Sunday, April 4, 2021

८. लोकमत दीपोत्सव (दिवाळी अंक २०२०)

दर दिवाळीला नुसते निखळ मनोरंजन करणारे नाही तर त्यातून काही शिकवून जाणारे, विचार करायला प्रवृत्त करणारे, वेळ सत्कारणी लागल्याचं समाधान देणारे अंक निवडण्याकडे माझा आजकाल कल असतो. कदाचित वर्षभरात जे जमलं नाही ते दिवाळीनंतरच्या काही दिवसांत साध्य करावं असा हेतू असेल त्यात कदाचित. पण लोकसत्ता, भवताल, किल्ला, दुर्ग, दुर्गांच्या देशातून ह्या अंकांनी गेली कित्येक वर्षं माझा हा विश्वास सार्थ ठरवला. ह्याच पठडीतला आणखी एक अंक म्हणजे लोकमतचा दीपोत्सव. त्यांची टीम दरवर्षी भारताच्या कानाकोपर्‍यांत फिरून वेगवेगळ्या विषयांवरचे रिपोर्ताज वाचकांसमोर ठेवते. पण २०२० मध्ये करोनाच्या कहरामुळे प्रवासावर तर बंदी. मग ह्या टीमने दिवाळी अंकात काय दिलं असावं ही उत्सुकता आणि आपली निराशा तर होणार नाही ना ही धाकधूक ह्यामुळे हा अंक जवळपास सगळ्यात शेवटी वाचायला घेतला. अनुक्रमणिका पाहिली आणि जीव भांड्यात पडला. पुढले काही दिवस मेंदूला खुराक मिळणार ह्याची खात्री पटली.

पहिला लेख प्रोफेसर अभिजित बॅनर्जी ह्यांचा. अर्थशास्त्रातलं नोबेल मिळवलेल्या ह्या व्यक्तीबद्दल कुतूहल. तसा हा विषय इंटरेस्टींग वाटला, बिझनेस स्कूलमध्ये मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमीक्सचा परिचय झाला असला तरी ह्या विषयाचं सखोल ज्ञान मला नाही.  पण 'गरिबी आणि गरीब' हा विषय कोणीतरी सखोल अभ्यास करायला घेतंय ह्याचं आधी आश्चर्य वाटलं. ह्यात काय बुवा संशोधन करणार हे? गरिबी हटाव हा आधीच्या सरकारचा आणि आत्मनिर्भर भारत हा आताच्या सरकारचा ह्या दोन घोषणांत फरक असेल तर तो फक्त शब्दांचा. बाकी बदल काही नाही. हे सत्य अंगवळणी पडलेलं. पण तरी नेटाने लेख वाचायला लागले आणि तो पूर्ण वाचल्याखेरीज हलले देखील नाही. गरीब लोक खायचे वांदे असताना एव्हढी पोरं जन्माला का घालतात? कर्ज घेऊन सणवार का साजरे करतात? त्यांना पैसे दिले तर त्याचा त्यांना उपयोग होतो का? असले टिपिकल भारतीय मध्यमवर्गी प्रश्न इथे अभ्यासाला घेतले गेले आणि त्यांची कधी अपेक्षित तर कधी पूर्णपणे थक्क करणारी उत्तरंही मिळाली. एक अप्रतिम लेख. ह्याबद्दल टीम दीपोत्सवचं मनापासून कौतुक. अंकाची किंमत ह्या एकाच लेखात पूर्ण वसूल झाली. अभिजित बॅनर्जीची पुस्तकं असतील तर मिळवून वाचायला हवी हेही ठरवलंय.

ह्यापुढला अतिशय आवडलेला लेख म्हणजे जगप्रसिध्द छायाचित्रकार केकी मूस ह्यांच्यावर लिहिलेला दिलीप कुलकर्णी ह्यांचा 'सहोदर'. केकी मूस ह्या अवलियाबद्दल, त्यांच्या चाळीसगावातल्या एकांतवासाबद्दल, कधीकाळी 'मी कलकत्ता मेलने चाळीसगावला येईन' असं वचन दिलेल्या प्रेयसीची वाट पहाण्याबद्दल, त्याच असोशीने चाळीसगावच्या रेलवे स्टेशनवर अनेक वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या आपल्या मालकाची शेवटच्या श्वासापर्यंत डोळ्यांत प्राण आणून वाट पहाणार्‍या त्यांच्या डॉनी नावाच्या कुत्र्याबद्दल आधी कुठल्याश्या लेखात वाचल्याचं अंधुक स्मरत होतं. ह्या लेखाने पूर्ण कथा समजली. टेबलटॉप फोटोग्राफीबद्दल प्रथमच ऐकलं. ह्या लेखाने एक अनामिक हुरहूर मात्र लावली. केकींची मैत्रिण का परत येऊ शकली नाही? तिने पाठवलेल्या (आणि केकींनी कधीही न उघडलेल्या) पत्रांत काय लिहिलं होतं? डॉनीचा मालक कुत्र्याला घ्यायला कधीच का आला नाही? अनेक अनुत्तरित प्रश्न. 

करोनाबद्दल वाचून आणि ऐकून एव्हढा वैताग आलाय की मृदुला बेळेंच्या लेखाचं 'व्हायरस' हे नाव आणि त्यासोबतचा करोनाचा फोटो पाहून 'हे नको वाचायला' असंच आधी वाटलं. पण तो वाचला हे बरं केलं कारण व्हायरसच्या जगाबद्द्ल छान माहिती मिळाली त्यातून. वैशाली करमरकर ह्यांचा 'चीन-चकवा' हा आपल्या विश्वासघातकी शेजार्‍याबद्दल बरीच माहिती देतो. नेहरूंच्या भोळेपणामुळे चीनने आक्रमण केलं असं म्हणत दात काढ्णार्या भाजपालाही त्यांनी हिसका दाखवलाच तेव्हा ह्या लेखाचं भाषांतर करून एखाद्या भक्ताने दिल्लीला पाठवायला हरकत नाही.चीनवरचाच मिथिला फडके ह्यांचा 'चाबुदुओ' चीनची एक वेगळी बाजू दाखवून जातो. 

भारतात येऊन संगीतसाधना करण्यासाठी जीवाचं रान करणार्‍या परदेशी माणसांबद्दल वन्दना अत्रेंनी 'तेरे कारन सब रंग त्यागा' मध्ये लिहिलंय. ह्यात पाकिस्तानातली पहिली महिला ध्रुपद गायिका म्हणून प्रसिध्दीला आलेली अलिया रशीद आहे, मलेशियात जन्माला येऊन तब्बल चार वर्षं डी.के. पट्टामल (ह्या कोण आहेत हे मला माहित नव्हतं हे कबूल करायला खरंच लाज वाटते) ह्यांच्याकडे कर्नाटक संगीट शिकणारा चोंग च्यू सेन आहे, जर्मनीहून भारतात रुद्रवीणा शिकायला आलेला आणि ती आता इथे बनत नाही हे कळताच पैसे आणि वेळ खर्चून ती स्वतःच बनवून घेणारा जर्मनीचा कर्स्टन विके आहे आणि पंडित निखिल बॅनर्जी आणि अन्नपूर्णा देवी ह्यांचं शिष्यत्त्व लाभलेला ऑस्ट्रीयाचा डॅनियल ब्रॅडली आहे. पिकतं तिथे विकत नाही हेच खरं. रुद्रवीणा बनवणारे कलाकार ह्या कलेला मोल नाही म्हणून ती बनवण्याचं बंद करतात आणि ह्या महाकाय देशात त्याविषयी काही खंत वा खेद नाही ह्याचं कर्स्टन विकेला आश्चर्य वाटतं. पण ह्या देशातल्या बर्‍याचश्या लोकांना आधी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आणि ती नसलेल्यांना ह्याविषयी कधी काही शिकवलंच न गेल्याने माहिती नाही. मुठीतलं निसटून गेल्यावरच जाग यावी हे आपल्या प्राक्तनातच लिहिलं असेल तर त्याला कोण काय करणार? भारतीय नाही तर नाही पण हे परदेशी कलाकार तरी हे शिकून गेले ह्यातच समाधान मानायचं.

कामाचा भाग म्हणून झोहोच्या सीआरएमचा अभ्यास काही महिन्यांपूर्वीच केला होता. त्यामुळे 'झोहो' ह्या नावाचा मुक्ता चैतन्य ह्यांचा लेख पाहून चक्रावले. ह्या शब्दाला काही वेगळा अर्थ आहे की काय? झेन वगैरे सारखा. तर नाही. हा लेख झोहो कंपनी तामीळनाडूतल्या एका खेडयात राहून तिचा गाडा हाकणारे तिचे संस्थापक श्रीधर वेंबू ह्यांच्यावर आहे. वीज आणि इंटरनेट कनेक्शन असलं की आयटीचं काम कुठूनही करता येतं. त्यासाठी मोठ्या शहरांच्या गर्दीत घुसमटायची काहीएक गरज नाही हे स्वतः करून पाहणार्या आणि ते करून पाहण्यासाठी आपल्या सहकार्‍यांना प्रोत्साहित करणार्या माणसाबद्दल मला आदर वाटला. हा असा विश्वास टाकायला खूप हिंमत लागते. ती फार थोड्या संस्थापकांकडे असते ते आजकालच्या वर्क फ्रॉम होम काळात आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल. ह्याच विषयाला धरुन 'स्लो लिव्हिंग' ह्या संकल्पनेवरचा मेघना ढोके ह्यांचा लेखही वाचनीय आहे. 

मागच्या वर्षी अचानक जाहिर झालेला लॉकडाऊन आणि परप्रांतीय मजूरांची झालेली ससेहोलपट न विसरता येण्याजोगी. अर्थात सरकारच्या कोणत्याही निर्णयाचं आंधळं समर्थन हा तुमचा एककलमी कार्यक्रम नसेल तर. असो. त्यामुळे अंकाच्या शेवटी ह्या विषयावरचे २-३ लेख पाहिले तेव्हा वाचू का नको असं झालं. आणखी शोकांतिका वाचायची ताकद आता नाही. पण न वाचताही राहवेना. 'काली बस्ती' हा रवींद्र राऊळ ह्यांचा मोठ्या शहरात उत्तर प्रदेश-बिहार मधून आलेल्या मजुरांच्या वस्त्यांवरचा, 'पुरुष नसलेली गावं' हा सुधाकर ओलवे ह्यांचा ह्या मजूरांच्या मूळ गावांतल्या स्थितीवरचा आणि मयुरेश भडसावळे ह्यांचा 'लिट्टी चोखा' हा ह्या स्थलांतरामागचे अनेक पदर उलगडून दाखवणारा असे ३ लेख अगदी वाचनीय. 'हम ये करेंगे', 'हम वो करेंगे' वगैरे हात उंचावून भक्तांच्या टाळ्यांच्या गजरात जाहिर करणार्‍या योगी वगैरे लोकांच्या घोषणा किती पोकळ आहेत, वास्तव किती भयानक आहे आणि त्यापासून तुम्हाआम्हासारखे सुखवस्तू लोक किती योजनं दूर आहेत हे खरंच समजावून घ्यायचं असेल तर हे लेख वाचायला हवेत. नाहीतर नुसती 'मन की बात' आहेच की ऐकून माना डोलावण्यासाठी.

अंकातल्या बाकी लेखांत उस्ताद झाकीर हुसेन ह्यांचा 'चिला कतना' आणि पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटच्या पुनावाला फॅमिलीवरचा सुकृत करंदीकर ह्यांचा 'इथे बनणार आहे लस' ह्या दोन लेखांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.

संपूर्ण जग करोनाने ठप्प केलं असताना आणि प्रवासावर बंदी असताना अंकाच्या मजकूराच्या दर्जात जराही उणीव पडू न देण्याचं शिवधनुष्य पेलल्याबद्दल टीम दीपोत्सवचं कौतुक आणि आभार :-)


No comments: