Saturday, December 30, 2023

५. किल्ला (दिवाळी अंक २०२३) (किंमत ४५० रुपये)

किल्ल्याचा दरवर्षीचा दिवाळी अंक मोठ्या उत्सुकतेने उघडते. ह्या वर्षीही तसंच झालं. पण ह्या वर्षीच्या अंकाने थोडी निराशा केली असं म्हणावं लागेल. कदाचित काही लेख नेहमीप्रमाणे एखादा विशिष्ट किल्ला किंवा शिवकालीन घटना किंवा शिवकाळातील एखादा विषय ह्यावर आधारित नव्हते म्हणून असेल कदाचित.

उदा. 'शिवपूर्वकाळ' वर डॉ. अजित आपटे ह्यांनी लेख लिहिला आहे. ह्यातली काही माहिती नवी असली तरी बरीचशी बऱ्याच मराठी माणसांना माहीत असलेली. तसाच एक जोडलेख शिवोत्तर काळ ह्या विषयावर लिहिला असता तर कदाचित तौलनिक अभ्यासाच्या दृष्टीने बरं झालं असतं. 'छत्रपती एक अदभूत कारकीर्द' हा संदीप तापकीर ह्यांचा लेखही असाच जेनेरिक वाटला. 

अपवाद काही लेखांचा. त्यातील पहिला आदिशक्ती श्रीतुळजाभवानी वरचा डॉ. मंजिरी भालेराव ह्यांचा. प्रतापगडावरील मूर्तीपासून देवीची अनेक तीर्थं, तिथले लेख आणि स्थापत्य याविषयी माहिती ह्या लेखातून मिळते. दुसरा लेख पुरुषोत्तम भार्गवे ह्यांचा 'शिवकाळातील चलन व्यवस्था' ह्या विषयावरचा. ह्यातल्या अनेक नाण्यांविषयी वाचून लोक रोजच्या जीवनात आर्थिक व्यवहार कसे करायचे हा प्रश्न पडला :-) शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांच्या मदतीने शिवराज्यकोष कसा निर्माण केला ह्याविषयीची मनोरंजक माहिती सुहास सोनावणे ह्यांच्या लेखातून मिळते. 'भरडधान्य' ह्या विषयावर आजकाल बरंच लिहिलं जातंय. पण हेच भरडधान्य मराठा सैन्याला कसं उपयुक्त ठरत होतं ह्याविषयी एड. सीमंतिनी नूलकर ह्यांचा लेख वाचून कळतं. तेव्हाच्या काळातल्या भरडधान्य वापरून केलेल्या काही पाककृती दिल्या असत्या तर लेख अधिक परिपूर्ण झाला असता. 

किल्ले पदमदुर्ग ह्याची रचना, दुर्ग निर्मितीतले घटक ह्याविषयी सविस्तर माहिती चंद्रशेखर बुरांडे ह्यांच्या लेखातून मिळते. शिवकाळातील कर म्हणजे औरंगजेबाने हिंदूंवर लादलेला जिझिया एव्हढीच माहिती होती. त्यापलीकडे जाऊन स्वराज्यातला महसूल विभाग, त्यातले अधिकारी,महसुलाचे मुख्य स्रोत, ३ प्रकारचे कर (प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि संकीर्ण) ह्याविषयी साद्यन्त माहिती 'शिवरायांची करप्रणाली' मधून प्रवीण गायकवाड आपल्याला देतात. लाल महालात शिरून महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली हा इतिहास सर्वाना माहीत आहे. पण त्या घटनेबद्दल बरीच वेगळी माहिती उदा. मोहीमपूर्व तयारी, प्रत्यक्ष कारवाई आणि ह्या घटनेचे झालेले परिणाम प्रा. अविनाश कोल्हे ह्यांच्या 'लाल महालातील थरार' ह्या लेखातून मिळते. तीच गोष्ट 'मुरारबाजी' वरच्या डॉ. सचिन पोवार ह्यांच्या लेखाची. पुरंदरची लढाई शर्थीने लढणाऱ्या मुरारबाजीबद्दल सर्व मराठी माणसांना माहित आहे. पण त्यांचं घराणं, पुरंदर किल्ला, प्रत्यक्ष लढाई आणि मुरारबाजी ह्यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारा बद्दल बरीच माहिती हा लेख देतो. 

मला सर्वात आवडलेला अंकातील लेख म्हणजे संजय तळेकर ह्यांनी लिहिलेला उंबरखिंडीच्या लढाईवरचा. ह्या लढाईबद्दल मला तरी खास माहिती नव्हती. पण लढाईची पूर्वपीठिका, कारतलब खानाचं सैन्य, त्याचा प्रवासाचा मार्ग, महाराजांनी केलेली व्यूहरचना आणि प्रत्यक्ष युद्ध ह्याबद्दल वाचताना खरोखर मजा आली. त्यामानाने लेखाचा 'शरणागती' हा शेवटला भाग घाईघाईत गुंडाळल्यासारखा वाटलं. लेखाची शब्दमर्यादा ओलांडली गेल्यामुळे असं झालं असावं का? ह्या लढाईच्या दूरगामी परिणामांबद्दल वाचायला नक्कीच आवडलं असतं. भास्कर सगर ह्यांची रायगडाची रेखाचित्रं आवडली. 

असो. मुख्यत्वेकरून शिवकालीन चलन आणि करप्रणाली ह्याविषयीच्या माहितीसाठी हा अंक दर वर्षीप्रमाणे जपून ठेवते आहे. मोडी लिपीचा सखोल अभ्यास जेव्हा करता येईल तेव्हा ह्या लेखांचा उपयोग होईल असं वाटतं.

No comments: