Tuesday, March 14, 2023

१०. भवताल (दिवाळी अंक २०२२) (किंमत ३०० रुपये)

भवतालचा २०२२ चा दिवाळी अंक 'सडे पठारे' विशेषांक. कोकणाशी फारसा संबंध नसला तरी गेली काही वर्षं भवतालचे अंक वाचून सडे म्हणजे जांभ्या दगडाची बनलेली सपाट जागा एव्हढं ज्ञान आहे. ह्या सड्यांवर आढळणाऱ्या कातळशिल्पांबद्दल वाचलंय. तेव्हा अख्खा दिवाळी अंक काढण्याइतकं ह्यात काय आहे बुवा लिहिण्यासारखं हे थोडं अधिक कुतूहल नेहमीप्रमाणे हा अंक घेताना होतं. 

अंक वाचायला सुरुवात केली तेव्हा ह्यावर लिहिण्यासारखं किती आणि कायकाय आहे ते लवकरच लक्षात आलं. मुळात सडे पावसाचे चार महिने सोडले तर कोरडे असतात म्हणून सरकारदरबारी त्याची पडीक जमीन म्हणून नोंदणी असली तरी प्रत्यक्षात तिथे विविध प्रकारची जीवसृष्टी नांदत असते. पावसाळा सुरु झाला की निरनिराळ्या प्रकारची फुलं, गवताचे नानाविध प्रकार, फुलपाखरं, किडे-कीटक, पक्षी असं काय काय एकोप्याने नांदायची जागा म्हणजे सडे. हे सडे सच्छिद्र जांभ्या दगडाचे बनलेले असल्याने ह्यातून पाणी आत झिरपते आणि भूजल पातळी तर वाढतेच पण आजूबाजूच्या गावांना ह्यातून पाणी पुरवठा होतो. सड्यावर इतर वेळी उगवणारं गवत गुरांना चारा म्हणून उपयोगी पडते. सडे हा एकाच अधिवास नसून त्यात अनेक छोटे अधिवास असतात आणि तिथे त्या त्या अधिवासाप्रमाणे अनुकूल (आणि फक्त तिथेच सापडतील अश्या!) प्रजाती सापडतात. पावसाळ्याचे चार महिने दर पंधरा दिवसांनी सडयाचं रूप बदलतं कारण आधीच्या वनस्पती आपलं आयुष्य जगून पुढल्या वनस्पतींना फुलायला जागा मोकळी करून देतात. पाचगणीचं टेबललॅन्ड म्हणजे एक सडा असून त्याचं बेलगाम पर्यटनामुळे होणारं नुकसान थांबवायला कोर्टात जावं लागलं हे वाचून तर मी थक्क झाले. 

ही सगळी माहिती देणारे अत्यंत सुरेख लेख ह्या अंकात आहेत. तरी मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो तो विभाग पाचचा - ह्यात कोकणातल्या सड्यांसोबत चांदवड, अंजनेरी, दुर्गावाडी. बाकाळे आणि चोर्ला इथल्या सड्यांविषयी माहिती आहे - आणि केलेंडर ह्या सदराचा - ह्यात कौस्तुभ मोघेंनी वर्षाच्या बारा महिन्यात सड्यात होणाऱ्या बदलांना टिपणारे प्राणी, फुलं, कीटक, वनस्पती ह्यांचे सुरेख फोटो दिलेत. 

आपल्या बेपर्वाईमुळे, पैश्याच्या हावेपोटी आणि जनतेचं भलं करण्यापेक्षा आपलं आणि आपल्या सात पिढ्यांचं भलं करायचं ह्या ध्येयाने पछाडलेल्या राजकर्त्यामुळे राज्यभरात सड्याचं किती नुकसान होतंय हे जवळजवळ प्रत्येक लेखात वाचून मन खंतावतं. आपल्याला कधी अक्कल येणारच नाहीये का? :-(

तरी अंकातील शेवटच्या विभागातले - शिकवण-संवर्धन-दृष्टी - लेख वाचून थोडी आशा वाटते. ठिकठिकाणी कार्यरत असलेल्या संस्थांमुळे आणि त्यात काम करणाऱ्या लोकांमुळे जे राहिलंय ते वाचेल, तगेल अशी आशा वाटतेय. देव करो आणि जनतेला अक्कल येवो आणि राज्यकर्त्यांना उपरती होवो.

एक लिहावंसं वाटतं की संपादकांनी ज्या व्यक्तींचे लेख घेणार आहोत त्यांच्याशी संपर्क साधून बाकी कुठले लेख अंकात असणार ह्याविषयी कल्पना द्यावी. त्यामुळे अंकात होणारी पुनरावृत्ती टळेल. उदा. अंकातील पहिला लेख सडे म्हणजे काय, ते कसे बनले असावेत वगैरे प्राथमिक माहिती देणारा असला तर बाकीच्या लेखांत हा उल्लेख टाळता येईल आणि अधिक उपयुक्त माहिती देता येईल. 

ह्या वर्षीच्या दिवाळीला कुठला विशेषांक असेल ह्याची उत्सुकता आत्तापासूनच लागलेली आहे :-)

Saturday, March 11, 2023

९. उत्तम अनुवाद (दिवाळी अंक २०२२) (किंमत ३२० रुपये)

 अनुवादित साहित्य असणारा दिवाळी अंक घ्यायचा की नाही हे मला दरवर्षी नव्याने ठरवावं लागतं. कारण अनुवाद ही अशी गोष्ट आहे की ती जर जमली नाही तर ती कथा किंवा कादंबरी जे काय असेल ते एकदम कृत्रिम वाटायला लागते. ओरिजिनल वाचता आली असती तर बरं झालं असतं ही बोच लागते. आणि वेळ फुकट गेला ही चिडचिड होते. पदरचे पैसे खर्च करून हा त्रास का विकत घ्या. अर्थात मी ही पोस्ट करतेय म्हणजे २०२२ च्या दिवाळीत हा अंक घेतला हे उघड आहे. असो. 

ह्यातल्या खूप आवडलेल्या गोष्टी म्हणजे पोस्ट ऑफिस (गौरीशंकर गोवर्धनराम जोशी हे मूळ गुजराती लेखक - गुजराती थोडंफार समजत असल्याने ह्यांचं मूळ साहित्य शोधून वाचायचा प्रयत्न करता येईल म्हणून ही नोंद), कुंती व निषादी (मूळ लेखिका महाश्वेतादेवी), पोस्टमास्तर (मूळ लेखक रवींद्रनाथ टागोर - बंगाली शिकायला मुहूर्त लागेतो मूळ साहित्य वाचणं अशक्य!), कोलकाता शेई काल, एई काल (मूळ लेखिका आशापूर्णादेवी), दही विक्रेती (मूळ लेखक मस्ती व्यंकटेश अय्यंगार - इथे मूळ साहित्य वाचणं ह्या जन्मी शक्य होईल असं वाटत नाही!), टेलिग्राम (मूळ लेखक आयन क्रायटन स्मिथ - हे नाव आधी कधी ऐकलं नव्हतं), रमजानी (मूळ लेखक ललित मिश्रा), वळून बघता मागे (मूळ लेखिका इस्मत चुगताई), ढिगाऱ्याचा मालक (मूळ लेखक मोहन राकेश), नांगर बोलतोय (मूळ लेखक पोंकून्नम वारकी) आणि मोहर बदलून गेली (मूळ लेखक कृष्णा सोबती). 

हिंदी साहित्य वाचायला सुरूवात करायला हवी हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं. खरं तर मराठी साहित्यसुद्धा आपण फारसं वाचलेलं नाही ही जुनी बोच आहेच. साठी उलटण्याची वाट बघायला नको - कल करे सो आज कर, आज करे सो अब हेच खरं. 

Thursday, February 16, 2023

८. ऋतुरंग (दिवाळी अंक २०२२) (किंमत ३०० रुपये)

 ह्या ब्लॉगवर एक नजर टाकल्यावर लक्षात आलं की २०२१ मध्ये मी ऋतुरंगचा दिवाळी अंक घेतला नव्हता. २०२० मध्ये घेतला होता. ह्या वर्षीची ह्या अंकांची खरेदी अनुक्रमणिका बघून केली होती.

पैकी बरेचसे लेख शब्दांकित. मग तो सत्यजित रेंवरचा शर्मिला टागोरचा असो किंवा शबाना आझमीवरचा जावेद अख्तर ह्यांचा असो किंवा निसर्गाशी असलेलं स्वतःचं नातं उलगडून सांगणारा दीप्ती नवल ह्यांचा असो. पण ह्यामुळे झालंय काय की शब्दांकन कितीही समजून उमजून केलेलं असलं तरी मूळ लेखाची सर त्याला येत नाही. कुठे ना कुठे तरी एखादा शब्द बोचतोच. कुठे वाक्यरचना उगाचच क्लिष्ट वाटते. दुसरं म्हणजे हे लेख छोटे वाटतात, त्रोटक वाटतात. पण हेही खरंच की शब्दांकन नसतं तर मिंटल मुखिजा, रसिका रेड्डी (ह्यांचा लेख बहुतेक लोकसत्तात आधी वाचला होता), दुर्गा गुडीलू ह्यांच्याबद्दल कळलंच नसतं.

त्यामानाने मराठी माणसाच्या लेखांचं शब्दांकन तितकंसं खटकत नाही. ह्यात कमल परदेशी, मीरा उमप, मीरा बाबर, लक्ष्मण चव्हाण, राजू बाविस्कर, सुरेख कोरडे, शिवराम भंडारी ह्या निदान मी तरी कधी नावं न ऐकलेल्या व्यक्तींच्या आयुष्याच्या प्रेरणादायक कथा आहेत. सुशीलकुमार शिंदे, मुकुंद संगोराम, किशोर मेढे ह्यांचे लेखही वाचनीय आहेत. वसंतदादा पाटील आणि गुलजार ह्यांच्यावरच्या अंबरीश मिश्र ह्यांच्या लेखात सुद्धा ह्या त्रुटी तुलनेने कमी जाणवल्या. भास्करराव पेरे पाटील ह्यांच्या लेखाचा खास उल्लेख करावासा वाटतो कारण सरकार मदत करेल म्हणून वाट बघत न बसता त्यांनी आपल्या गावाचा जो कायापालट केला त्याबद्दल वाचायला फार छान वाटलं. ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतो त्याचा प्रॅक्टिकल वापर केलाय. 

ललित भागातले हिमवाटेवरील पहाट (सुरेशचंद्र वारघडे) आणि मायकल पालीनचा जगप्रवास (नीती मेहेंदळे) हे लेख आवडले. अंजली आंबेकर ह्यांच्या लेखातून आदिवासी संगीत पार सातासमुद्रापल्याड नेणाऱ्या नंचयम्मा ह्यांची ओळख होते. मल्हार अरणकल्ले ह्यांचा गावाकडल्या ऋतूबदलांची ओळख करून देणारा 'ही वाट दूर जाते' हा लेखही वाचनीय आहे. 

दोन लेख मात्र खटकले. एक नृत्यसाधनेची सहा वर्षं हा डॉ. भाग्यश्री पाटील ह्यांचा. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली आणि ते नेटाने पूर्ण केलं हे कौतुकास्पद आहे ह्यात वादच नाही. पण ह्या नृत्यप्रवासात त्यांना काय अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली ह्याबाबत लेखात फार कमी माहिती आहे. नृत्य लहान वयात शिकायला सुरुवात करावी लागते कारण त्यासाठी लागणार लवचिकपणा तेव्हा शरीरात असतो ही सर्वमान्य समजूत आहे. त्याला छेद देत हा प्रवास त्यांनी केला तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कोणाला जायचं असेल तर त्या व्यक्तीने काय करायला हवं किंवा नको त्याविषयीची माहिती लेखात हवी होती. तसं न होता हा लेख निव्वळ आभारप्रदर्शनाचा झाला आहे. हे टाळता आलं असतं.

दुसरा लेख विनय सहस्र्बुद्धे ह्यांचा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांच्यावर लिहिलेला. सहस्र्बुद्धे ह्यांचं नाव ओळखीचं वाटलं. गुगल केल्यावर त्यांचं लिखाण कुठे वाचलंय आणि गाडी कुठल्या रुळावरून धावणार ह्याचा नेमका अंदाज आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांच्या आयुष्याबद्दल माहिती मिळाली. त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल, त्यांच्या राष्ट्रपती पदावर नेमणूक होण्याआधीच्या कामाबद्दल आदर आहे. पण "त्या कोणालाही गृहीत धरत नाहीत आणि कोणीही त्यांना गृहीत धरू शकत नाही" वगैरे लेखकाची विधानं भाषणात टाळ्या पडाव्या ह्या हेतूने करतात थेट तश्या पद्धतीची वाटली. त्यांची नोकरशाहीवरची पकड आणि अचूक थेट प्रश्न विचारायची सवय वगैरे अजून तरी दिसायची आहे. तूर्तास रबर स्टॅम्प ह्या यशवंत सिंह ह्यांच्या शब्दांची आठवण व्हावी अशीच स्थिती आहे. स्थिती बदलेल अशी आशा करावी का?

असो. पुढल्या वेळी अनुक्रमणिका जरा सावधपणे पाहावी लागेल असं दिसतंय. 

Sunday, February 12, 2023

७. लोकसत्ता (दिवाळी अंक २०२२) (किंमत १७५ रुपये)

खरं तर दर वर्षी दिवाळी अंक वाचनाची सुरुवात लोकसत्ताच्या अंकाने करायची हा माझा अलिखित शिरस्ता.  हा अंक आधी आणलेल्या अंकांत होता. नंतर काही अंक आणले ते खाली ठेवले आणि आधीच संच कपाटावर ठेवला गेला. मग खाली ठेवलेले अंक आधी वाचून टाकले. त्यामुळे लोकसत्ताचा अंक वाचायला उशीर झाला. 

२०२२ च्या बरीच बऱ्याच अंकांप्रमाणे ह्या अंकाची अनुक्रमणिका वाचून आता वेळ सत्कारणी लागणार ह्याची खात्री पटली. पहिला लेख अभिनव चंद्रचूड ह्यांचा - दुय्यम न्यायालयांना देशाच्या घटनेचा अर्थ लावण्याचा हक्क मिळावा असा ह्यातला युक्तिवाद. म्हटलं तर क्लिष्ट विषय. शाळेत असतानाही नागरिकशास्त्र हा आवडीचा विषय नव्हता. पण गेली काही वर्षं राज्यघटना आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टीबाबत थोडं वाचू लागले आहे. त्यामुळे हा लेख ज्ञानात भर टाकणारा वाटला. बीबीसी माहीत नसलेल्या लोकांनाही भारतात गेले काही दिवस हे नाव माहित झालेलं आहे. मी गेली कित्येक वर्ष त्यांचा ऐतिहासिक घटनांचा ९-१० मिनिटात मागोवा घेणारा Witness History हा पॉडकास्ट ऐकते आहे. त्यामुळे ह्या संस्थेबद्दल मनात खूप आदर आहे. सतीश जेकब ह्यांचा 'बीबीसीतले  दिवस', आशुतोष ह्यांचा 'बीबीसी आजही आशेचा किरण' आणि गिरीश कुबेर ह्यांचा 'एका क्रान्तीचं शतक' हे लेख वाचून तर हा आदर आणखी वाढला. कधी इंग्लंडला जाणं झालंच तर बाहेरून का होईना त्यांची इमारत नक्की पाहून येणार आहे. श्याम सरन ह्यांच्या 'बीबीसीचे भारताबद्दलचे धोरण बदलते आहे' मध्ये थोडा वेगळा सूर लागला आहे. असो.

'प्राचीन भारत', 'भारतीय संस्कृती' वगैरे शब्द कोणी वापरायला लागले की धडकी भरते आजकाल. पण 'सहिष्णुता' शब्द वाचल्यावर जीवात जीव आला. आजकाल हा शब्द नाहीसा झालाय वापरातून. हेमंत राजोपाध्ये ह्यांचा हा लेख संस्कृतीच्या नावाने गळे काढणाऱ्या समस्त मंडळींना वाचायला द्यायला हवा. ह्या वाढत्या असहिष्णूतेची कारणं आपल्या सर्वानाच ठाऊक आहेत. तरीही ह्या कारणांसोबतच ह्यावर काय उपाय करता येईल ह्याचा उहापोह नौशाद उस्मान ह्यांनी आपल्या लेखात केला आहे. त्यांच्या लेखाच्या शेवटच्या 'इन्शा अल्लाह' ला माझं 'देव करो' आणि 'Amen' जोडते. हे होईल तो सुदिन.

विनय सहस्त्रबुद्धे ह्यांचे लेख लोकसत्तामध्ये वाचले आहेत. त्यांच्या लेखाचं 'सदिच्छा संपदेकडून सॉफ्ट पॉवरकडे' हे शीर्षक वाचून लेखात काय मालमसाला असेल ह्याचा अंदाज आला. तरी लोकशाही टिकवून ठेवण्यात भारताने यश संपादन केलं आहे हे ते मान्य करतात हे वाचून आनंद वाटला. २०१४ च्या आधीपासून देशात लोकशाही होती हे त्यांना मान्य आहे की नाही कोणास ठाऊक. लष्कराने आपली स्वायत्तता टिकवून ठेवली आहे हे आपलं नशीब. पण न्यायालयांच्या स्वायत्ततेबाबत आजकाल शंका येऊ लागली आहे. पुन्हा असो.

म्युझियम्स हा माझा आवडता विषय. मुंबईमधलं छत्रपती शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय (पूर्वाश्रमीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम) ही माझी अत्यंत आवडती जागा. अरुंधती देवस्थळे ह्यांच्या 'कलासंग्रहालयाचिये दारी' ह्या लेखात मात्र देशविदेशातल्या नानाविध प्रकारच्या म्यूझियम्सबद्दल वाचायला मिळतं - अगदी museum of broken relationships, museum of bad art, Gelato Museum पासून ते पार फ्रॉईड म्यूझियम सर जॉन सोन्स म्युझियम ऑफ आर्किटेक्चरपर्यंत. खासगी संग्रहालयांवरचा अभिजित बेल्हेकर ह्यांचा आणि Anatomy ला वाहून घेतलेल्या एना मोरंडी मंझोलीनी वरचा विजय तापस ह्यांचा लेखही वाचनीय. हे लेख वाचून हे सगळं आपण कधी पाहणार हा प्रश्न अर्थात मनात उगवलाच. 

हिंदी सिनेसृष्टीतला चिरतरुण समजला जाणाऱ्या देव आनंदवर लिहिलेला अरुणा अंतरकर ह्यांचा लेख देवच्या चाहत्यांना नक्की आवडेल. हबीब तन्वीर हे नाव कुठेकुठे वाचलेलं पण मला त्यांच्याबद्दल फार काही माहिती नव्हती. लेखातला त्यांचा फोटो पाहिल्यावर काही आर्ट फिल्म्समध्ये त्यांना पाहिल्याचं आठवलं. पण त्यांच्या नाट्यकलेतल्या प्रवासाबद्दल त्यांच्याच शब्दात 'मोर नाम हबीब तन्वीर' ह्या लेखात वाचायला मिळतं. जुन्या काळातलं किती आणि काय काय निसटून गेलंय हे वाचून खिन्न व्हायला होतं. 

शाळेत असताना जी. ए. ची पुस्तकं वाचली होती. काही गोष्टी कळल्या, बऱ्याचश्या डोक्यावरून गेल्या. पण ह्या नावाचं गारूड कायम राहिलं. रामदास भटकळ ह्यांनी जी. ए. वर लिहिलेल्या लेखावरून आणि त्यात समाविष्ट केलेल्या त्यांना जी. ए.नी लिहिलेल्या पत्रातून त्यांच्या स्वभावाबद्दल थोडी कल्पना येते.

'मुकेश' म्हटलं की सुमधुर गाण्यांची एक मालिकाच मनात उभी राहते. गाणी काय आपण सगळेच ऐकतो. पण ती कशी ऐकावीत हे डॉ. मृदुला दाढे-जोशी ह्यांचा मुकेशवर लिहिलेला लेख वाचून कळतं. मी तर ठरवलं आहे की वेळ मिळेल तेव्हा हा लेख घेऊन बसायचं आणि पारायणं केलेली मुकेशची गाणी पुन्हा एकदा ऐकायची. लेखिकेने सांगितलेल्या जागा आपल्याला सापडताहेत का ते पाहायचं आणि मग गोल्डन एरातली इतर आवडती गाणी त्याच पद्धतीने ऐकून पाहायची. पाहू कधी जमतंय ते. 

प्रवीण बांदेकरांची 'कावळ्याची अंडी आणि गडगडलेलं सरकार' ही कथा कळतेय कळतेय म्हणेस्तोवर हातातून निसटली. तीच गोष्ट प्रणव सुखदेव ह्यांच्या 'नर आणि सागर' ह्या कथेची. त्यामानाने 'राखण' (रश्मी कशेळकर), 'एका राणीची गोष्ट' (डॉ. शुभदा कुलकर्णी)आणि 'दिलशाद खालाची न्हाणी '(वसीमबारी मणेर) ह्या कथा आवडल्या. 'दिलशाद खालाची न्हाणी' मधली मुसलमान पात्रांच्या तोंडची मराठीमिश्रित हिंदी फार वैशिष्ट्यपूर्ण वाटली. 

प्रमोद मुनघाटे ह्यांचा लेख वाचून 'सुशील राधा आणि सद्गुणी कृष्णराव' हे अजब नाव असलेली कादंबरी वाचायची उत्सुकता लागली आहे. कविता विभागातली  'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' ही नीरजा ह्यांची कविता आवडली. 'चिन्हचित्रं' मधली गणितातल्या चिन्हांवर आधारलेली व्यंगचित्रं मस्तच. 

Monday, January 30, 2023

६. महाअनुभव (दिवाळी अंक २०२२) (किंमत २५० रुपये)

महाअनुभवचा अंक मी दर दिवाळीला घेत असले तरी ह्या वर्षी अनुक्रमणिका पाहून अंक वाचायच्या आधीच खुश झाले. निळू  दामले, डॉ. शंतनू अभ्यंकर, प्रीति छत्रे, उमेश झिरपे अशी अनेक परिचयाची नावं दिसली ना.

पहिलाच लेख निळू दामले ह्यांचा 'कुंपणच जेव्हा शेत खातं. लोकशाहीच्या बुरख्याआडची हुकूमशाही'. शीर्षक वाचूनच लेख कश्याबद्दल असणार ह्याची कल्पना आली. इराण, रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि अर्थात मायभूमी भारत इथल्या सरकार आणि एकुणात शासनव्यवस्थेचा उहापोह करणारा हा लेख रोजची पेपरातली चिखलफेक वाचून व्यथित होणाऱ्या कोणाही सुजाण माणसाला पटावा असाच.

डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांचा एक लेख आधीच्या वर्षीच्या कुठल्या तरी दिवाळी अंकात वाचला होता. मूल जन्माला येताना काय गुंतागुंतीची प्रक्रिया घडून यावी लागते त्याचं अतिशय सोपं वर्णन त्यांनी त्या लेखात केलं होतं. नंतर लोकसत्तामध्ये उत्क्रान्तीचा डार्विनचा सिध्दांत मोडून काढून त्याऐवजी सकल सृष्टीचा कोणी कर्ताकरविता आहे असा सिध्दांत मांडणाऱ्या - ज्याला छद्मविज्ञान म्हटलं जातं अश्या एका पुस्तकाचा खडसून समाचार घेणारा त्यांचा लेखही वाचनात आला. पुन्हा ह्या अंकातल्या त्यांच्या लेखाचं शीर्षकसुद्धा 'आपुले मरण पाहिले म्या डोळा'. (ते 'आपुले मरण पाहिले मी म्या डोळा' असं असायला हवं होतं खरं तर!) पण लेख वाचून हादरायला झालं. क्षणभर हे जे लिहिलंय ते अभ्यंकर ह्यांच्यासोबत खरोखर झालंय का कल्पित कथा आहे असंही वाटून गेलं. रोज संध्याकाळी येणारा बारीक ताप आणि थकवा ते फुफ्फुसाच्या कॅंसरचं निदान ह्या प्रवासातल्या आपल्या विविध अवस्थांचं त्यांनी ह्या लेखात वर्णन केलंय. हे नुसतं वाचूनच आपल्याला कसंतरी होतं ते ह्या माणसाने कसं निभावलं असेल ह्याचं आश्चर्य आणि कौतुक वाटतं. पुन्हा ह्यात त्यांनी आपली विनोदबुद्धी शाबूत ठेवली आहे. हा लेख वाचून असं वाटलंच की ते डॉक्टर असल्याने अनेक डॉक्टर मित्रांची त्यांना अचूक निदान होण्यात म्हणा किंवा एक सपोर्ट सिस्टीम उभी करण्यात म्हणा खूप मदत झाली. ज्याचां वैद्यकीय क्षेत्रांत कोणीही ओळखीचं नाही अश्या लोकांना मात्र हा अनुभव दुरापास्तच. पूर्वीच्या काळी फेमिली डॉक्टर हे जसा आधार वाटायचे तशी सोय आता नाही. जवळपास सगळेच डॉक्टर पेशंटसंबंधी सहअनुभूती दाखवत नाहीत. मग कारण काहीही असो. तसा एखादा डॉक्टर मिळालाच तर तुमचं नशीब जोरावर म्हणायचं. 

'सोनपावसाचं ऐतिहासिक गाव' (इथे लेखाच्या शीर्षकात 'ऐतिहासिक' ह्या शब्दात एक मात्रा अधिक छापली गेली आहे) हा प्रणव पाटील ह्यांचा कोल्हापूरजवळच्या कसबा बीड गावाबद्दलचा लेख आवडला. शिलाहार राजांच्या काळातली नाणी इथे सापडतात. त्या काळातल्या वीरगळी आणि अजून बऱ्याच खुणा तिथे आहेत. कधीतरी जायला हवं इथे असं वाटून गेलं. 'भारत विकास ग्रुप' ह्या उद्योगाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड ह्यांच्यावरचा आनंद अवधानी ह्यांनी लिहिलेला लेख वाचून मस्त वाटलं. एका मराठी माणसाने एकट्याने एव्हढा पसारा उभा केला ह्याचं कौतुक वाटल्यावाचून राहात नाही. आधी हा लेख कदाचित स्पॉन्सर्ड असावा असं वाटून मी वाचायचं टाळणार होते. पण वाचला हे बरं झालं. 

मेघश्री दळवी ह्यांच्या तिन्ही कथा सगळीकडे रोषणाई आणि जमिनीची तोडफोड करून मेट्रो बांधणं एव्हढीच मुंबईच्या विकासाची कल्पना डोक्यात असणाऱ्या सर्व राजकारणी लोकांना वाचायला द्यायला हव्यात. ह्या अश्या कथा वाचून भयानक भीती वाटते. कारण अवकाळी पाऊस, बिघडलेली हवा अश्यासारखे अनेक धोक्याचे इशारे केव्हापासूनच दिसायला लागलेले आहेत. हे भविष्य खूप नजीकचं तर नाही?

लेवीसन वुडवरचा प्रीति छत्रे ह्यांचा लेख वाचून पृथ्वी उभीआडवी पालथी घालणाऱ्या ह्या अवलियाला मनोमन सलाम केला. विशेषतः कुठल्याश्या आदिम जमातीतले लोक केसाला केशरी रंग द्यायला त्यावर एक विशिष्ट राख फासून शॉवरखाली आंघोळ केल्यासारखे डायरेक्ट गोमूत्राची धार अंगावर घेतात म्हटल्यावर ह्या पठ्ठ्याने तेही केलं हे वाचून तर मी उडालेच. गोमातेचा उठता बसता जयजयकार करणारे किती हिंदुत्ववादी लोक हे स्नान करायला तयार होतील हा मजेशीर प्रश्न मनात डोकावून गेला. Walking The Himalayas हे नाव टीव्हीगाईड मध्ये पाहिलं होतं. पण लेवीसन वुडच्या भटकंतीवर तो आहे हे ठाऊक नव्हतं. भारत-पाकिस्तान सीमेवरची त्याची भटकंती पाहायला डिस्कव्हरी प्लस पाहिलं पाहिजे आता.  

'यात्रा अपघातांची' हा एक लोको पायलट असलेल्या गणेश मनोहर कुलकर्णी ह्यांनी लिहिलेला लेख सुन्न करणारा. टेनिस क्रिकेट हा शब्द मी कधी ऐकलाही नव्हता. मग तिथेही अनेक संघ आहेत, त्यांच्या देश-विदेशात मालिका खेळलया जातात आणि खूप लोक ह्या खेळाचे, खेळाडूंचे चाहते आहेत हे ठाऊक असणार तरी कसं. तुषार कलबुर्गी ह्यांचा लेख मात्र ह्यावर सविस्तर माहिती देतो. माहिती अक्षरश: एका क्लिकवर उपलब्ध असायच्या काळातसुद्धा आपल्याला किती गोष्टी माहित नसतात. सुझन मेसेलस ह्या फोटोग्राफरवरचा 'अस्वस्थ काळाची फोटोग्राफर' हा लेख वाचूनसुद्धा असंच वाटलं. 

आयुष्यात प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते - करून बघायच्या गोष्टींची. त्यात बहुतेक साऱ्या असाध्य असतात म्हणा. माझ्या बकेट लिस्टमध्येही एव्हरेस्टच्या बेस केम्पपर्यंत जाऊन यायचं अशी एक एंट्री आहे. त्यामुळे भारतातला अव्वल गिर्यारोहक असलेल्या मिंग्मा शेर्पावरचा लेख मोठ्या उत्सुकतेने वाचला. ह्याही बाबाला माझा सलाम आहे. 'कोकणातला कातळखजिना' हा सुहास गुर्जर ह्यांचा लेख वाचून हे सगळं आपण बघायचा मुहूर्त लागायच्या आधी नष्ट तर होणार नाही ना असा एक भुंगा डोक्याला लागला. पुन्हा एकदा 'हजारो ख्वाहिशें ऐसी' वगैरे.... 

अगोचर, द मिस्ट्री रूम, छर्रा  ह्या कथा फारश्या आवडल्या नाहीत. त्यामानाने 'सगळ्याचा मिळून पांढरा किंवा काळा' ही कथा खूप भावली. विशेषतः: त्यातलं 'सगळ्यात पांढराच खरा! सुरुवातबी तो करून देतोय न शेवटाला बी तोच हात देतोय' हे वाक्य अगदी पटलं.

Sunday, January 29, 2023

५. कालनिर्णय (दिवाळी अंक २०२२) (किंमत २५० रुपये)

 निदान मागच्या दोन वर्षी तरी कालनिर्णयचा अंक वाचल्याचं स्मरणात नाही. ह्या वर्षीही हा अंक असल्याचं मला माहित नव्हतं. मग लोकसत्तामध्ये त्याबद्दल वाचलं. आणि घरी पेपर टाकणाऱ्या व्यक्तीला आणून द्यायला सांगितलं. 

अंकाच्या सुरुवातीलाच इंदिरा संतांची 'अक्कू बक्कूची दिवाळी' ही कविता वाचली. शाळेत असताना कधी ही कविता वाचनात आली नव्हती. पण मुद्दामहून कुठलीही कविता शोधून वाचावी असं मला फारसं कधी वाटत नाहीच. असो. तर शाळेत असताना ही कविता वाचून काय वाटलं असतं ते आता सांगता नाही येणार. पण आता ह्या वयात तरी ती फारशी भावली नाही. भाचरांची दिवाळी आनंदात जावी अश्या भावनेतून जरी मामाने सगळ्या वस्तू आणल्या असल्या तरी त्यातून बहिणीची गरिबी अधिक अधोरेखित होते. तसंच मामा भाचरांना आजोळी घेऊन जायला आलेला असतो तर एव्हढं सामान का घेऊन येतो ते कळलं नाही. वर तुम्ही येणार नाही म्हणून मामीने दिलं आहे असाही उल्लेख आहे. ते मामीला आधीच कसं कळलं हेही समजलं नाही. कदाचित बालवयात हे प्रश्न पडले नसते.

पुढली अनुक्रमणिका वाचून मात्र पुढे मेजवानीच वाढून ठेवली आहे ह्याची खात्री पटली :-)

मराठ्यांचं आरमार २०२२ च्या दिवाळीतला लाडका विषय दिसतो. किल्ला किंवा दुर्ग ह्यापैकी एका अंकातही ह्यावरचा लेख ह्याच दिवाळीत वाचल्याचं आठवलं. अर्थात आरमारातलया जहाजांवर छान माहिती ह्या लेखातून मिळाली. ' गोव्याच्या मातीचा सन्मान' हा कोकणी साहित्यातलया दामोदर मावजो ह्या लेखकांवर लिहिलेला लेख उत्सुकतेने वाचला. आम्ही जीएसबी म्हटल्यावर बरेच लोक कोकणी समजतात. त्यामुळे कित्येक दिवसात मलाही वाटायचं की आपल्याला कोकणी कसं येत नाही. पण आमच्या कुठल्याही पिढीत कधीच कोकणी बोलली गेली नाही. तरी त्या भाषेबद्दल एक कुतूहल नेहमीच राहिलं. त्यातून भाषा हा  माझा नेहमीच आवडीचा विषय राहिलेला आहे. कोकणी शिकून मूळ साहित्य वाचायची संधी मिळेल असं वाटत नाही. पण कधी कुठे काही अनुवादित मिळालं तर नक्की वाचेन. 

न्यू यॉर्कर बद्दल आणि त्याच्या विल्यम शॉन ह्या संपादकांबद्दल वाचून आपल्याला किती आणि काय वाचायचं आहे हे जाणवून छाती दडपून गेली. हे असलं रोखठोक, कोणाचीही भीड ना बाळगता लिहिणारे लेखक, ते छापणारे संपादक आणि वाचणारे वाचक आपल्या देशात कधी दिसतील असा विचार नको नको म्हणताना डोकावून गेलाच. 

हंसा वाडकर आणि त्यांच्या चरित्राबद्दल वाचलंय. पण हे एव्हढं अंगावर येणारं काही आपल्याला झेपेल असं वाटत नसल्याने ते चरित्र कधी वाचलं नाही आणि त्यावर  बेतलेला 'भूमिका' कधी पाहिला नाही. श्रीकांत बोजेवार ह्यांचा लेख मात्र आवडला. हंसाबाई दिसायला सुरेखच होत्या हे फोटोवरून कळून येतं. एकदम मिळालेली प्रसिद्धी, हातात आलेला पैसा, मार्गदर्शन करायला कोणा वडीलधाऱ्या व्यक्तीचं नसणं ह्या परिस्थितीत आयुष्य उध्वस्त झाल्याच्या घटना चित्रपटसृष्टीत नव्या नाहीत. पण तरी दरवेळी त्या वाचून जीव कळवळतोच. 

कविता आणि माझं जसं कधी जमलं नाही तसंच शास्त्रीय संगीत आणि माझं कधी जमेल असं वाटत नाही. अर्थात मी शास्त्रीय संगीत मुळापासून जाणून घ्यायचा प्रयत्न कधी केला नाही ही माझी चूक आहे. पण सध्या तरी तेव्हढा वेळ आणि सवड नाही हे खरं . मास्तर कृष्णराव हे नाव ऐकलेलं असलं तरी त्यांच्याविषयी फार माहिती मला असण्याचं त्यामुळे काही कारण नाही. लीना पाटणकर ह्यांच्या लेखाने ती ओळख यथास्थित करून दिली. गरीब घरात जन्मूनही पुढे आयुष्याचं सोनं करणाऱ्या अश्या व्यक्तींबद्दल वाचलं की हे सगळं योगायोगाने घडतं का पूर्वनियोजित असतं हा नेहमीच प्रश्न पडतोच. 'कीचकवध' चित्रपटातलं 'धुंद मधुमती रात रे' हे माझं ऑल टाईम फेव्हरेट गाणं ह्याच मास्टर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलं आहे हे वाचून तर मी उडालेच. ह्या गाण्याचा संगीतकार कोण हा विचारच मी कधी  केला नव्हता.

हंसा वाडकर ह्यांच्याबद्दल जसं ऐकलंय, कुठेकुठे थोडंफार वाचलंय तसंच देविकाराणी ह्यांच्याबद्दलही त्रोटक माहिती मला होती. पूर्वीच्या काळी सौंदर्यवती वगैरे गणल्या जाणाऱ्या अभिनेत्री मला बऱ्याच वेळा अजिबात सुंदर वाटलेल्या नाहीत. उदा. लीला नायडू किंवा सुरेय्या. पण हंसा वाडकर आणि देविकाराणी दोघींचे फोटो पाहून त्या आजकालच्या काही नट्यापेक्षाही अधिक सुंदर असतील असं वाटून गेलं. निदान देविकाराणी ह्यांचं उत्तर आयुष्य तरी सुखात गेलं हे वाटून बरं वाटलं. हा लेख थोडा त्रोटक वाटलं. अजून वाचायला आवडलं असतं. 

ह्या दोघींच्या मानाने अभिनेत्री नंदा माझ्या अधिक परिचयाची. तिचे गुमनाम, कानून, द ट्रेन, इत्तेफाक, धूल का फूल हे चित्रपट पाहिले आहेत. आईच्या लहानपणची तिची एक मैत्रीण नंदाची चुलतबहीण होती तेव्हा आई तिच्या घरी एकदा नंदाला भेटली होती हे तिच्याकडून ऐकलंय. त्यामुळे तिच्यावर लिहिलेला प्रकाश चांदे ह्यांचा 'चिरतरुण बेबी' हा लेख उत्सुकतेने वाचला. नंदाने मराठी चित्रपटात काम केलं आहे ह्याची मला अजिबात माहिती नव्हती. मला तर ती थेट हिंदी चित्रपटात आली असंच वाटायचं. 

'चित्रकला' हा मला न जमणारा आणखी एक प्रकार. विशेषतः ती abstract paintings तर अजिबात समजत नाहीत. त्यामुळे 'सुझा' हे नाव कुठेकुठे वाचलेलं असलं तरी एक चित्रकार ह्यापलीकडे मला त्यांच्याविषयी फार माहिती नव्हती. त्यांच्यावर राजेंद्र पाटील ह्यंनी लिहिलेल्या लेखातून ती ओळख झाली. पण हा लेखही फारसा कळला नाही. आणि त्यांची लेखात दिलेली चित्रं पाहून हा आपला प्रांत नव्हे ही खात्री झाली :-)

स्टॅम्प्स, नाणी वगैरे जमवायचा छंद वाचून ठाऊक आहे. मी स्वतः सुद्धा विविध चित्रं असलेली नाणी जमवते. भारतात अशी नाणी मिळायची संधी कमीच आहे. एकुणात फक्त चलन म्हणून नाणी वापरायची हा आपल्या इथला खाक्या. जाने दो. तर सांगायचं मुद्दा हा की फक्त शिपच्या काडेपेट्या पाहून सवय असलेल्या मला काडेपेट्यांवरही वेगवेगळी चित्रं असतात हे वाचून धक्काच बसला. नाही म्हणायला लॉकडाऊनच्या काळात शिपची काडेपेटी मिळाली नव्हती तेव्हा दुसरी कुठलीतरी आणली होती (ती पेटेल की नाही ही शंका मनात घेऊन!). रविप्रकाश कुलकर्णी ह्यांचा 'काडेपेटीवरच्या चित्रांची वेगळी कहाणी' हा लेख खूप मनोरंजक माहिती देतो. सुलोचना उर्फ रुबी मायर्स (ह्यांच्याबद्दलही फक्त ऐकून-वाचूनच आहे) ह्यांची छबीही काडेपेटीवर असायची. त्याचा लेखकाने सांगितलेला किस्सा वाचण्याजोगाच. 

'रंगातून जग पाहणारा चित्रकार' हे प्रशांत कुलकर्णी ह्यांच्या लेखाचं शीर्षक वाचून म्हटलं हाही लेख डोक्यावरून जाणार. पण ख्रिस्तोफ निमनच्या (ह्याचं नाव मात्र मी आजवर ऐकलेलं नव्हतं!) चित्रकलेतलं ओ की ठो कळत नसणाऱ्या लोकांनाही सहजगत्या समजू शकणाऱ्या अफलातून चित्रांची त्यांनी सुरेख ओळख करून दिली आहे. आजवर आपण ह्याचं नाव कसं ऐकलं नाही ह्याचंच आश्चर्य मला लेख वाचून संपला तरी वाटत राहिलं. 

'केनेडींच्या हत्येमागील विलक्षण ताणेबाणे' हा दीपक करंजीकर ह्यांचा लेख अमेरिकी इतिहासातल्या एका महत्त्वाच्या घटनेवर आहे. पण तो विषयाला न्याय देत नाही. ह्या घटनेबाबत ज्या conspiracy theories आहेत त्यांचा व्यवस्थित उहापोह अपेक्षित होता. पण लेखकाने काही थिअरीजना उदा. अमेरिकी परराष्ट्र धोरण खूप जास्त महत्त्व दिलं आहे. बाकी थिअरीज थोडक्यात आटपल्या आहेत. असं करण्यामागचं कारण स्पष्ट होत नाही. त्यामुळे लेखही खूप विस्कळीत वाटतो. 

जंगल आणि पर्वत ह्यांच्यावर खास प्रेम असलेल्या मला सुरेशचंद्र वारघडे ह्यांचा 'अरण्यजीवन' हा लेखही खूप आवडला. लेखातले फोटोही सुरेख आहेत. हिंदी साहित्यातल्या कुमार अंबुज ह्यांच्या 'मंदिर-चौक' ह्या कथेचा मधुकर धर्मापुरीकर ह्यांची केलेला अनुवाद आवडला. निदान हिंदी साहित्य तरी वाचायला सुरुवात करायला हवी हे पुन्हा एकदा जाणवलं. त्यामानाने 'पेस्ट्री दुकानातली चोरी'  ही अनुवादित कथा फारशी आवडली नाही. 

वसंत देशमुख ह्यांचा गुप्तचर खात्यातल्या अनुभवांवरचा लेख, डॉ. स. गं मालशे आणि कच्छच्या लोककला संगीतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धनबाई कारा ह्यांची ओळख करून देणारे लेख वाचनीय. 

कवितांचा विभाग 'पाहू काही समजतात का?' हा पूर्वग्रह मनात घेऊन वाचला. त्यातल्या काही कळल्या. काही कळल्या नाहीत. पण विशेष आवडलेल्या कविता म्हणजे एक कौटुंबिक कविता (अलका गांधी असेरकर) आणि घुसमट (मंदाकिनी पाटील). 

'पाकनिर्णय' मधल्या वाळवणाचे पदार्थ, सूप्स आणि आईसक्रीम ह्या विभागातले पदार्थ वेगळे वाटले. 

एकंदरीत ह्या वर्षीपासून कालनिर्णयचा दिवाळी अंकसुद्धा विकत घेणार हे नक्की. 

Saturday, January 21, 2023

 I spent the last week of 2022 out of the city. It felt good to see the concrete landscape gradually give way to greenery nearby and the mountains from the Sahyadri ranges in the distance. In the mornings I stepped out to take long walks past the sleepy little villages.

It is difficult to put into words what you feel when you see an empty road, intermittently hemmed in by fields or grassy expanse, stretching out far in the distance. You can hear birds chirping about in the trees. Occasionally, you pass cattle munching on the leaves contentedly. For a city person like me, it is a wonder to hear the sound that a solitary leave makes while falling on the road. Or the rustling of the wind in the trees. I never knew that the leaves can be of such different shapes. It is a delight to see the patterns that the sun's rays make as they filter through the treetops. Or to suddenly come across a burst of tiny blue flowers in full bloom by the roadside.

You can see giant spiders waiting patiently in the middle of the web spun across tree branches. If you are lucky, you can spot a snake slither away in a thicket. I have seen this only once and was so thrilled that I could not stop talking about it the whole day.

This road is my favorite hangout. Every time I go for a walk I discover something new. I never tire of it. And when I return to the city, I see it in my dreams as I fall asleep in the night.