'एबीपी माझा' हे एक न्यूज चॅनेल आहे हे माहीत होतं. पण त्यांचा दिवाळी अंक असतो हे माहीतच नव्हतं. त्या उत्सुकतेपोटी उचलून पाहिला तेव्हा लक्षात आलं की हा त्यांचा पहिलाच दिवाळी अंक आहे. कुठल्याही दिवाळी अंकांचा अगदी पहिला इश्यू वाचायची माझी ही पहिलीच वेळ :-) अनुक्रमणिका चाळली तेव्हा लेख इंटरेस्टींग वाटले म्हणून विकत घेतला. म्हटलं आवडला तर पुढल्या वर्षीही घेऊ. न आवडला तर १५० रुपये गंगार्पण.
प्रामाणिकपणे सांगायचं तर पहिलाच लेख - नागराज मंजुळे ह्यांचा अमिताभवर लिहिलेला - मला फारसा आवडला नाही. अर्थात to be fair, त्यामागे मला मुळात कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीबद्दल 'fan' म्हणावं एव्हढं आकर्षण कधीच नव्हतं हे कारणही असेल. "माणसासारखी माणसं ती" हे माझं एकूणच मत. त्यातून 'मला अभिनयातलं फारसं कळत नाही' हे मान्य करूनही मी असं म्हणेन की बच्चनचा अभिनय मला बराचसा एकसुरी वाटत आलेला आहे. त्यामुळे हा लेख मी वाचला आणि सोडून दिला.
त्यामानाने 'महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग' हा टीम एबीपी माझाने नागपूर ते मुंबई समृद्धीचा महामार्गावर लिहिलेला लेख आणि 'उद्याच्या महाराष्ट्रासाठी' ही सरिता कौशिक हयांनी घेतलेली नितीन गडकरींची मुलाखत दोन्ही मला अधिक भावले. पैकी गडकरी हे बीजेपीचे असले तरी मला त्यांच्याबद्दल कौतुक आहे. 'मी बरा आणि माझं काम बरं' ही त्यांची वृत्ती मला फार आवडते. कधी कोणाबद्दल वादग्रस्त विधान नाही, राणा भीमदेवी घोषणा नाहीत की 'आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटे' छाप आरोप नाहीत. ह्या छोटेखानी लेखातही त्यांच्या ह्या स्वभावाचं प्रतिबिंब पडतंच. 'भाडिपा' हे नाव वाचून आधी मी बरीच दचकले होते. पण नंतर मात्र हे युट्युब चॅनेल माझं आवडीचं झालं - विशेषत: Inside Someone's House आणि 'आई आणि मी' हे दोन चॅनेल्स. त्यामुळे ह्या चॅनेलच्या जन्माविषयीचा ओंकार जाधव ह्यांचा लेख फार आवडला.
'अस्वस्थता @ 75' हा सुहास पळशीकर ह्यांनी लिहिलेला लेख भारताच्या ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याची परखड मीमांसा करतो. लेखाच्या सुरुवातीला 'भारत माझा देश आहे' ही प्रतिज्ञा लिहिलेल्या फोटोला घातलेला हार आणि समोर लावलेल्या उदबत्त्या देशाच्या आजच्या स्थितीवर अचूक भाष्य करतात. ह्या फोटोची कल्पना ज्याची / जिची त्या व्यक्तीला माझा सलाम. भारताच्या आत्म्यासाठीची लढाई आपण अजून लढतोय हे हा लेख वाचून पुन्हा एकदा प्रकर्षांने जाणवलं.
हिंदी चित्रपटसृष्टीतून करियरला सुरुवात करणाऱ्या मयुरी कांगोने गुगल जॉईन केलं तेव्हा इतरांसोबत मलाही आश्चर्य वाटलं होतं. कारण आजवरचा इतिहास पहाता ३-४ चित्रपटात काम करायचं आणि मग एखाद्या बिझनेसमन अथवा एनआरआयशी लग्न करून परदेशात स्थायिक व्हायचं अशी ही नायिकांची मळलेली वाट होती. ती सोडून ही करियर वुमन झाली म्हणून तिचं कौतुकही वाटलं होतं. 'Bollywood ते Google' ह्या लेखात तिच्या ह्या प्रवासाबद्दल वाचायला मिळेल असं वाटलं होतं. पण तिने जास्त करून इंटरनेटचा वापर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संधी ह्यावर लिहिल्याने थोडा भ्रमनिरास झाला.
चित्रपट आणि नाटक हे आवडीचे विषय असल्याने 'मातीतल्या गोष्टींचा सिनेमा' हा चैतन्य ताम्हाणेचा लेख आवडला. 'वाडा चिरेबंदी 'पाहिलं होतं आणि आवडलंही होतं. त्याचे पुढले २ भाग झेपतील की नाही ह्याची खात्री नसल्याने पाहिले नाहीत. तेव्हा 'वाड्यात माझं आतडं गुंतलंय' हा वाडा trilogy चे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हयांनी लिहिलेला लेखही प्रचंड आवडला. पुढेमागे 'त्रिनाट्यधारा' झालीच तर बघणार हे नक्की. मग पुढले काही दिवस डोक्याला भुंगा लागला तरी चालेल.
'संवेदनांच्या मुळाशी' विभागात हृषीकेश जोशी, वैभव मांगले, वैभव तत्त्ववादी आणि संकर्षण कर्हाडे ह्या चौघांच्या जन्मगाव ते मुंबईत येऊन कलाकार होण्याच्या प्रवासावरचे लेख समाविष्ट आहेत. पैकी हृषीकेश जोशी सोडल्यास बाकीचे तिघे कोण आहेत हे ठाऊक होतं. एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून एखाद्याला घडवण्यात माणसाचे बालपणीचे अनुभव किती मोलाची कामगिरी बजावतात हे पुन्हा एकदा जाणवलं. हे सगळे मुंबईबाहेरून आलेले असल्याने त्यांची मुंबईबद्दलची निरीक्षणं वाचून मुंबईतच जन्माला येऊन लहानाची मोठी झालेल्या मला खूप मजा वाटली.
'सहा खंडांत दोन ध्रुवांवर' हा विक्रम पोतदार ह्यांच्या wildlife photography ची माहीती देणारा लेख, 'विषमतेचे राजकारण' हा पी. साईनाथ ह्यांचा १९९१ मध्ये भारतात झालेल्या जागतिकीकरणाच्या यशापयशाची चिकित्सा करणारा लेख, आल्बर्ट आईनस्टाईनच्या खाजगी आयुष्यावर लिहिलेला निरंजन घाटे ह्यांचा लेख, आणि 'अन्नपूर्णा प्रसन्न' हा पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी 'अन्नपूर्णा - १' ह्या शिखरावर केलेल्या यशस्वी चढाईवरचा लेख वेगळीच माहिती देऊन गेले.
लोकसत्ता दिवाळी अंकावरच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे कविता हा माझा प्रांत नव्हे. त्यामुळे त्या सेक्शनला माझा पास. कथांचीही तीच गत. 'परत आल्यावर' ही सानिया ह्यांची कथा फारशी आवडली नाही. प्रवीण बांदेकर गेले वर्षभर लोकसत्ताच्या वीकएन्ड पुरवणीत जे सादर लिहीत होते ते फार आवडलं होतं त्यामानाने त्यांची 'शतखंडित' ही कथा कळलीही नाही आणि त्यामुळे आवडलीही नाही. 'हॅपी बर्थडे' ही राजीव तांबेंची कथा सुखांत केली नसती तर भयकथा म्हणून अधिक परिणामकारक झाली असती असं वाटून गेलं.
एकुणात काय तर पुढल्या वर्षी घ्यायच्या अंकांच्या यादीत माझाचा अंक नक्की असेल.
No comments:
Post a Comment