भवतालचा २०२२ चा दिवाळी अंक 'सडे पठारे' विशेषांक. कोकणाशी फारसा संबंध नसला तरी गेली काही वर्षं भवतालचे अंक वाचून सडे म्हणजे जांभ्या दगडाची बनलेली सपाट जागा एव्हढं ज्ञान आहे. ह्या सड्यांवर आढळणाऱ्या कातळशिल्पांबद्दल वाचलंय. तेव्हा अख्खा दिवाळी अंक काढण्याइतकं ह्यात काय आहे बुवा लिहिण्यासारखं हे थोडं अधिक कुतूहल नेहमीप्रमाणे हा अंक घेताना होतं.
अंक वाचायला सुरुवात केली तेव्हा ह्यावर लिहिण्यासारखं किती आणि कायकाय आहे ते लवकरच लक्षात आलं. मुळात सडे पावसाचे चार महिने सोडले तर कोरडे असतात म्हणून सरकारदरबारी त्याची पडीक जमीन म्हणून नोंदणी असली तरी प्रत्यक्षात तिथे विविध प्रकारची जीवसृष्टी नांदत असते. पावसाळा सुरु झाला की निरनिराळ्या प्रकारची फुलं, गवताचे नानाविध प्रकार, फुलपाखरं, किडे-कीटक, पक्षी असं काय काय एकोप्याने नांदायची जागा म्हणजे सडे. हे सडे सच्छिद्र जांभ्या दगडाचे बनलेले असल्याने ह्यातून पाणी आत झिरपते आणि भूजल पातळी तर वाढतेच पण आजूबाजूच्या गावांना ह्यातून पाणी पुरवठा होतो. सड्यावर इतर वेळी उगवणारं गवत गुरांना चारा म्हणून उपयोगी पडते. सडे हा एकाच अधिवास नसून त्यात अनेक छोटे अधिवास असतात आणि तिथे त्या त्या अधिवासाप्रमाणे अनुकूल (आणि फक्त तिथेच सापडतील अश्या!) प्रजाती सापडतात. पावसाळ्याचे चार महिने दर पंधरा दिवसांनी सडयाचं रूप बदलतं कारण आधीच्या वनस्पती आपलं आयुष्य जगून पुढल्या वनस्पतींना फुलायला जागा मोकळी करून देतात. पाचगणीचं टेबललॅन्ड म्हणजे एक सडा असून त्याचं बेलगाम पर्यटनामुळे होणारं नुकसान थांबवायला कोर्टात जावं लागलं हे वाचून तर मी थक्क झाले.
ही सगळी माहिती देणारे अत्यंत सुरेख लेख ह्या अंकात आहेत. तरी मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो तो विभाग पाचचा - ह्यात कोकणातल्या सड्यांसोबत चांदवड, अंजनेरी, दुर्गावाडी. बाकाळे आणि चोर्ला इथल्या सड्यांविषयी माहिती आहे - आणि केलेंडर ह्या सदराचा - ह्यात कौस्तुभ मोघेंनी वर्षाच्या बारा महिन्यात सड्यात होणाऱ्या बदलांना टिपणारे प्राणी, फुलं, कीटक, वनस्पती ह्यांचे सुरेख फोटो दिलेत.
आपल्या बेपर्वाईमुळे, पैश्याच्या हावेपोटी आणि जनतेचं भलं करण्यापेक्षा आपलं आणि आपल्या सात पिढ्यांचं भलं करायचं ह्या ध्येयाने पछाडलेल्या राजकर्त्यामुळे राज्यभरात सड्याचं किती नुकसान होतंय हे जवळजवळ प्रत्येक लेखात वाचून मन खंतावतं. आपल्याला कधी अक्कल येणारच नाहीये का? :-(
तरी अंकातील शेवटच्या विभागातले - शिकवण-संवर्धन-दृष्टी - लेख वाचून थोडी आशा वाटते. ठिकठिकाणी कार्यरत असलेल्या संस्थांमुळे आणि त्यात काम करणाऱ्या लोकांमुळे जे राहिलंय ते वाचेल, तगेल अशी आशा वाटतेय. देव करो आणि जनतेला अक्कल येवो आणि राज्यकर्त्यांना उपरती होवो.
एक लिहावंसं वाटतं की संपादकांनी ज्या व्यक्तींचे लेख घेणार आहोत त्यांच्याशी संपर्क साधून बाकी कुठले लेख अंकात असणार ह्याविषयी कल्पना द्यावी. त्यामुळे अंकात होणारी पुनरावृत्ती टळेल. उदा. अंकातील पहिला लेख सडे म्हणजे काय, ते कसे बनले असावेत वगैरे प्राथमिक माहिती देणारा असला तर बाकीच्या लेखांत हा उल्लेख टाळता येईल आणि अधिक उपयुक्त माहिती देता येईल.
ह्या वर्षीच्या दिवाळीला कुठला विशेषांक असेल ह्याची उत्सुकता आत्तापासूनच लागलेली आहे :-)
No comments:
Post a Comment