंक २०२१) (किंमत ४०० रुपये)

ह्या वर्षी मॅजेस्टीकमध्ये अंक घ्यायला गेले तेव्हा किल्ला अजून आला नव्हता. परत जायला जमेल ह्याची खात्री नसल्याने घरी रोजचा पेपर टाकणाऱ्याला आणून द्यायला सांगितलं. हा शहाणपणाचा निर्णय ठरला कारण पुन्हा मॅजेस्टीकमध्ये गेले तेव्हा किल्लाचे सगळे अंक संपले होते. हा अंक घ्यायला लागल्यापासून दार वर्षीचा अंक जपून ठेवलाय कारण कधी काळी हे सगळे किल्ले बघता येतील अशी आशा अजून आहे. बाकी आमच्या इच्छा म्हणजे 'हजारो ख्वाहिशें ऐसी'. असो.

अंकाची सुरूवात अभिजित बेल्हेकर ह्यांच्या बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यावरच्या सुरेख लेखाने झालेली आहे. अर्थात हा लेख लिहिला तेव्हा पुरंदरे हयात होते. पण त्यांच्या जाण्याने आपण काय गमावलं आहे ह्याची हा लेख वाचून पुन्हा एकदा जाणीव झाली. भक्तीभावाने देवळात जायचे दिवस माझ्यापुरते संपलेत तरी मंदिरात जायला, तिथल्या मूर्ती, कलाकुसर पाहायला मात्र आवडतं त्यामुळे खजुराहोच्या मार्कंडेश्वर मंदिरावरचा डॉ. गो. बं. देगलूरकरांचा लेख मोठ्या उत्सुकतेने वाचला आणि आवडलाही. लेखासोबत मंदिरातलया काही मूर्तींची सुरेख चित्रंही आहेत. 

वेगवेगळ्या किल्ल्यांबद्दल वाचायला मी नेहमीच उत्सुक असते. त्यामुळे अकोल्याजवळच्या बाळापूरच्या किल्ल्यावर लिहिलेला डॉ. जयंत वडतकर ह्यांचा, सेंट जॉर्ज फोर्टवरचा आनंद गुप्ते ह्यांचा आणि डन्सटाईन केसल वरचा अमित सामंत ह्यांचा हे सगळेच लेख आवडले. 

किल्ल्यांवर वाढत असलेली पर्यटकांची वर्दळ आणि त्यामुळे त्यांचं होणारं नुकसान हा विषय आजकाल सातत्याने चर्चेत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत हा मुद्दा नेहमीच ऐरणीवर येतो. अंकाचा पुढला भाग ह्यावर विवेचन करतो.  ह्या भागात एकूण ५ लेख आहेत. माझ्या मते दोन्ही बाजू मांडायला २ ते ३ लेख पुरेसे होते. त्यापेक्षा जास्त लेख झाल्याने तेच तेच मुद्दे पुन्हापुन्हा सगळ्या लेखात येतात. तसंच ह्याविषयी कोणतेही ठोस उपाय कुठल्याच लेखात मांडलेले किंवा सुचवलेले नाहीत.

युनेस्कोकडे महाराष्ट्रातलया महत्त्वाच्या १४ किल्ल्यांसाठीचे नामांकन पात्र सुपूर्द केलं गेलंय हे मला माहीत नव्हतं. हे किल्ले जागतिक वारसास्थळांत समाविष्ट होण्याबाबत बरेच वाद सुरु आहेत हेही मला 'जागतिक वारसास्थळे समज गैरसमज' ह्या राजेंद्र शेंडे-आनंद खर्डे ह्यांच्या लेखातून समजलं. ह्यातले बरेचसे गैरसमज दूर करायचं काम हा लेख करतो. हा लेख खरं तर प्रमुख वर्तमानपत्रातून प्रसिद्ध व्हायला हवा. म्हणजे ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोचेल आणि गैरसमजातून होणारा तसेच आजकाल महाराष्ट्रात कॉमन झालेला 'विरोधासाठी विरोध' हा फालतू असे दोन्ही प्रकार थांबतील. 

व्हिएन्नाच्या प्रसिद्ध दफनभूमीबद्दल लिहिलेला राजीव खांडेकर ह्यांचा लेख वाचून मलाही ही दफनभूमी पाहावीशी वाटतेय :-) हंपी तर अनेक वर्ष माझ्या पाहायच्या ठिकाणांच्या यादीत आहे. त्यामुळे त्यावरचा एड. सीमंतिनी नूलकर ह्यांचा लेख आवडला. काही वर्षांपूर्वी मी व्हॉटसएप वर एका इतिहासावरच्या ग्रुपचा भाग होते तेव्हा सतीचा हात, वीरगळ ह्याबद्दल वाचलं होतं तसंच गधेगाळीबद्दलही वाचलं होतं. ह्या काहीश्या विचित्र शिलालेखांबद्दलचे अनेक पैलू डॉ. मुकुंद कुळे ह्यांनी 'गधेगाळ - एक सामाजिक सांस्कृतिक मागोवा' ह्या लेखात उलगडून दाखवले आहेत. 

लेखाच्या शेवटी असलेले 'मुक्कामी ट्रेक - एक अनुभूती' (संजय अमृतकर), कातळ खोदचित्र (सुधीर रिसबूड) आणि शिवराई (छत्रपती शाहू महाराज) (पुरुषोत्तम भार्गवे) हे लेखही माहितीपूर्ण आहेत. 

Wednesday, January 12, 2022

४. महाअनुभव (दिवाळी अंक २०२१) (किंमत २०० रुपये)

 गेली काही वर्षं महाअनुभवचा दिवाळी अंक घेते आहे. ह्या वर्षीही मॅजेस्टिकमध्ये गेले तेव्हा अनुक्रमणिका चाळून पाहिली. कथा-कविता ह्यांपेक्षाही ज्ञान वाढवणारे लेख असतील असा अंक घेण्याकडे माझा कल असतो. त्या कसोटीत हा अंक पुरेपूर उतरेल असं वाटलं म्हणून विकत घेतला. 

अंक वाचायला घेतला तेव्हा निर्णय योग्य असल्याची खात्री पटली. मुकुंद कुलकर्णींचा त्यांच्या करोना आजाराविषयीचा लेख वाचून त्यांचं  कौतुक वाटलं. साधं डोकं दुखलं तर आपण किती बेचैन होतो. पण करोनातून बरं होऊन म्युकरमायकोसिसमुळे कवटीचा काही भाग काढून टाकण्याचं ऑपरेशन करावं लागलं त्या सर्व काळाचं वर्णन त्यांनी किती सहजतेने केलं आहे. विनोदबुद्धी शाबूत असल्यानेच ते ह्यातून सहीसलामत बाहेर पडले असंच वाटलं. सुचिता पडळकर ह्यांचा मधमाश्या पालनावरचा लेख वाचून त्यांच्या चिकाटी ची दाद द्यावीशी वाटली. मधमाश्या पालनाबद्दल खूप मनोरंजक माहिती मिळाली. 

चित्रकला हा माझ्या शाळेतल्या नावडत्या विषयांपैकी एक कारण त्यात अजिबात गती नव्हती. ज्यांना देवाने चित्र काढायची देणगी दिली नाही त्यांचा वेळ ह्या वर्गात फुकट का घालवतात असं मला तेव्हा वाटायचं आणि आजही माझं तेच मत आहे. पण लोकसत्तात गेले वर्षभर सुभाष अवचट चालवत असलेलं सदर मी आवडीने वाचलं. त्यामुळे त्यांचा 'सेल्फ पोर्टेट' वरचा लेख आवर्जून वाचला. डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांचा 'जन्मरहस्याची जन्मकहाणी' हा लेख मानवी जीवाची वाढ कशी होते हे साध्या सोप्या शब्दात समजावून देतो. ही प्रक्रिया किती गुंतागुंतीची असते ते वाचून अवाक व्हायला होतं. वर्षानुवर्षं हे चक्र अविरत चालू राहण्यामागे कुठली शक्ती असेल असाही विचार मनात येतोच. राजकारण - मग ते देशांतर्गत असो वा विदेशी - हा मला एक अतिशय इंटरेस्टिंग विषय वाटत आलाय. त्यामुळे निळू दामलेंचा अँगेला मर्केलवरचा लेख फार आवडला. 'द वायर' ह्या न्यूज पोर्टलबद्दल माहीत नव्हतं. ती माहिती नितीन ब्रम्हेच्या लेखातून मिळाली. हे पोर्टल चेक करून सबस्क्राईब करायला आवडेल. 

'माणसं' विभागातले लेखही उत्तम. पैकी एगथा ख्रिस्ती माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक. तिच्यावर राजेश्वरी देशपांडे ह्यांनी लिहिलंय. डिआन अरबसबद्दल कधी ऐकलं नव्हतं. ती माहिती नितीन दादरावाला ह्यांच्या लेखातून मिळाली. पॉल सॅलोपेकचं नाव ऐकलं नव्हतं त्यामुळे अश्मयुगीन मानवाच्या स्थलांतराच्या वाटेवरून तो करत असलेल्या प्रवासाचीही काही माहिती नव्हती. https://www.nationalgeographic.org/projects/out-of-eden-walk/ वर जमेल तसं ह्याबाबत वाचणार आहे. जग फिरायचं स्वप्न आता स्वप्नच राहतंय का काय अशी शंका आजकाल येते. पण देवाजीच्या कृपेने संधी मिळालीच तर ह्या लेखात उल्लेख केलेली स्थळं - रिफ्ट व्हॅलीतलं गोना (जिथे २६ लाख वर्षांपूर्वीची उपकरणं सापडली आहेत), जॉर्डनमधलं घोर-अल-साफी (जगातली सगळ्यात कमी उंचीवरची जागा आणि तिथली पाचव्या शतकातली मॉनेस्ट्री) आणि वादी -अल -रमचं वाळवंट, वादी -हाफीर, वादी - नातुफ अझरबैजानमधलं गोबुस्थान नेशनल पार्क, खिवा-बुखारा-समरकंद ही शहरं, रेशीम कारागिरांचं मार्गिलन गाव - त्या यादीत जाऊन बसली आहेत.

'ललित' मधले सगळे लेख छान आहेत. कथा विभागातल्या रन -आउट (प्रदीप चंपानेरकर) आणि पॉपअप (मेघश्री दळवी) आवडल्या. गंगोचं पोर (भीष्म सहानी) आणि डान्स बार (मानसी) जराश्या चाळलया तेव्हा ट्रॅजेडी वाटल्या. अश्या कथा वाचायला नको वाटतात म्हणून स्किप केल्या. 

Wednesday, December 29, 2021

३. माझा (दिवाळी अंक २०२१) (किंमत १५० रुपये)

 'एबीपी माझा' हे एक न्यूज चॅनेल आहे हे माहीत होतं. पण त्यांचा दिवाळी अंक असतो हे माहीतच नव्हतं. त्या उत्सुकतेपोटी उचलून पाहिला तेव्हा लक्षात आलं की हा त्यांचा पहिलाच दिवाळी अंक आहे. कुठल्याही दिवाळी अंकांचा अगदी पहिला इश्यू वाचायची माझी ही पहिलीच वेळ :-) अनुक्रमणिका चाळली तेव्हा लेख इंटरेस्टींग वाटले म्हणून विकत घेतला. म्हटलं आवडला तर पुढल्या वर्षीही  घेऊ. न आवडला तर १५० रुपये गंगार्पण.

प्रामाणिकपणे सांगायचं तर पहिलाच लेख - नागराज मंजुळे ह्यांचा अमिताभवर लिहिलेला - मला फारसा आवडला नाही. अर्थात to be fair, त्यामागे मला मुळात कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीबद्दल 'fan' म्हणावं एव्हढं आकर्षण कधीच नव्हतं हे कारणही असेल. "माणसासारखी माणसं ती" हे माझं एकूणच मत. त्यातून 'मला अभिनयातलं फारसं कळत नाही' हे मान्य करूनही मी असं म्हणेन की बच्चनचा अभिनय मला बराचसा एकसुरी वाटत आलेला आहे.  त्यामुळे हा लेख मी वाचला आणि सोडून दिला.

त्यामानाने 'महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग' हा टीम एबीपी माझाने नागपूर ते मुंबई समृद्धीचा महामार्गावर लिहिलेला लेख आणि 'उद्याच्या महाराष्ट्रासाठी' ही  सरिता कौशिक हयांनी घेतलेली नितीन गडकरींची मुलाखत दोन्ही मला अधिक भावले. पैकी गडकरी हे बीजेपीचे असले तरी मला त्यांच्याबद्दल कौतुक आहे. 'मी बरा आणि माझं काम बरं' ही त्यांची वृत्ती मला फार आवडते. कधी कोणाबद्दल वादग्रस्त विधान नाही, राणा भीमदेवी घोषणा नाहीत की 'आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटे' छाप आरोप नाहीत. ह्या छोटेखानी लेखातही त्यांच्या ह्या स्वभावाचं प्रतिबिंब पडतंच. 'भाडिपा' हे नाव वाचून आधी मी बरीच दचकले होते. पण नंतर मात्र हे युट्युब चॅनेल माझं आवडीचं झालं - विशेषत: Inside Someone's House आणि 'आई आणि मी' हे दोन चॅनेल्स. त्यामुळे ह्या चॅनेलच्या जन्माविषयीचा ओंकार जाधव ह्यांचा लेख फार आवडला.

'अस्वस्थता @ 75' हा सुहास पळशीकर ह्यांनी लिहिलेला लेख भारताच्या ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याची परखड मीमांसा करतो. लेखाच्या सुरुवातीला 'भारत माझा देश आहे' ही प्रतिज्ञा लिहिलेल्या फोटोला घातलेला हार आणि समोर लावलेल्या उदबत्त्या देशाच्या आजच्या स्थितीवर अचूक भाष्य करतात. ह्या फोटोची कल्पना ज्याची / जिची त्या व्यक्तीला माझा सलाम. भारताच्या आत्म्यासाठीची लढाई आपण अजून लढतोय हे हा लेख वाचून पुन्हा एकदा प्रकर्षांने जाणवलं. 

हिंदी चित्रपटसृष्टीतून करियरला सुरुवात करणाऱ्या मयुरी कांगोने गुगल जॉईन केलं तेव्हा इतरांसोबत मलाही आश्चर्य वाटलं होतं. कारण आजवरचा इतिहास पहाता ३-४ चित्रपटात काम करायचं आणि मग एखाद्या बिझनेसमन अथवा एनआरआयशी लग्न करून परदेशात स्थायिक व्हायचं अशी ही नायिकांची मळलेली वाट होती. ती  सोडून ही करियर वुमन झाली म्हणून तिचं कौतुकही वाटलं होतं. 'Bollywood ते Google' ह्या लेखात तिच्या ह्या प्रवासाबद्दल वाचायला मिळेल असं वाटलं होतं. पण तिने जास्त करून इंटरनेटचा वापर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संधी ह्यावर लिहिल्याने थोडा भ्रमनिरास झाला. 

चित्रपट आणि नाटक हे आवडीचे विषय असल्याने 'मातीतल्या गोष्टींचा सिनेमा' हा चैतन्य ताम्हाणेचा लेख आवडला. 'वाडा चिरेबंदी 'पाहिलं होतं आणि आवडलंही होतं. त्याचे पुढले २ भाग झेपतील की नाही ह्याची खात्री नसल्याने पाहिले नाहीत. तेव्हा 'वाड्यात माझं आतडं गुंतलंय' हा वाडा trilogy चे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हयांनी लिहिलेला लेखही प्रचंड आवडला. पुढेमागे 'त्रिनाट्यधारा' झालीच तर बघणार हे नक्की. मग पुढले काही दिवस डोक्याला भुंगा लागला तरी चालेल. 

'संवेदनांच्या मुळाशी' विभागात हृषीकेश जोशी, वैभव मांगले, वैभव तत्त्ववादी आणि संकर्षण कर्हाडे ह्या चौघांच्या जन्मगाव ते मुंबईत येऊन कलाकार होण्याच्या प्रवासावरचे लेख समाविष्ट आहेत. पैकी हृषीकेश जोशी सोडल्यास बाकीचे तिघे कोण आहेत हे ठाऊक होतं. एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून एखाद्याला घडवण्यात माणसाचे बालपणीचे अनुभव किती मोलाची कामगिरी बजावतात हे पुन्हा एकदा जाणवलं. हे सगळे मुंबईबाहेरून आलेले असल्याने त्यांची मुंबईबद्दलची निरीक्षणं वाचून मुंबईतच जन्माला येऊन लहानाची मोठी झालेल्या मला खूप मजा वाटली. 

'सहा खंडांत दोन ध्रुवांवर' हा विक्रम पोतदार ह्यांच्या wildlife photography ची माहीती देणारा लेख, 'विषमतेचे राजकारण' हा पी. साईनाथ ह्यांचा १९९१ मध्ये भारतात झालेल्या जागतिकीकरणाच्या यशापयशाची चिकित्सा करणारा लेख, आल्बर्ट आईनस्टाईनच्या खाजगी आयुष्यावर लिहिलेला निरंजन घाटे ह्यांचा लेख,  आणि 'अन्नपूर्णा प्रसन्न' हा पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी 'अन्नपूर्णा - १' ह्या शिखरावर केलेल्या यशस्वी चढाईवरचा लेख वेगळीच माहिती देऊन गेले. 

लोकसत्ता दिवाळी अंकावरच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे कविता हा माझा प्रांत नव्हे. त्यामुळे त्या सेक्शनला माझा पास. कथांचीही तीच गत. 'परत आल्यावर' ही सानिया ह्यांची कथा फारशी आवडली नाही. प्रवीण बांदेकर गेले वर्षभर लोकसत्ताच्या वीकएन्ड पुरवणीत जे सादर लिहीत होते ते फार आवडलं होतं त्यामानाने त्यांची 'शतखंडित' ही कथा कळलीही नाही आणि त्यामुळे आवडलीही नाही. 'हॅपी बर्थडे' ही  राजीव तांबेंची कथा सुखांत केली नसती तर भयकथा म्हणून अधिक परिणामकारक झाली असती असं वाटून गेलं. 

एकुणात काय तर पुढल्या वर्षी घ्यायच्या अंकांच्या यादीत माझाचा अंक नक्की असेल.

२. लोकसत्ता (दिवाळी अंक २०२१) (किंमत १५० रुपये)

 खरं सांगायचं तर ह्या अंकाची नुसती अनुक्रमणिका पाहूनच पोट भरलं. विशेषतः 'चिनी कम्युनिस्ट पक्षशताब्दी: परिचर्चा' ह्या सेक्शनमध्ये असलेली लेखांची यादी वाचली तेव्हा मनोरंजक नव्हे तर ज्ञानप्रबोधन करणारं काहीतरी वाचायला मिळणार ह्याची खात्री झाली. पण कुठलंही पुस्तक सुरुवातीपासून वाचायचं हा शिरस्ता असल्याने आधीचे दोन लेख वाचणं क्रमप्राप्तच होतं. 

अंकाची सुरुवात प्रसिद्ध मराठी लेखक अनिल बर्वे ह्यांच्यावर दिलीप माजगावकरानी लिहिलेल्या लेखाने झालेली आहे. अनिल बर्वेच्या 'थँक यू मिस्टर ग्लाड' चा काही भाग शाळेत असताना वाचल्याचं अंधुक स्मरतंय. त्यापलीकडे त्यांच्या 'डोंगर म्हातारा झाला' , 'अकरा कोटी गेलन पाणी' वगैरे कादंबरयाबद्दल नुसतं माहीत आहे. वाचायचा योग अजून आला नाही. पुन्हा लायब्ररी जॉईन करेन तेव्हा तिथे आहेत का पहाते. लेख वाचनीय आहे. काही उल्लेख टाळता आले असते पण कदाचित ते अपरिहार्य असावेत. असो. ह्यापुढला लेखाचं 'निर्मिती शोनार बांगलाची' हे शीर्षक आणि कुमार केतकर हे नाव वाचून बांगला देशाच्या निर्मितीला यंदा ५० वर्ष झाल्या निमित्ताने त्याबद्दल सविस्तर काही वाचायला मिळेल असं वाटलं होतं. पण थोडी निराशाच पदरी आली. बहुतेक भाग एका पत्रकाराच्या चष्म्यातून लिहिलेला असल्याने प्रत्यक्ष ऐतिहासिक घटनांवर कमी लिहिलंय. अर्थात जे लिहिलंय तेही ह्याआधी कधी वाचलं नसल्याने लेख आवडला. शीर्षक थोडं misleading होतं एव्हढंच. 

त्यामानाने 'चिनी कम्युनिस्ट पक्षशताब्दी: परिचर्चा' ह्या सेक्शनमधले सर्व लेख खूप नवी माहिती देऊन गेले. मला आवडलेले दोन लेख म्हणजे Mao Zedong, Deng Xiaoping पासून थेट Xi Jinping पर्यंतच्या राजकीय नेत्यांच्या कारकिर्दीची आणि त्यांच्या विचारसरणीची मीमांसा करणारा सुधींद्र कुलकर्णी ह्यांचा आणि चीनच्या आजवरच्या इतिहासाचा आढावा घेत त्याचा आजचा चीन घडण्यात कसा हातभार लागला त्याची चिकित्सा करणारा अजित अभ्यंकर ह्यांचा लेख. 

पी . जी. वुडहाऊस हा माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक . त्याच्या 'Indian Summer of an Uncle' ह्या कथेचा शांता गोखले हयांनी फार सुरेख अनुवाद केलाय. इतका सुरेख की आता मूळ इंग्रजी कथाही वाचावीशी वाटत नाही. :-)

कविता आणि माझं कधी फारसं जमलं नाही. त्यामुळे 'करोनाकाळाच्या कविता' हा विभाग मी नुसता चाळला. 

कवितेप्रमाणेच अंकातल्या कथा हाही माझा फारसा आवडता भाग नव्हे. तरी ह्या अंकातली 'बाऊजी आ रहे है' ही राजरत्न भोजने ह्यांची कथा मनाला भिडली. शहरात लॉकडाऊन झाल्यावर पोराबाळांना अंगाखांद्यावर घेत उपाशीतापाशी हजारो किलोमीटर दूर असलेल्या मुलुखाकडे चालत निघालेले मजूर पाहून ज्यांच्या हृदयात कालवाकालव झाली त्या कोणालाही ही कथा वाचून असंच वाटेल. 

चार्ली चॅप्लिनच्या 'द किड' ह्या चित्रपटाला १०० वर्ष झाल्यानिमित्ताने लिहिलेला विजय पाडळकर ह्यांचा 'हसू आणि आसू', प्रसिद्ध राजस्थानी लेखक विजयदान देठा ह्यांच्यावर लिहिलेला आसाराम लोमटे ह्यांचा 'वाळवंटात उमललेलं फूल', दर मैलागणिक भाषा आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलणाऱ्या आपल्या देशात pan-Indian सिनेमा होऊ शकतो का ह्याची मींमासा करणारा अमोल उदगीरकर ह्यांचा 'मृगजळ की वास्तव?', संजय नार्वेकरचा 'स्ट्रगल फॉर द बेस्ट', बीसीजी लसीच्या शोधावरचा डॉ. प्रदीप आवटे ह्यांचा 'वैद्यक पसायदानाची कहाणी' आणि १९९० नंतरच्या मराठी रंगभूमीवरील नाटकांवरचा अतुल पेठेंचा 'नव्वदोत्तरी नाटके आणि आज' हे सर्व लेख अतिशय वाचनीय. 

प्रशांत कुलकर्णीची 'मॉडर्न पालक इन एनिमलफार्म' मधली व्यंगचित्रं आवडली. 

Sunday, November 28, 2021

१. लोकप्रभा (दिवाळी अंक २०२१) (किंमत ५० रुपये)

 ह्या वर्षी दिवाळीच्या आधीच मॅजेस्टिकमध्ये चक्कर टाकून अंकांची चवड घेऊन आले. ऐन दिवाळीत तिथलया गर्दीत शिरून करोनाचा प्रसाद घेऊन यायची माझी इच्छा नव्हती :-)

खरं तर लोकप्रभाचा अंक वाचून काही आठवडे झालेत. आज लिहू उद्या लिहू म्हणत म्हणत लिहायचा मुहूर्त काही लागत नव्हता. शेवटी आज लागला. पण गोची अशी आहे की काही लेख नेमके कश्याबद्दल होते तेच मुळात आठवत नाही. उदा. विनायक परब ह्यांचा अगदी पहिला लेख 'व्वा! चितारताना'. कोल्हापूर परंपरेतले प्रसिद्ध चित्रकार, त्यांची पेंटिंग्ज, शैली आदिवर ह्यात माहिती होती एव्हढं आठवतंय. पण चित्रकलेचं आणि माझं सूत कधी जुळलंच नसल्याने असेल कदाचित पण ह्या लेखात भरपूर माहिती असूनही फार काही लक्षात राहिलेलं नाही. अर्थात हा दोष सर्वस्वी माझाच. 

एव्हढ्या तेव्हढ्या कारणाने भावना दुखावलया जाण्याच्या ह्या काळात शमिका वृषाली ह्यांचा 'शृंगारप्रेमी महाराष्ट्र' हा लेख तथाकथित संस्कृतीरक्षकांना फेफरं, झीट वगैरे सर्व काही आणेल असाच. महाराष्ट्रातला समाज ह्याबाबतीत किती मोकळाढाकळा होता हे वाचून आश्चर्य तर वाटतंच पण खेदही वाटतो. हा मोकळेपणा लोप पावल्याने तर आजकाल स्त्रियांशी निगडित गुन्हयांत वाढ होत नसेल ना हा प्रश्न मनात डोकावल्याशिवाय राहात नाही. 'प्रतिकारशक्तीची खाण' हा डॉ. अंजली कुलकर्णी ह्यांचा मानवी शरीराच्या आश्रयाने राहणाऱ्या सूक्ष्म जीवांवरचा लेख उद्बोधक. "पन्नालाल घोष" हे नाव मी फक्त ऐकून होते. पण त्यांनी केलेल्या कामाचं उत्तम दस्तावेजीकरण करण्यासाठी काय भगीरथ प्रयत्न करावे लागले ह्यावरचा विश्वास कुलकर्णी ह्यांचा लेख खिन्न करून गेला. आपल्याकडे कुठल्याही वारश्याचं जतन करण्याबाबत भयानक अनास्था आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. संस्कृती, इतिहास वगैरे गोष्टी निवडणूक जिंकण्यापुरत्या वापरायच्या. बाकी त्याचं जतन वगैरे करायचं तर फार मेहनत लागते. ती करतो कोण?

अफगाणिस्तानमधून अमेरिकी फौजा बाहेर पडल्या तेव्हा आलेल्या अनेक लेखांपैकी कुठल्याश्या लेखात 'बचा पोष' बद्द्ल वाचल्याचं आठवतंय. ज्या घरात मुलगा नाही तिथे मुलीलाच मुलाचा पोशाख देऊन मुलासारखं वाढवायची ही प्रथा. पण त्याला असलेले अनेक कंगोरे 'बचा पोष' ही प्राजक्ता पाडगांवकर ह्यांची छोटेखानी कथा उलगडते. त्या मानाने 'लिव्ह इन' ही सरिता बांदेकर ह्यांची कथा अगदी बेतलेली आणि अतिशयोक्तीपूर्ण वाटली. 'तुम्हां कोण म्हणे दुर्बळ बिचारे' ही डॉ. संजीव कुलकर्णी ह्यांची कथा एकेकाळी कपोलकल्पित वाटली असती. पण सध्याच्या काळात मात्र ती अशक्य वाटत नाही. आपण निसर्गातले सगळ्यात बुद्धिमान प्राणी हा माणसाचा अहंकार एव्हढ्याश्या करोनाने उतरवला आहेच. त्यातूनही आपण शिकलो नाही तर इतर जीवही आपल्याला धक्का देऊ शकतील ह्यात वादाचा मुद्दा नाही. 

'यक्षनगरीतली शृंगारपुरे' हा आशुतोष उकिडवे ह्यांचा देशोदेशींच्या निवासी हॉटेल्सवरचा आणि 'गुहाघरे' हा संदीप नलावडे ह्यांचा अजूनही आदिमानवाप्रमाणे गुहेत राहाणाऱ्या लोकांविषयीचा दोन्ही लेख मनोरंजक. प्रवासवर्णनांचा खजिना (मकरंद जोशी), 'छू मंतर' (उज्ज्वला दळवी) आणि रमे तेथे मन  (विजया जांगळे) माहितीपूर्ण. 

Sunday, April 4, 2021

८. लोकमत दीपोत्सव (दिवाळी अंक २०२०)

दर दिवाळीला नुसते निखळ मनोरंजन करणारे नाही तर त्यातून काही शिकवून जाणारे, विचार करायला प्रवृत्त करणारे, वेळ सत्कारणी लागल्याचं समाधान देणारे अंक निवडण्याकडे माझा आजकाल कल असतो. कदाचित वर्षभरात जे जमलं नाही ते दिवाळीनंतरच्या काही दिवसांत साध्य करावं असा हेतू असेल त्यात कदाचित. पण लोकसत्ता, भवताल, किल्ला, दुर्ग, दुर्गांच्या देशातून ह्या अंकांनी गेली कित्येक वर्षं माझा हा विश्वास सार्थ ठरवला. ह्याच पठडीतला आणखी एक अंक म्हणजे लोकमतचा दीपोत्सव. त्यांची टीम दरवर्षी भारताच्या कानाकोपर्‍यांत फिरून वेगवेगळ्या विषयांवरचे रिपोर्ताज वाचकांसमोर ठेवते. पण २०२० मध्ये करोनाच्या कहरामुळे प्रवासावर तर बंदी. मग ह्या टीमने दिवाळी अंकात काय दिलं असावं ही उत्सुकता आणि आपली निराशा तर होणार नाही ना ही धाकधूक ह्यामुळे हा अंक जवळपास सगळ्यात शेवटी वाचायला घेतला. अनुक्रमणिका पाहिली आणि जीव भांड्यात पडला. पुढले काही दिवस मेंदूला खुराक मिळणार ह्याची खात्री पटली.

पहिला लेख प्रोफेसर अभिजित बॅनर्जी ह्यांचा. अर्थशास्त्रातलं नोबेल मिळवलेल्या ह्या व्यक्तीबद्दल कुतूहल. तसा हा विषय इंटरेस्टींग वाटला, बिझनेस स्कूलमध्ये मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमीक्सचा परिचय झाला असला तरी ह्या विषयाचं सखोल ज्ञान मला नाही.  पण 'गरिबी आणि गरीब' हा विषय कोणीतरी सखोल अभ्यास करायला घेतंय ह्याचं आधी आश्चर्य वाटलं. ह्यात काय बुवा संशोधन करणार हे? गरिबी हटाव हा आधीच्या सरकारचा आणि आत्मनिर्भर भारत हा आताच्या सरकारचा ह्या दोन घोषणांत फरक असेल तर तो फक्त शब्दांचा. बाकी बदल काही नाही. हे सत्य अंगवळणी पडलेलं. पण तरी नेटाने लेख वाचायला लागले आणि तो पूर्ण वाचल्याखेरीज हलले देखील नाही. गरीब लोक खायचे वांदे असताना एव्हढी पोरं जन्माला का घालतात? कर्ज घेऊन सणवार का साजरे करतात? त्यांना पैसे दिले तर त्याचा त्यांना उपयोग होतो का? असले टिपिकल भारतीय मध्यमवर्गी प्रश्न इथे अभ्यासाला घेतले गेले आणि त्यांची कधी अपेक्षित तर कधी पूर्णपणे थक्क करणारी उत्तरंही मिळाली. एक अप्रतिम लेख. ह्याबद्दल टीम दीपोत्सवचं मनापासून कौतुक. अंकाची किंमत ह्या एकाच लेखात पूर्ण वसूल झाली. अभिजित बॅनर्जीची पुस्तकं असतील तर मिळवून वाचायला हवी हेही ठरवलंय.

ह्यापुढला अतिशय आवडलेला लेख म्हणजे जगप्रसिध्द छायाचित्रकार केकी मूस ह्यांच्यावर लिहिलेला दिलीप कुलकर्णी ह्यांचा 'सहोदर'. केकी मूस ह्या अवलियाबद्दल, त्यांच्या चाळीसगावातल्या एकांतवासाबद्दल, कधीकाळी 'मी कलकत्ता मेलने चाळीसगावला येईन' असं वचन दिलेल्या प्रेयसीची वाट पहाण्याबद्दल, त्याच असोशीने चाळीसगावच्या रेलवे स्टेशनवर अनेक वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या आपल्या मालकाची शेवटच्या श्वासापर्यंत डोळ्यांत प्राण आणून वाट पहाणार्‍या त्यांच्या डॉनी नावाच्या कुत्र्याबद्दल आधी कुठल्याश्या लेखात वाचल्याचं अंधुक स्मरत होतं. ह्या लेखाने पूर्ण कथा समजली. टेबलटॉप फोटोग्राफीबद्दल प्रथमच ऐकलं. ह्या लेखाने एक अनामिक हुरहूर मात्र लावली. केकींची मैत्रिण का परत येऊ शकली नाही? तिने पाठवलेल्या (आणि केकींनी कधीही न उघडलेल्या) पत्रांत काय लिहिलं होतं? डॉनीचा मालक कुत्र्याला घ्यायला कधीच का आला नाही? अनेक अनुत्तरित प्रश्न. 

करोनाबद्दल वाचून आणि ऐकून एव्हढा वैताग आलाय की मृदुला बेळेंच्या लेखाचं 'व्हायरस' हे नाव आणि त्यासोबतचा करोनाचा फोटो पाहून 'हे नको वाचायला' असंच आधी वाटलं. पण तो वाचला हे बरं केलं कारण व्हायरसच्या जगाबद्द्ल छान माहिती मिळाली त्यातून. वैशाली करमरकर ह्यांचा 'चीन-चकवा' हा आपल्या विश्वासघातकी शेजार्‍याबद्दल बरीच माहिती देतो. नेहरूंच्या भोळेपणामुळे चीनने आक्रमण केलं असं म्हणत दात काढ्णार्या भाजपालाही त्यांनी हिसका दाखवलाच तेव्हा ह्या लेखाचं भाषांतर करून एखाद्या भक्ताने दिल्लीला पाठवायला हरकत नाही.चीनवरचाच मिथिला फडके ह्यांचा 'चाबुदुओ' चीनची एक वेगळी बाजू दाखवून जातो. 

भारतात येऊन संगीतसाधना करण्यासाठी जीवाचं रान करणार्‍या परदेशी माणसांबद्दल वन्दना अत्रेंनी 'तेरे कारन सब रंग त्यागा' मध्ये लिहिलंय. ह्यात पाकिस्तानातली पहिली महिला ध्रुपद गायिका म्हणून प्रसिध्दीला आलेली अलिया रशीद आहे, मलेशियात जन्माला येऊन तब्बल चार वर्षं डी.के. पट्टामल (ह्या कोण आहेत हे मला माहित नव्हतं हे कबूल करायला खरंच लाज वाटते) ह्यांच्याकडे कर्नाटक संगीट शिकणारा चोंग च्यू सेन आहे, जर्मनीहून भारतात रुद्रवीणा शिकायला आलेला आणि ती आता इथे बनत नाही हे कळताच पैसे आणि वेळ खर्चून ती स्वतःच बनवून घेणारा जर्मनीचा कर्स्टन विके आहे आणि पंडित निखिल बॅनर्जी आणि अन्नपूर्णा देवी ह्यांचं शिष्यत्त्व लाभलेला ऑस्ट्रीयाचा डॅनियल ब्रॅडली आहे. पिकतं तिथे विकत नाही हेच खरं. रुद्रवीणा बनवणारे कलाकार ह्या कलेला मोल नाही म्हणून ती बनवण्याचं बंद करतात आणि ह्या महाकाय देशात त्याविषयी काही खंत वा खेद नाही ह्याचं कर्स्टन विकेला आश्चर्य वाटतं. पण ह्या देशातल्या बर्‍याचश्या लोकांना आधी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आणि ती नसलेल्यांना ह्याविषयी कधी काही शिकवलंच न गेल्याने माहिती नाही. मुठीतलं निसटून गेल्यावरच जाग यावी हे आपल्या प्राक्तनातच लिहिलं असेल तर त्याला कोण काय करणार? भारतीय नाही तर नाही पण हे परदेशी कलाकार तरी हे शिकून गेले ह्यातच समाधान मानायचं.

कामाचा भाग म्हणून झोहोच्या सीआरएमचा अभ्यास काही महिन्यांपूर्वीच केला होता. त्यामुळे 'झोहो' ह्या नावाचा मुक्ता चैतन्य ह्यांचा लेख पाहून चक्रावले. ह्या शब्दाला काही वेगळा अर्थ आहे की काय? झेन वगैरे सारखा. तर नाही. हा लेख झोहो कंपनी तामीळनाडूतल्या एका खेडयात राहून तिचा गाडा हाकणारे तिचे संस्थापक श्रीधर वेंबू ह्यांच्यावर आहे. वीज आणि इंटरनेट कनेक्शन असलं की आयटीचं काम कुठूनही करता येतं. त्यासाठी मोठ्या शहरांच्या गर्दीत घुसमटायची काहीएक गरज नाही हे स्वतः करून पाहणार्या आणि ते करून पाहण्यासाठी आपल्या सहकार्‍यांना प्रोत्साहित करणार्या माणसाबद्दल मला आदर वाटला. हा असा विश्वास टाकायला खूप हिंमत लागते. ती फार थोड्या संस्थापकांकडे असते ते आजकालच्या वर्क फ्रॉम होम काळात आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल. ह्याच विषयाला धरुन 'स्लो लिव्हिंग' ह्या संकल्पनेवरचा मेघना ढोके ह्यांचा लेखही वाचनीय आहे. 

मागच्या वर्षी अचानक जाहिर झालेला लॉकडाऊन आणि परप्रांतीय मजूरांची झालेली ससेहोलपट न विसरता येण्याजोगी. अर्थात सरकारच्या कोणत्याही निर्णयाचं आंधळं समर्थन हा तुमचा एककलमी कार्यक्रम नसेल तर. असो. त्यामुळे अंकाच्या शेवटी ह्या विषयावरचे २-३ लेख पाहिले तेव्हा वाचू का नको असं झालं. आणखी शोकांतिका वाचायची ताकद आता नाही. पण न वाचताही राहवेना. 'काली बस्ती' हा रवींद्र राऊळ ह्यांचा मोठ्या शहरात उत्तर प्रदेश-बिहार मधून आलेल्या मजुरांच्या वस्त्यांवरचा, 'पुरुष नसलेली गावं' हा सुधाकर ओलवे ह्यांचा ह्या मजूरांच्या मूळ गावांतल्या स्थितीवरचा आणि मयुरेश भडसावळे ह्यांचा 'लिट्टी चोखा' हा ह्या स्थलांतरामागचे अनेक पदर उलगडून दाखवणारा असे ३ लेख अगदी वाचनीय. 'हम ये करेंगे', 'हम वो करेंगे' वगैरे हात उंचावून भक्तांच्या टाळ्यांच्या गजरात जाहिर करणार्‍या योगी वगैरे लोकांच्या घोषणा किती पोकळ आहेत, वास्तव किती भयानक आहे आणि त्यापासून तुम्हाआम्हासारखे सुखवस्तू लोक किती योजनं दूर आहेत हे खरंच समजावून घ्यायचं असेल तर हे लेख वाचायला हवेत. नाहीतर नुसती 'मन की बात' आहेच की ऐकून माना डोलावण्यासाठी.

अंकातल्या बाकी लेखांत उस्ताद झाकीर हुसेन ह्यांचा 'चिला कतना' आणि पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटच्या पुनावाला फॅमिलीवरचा सुकृत करंदीकर ह्यांचा 'इथे बनणार आहे लस' ह्या दोन लेखांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.

संपूर्ण जग करोनाने ठप्प केलं असताना आणि प्रवासावर बंदी असताना अंकाच्या मजकूराच्या दर्जात जराही उणीव पडू न देण्याचं शिवधनुष्य पेलल्याबद्दल टीम दीपोत्सवचं कौतुक आणि आभार :-)


Saturday, March 27, 2021

७. किल्ला (दिवाळी अंक २०२०)

 मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकांतसुध्दा मेल्या करोनाने शिरकाव केला. त्यामुळे 'किल्ला' ची प्रस्तावना वाचताना मनात धाकधूक होती. पण त्यात करोनाचा 'क' पण नसल्याचं पाहून हायसं वाटलं. एव्हढंच काय तर 'आरमार' ह्या विषयावर हा अंक आहे हे वाचून काय काय लेख आहेत हे चाळून बघायचा मोह झाला. कळवण्यास अत्यंत आनंद वाटतो की 'मराठा आरमार' ह्या विषयावर इत्यंभूत माहिती देणार्या आणि अधिक अभ्यास करण्यास मार्गदर्शक ठरतील अश्या लेखांची अगदी भरगच्च मेजवानी अंकात आहे. फक्त वाचणारे डोळे हवेत.

अंकाची सुरुवात झालेय ती 'प्राचीन भारतीय आरमार' वरच्या लेखाने. सध्याच्या काळात 'प्राचीन' आणि 'भारत' हे शब्द एकत्र वाचले की पोटात गोळा येतो. जुनं ते सगळं सोनं नसतं. तरी ते रेटून सोनं ठरवायचा आणि नसलेली झळाळी त्याला द्यायचा ट्रेंडच आलाय ना. असो. पण हा लेख अपवाद. लोथल, हरप्पा आणि सिंधुसंस्कृतीतल्या भागांतल्या उत्खननांत सापडलेल्या नौकानयन क्षेत्रातल्या गोष्टींबद्दल, तसंच मौर्य, शिलाहार राजे तसंच राजा भोज यांच्या काळातल्या आरमाराबद्दल, त्यावरच्या ग्रंथांबद्दलही ह्यात बरीच माहिती मिळते.

ह्यापुढल्या लेखांत छत्रपती शिवाजीमहाराजांचे आरमार, त्यांनी बांधलेले जलदुर्ग, ह्या जलदुर्गांवरचे तोफखाने, सरखेल कान्होजी आंग्रे, ह्या काळातली नाणी, मराठा आरमारातली विविध प्रकारची जहाजं आणि त्यांची बांधणी अश्या विविध विषयांवरची माहिती आहे. हे सगळं वाचून वाचकांना ह्या विषयावर अधिक वाचण्याचा मोह होणार हे जाणून की काय कोणास ठाऊक पण ह्या विषयावर अधिक अभ्यास कसा करावा ह्याचं मौलिक मार्गदर्शन करणारा कौस्तुभ पोंक्षेंचा 'मराठा आरमार आणि संशोधन' हा लेखही अंकात समाविष्ट आहे.  कधीकाळी वेळ मिळालाच तर मोडीचा अभ्यास नव्याने करून ह्या विषयात काही हातभार लावता येतो का ते पहायचं असा शेखचिल्ली बेत करायचा मोह मलाही झालाच :-)

आधुनिक भारतीय आरमाराची माहिती देणार्या लेखाने अंकाची सांगता झाली आणि बुध्दीला खुराक देणारं काहीतरी छान वाचल्याचं समाधान मिळालं.