दिवाळीत अंक विकत घेताना कथा असलेले अंक मी शक्यतो विकत घेत नाही. कारण त्या शोकांत असलेल्या असल्या तर उगाच डोक्याला भुंगा लागतो. निदान दिवाळीचे चार दिवस तरी मजेत जावेत असं वाटतं. अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की एकदम हलकंफुलकं वाचण्याकडे माझा कल आहे. शेवटी सुवर्णमध्य असतोच की. पण तरी एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्याआमच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत (आणि ज्याच्याशी राजकारणी लोक काडीचा संबंध येऊ देत नाहीत!) अश्या विषयांवर वाचायला नक्कीच आवडतं. तसंच नेहमीचे विषय सोडले तर काही वेगळं असं ह्या निमित्ताने पदरात पडावं अशीही इच्छा असतेच. म्हणून कालनिर्णयचा अंक घ्यायला सुरुवात केली आहे.
ह्या वर्षीच्या अंकाची सुरुवात 'पृथ्वी अत्यवस्थ' ह्या अतुल देऊळगावकर ह्यांच्या लेखाने झाली आहे. रोजचं वर्तमानपत्र वाचणाऱ्या सर्वांना हा विषय आणि त्याचं गांभीर्य माहीतच असणार. पण संकट किती दाराशी येऊन ठेपलं आहे ह्याची जाणीव ह्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा झाली. आपल्या बाल्कनीत दोन गुलाबाची, एक तुळशीचं आणि एक मोगऱ्याचं झाड लावून सुटणाऱ्यातला हा प्रश्न राहिलेला नाही. प्रश्न फक्त हा की वेड पांघरून पेडगावला जाणाऱ्या शासनाला आपण एक जबाबदार नागरिक म्हणून ह्याची जाणीव कधी करुन देणार?
कुठल्याही वाचकाला लेखन, प्रकाशन, संपादन ह्या सगळ्याबद्दल एक कुतूहल असायला हवं. आपल्या हातात जे पुस्तक आहे ते लेखकाच्या डोक्यात तयार होऊन आपल्या हातात पडेस्तोवर काय काय करावं लागतं ह्याची ही पूर्ण 'प्रोसेस' मनोरंजक असणारच. म्हणून निळू दामले ह्यांचा मॅक्सवेल पार्किन्सवरचा लेख खूप आवडला. विशेषतः स्कॉट फिझगेर्लड आणि अर्नेस्ट हेमिंग्वे हे लेखक माहीत असल्यामुळे तर जास्तच. टॉम वुल्फबाबत मला तुलनेने कमी माहिती आहे. सालाबादप्रमाणे ह्या सगळ्या लेखकांची पुस्तकं कधी वाचून होणार हा प्रश्न पडला आणि तो 'रिटायर झाल्यावर करायच्या गोष्टी' ह्या सदरात ढकलला गेला. :-) असो.
ह्याच सदरात मोडणारा पुढला लेख प्रा. अ. का. प्रियोळकर ह्यांच्यावरचा डॉ. मीना वैशंपायन ह्यांचा. खरं तर मी प्रा. प्रियोळकरांबद्दल एक संशोधक म्हणूनही कधी ऐकलेले नाही. त्यामुळे ते लेखक होते ह्याबद्दल काही माहिती असण्याची शक्यता शून्य. अर्थात हा माझा दोष. पण शाळेत असताना अभ्यासाच्या धबडग्यात अवांतर वाचन राहून गेलं आणि शाळेतून बाहेर पडल्यावर फक्त इंग्रजीपुरतं मर्यादित राहिलं ही अभिमानाने सांगावी अशी नसली तरी खरी गोष्ट आहे. त्यांच्या संशोधनात्मक लिखाणात किती रस वाटेल हा भाग सोडला आणि त्यांचं ललितलिखाण पुढेमागे कधी वाचावं म्हटलं तरी एव्हढं जुनं साहित्य कुठे उपलब्ध असणार हा प्रश्न राहतोच. त्यावर ह्या लेखात काही प्रकाश टाकला असता तर बरं झालं असतं.
अमिताभ बच्चन हा काही माझ्या आवडत्या नटांपैकी एक नव्हे. खरं सांगायचं तर मला त्याचा अभिनय बराच एकसुरी वाटत आला आहे. पुन्हा तो ज्या Angry Young Man च्या भूमिकेतून प्रसिद्धीस आला ते चित्रपट मला तरी बरेच अतिशयोक्तीपूर्ण वाटतात. त्यामानाने त्याचे आनंद, अभिमान, चुपके चुपके वगैरे आवडले होते. अर्थात अमिताभ ह्या विषयावर एवढं लिहिलं गेलंय की विजय पाडळकर ह्यांचा लेख वेगळं काय सांगणार असाच प्रश्न पडला होता. जंजीर, दीवार, आनंद वर लिहिलेलं बरंचसं आधी वाचलेलं. पण नमकहराम आणि सौदागर बद्दल (हा हल्ली हल्लीच टीव्हीवर अर्धामुर्धा पाहिला) वाचायला मिळालं. 'अभिमान' मधला शेवटची दोघांनी एकत्र गायची सिच्युएशन अत्यंत फिल्मी हे मत १००% पटलं.
गोल्डन इरा हा अनेक भारतीय प्रेक्षकांसारखाच माझ्याही जिव्हाळ्याचा विषय. वहिदा, आशा पारेख, शर्मिला टागोर ह्यांचे काही चित्रपट पाहिलेत. अशोक राणे ह्यांचं फिल्मी जगतावरचं एक पुस्तक नुकतंच वाचलं. त्यामुळे त्यांचा 'तीन देविया' हा लेख मोठ्या उत्सुकतेने वाचला. पण तिघींबद्दल एव्हढं त्रोटक लिहिण्याऐवजी प्रत्येकीबद्दल एकेक लेख विस्ताराने लिहायला हवा होता असं वाटून गेलं. तसंच 'सौंदर्याच्या व्याख्येचा विचार करता आशा पारेख त्यात कुठे बसणार नाही' सरसकट विधान करताना आपली सौंदर्याची व्याख्या काय ह्याचाही उलगडा केला असता तर बरं झालं असतं. आशा पारेख नंतर वयाच्या मानाने थोडी थोराड दिसू लागली होती हे मान्य करूनही ती सुरुवातीच्या चित्रपटात गोड दिसायची. हा, आता शेलाटी बांधा हे सौंदर्याच्या व्याख्येतलं एक परिमाण असेल तर विषय संपला.
८०च्या दशकात आमच्या घरी टाइम्स येत असे. त्यामुळे मारिओ मिरांडा ह्यांची व्यंगचित्रं नक्कीच आठवतात. मला वाटतं फोर्टमधल्या 'फाउंटन सिझलर्स' ह्या हॉटेलमध्येसुद्धा एक भिंतभरून त्यांची मोठी व्यंगचित्रं होती. आपण ऑर्डर केलेलं सिझलर कधी वाफाळत टेबलवर येतंय ह्याची वाट पाहत त्या चित्रातल्या व्यक्तिरेखा पाहणे हा एक आनंदाचा भाग होता. त्यांच्यावर मधुकर धर्मापुरीकर ह्यांनी लिहिलेला लेख आवडला. अँडी गोल्डसवर्दी ह्याच्याबद्दल निदान मी तरी कधी काही ऐकलं नव्हतं. निसर्गातच निर्माण केलेल्या त्याच्या कलाकृतीबद्दल महेंद्र दामले ह्यांनी लेख लिहिलाय. तो वाचणं आणि त्यात दिलेली त्या कलाकृतीची चित्रं पाहणं आवडलं. आता हे सगळं नेटवर शोधून पाहणं आलंच :-)
'सोनेरी कासवीची गोष्ट' हे शीर्षक वाचून ती परीकथा (कदाचित अनुवादित) असावी असं वाटलं होतं. ही कथा वाचायला सुरुवात केली तेव्हा ती नेमकी कश्याबद्दल आहे ह्याचा उलगडा पहिली काही पानं झाला नाही. मग सीता, द्रौपदी, अहिल्या आणि रेणुका ह्यांचे उल्लेख आले तेव्हा थोडा थोडा उलगडा होऊ लागला. माधवीची कथा माहिती होती पण नंदिनी आणि चित्रांगदा ह्यांच्याबद्दल नंदिनी कामधेनूची मुलगी आणि चित्रांगदा ही अर्जुनाची मणिपूर इथली पत्नी ह्यापलीकडे काही माहिती नव्हती. पण ह्या कथेतली नंदिनी कृष्णाच्या १६१०० पत्नीपैकी एक. किरण येले ह्यांची ही कथा खूप आवडली पण सोनेरी कासवी कोण ह्याचा मात्र मला उलगडा झाला नाही. लेखकाला ईमेल करून विचारावं का?
'भातुकलीतून निष्कासित' ही संतोष शिंत्रे ह्यांची कल्पित वाटली असती एके काळी. पण आजच्या काळात खूप relevant वाटली ही खरं तर वाईट गोष्ट आहे.
अंकातले बाकीचे माहितीपूर्ण लेख म्हणजे रंगधुरंधर विद्याधर (शुभदा दादरकर), रंगीला रॉबर्टो (दिलीप चावरे), जोगती परंपरेतील दंतकथा 'मंजम्मा' (प्रा. डॉ. प्रकाश खांडगे), 'चिनी कूटनीती' (डॉ. शरद वर्दे), 'श्री सरस्वती प्रेस' (पी. आर. रे) आणि 'भारताचा इतिहास बदलणारे पालखेडचे युद्ध' (चंद्रशेखर नेने). 'गुलदस्त्यातील रत्न: ओरछा' हा अनुराधा ठाकूर ह्यांचा लेख वाचून इथे कधीतरी जाण्याचा विचार पक्का केलाय.
'प्राण्यांचं आधुनिक जग' मधली प्रशांत कुलकर्णी ह्यांची कार्टून्स आवडली. बाकी अंकातल्या हायकू आणि सेनर्यु बर्याचश्या डोक्यावरून गेल्या ह्यात नवल नाही. कवितेचं आणि माझं फारसं कधी जमलेलं नाही. हा नियम सिद्ध करायला की काय कोण जाणे पण अपवाद म्हणून महेश केळुस्कर ह्यांची 'फ्रायकू', उत्तपा कोळगावकर ह्यांची 'चिठ्ठी' आणि अंजली कुलकर्णी ह्यांची 'या आखीवरेखीव सुबक बागेत' फार आवडल्या. शेवटल्या कवितेने तर 'एका तळ्यात होती' ची आठवण करून दिली.
अंकातले काही लेख अधिक मनोरंजक, अधिक सोप्या पद्धतीने लिहिले असते तर अधिक वाचनीय झाले असते असं वाटलं. पण एकंदरीत अंक आवडला.
No comments:
Post a Comment