निदान मागच्या दोन वर्षी तरी कालनिर्णयचा अंक वाचल्याचं स्मरणात नाही. ह्या वर्षीही हा अंक असल्याचं मला माहित नव्हतं. मग लोकसत्तामध्ये त्याबद्दल वाचलं. आणि घरी पेपर टाकणाऱ्या व्यक्तीला आणून द्यायला सांगितलं.
अंकाच्या सुरुवातीलाच इंदिरा संतांची 'अक्कू बक्कूची दिवाळी' ही कविता वाचली. शाळेत असताना कधी ही कविता वाचनात आली नव्हती. पण मुद्दामहून कुठलीही कविता शोधून वाचावी असं मला फारसं कधी वाटत नाहीच. असो. तर शाळेत असताना ही कविता वाचून काय वाटलं असतं ते आता सांगता नाही येणार. पण आता ह्या वयात तरी ती फारशी भावली नाही. भाचरांची दिवाळी आनंदात जावी अश्या भावनेतून जरी मामाने सगळ्या वस्तू आणल्या असल्या तरी त्यातून बहिणीची गरिबी अधिक अधोरेखित होते. तसंच मामा भाचरांना आजोळी घेऊन जायला आलेला असतो तर एव्हढं सामान का घेऊन येतो ते कळलं नाही. वर तुम्ही येणार नाही म्हणून मामीने दिलं आहे असाही उल्लेख आहे. ते मामीला आधीच कसं कळलं हेही समजलं नाही. कदाचित बालवयात हे प्रश्न पडले नसते.
पुढली अनुक्रमणिका वाचून मात्र पुढे मेजवानीच वाढून ठेवली आहे ह्याची खात्री पटली :-)
मराठ्यांचं आरमार २०२२ च्या दिवाळीतला लाडका विषय दिसतो. किल्ला किंवा दुर्ग ह्यापैकी एका अंकातही ह्यावरचा लेख ह्याच दिवाळीत वाचल्याचं आठवलं. अर्थात आरमारातलया जहाजांवर छान माहिती ह्या लेखातून मिळाली. ' गोव्याच्या मातीचा सन्मान' हा कोकणी साहित्यातलया दामोदर मावजो ह्या लेखकांवर लिहिलेला लेख उत्सुकतेने वाचला. आम्ही जीएसबी म्हटल्यावर बरेच लोक कोकणी समजतात. त्यामुळे कित्येक दिवसात मलाही वाटायचं की आपल्याला कोकणी कसं येत नाही. पण आमच्या कुठल्याही पिढीत कधीच कोकणी बोलली गेली नाही. तरी त्या भाषेबद्दल एक कुतूहल नेहमीच राहिलं. त्यातून भाषा हा माझा नेहमीच आवडीचा विषय राहिलेला आहे. कोकणी शिकून मूळ साहित्य वाचायची संधी मिळेल असं वाटत नाही. पण कधी कुठे काही अनुवादित मिळालं तर नक्की वाचेन.
न्यू यॉर्कर बद्दल आणि त्याच्या विल्यम शॉन ह्या संपादकांबद्दल वाचून आपल्याला किती आणि काय वाचायचं आहे हे जाणवून छाती दडपून गेली. हे असलं रोखठोक, कोणाचीही भीड ना बाळगता लिहिणारे लेखक, ते छापणारे संपादक आणि वाचणारे वाचक आपल्या देशात कधी दिसतील असा विचार नको नको म्हणताना डोकावून गेलाच.
हंसा वाडकर आणि त्यांच्या चरित्राबद्दल वाचलंय. पण हे एव्हढं अंगावर येणारं काही आपल्याला झेपेल असं वाटत नसल्याने ते चरित्र कधी वाचलं नाही आणि त्यावर बेतलेला 'भूमिका' कधी पाहिला नाही. श्रीकांत बोजेवार ह्यांचा लेख मात्र आवडला. हंसाबाई दिसायला सुरेखच होत्या हे फोटोवरून कळून येतं. एकदम मिळालेली प्रसिद्धी, हातात आलेला पैसा, मार्गदर्शन करायला कोणा वडीलधाऱ्या व्यक्तीचं नसणं ह्या परिस्थितीत आयुष्य उध्वस्त झाल्याच्या घटना चित्रपटसृष्टीत नव्या नाहीत. पण तरी दरवेळी त्या वाचून जीव कळवळतोच.
कविता आणि माझं जसं कधी जमलं नाही तसंच शास्त्रीय संगीत आणि माझं कधी जमेल असं वाटत नाही. अर्थात मी शास्त्रीय संगीत मुळापासून जाणून घ्यायचा प्रयत्न कधी केला नाही ही माझी चूक आहे. पण सध्या तरी तेव्हढा वेळ आणि सवड नाही हे खरं . मास्तर कृष्णराव हे नाव ऐकलेलं असलं तरी त्यांच्याविषयी फार माहिती मला असण्याचं त्यामुळे काही कारण नाही. लीना पाटणकर ह्यांच्या लेखाने ती ओळख यथास्थित करून दिली. गरीब घरात जन्मूनही पुढे आयुष्याचं सोनं करणाऱ्या अश्या व्यक्तींबद्दल वाचलं की हे सगळं योगायोगाने घडतं का पूर्वनियोजित असतं हा नेहमीच प्रश्न पडतोच. 'कीचकवध' चित्रपटातलं 'धुंद मधुमती रात रे' हे माझं ऑल टाईम फेव्हरेट गाणं ह्याच मास्टर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलं आहे हे वाचून तर मी उडालेच. ह्या गाण्याचा संगीतकार कोण हा विचारच मी कधी केला नव्हता.
हंसा वाडकर ह्यांच्याबद्दल जसं ऐकलंय, कुठेकुठे थोडंफार वाचलंय तसंच देविकाराणी ह्यांच्याबद्दलही त्रोटक माहिती मला होती. पूर्वीच्या काळी सौंदर्यवती वगैरे गणल्या जाणाऱ्या अभिनेत्री मला बऱ्याच वेळा अजिबात सुंदर वाटलेल्या नाहीत. उदा. लीला नायडू किंवा सुरेय्या. पण हंसा वाडकर आणि देविकाराणी दोघींचे फोटो पाहून त्या आजकालच्या काही नट्यापेक्षाही अधिक सुंदर असतील असं वाटून गेलं. निदान देविकाराणी ह्यांचं उत्तर आयुष्य तरी सुखात गेलं हे वाटून बरं वाटलं. हा लेख थोडा त्रोटक वाटलं. अजून वाचायला आवडलं असतं.
ह्या दोघींच्या मानाने अभिनेत्री नंदा माझ्या अधिक परिचयाची. तिचे गुमनाम, कानून, द ट्रेन, इत्तेफाक, धूल का फूल हे चित्रपट पाहिले आहेत. आईच्या लहानपणची तिची एक मैत्रीण नंदाची चुलतबहीण होती तेव्हा आई तिच्या घरी एकदा नंदाला भेटली होती हे तिच्याकडून ऐकलंय. त्यामुळे तिच्यावर लिहिलेला प्रकाश चांदे ह्यांचा 'चिरतरुण बेबी' हा लेख उत्सुकतेने वाचला. नंदाने मराठी चित्रपटात काम केलं आहे ह्याची मला अजिबात माहिती नव्हती. मला तर ती थेट हिंदी चित्रपटात आली असंच वाटायचं.
'चित्रकला' हा मला न जमणारा आणखी एक प्रकार. विशेषतः ती abstract paintings तर अजिबात समजत नाहीत. त्यामुळे 'सुझा' हे नाव कुठेकुठे वाचलेलं असलं तरी एक चित्रकार ह्यापलीकडे मला त्यांच्याविषयी फार माहिती नव्हती. त्यांच्यावर राजेंद्र पाटील ह्यंनी लिहिलेल्या लेखातून ती ओळख झाली. पण हा लेखही फारसा कळला नाही. आणि त्यांची लेखात दिलेली चित्रं पाहून हा आपला प्रांत नव्हे ही खात्री झाली :-)
स्टॅम्प्स, नाणी वगैरे जमवायचा छंद वाचून ठाऊक आहे. मी स्वतः सुद्धा विविध चित्रं असलेली नाणी जमवते. भारतात अशी नाणी मिळायची संधी कमीच आहे. एकुणात फक्त चलन म्हणून नाणी वापरायची हा आपल्या इथला खाक्या. जाने दो. तर सांगायचं मुद्दा हा की फक्त शिपच्या काडेपेट्या पाहून सवय असलेल्या मला काडेपेट्यांवरही वेगवेगळी चित्रं असतात हे वाचून धक्काच बसला. नाही म्हणायला लॉकडाऊनच्या काळात शिपची काडेपेटी मिळाली नव्हती तेव्हा दुसरी कुठलीतरी आणली होती (ती पेटेल की नाही ही शंका मनात घेऊन!). रविप्रकाश कुलकर्णी ह्यांचा 'काडेपेटीवरच्या चित्रांची वेगळी कहाणी' हा लेख खूप मनोरंजक माहिती देतो. सुलोचना उर्फ रुबी मायर्स (ह्यांच्याबद्दलही फक्त ऐकून-वाचूनच आहे) ह्यांची छबीही काडेपेटीवर असायची. त्याचा लेखकाने सांगितलेला किस्सा वाचण्याजोगाच.
'रंगातून जग पाहणारा चित्रकार' हे प्रशांत कुलकर्णी ह्यांच्या लेखाचं शीर्षक वाचून म्हटलं हाही लेख डोक्यावरून जाणार. पण ख्रिस्तोफ निमनच्या (ह्याचं नाव मात्र मी आजवर ऐकलेलं नव्हतं!) चित्रकलेतलं ओ की ठो कळत नसणाऱ्या लोकांनाही सहजगत्या समजू शकणाऱ्या अफलातून चित्रांची त्यांनी सुरेख ओळख करून दिली आहे. आजवर आपण ह्याचं नाव कसं ऐकलं नाही ह्याचंच आश्चर्य मला लेख वाचून संपला तरी वाटत राहिलं.
'केनेडींच्या हत्येमागील विलक्षण ताणेबाणे' हा दीपक करंजीकर ह्यांचा लेख अमेरिकी इतिहासातल्या एका महत्त्वाच्या घटनेवर आहे. पण तो विषयाला न्याय देत नाही. ह्या घटनेबाबत ज्या conspiracy theories आहेत त्यांचा व्यवस्थित उहापोह अपेक्षित होता. पण लेखकाने काही थिअरीजना उदा. अमेरिकी परराष्ट्र धोरण खूप जास्त महत्त्व दिलं आहे. बाकी थिअरीज थोडक्यात आटपल्या आहेत. असं करण्यामागचं कारण स्पष्ट होत नाही. त्यामुळे लेखही खूप विस्कळीत वाटतो.
जंगल आणि पर्वत ह्यांच्यावर खास प्रेम असलेल्या मला सुरेशचंद्र वारघडे ह्यांचा 'अरण्यजीवन' हा लेखही खूप आवडला. लेखातले फोटोही सुरेख आहेत. हिंदी साहित्यातल्या कुमार अंबुज ह्यांच्या 'मंदिर-चौक' ह्या कथेचा मधुकर धर्मापुरीकर ह्यांची केलेला अनुवाद आवडला. निदान हिंदी साहित्य तरी वाचायला सुरुवात करायला हवी हे पुन्हा एकदा जाणवलं. त्यामानाने 'पेस्ट्री दुकानातली चोरी' ही अनुवादित कथा फारशी आवडली नाही.
वसंत देशमुख ह्यांचा गुप्तचर खात्यातल्या अनुभवांवरचा लेख, डॉ. स. गं मालशे आणि कच्छच्या लोककला संगीतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धनबाई कारा ह्यांची ओळख करून देणारे लेख वाचनीय.
कवितांचा विभाग 'पाहू काही समजतात का?' हा पूर्वग्रह मनात घेऊन वाचला. त्यातल्या काही कळल्या. काही कळल्या नाहीत. पण विशेष आवडलेल्या कविता म्हणजे एक कौटुंबिक कविता (अलका गांधी असेरकर) आणि घुसमट (मंदाकिनी पाटील).
'पाकनिर्णय' मधल्या वाळवणाचे पदार्थ, सूप्स आणि आईसक्रीम ह्या विभागातले पदार्थ वेगळे वाटले.
एकंदरीत ह्या वर्षीपासून कालनिर्णयचा दिवाळी अंकसुद्धा विकत घेणार हे नक्की.