Wednesday, December 29, 2021

३. माझा (दिवाळी अंक २०२१) (किंमत १५० रुपये)

 'एबीपी माझा' हे एक न्यूज चॅनेल आहे हे माहीत होतं. पण त्यांचा दिवाळी अंक असतो हे माहीतच नव्हतं. त्या उत्सुकतेपोटी उचलून पाहिला तेव्हा लक्षात आलं की हा त्यांचा पहिलाच दिवाळी अंक आहे. कुठल्याही दिवाळी अंकांचा अगदी पहिला इश्यू वाचायची माझी ही पहिलीच वेळ :-) अनुक्रमणिका चाळली तेव्हा लेख इंटरेस्टींग वाटले म्हणून विकत घेतला. म्हटलं आवडला तर पुढल्या वर्षीही  घेऊ. न आवडला तर १५० रुपये गंगार्पण.

प्रामाणिकपणे सांगायचं तर पहिलाच लेख - नागराज मंजुळे ह्यांचा अमिताभवर लिहिलेला - मला फारसा आवडला नाही. अर्थात to be fair, त्यामागे मला मुळात कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीबद्दल 'fan' म्हणावं एव्हढं आकर्षण कधीच नव्हतं हे कारणही असेल. "माणसासारखी माणसं ती" हे माझं एकूणच मत. त्यातून 'मला अभिनयातलं फारसं कळत नाही' हे मान्य करूनही मी असं म्हणेन की बच्चनचा अभिनय मला बराचसा एकसुरी वाटत आलेला आहे.  त्यामुळे हा लेख मी वाचला आणि सोडून दिला.

त्यामानाने 'महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग' हा टीम एबीपी माझाने नागपूर ते मुंबई समृद्धीचा महामार्गावर लिहिलेला लेख आणि 'उद्याच्या महाराष्ट्रासाठी' ही  सरिता कौशिक हयांनी घेतलेली नितीन गडकरींची मुलाखत दोन्ही मला अधिक भावले. पैकी गडकरी हे बीजेपीचे असले तरी मला त्यांच्याबद्दल कौतुक आहे. 'मी बरा आणि माझं काम बरं' ही त्यांची वृत्ती मला फार आवडते. कधी कोणाबद्दल वादग्रस्त विधान नाही, राणा भीमदेवी घोषणा नाहीत की 'आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटे' छाप आरोप नाहीत. ह्या छोटेखानी लेखातही त्यांच्या ह्या स्वभावाचं प्रतिबिंब पडतंच. 'भाडिपा' हे नाव वाचून आधी मी बरीच दचकले होते. पण नंतर मात्र हे युट्युब चॅनेल माझं आवडीचं झालं - विशेषत: Inside Someone's House आणि 'आई आणि मी' हे दोन चॅनेल्स. त्यामुळे ह्या चॅनेलच्या जन्माविषयीचा ओंकार जाधव ह्यांचा लेख फार आवडला.

'अस्वस्थता @ 75' हा सुहास पळशीकर ह्यांनी लिहिलेला लेख भारताच्या ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याची परखड मीमांसा करतो. लेखाच्या सुरुवातीला 'भारत माझा देश आहे' ही प्रतिज्ञा लिहिलेल्या फोटोला घातलेला हार आणि समोर लावलेल्या उदबत्त्या देशाच्या आजच्या स्थितीवर अचूक भाष्य करतात. ह्या फोटोची कल्पना ज्याची / जिची त्या व्यक्तीला माझा सलाम. भारताच्या आत्म्यासाठीची लढाई आपण अजून लढतोय हे हा लेख वाचून पुन्हा एकदा प्रकर्षांने जाणवलं. 

हिंदी चित्रपटसृष्टीतून करियरला सुरुवात करणाऱ्या मयुरी कांगोने गुगल जॉईन केलं तेव्हा इतरांसोबत मलाही आश्चर्य वाटलं होतं. कारण आजवरचा इतिहास पहाता ३-४ चित्रपटात काम करायचं आणि मग एखाद्या बिझनेसमन अथवा एनआरआयशी लग्न करून परदेशात स्थायिक व्हायचं अशी ही नायिकांची मळलेली वाट होती. ती  सोडून ही करियर वुमन झाली म्हणून तिचं कौतुकही वाटलं होतं. 'Bollywood ते Google' ह्या लेखात तिच्या ह्या प्रवासाबद्दल वाचायला मिळेल असं वाटलं होतं. पण तिने जास्त करून इंटरनेटचा वापर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संधी ह्यावर लिहिल्याने थोडा भ्रमनिरास झाला. 

चित्रपट आणि नाटक हे आवडीचे विषय असल्याने 'मातीतल्या गोष्टींचा सिनेमा' हा चैतन्य ताम्हाणेचा लेख आवडला. 'वाडा चिरेबंदी 'पाहिलं होतं आणि आवडलंही होतं. त्याचे पुढले २ भाग झेपतील की नाही ह्याची खात्री नसल्याने पाहिले नाहीत. तेव्हा 'वाड्यात माझं आतडं गुंतलंय' हा वाडा trilogy चे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हयांनी लिहिलेला लेखही प्रचंड आवडला. पुढेमागे 'त्रिनाट्यधारा' झालीच तर बघणार हे नक्की. मग पुढले काही दिवस डोक्याला भुंगा लागला तरी चालेल. 

'संवेदनांच्या मुळाशी' विभागात हृषीकेश जोशी, वैभव मांगले, वैभव तत्त्ववादी आणि संकर्षण कर्हाडे ह्या चौघांच्या जन्मगाव ते मुंबईत येऊन कलाकार होण्याच्या प्रवासावरचे लेख समाविष्ट आहेत. पैकी हृषीकेश जोशी सोडल्यास बाकीचे तिघे कोण आहेत हे ठाऊक होतं. एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून एखाद्याला घडवण्यात माणसाचे बालपणीचे अनुभव किती मोलाची कामगिरी बजावतात हे पुन्हा एकदा जाणवलं. हे सगळे मुंबईबाहेरून आलेले असल्याने त्यांची मुंबईबद्दलची निरीक्षणं वाचून मुंबईतच जन्माला येऊन लहानाची मोठी झालेल्या मला खूप मजा वाटली. 

'सहा खंडांत दोन ध्रुवांवर' हा विक्रम पोतदार ह्यांच्या wildlife photography ची माहीती देणारा लेख, 'विषमतेचे राजकारण' हा पी. साईनाथ ह्यांचा १९९१ मध्ये भारतात झालेल्या जागतिकीकरणाच्या यशापयशाची चिकित्सा करणारा लेख, आल्बर्ट आईनस्टाईनच्या खाजगी आयुष्यावर लिहिलेला निरंजन घाटे ह्यांचा लेख,  आणि 'अन्नपूर्णा प्रसन्न' हा पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी 'अन्नपूर्णा - १' ह्या शिखरावर केलेल्या यशस्वी चढाईवरचा लेख वेगळीच माहिती देऊन गेले. 

लोकसत्ता दिवाळी अंकावरच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे कविता हा माझा प्रांत नव्हे. त्यामुळे त्या सेक्शनला माझा पास. कथांचीही तीच गत. 'परत आल्यावर' ही सानिया ह्यांची कथा फारशी आवडली नाही. प्रवीण बांदेकर गेले वर्षभर लोकसत्ताच्या वीकएन्ड पुरवणीत जे सादर लिहीत होते ते फार आवडलं होतं त्यामानाने त्यांची 'शतखंडित' ही कथा कळलीही नाही आणि त्यामुळे आवडलीही नाही. 'हॅपी बर्थडे' ही  राजीव तांबेंची कथा सुखांत केली नसती तर भयकथा म्हणून अधिक परिणामकारक झाली असती असं वाटून गेलं. 

एकुणात काय तर पुढल्या वर्षी घ्यायच्या अंकांच्या यादीत माझाचा अंक नक्की असेल.

२. लोकसत्ता (दिवाळी अंक २०२१) (किंमत १५० रुपये)

 खरं सांगायचं तर ह्या अंकाची नुसती अनुक्रमणिका पाहूनच पोट भरलं. विशेषतः 'चिनी कम्युनिस्ट पक्षशताब्दी: परिचर्चा' ह्या सेक्शनमध्ये असलेली लेखांची यादी वाचली तेव्हा मनोरंजक नव्हे तर ज्ञानप्रबोधन करणारं काहीतरी वाचायला मिळणार ह्याची खात्री झाली. पण कुठलंही पुस्तक सुरुवातीपासून वाचायचं हा शिरस्ता असल्याने आधीचे दोन लेख वाचणं क्रमप्राप्तच होतं. 

अंकाची सुरुवात प्रसिद्ध मराठी लेखक अनिल बर्वे ह्यांच्यावर दिलीप माजगावकरानी लिहिलेल्या लेखाने झालेली आहे. अनिल बर्वेच्या 'थँक यू मिस्टर ग्लाड' चा काही भाग शाळेत असताना वाचल्याचं अंधुक स्मरतंय. त्यापलीकडे त्यांच्या 'डोंगर म्हातारा झाला' , 'अकरा कोटी गेलन पाणी' वगैरे कादंबरयाबद्दल नुसतं माहीत आहे. वाचायचा योग अजून आला नाही. पुन्हा लायब्ररी जॉईन करेन तेव्हा तिथे आहेत का पहाते. लेख वाचनीय आहे. काही उल्लेख टाळता आले असते पण कदाचित ते अपरिहार्य असावेत. असो. ह्यापुढला लेखाचं 'निर्मिती शोनार बांगलाची' हे शीर्षक आणि कुमार केतकर हे नाव वाचून बांगला देशाच्या निर्मितीला यंदा ५० वर्ष झाल्या निमित्ताने त्याबद्दल सविस्तर काही वाचायला मिळेल असं वाटलं होतं. पण थोडी निराशाच पदरी आली. बहुतेक भाग एका पत्रकाराच्या चष्म्यातून लिहिलेला असल्याने प्रत्यक्ष ऐतिहासिक घटनांवर कमी लिहिलंय. अर्थात जे लिहिलंय तेही ह्याआधी कधी वाचलं नसल्याने लेख आवडला. शीर्षक थोडं misleading होतं एव्हढंच. 

त्यामानाने 'चिनी कम्युनिस्ट पक्षशताब्दी: परिचर्चा' ह्या सेक्शनमधले सर्व लेख खूप नवी माहिती देऊन गेले. मला आवडलेले दोन लेख म्हणजे Mao Zedong, Deng Xiaoping पासून थेट Xi Jinping पर्यंतच्या राजकीय नेत्यांच्या कारकिर्दीची आणि त्यांच्या विचारसरणीची मीमांसा करणारा सुधींद्र कुलकर्णी ह्यांचा आणि चीनच्या आजवरच्या इतिहासाचा आढावा घेत त्याचा आजचा चीन घडण्यात कसा हातभार लागला त्याची चिकित्सा करणारा अजित अभ्यंकर ह्यांचा लेख. 

पी . जी. वुडहाऊस हा माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक . त्याच्या 'Indian Summer of an Uncle' ह्या कथेचा शांता गोखले हयांनी फार सुरेख अनुवाद केलाय. इतका सुरेख की आता मूळ इंग्रजी कथाही वाचावीशी वाटत नाही. :-)

कविता आणि माझं कधी फारसं जमलं नाही. त्यामुळे 'करोनाकाळाच्या कविता' हा विभाग मी नुसता चाळला. 

कवितेप्रमाणेच अंकातल्या कथा हाही माझा फारसा आवडता भाग नव्हे. तरी ह्या अंकातली 'बाऊजी आ रहे है' ही राजरत्न भोजने ह्यांची कथा मनाला भिडली. शहरात लॉकडाऊन झाल्यावर पोराबाळांना अंगाखांद्यावर घेत उपाशीतापाशी हजारो किलोमीटर दूर असलेल्या मुलुखाकडे चालत निघालेले मजूर पाहून ज्यांच्या हृदयात कालवाकालव झाली त्या कोणालाही ही कथा वाचून असंच वाटेल. 

चार्ली चॅप्लिनच्या 'द किड' ह्या चित्रपटाला १०० वर्ष झाल्यानिमित्ताने लिहिलेला विजय पाडळकर ह्यांचा 'हसू आणि आसू', प्रसिद्ध राजस्थानी लेखक विजयदान देठा ह्यांच्यावर लिहिलेला आसाराम लोमटे ह्यांचा 'वाळवंटात उमललेलं फूल', दर मैलागणिक भाषा आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलणाऱ्या आपल्या देशात pan-Indian सिनेमा होऊ शकतो का ह्याची मींमासा करणारा अमोल उदगीरकर ह्यांचा 'मृगजळ की वास्तव?', संजय नार्वेकरचा 'स्ट्रगल फॉर द बेस्ट', बीसीजी लसीच्या शोधावरचा डॉ. प्रदीप आवटे ह्यांचा 'वैद्यक पसायदानाची कहाणी' आणि १९९० नंतरच्या मराठी रंगभूमीवरील नाटकांवरचा अतुल पेठेंचा 'नव्वदोत्तरी नाटके आणि आज' हे सर्व लेख अतिशय वाचनीय. 

प्रशांत कुलकर्णीची 'मॉडर्न पालक इन एनिमलफार्म' मधली व्यंगचित्रं आवडली. 

Sunday, November 28, 2021

१. लोकप्रभा (दिवाळी अंक २०२१) (किंमत ५० रुपये)

 ह्या वर्षी दिवाळीच्या आधीच मॅजेस्टिकमध्ये चक्कर टाकून अंकांची चवड घेऊन आले. ऐन दिवाळीत तिथलया गर्दीत शिरून करोनाचा प्रसाद घेऊन यायची माझी इच्छा नव्हती :-)

खरं तर लोकप्रभाचा अंक वाचून काही आठवडे झालेत. आज लिहू उद्या लिहू म्हणत म्हणत लिहायचा मुहूर्त काही लागत नव्हता. शेवटी आज लागला. पण गोची अशी आहे की काही लेख नेमके कश्याबद्दल होते तेच मुळात आठवत नाही. उदा. विनायक परब ह्यांचा अगदी पहिला लेख 'व्वा! चितारताना'. कोल्हापूर परंपरेतले प्रसिद्ध चित्रकार, त्यांची पेंटिंग्ज, शैली आदिवर ह्यात माहिती होती एव्हढं आठवतंय. पण चित्रकलेचं आणि माझं सूत कधी जुळलंच नसल्याने असेल कदाचित पण ह्या लेखात भरपूर माहिती असूनही फार काही लक्षात राहिलेलं नाही. अर्थात हा दोष सर्वस्वी माझाच. 

एव्हढ्या तेव्हढ्या कारणाने भावना दुखावलया जाण्याच्या ह्या काळात शमिका वृषाली ह्यांचा 'शृंगारप्रेमी महाराष्ट्र' हा लेख तथाकथित संस्कृतीरक्षकांना फेफरं, झीट वगैरे सर्व काही आणेल असाच. महाराष्ट्रातला समाज ह्याबाबतीत किती मोकळाढाकळा होता हे वाचून आश्चर्य तर वाटतंच पण खेदही वाटतो. हा मोकळेपणा लोप पावल्याने तर आजकाल स्त्रियांशी निगडित गुन्हयांत वाढ होत नसेल ना हा प्रश्न मनात डोकावल्याशिवाय राहात नाही. 'प्रतिकारशक्तीची खाण' हा डॉ. अंजली कुलकर्णी ह्यांचा मानवी शरीराच्या आश्रयाने राहणाऱ्या सूक्ष्म जीवांवरचा लेख उद्बोधक. "पन्नालाल घोष" हे नाव मी फक्त ऐकून होते. पण त्यांनी केलेल्या कामाचं उत्तम दस्तावेजीकरण करण्यासाठी काय भगीरथ प्रयत्न करावे लागले ह्यावरचा विश्वास कुलकर्णी ह्यांचा लेख खिन्न करून गेला. आपल्याकडे कुठल्याही वारश्याचं जतन करण्याबाबत भयानक अनास्था आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. संस्कृती, इतिहास वगैरे गोष्टी निवडणूक जिंकण्यापुरत्या वापरायच्या. बाकी त्याचं जतन वगैरे करायचं तर फार मेहनत लागते. ती करतो कोण?

अफगाणिस्तानमधून अमेरिकी फौजा बाहेर पडल्या तेव्हा आलेल्या अनेक लेखांपैकी कुठल्याश्या लेखात 'बचा पोष' बद्द्ल वाचल्याचं आठवतंय. ज्या घरात मुलगा नाही तिथे मुलीलाच मुलाचा पोशाख देऊन मुलासारखं वाढवायची ही प्रथा. पण त्याला असलेले अनेक कंगोरे 'बचा पोष' ही प्राजक्ता पाडगांवकर ह्यांची छोटेखानी कथा उलगडते. त्या मानाने 'लिव्ह इन' ही सरिता बांदेकर ह्यांची कथा अगदी बेतलेली आणि अतिशयोक्तीपूर्ण वाटली. 'तुम्हां कोण म्हणे दुर्बळ बिचारे' ही डॉ. संजीव कुलकर्णी ह्यांची कथा एकेकाळी कपोलकल्पित वाटली असती. पण सध्याच्या काळात मात्र ती अशक्य वाटत नाही. आपण निसर्गातले सगळ्यात बुद्धिमान प्राणी हा माणसाचा अहंकार एव्हढ्याश्या करोनाने उतरवला आहेच. त्यातूनही आपण शिकलो नाही तर इतर जीवही आपल्याला धक्का देऊ शकतील ह्यात वादाचा मुद्दा नाही. 

'यक्षनगरीतली शृंगारपुरे' हा आशुतोष उकिडवे ह्यांचा देशोदेशींच्या निवासी हॉटेल्सवरचा आणि 'गुहाघरे' हा संदीप नलावडे ह्यांचा अजूनही आदिमानवाप्रमाणे गुहेत राहाणाऱ्या लोकांविषयीचा दोन्ही लेख मनोरंजक. प्रवासवर्णनांचा खजिना (मकरंद जोशी), 'छू मंतर' (उज्ज्वला दळवी) आणि रमे तेथे मन  (विजया जांगळे) माहितीपूर्ण. 

Sunday, April 4, 2021

८. लोकमत दीपोत्सव (दिवाळी अंक २०२०)

दर दिवाळीला नुसते निखळ मनोरंजन करणारे नाही तर त्यातून काही शिकवून जाणारे, विचार करायला प्रवृत्त करणारे, वेळ सत्कारणी लागल्याचं समाधान देणारे अंक निवडण्याकडे माझा आजकाल कल असतो. कदाचित वर्षभरात जे जमलं नाही ते दिवाळीनंतरच्या काही दिवसांत साध्य करावं असा हेतू असेल त्यात कदाचित. पण लोकसत्ता, भवताल, किल्ला, दुर्ग, दुर्गांच्या देशातून ह्या अंकांनी गेली कित्येक वर्षं माझा हा विश्वास सार्थ ठरवला. ह्याच पठडीतला आणखी एक अंक म्हणजे लोकमतचा दीपोत्सव. त्यांची टीम दरवर्षी भारताच्या कानाकोपर्‍यांत फिरून वेगवेगळ्या विषयांवरचे रिपोर्ताज वाचकांसमोर ठेवते. पण २०२० मध्ये करोनाच्या कहरामुळे प्रवासावर तर बंदी. मग ह्या टीमने दिवाळी अंकात काय दिलं असावं ही उत्सुकता आणि आपली निराशा तर होणार नाही ना ही धाकधूक ह्यामुळे हा अंक जवळपास सगळ्यात शेवटी वाचायला घेतला. अनुक्रमणिका पाहिली आणि जीव भांड्यात पडला. पुढले काही दिवस मेंदूला खुराक मिळणार ह्याची खात्री पटली.

पहिला लेख प्रोफेसर अभिजित बॅनर्जी ह्यांचा. अर्थशास्त्रातलं नोबेल मिळवलेल्या ह्या व्यक्तीबद्दल कुतूहल. तसा हा विषय इंटरेस्टींग वाटला, बिझनेस स्कूलमध्ये मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमीक्सचा परिचय झाला असला तरी ह्या विषयाचं सखोल ज्ञान मला नाही.  पण 'गरिबी आणि गरीब' हा विषय कोणीतरी सखोल अभ्यास करायला घेतंय ह्याचं आधी आश्चर्य वाटलं. ह्यात काय बुवा संशोधन करणार हे? गरिबी हटाव हा आधीच्या सरकारचा आणि आत्मनिर्भर भारत हा आताच्या सरकारचा ह्या दोन घोषणांत फरक असेल तर तो फक्त शब्दांचा. बाकी बदल काही नाही. हे सत्य अंगवळणी पडलेलं. पण तरी नेटाने लेख वाचायला लागले आणि तो पूर्ण वाचल्याखेरीज हलले देखील नाही. गरीब लोक खायचे वांदे असताना एव्हढी पोरं जन्माला का घालतात? कर्ज घेऊन सणवार का साजरे करतात? त्यांना पैसे दिले तर त्याचा त्यांना उपयोग होतो का? असले टिपिकल भारतीय मध्यमवर्गी प्रश्न इथे अभ्यासाला घेतले गेले आणि त्यांची कधी अपेक्षित तर कधी पूर्णपणे थक्क करणारी उत्तरंही मिळाली. एक अप्रतिम लेख. ह्याबद्दल टीम दीपोत्सवचं मनापासून कौतुक. अंकाची किंमत ह्या एकाच लेखात पूर्ण वसूल झाली. अभिजित बॅनर्जीची पुस्तकं असतील तर मिळवून वाचायला हवी हेही ठरवलंय.

ह्यापुढला अतिशय आवडलेला लेख म्हणजे जगप्रसिध्द छायाचित्रकार केकी मूस ह्यांच्यावर लिहिलेला दिलीप कुलकर्णी ह्यांचा 'सहोदर'. केकी मूस ह्या अवलियाबद्दल, त्यांच्या चाळीसगावातल्या एकांतवासाबद्दल, कधीकाळी 'मी कलकत्ता मेलने चाळीसगावला येईन' असं वचन दिलेल्या प्रेयसीची वाट पहाण्याबद्दल, त्याच असोशीने चाळीसगावच्या रेलवे स्टेशनवर अनेक वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या आपल्या मालकाची शेवटच्या श्वासापर्यंत डोळ्यांत प्राण आणून वाट पहाणार्‍या त्यांच्या डॉनी नावाच्या कुत्र्याबद्दल आधी कुठल्याश्या लेखात वाचल्याचं अंधुक स्मरत होतं. ह्या लेखाने पूर्ण कथा समजली. टेबलटॉप फोटोग्राफीबद्दल प्रथमच ऐकलं. ह्या लेखाने एक अनामिक हुरहूर मात्र लावली. केकींची मैत्रिण का परत येऊ शकली नाही? तिने पाठवलेल्या (आणि केकींनी कधीही न उघडलेल्या) पत्रांत काय लिहिलं होतं? डॉनीचा मालक कुत्र्याला घ्यायला कधीच का आला नाही? अनेक अनुत्तरित प्रश्न. 

करोनाबद्दल वाचून आणि ऐकून एव्हढा वैताग आलाय की मृदुला बेळेंच्या लेखाचं 'व्हायरस' हे नाव आणि त्यासोबतचा करोनाचा फोटो पाहून 'हे नको वाचायला' असंच आधी वाटलं. पण तो वाचला हे बरं केलं कारण व्हायरसच्या जगाबद्द्ल छान माहिती मिळाली त्यातून. वैशाली करमरकर ह्यांचा 'चीन-चकवा' हा आपल्या विश्वासघातकी शेजार्‍याबद्दल बरीच माहिती देतो. नेहरूंच्या भोळेपणामुळे चीनने आक्रमण केलं असं म्हणत दात काढ्णार्या भाजपालाही त्यांनी हिसका दाखवलाच तेव्हा ह्या लेखाचं भाषांतर करून एखाद्या भक्ताने दिल्लीला पाठवायला हरकत नाही.चीनवरचाच मिथिला फडके ह्यांचा 'चाबुदुओ' चीनची एक वेगळी बाजू दाखवून जातो. 

भारतात येऊन संगीतसाधना करण्यासाठी जीवाचं रान करणार्‍या परदेशी माणसांबद्दल वन्दना अत्रेंनी 'तेरे कारन सब रंग त्यागा' मध्ये लिहिलंय. ह्यात पाकिस्तानातली पहिली महिला ध्रुपद गायिका म्हणून प्रसिध्दीला आलेली अलिया रशीद आहे, मलेशियात जन्माला येऊन तब्बल चार वर्षं डी.के. पट्टामल (ह्या कोण आहेत हे मला माहित नव्हतं हे कबूल करायला खरंच लाज वाटते) ह्यांच्याकडे कर्नाटक संगीट शिकणारा चोंग च्यू सेन आहे, जर्मनीहून भारतात रुद्रवीणा शिकायला आलेला आणि ती आता इथे बनत नाही हे कळताच पैसे आणि वेळ खर्चून ती स्वतःच बनवून घेणारा जर्मनीचा कर्स्टन विके आहे आणि पंडित निखिल बॅनर्जी आणि अन्नपूर्णा देवी ह्यांचं शिष्यत्त्व लाभलेला ऑस्ट्रीयाचा डॅनियल ब्रॅडली आहे. पिकतं तिथे विकत नाही हेच खरं. रुद्रवीणा बनवणारे कलाकार ह्या कलेला मोल नाही म्हणून ती बनवण्याचं बंद करतात आणि ह्या महाकाय देशात त्याविषयी काही खंत वा खेद नाही ह्याचं कर्स्टन विकेला आश्चर्य वाटतं. पण ह्या देशातल्या बर्‍याचश्या लोकांना आधी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आणि ती नसलेल्यांना ह्याविषयी कधी काही शिकवलंच न गेल्याने माहिती नाही. मुठीतलं निसटून गेल्यावरच जाग यावी हे आपल्या प्राक्तनातच लिहिलं असेल तर त्याला कोण काय करणार? भारतीय नाही तर नाही पण हे परदेशी कलाकार तरी हे शिकून गेले ह्यातच समाधान मानायचं.

कामाचा भाग म्हणून झोहोच्या सीआरएमचा अभ्यास काही महिन्यांपूर्वीच केला होता. त्यामुळे 'झोहो' ह्या नावाचा मुक्ता चैतन्य ह्यांचा लेख पाहून चक्रावले. ह्या शब्दाला काही वेगळा अर्थ आहे की काय? झेन वगैरे सारखा. तर नाही. हा लेख झोहो कंपनी तामीळनाडूतल्या एका खेडयात राहून तिचा गाडा हाकणारे तिचे संस्थापक श्रीधर वेंबू ह्यांच्यावर आहे. वीज आणि इंटरनेट कनेक्शन असलं की आयटीचं काम कुठूनही करता येतं. त्यासाठी मोठ्या शहरांच्या गर्दीत घुसमटायची काहीएक गरज नाही हे स्वतः करून पाहणार्या आणि ते करून पाहण्यासाठी आपल्या सहकार्‍यांना प्रोत्साहित करणार्या माणसाबद्दल मला आदर वाटला. हा असा विश्वास टाकायला खूप हिंमत लागते. ती फार थोड्या संस्थापकांकडे असते ते आजकालच्या वर्क फ्रॉम होम काळात आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल. ह्याच विषयाला धरुन 'स्लो लिव्हिंग' ह्या संकल्पनेवरचा मेघना ढोके ह्यांचा लेखही वाचनीय आहे. 

मागच्या वर्षी अचानक जाहिर झालेला लॉकडाऊन आणि परप्रांतीय मजूरांची झालेली ससेहोलपट न विसरता येण्याजोगी. अर्थात सरकारच्या कोणत्याही निर्णयाचं आंधळं समर्थन हा तुमचा एककलमी कार्यक्रम नसेल तर. असो. त्यामुळे अंकाच्या शेवटी ह्या विषयावरचे २-३ लेख पाहिले तेव्हा वाचू का नको असं झालं. आणखी शोकांतिका वाचायची ताकद आता नाही. पण न वाचताही राहवेना. 'काली बस्ती' हा रवींद्र राऊळ ह्यांचा मोठ्या शहरात उत्तर प्रदेश-बिहार मधून आलेल्या मजुरांच्या वस्त्यांवरचा, 'पुरुष नसलेली गावं' हा सुधाकर ओलवे ह्यांचा ह्या मजूरांच्या मूळ गावांतल्या स्थितीवरचा आणि मयुरेश भडसावळे ह्यांचा 'लिट्टी चोखा' हा ह्या स्थलांतरामागचे अनेक पदर उलगडून दाखवणारा असे ३ लेख अगदी वाचनीय. 'हम ये करेंगे', 'हम वो करेंगे' वगैरे हात उंचावून भक्तांच्या टाळ्यांच्या गजरात जाहिर करणार्‍या योगी वगैरे लोकांच्या घोषणा किती पोकळ आहेत, वास्तव किती भयानक आहे आणि त्यापासून तुम्हाआम्हासारखे सुखवस्तू लोक किती योजनं दूर आहेत हे खरंच समजावून घ्यायचं असेल तर हे लेख वाचायला हवेत. नाहीतर नुसती 'मन की बात' आहेच की ऐकून माना डोलावण्यासाठी.

अंकातल्या बाकी लेखांत उस्ताद झाकीर हुसेन ह्यांचा 'चिला कतना' आणि पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटच्या पुनावाला फॅमिलीवरचा सुकृत करंदीकर ह्यांचा 'इथे बनणार आहे लस' ह्या दोन लेखांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.

संपूर्ण जग करोनाने ठप्प केलं असताना आणि प्रवासावर बंदी असताना अंकाच्या मजकूराच्या दर्जात जराही उणीव पडू न देण्याचं शिवधनुष्य पेलल्याबद्दल टीम दीपोत्सवचं कौतुक आणि आभार :-)


Saturday, March 27, 2021

७. किल्ला (दिवाळी अंक २०२०)

 मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकांतसुध्दा मेल्या करोनाने शिरकाव केला. त्यामुळे 'किल्ला' ची प्रस्तावना वाचताना मनात धाकधूक होती. पण त्यात करोनाचा 'क' पण नसल्याचं पाहून हायसं वाटलं. एव्हढंच काय तर 'आरमार' ह्या विषयावर हा अंक आहे हे वाचून काय काय लेख आहेत हे चाळून बघायचा मोह झाला. कळवण्यास अत्यंत आनंद वाटतो की 'मराठा आरमार' ह्या विषयावर इत्यंभूत माहिती देणार्या आणि अधिक अभ्यास करण्यास मार्गदर्शक ठरतील अश्या लेखांची अगदी भरगच्च मेजवानी अंकात आहे. फक्त वाचणारे डोळे हवेत.

अंकाची सुरुवात झालेय ती 'प्राचीन भारतीय आरमार' वरच्या लेखाने. सध्याच्या काळात 'प्राचीन' आणि 'भारत' हे शब्द एकत्र वाचले की पोटात गोळा येतो. जुनं ते सगळं सोनं नसतं. तरी ते रेटून सोनं ठरवायचा आणि नसलेली झळाळी त्याला द्यायचा ट्रेंडच आलाय ना. असो. पण हा लेख अपवाद. लोथल, हरप्पा आणि सिंधुसंस्कृतीतल्या भागांतल्या उत्खननांत सापडलेल्या नौकानयन क्षेत्रातल्या गोष्टींबद्दल, तसंच मौर्य, शिलाहार राजे तसंच राजा भोज यांच्या काळातल्या आरमाराबद्दल, त्यावरच्या ग्रंथांबद्दलही ह्यात बरीच माहिती मिळते.

ह्यापुढल्या लेखांत छत्रपती शिवाजीमहाराजांचे आरमार, त्यांनी बांधलेले जलदुर्ग, ह्या जलदुर्गांवरचे तोफखाने, सरखेल कान्होजी आंग्रे, ह्या काळातली नाणी, मराठा आरमारातली विविध प्रकारची जहाजं आणि त्यांची बांधणी अश्या विविध विषयांवरची माहिती आहे. हे सगळं वाचून वाचकांना ह्या विषयावर अधिक वाचण्याचा मोह होणार हे जाणून की काय कोणास ठाऊक पण ह्या विषयावर अधिक अभ्यास कसा करावा ह्याचं मौलिक मार्गदर्शन करणारा कौस्तुभ पोंक्षेंचा 'मराठा आरमार आणि संशोधन' हा लेखही अंकात समाविष्ट आहे.  कधीकाळी वेळ मिळालाच तर मोडीचा अभ्यास नव्याने करून ह्या विषयात काही हातभार लावता येतो का ते पहायचं असा शेखचिल्ली बेत करायचा मोह मलाही झालाच :-)

आधुनिक भारतीय आरमाराची माहिती देणार्या लेखाने अंकाची सांगता झाली आणि बुध्दीला खुराक देणारं काहीतरी छान वाचल्याचं समाधान मिळालं. 

Wednesday, March 10, 2021

६. ऋतुरंग (दिवाळी अंक २०२०)

ऋतुरंगचा ह्या वर्षीचा दिवाळी अंक 'लढत' विशेषांक. त्या अनुषंगाने कला, साहित्य, राजकारण, क्रीडा अश्या अनेक क्षेत्रांतल्या मान्यवंतांच्या  आयुष्यातल्या लढ्याबद्द्ल वाचायला मिळालं. 

ह्यापैकी गुलजार, अमिताभ बच्चन, सुशीलकुमार शिंदे, अंबरिश मिश्र, आयुष्मान खुराना, रणवीर सिंग, अरिजित सिंग, तापसी पन्नू, अशोक नायगांवकर, रामदास फुटाणे ह्या मला माहित असलेल्या व्यक्ती. त्याव्यतिरिक्त गुलाबबाई संगमनेरकर, श्रीपती खंचनाळे, सुनील मेहता आदि माहित नसलेल्या व्यक्तींबद्दलही कळलं. अंकात मेलिंडा गेटस ह्यांच्या 'द मोमेंट ऑफ लिफ्ट' ह्या पुस्तकातल्या एका भागाचा अनुवाद आणि ग्रेटा थुनबई (थॉनबर्ग नव्हे म्हणे!) हिच्यावर शुभदा चौकर ह्यांनी लिहिलेला लेखही आहेत. 

मला अधिक भावलेले लेख म्हणजे अर्थात गुलजारचा 'धूप आने दो', रवी आमले ह्यांचा 'मोल हंटर आणि सुटलेली शिकार' आणि डॉ. अभय बंग ह्यांचा 'आज महात्मा गांधी असते तर'. पैकी डॉ. बंग ह्यांनी लॉकडाऊनच्या काळात मजुरांच्या झालेल्या हालाबद्दल जे काही लिहिलंय ते ह्याच अंकात 'ते चौदा दिवस' हा लेख लिहिलेल्या सुरेश प्रभू ह्यांनी नंतर का होईना वाचलं असावं अशी आशा आहे. ते वाचून स्वतःच्या लेखाच्या शेवटी 'खोटं बोला पण रेटून बोला' ह्या भाजपाच्या कार्यशैलीनुसार लिहिलेल्या 'पण आता मागे वळून पहातो तेव्हा लक्षात येतं की आपल्याकडे अगदी वेळेवर उपाययोजना करण्यात आल्या. जगातील सात ते आठ देशांशी माझा रोज संबंध येतो. माझ्याशी ते भारताच्या उपाययोजनांबद्द्ल कौतुक करतात'  ह्या वाक्यांबद्दल त्यांना काय वाटलं असेल काय माहित. जनांत नाही तरी मनात तरी आपल्या चुकांची कबूली द्यावीशी वाटली असेल का?

Sunday, February 28, 2021

५. अक्षरगंध (दिवाळी अंक २०२०)

 मला वाटतं 'अक्षरगंध' चा अंक मी ह्याआधी कुठल्याही दिवाळीला घेतला नव्हता. अर्थात आता मागच्या वर्षींच्या अंकांबद्दलच्या पोस्टस शोधून तपासून पहायचा कंटाळा आलाय. मॅजेस्टिक दालनात जाऊन घेतलेल्या अंकांपैकी हा एक अंक. तसा संध्याकाळी उशीरच झाला होता. दिवाळीची बाकीची खरेदी करायची होती आणि ती रानडे रोडवरच्या वाहणार्‍या गर्दीत करोनाकाळात करायचं दडपण मनावर होतं. त्यामुळे दिवाळी अंकांची खरेदी थोडी घाईत उरकली गेली म्हणून असेल. किंवा असंही असेल की अनुक्रमणिकेत बर्‍याच परिचित लोकांवरचे लेख आहेत हे वाचून अंक घेतला गेला असेल. पण अंक वाचायला सुरुवात केली तेव्हा एकाच व्यक्तींविषयीचे अनेकांनी लिहिलेले लेख वाचणं किंवा अपरिचित व्यक्तींवरचे लेख वाचणं - ए़कूणात व्यक्तिचित्रं वाचणं हे आपलं काम नाही, ते आपल्याला आवडत नाही हे प्रकर्षाने जाणवलं.

ह्याचा अर्थ असा नाही की हा अंकाचा दोष आहे. अंक सर्वार्थाने खरंच परिपूर्ण आहे. ज्यांना हे लिखाण आवडतं त्यांच्यासाठी माहितीचा खजिना आहे. डॉ. जयंत नारळीकर, भास्कर चंदावरकर (ह्यांच्याविषयी मला खरंच काही माहिती नव्हती ह्याचा विषाद वाटला), दुर्गा खोटे, किशोरी आमोणकर, कनक रेळे, सुधा मूर्ती, डॉ. राणी बंग, शाहीर साबळे, प्रा.वसंत देव, मंगेश पाडगांवकर, डॉ. श्रीराम लागू ह्यांच्यासारख्या मला माहित असलेल्या अनेक मान्यवरांबद्दल ह्या लेखांत वाचायला मिळालं.  पण ज्योत्स्ना कदम, डॉ. बाळ भालेराव, डॉ. नरगुंद, डॉ. सातोस्कर, डॉ. भांडारकर ह्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांचीही ओळख झाली. अर्थात काही लेख चित्रकला, गायन, नृत्य ह्या माझ्यासाठी फारसं ज्ञान नसलेल्या विषयावरचे असल्याने कंटाळवाणे वाटले ह्यात दोष सर्वस्वी माझा. ह्या विषयांत रुची आणि ज्ञान असलेल्यांसाठी ते माहितीपूर्ण ठरतील ह्यात वादाचा मुद्दा नसावा. 

किरण पुरंदरेंचा 'नागझिर्‍याच्या अंगणात' हा लेख मात्र खूप आवडला. तसंच एके ठिकाणी सई परांजपेंनी दिग्दर्शित केलेल्या बालचित्रपटांच्या उल्लेखात 'जादूचा शंख' आणि 'सिकंदर' ह्या चित्रपटांची नावं वाचून मन एकदम अनेक वर्षं मागे गेलं. 'एक मुछंदर चार बिलंदर, हम सबका सरताज सिकंदर' हे गाणं तर किती वर्षांनी आठवलं.  त्यामानाने 'अच्छे बच्चे नही जागते' ह्या अंगाईगीताच्या ओळी इतकी वर्षं झाली तरी स्मरणात होत्या. हे चित्रपट नेटवर शोधून पुन्हा पाहिले पाहिजेत. :-)

पुढच्या दिवाळीला ह्या अंकावरचं परिक्षण वाचूनच विकत घेईन.

Wednesday, February 24, 2021

४. लोकसत्ता (दिवाळी अंक २०२०)

 'भवताल' चा अंक वाचून संपवला आणि वाचनातली गोडी आटल्यासारखी झाली. अर्थात त्याचा त्या अंकाशी काही संबंध नाही हे सांगितलेलं बरं.  :-) रोजचं काम संपवून कधी एकदा पुस्तक / अंक हातात घेतो ह्याची वाट पहाणार्या मला पुस्तक डोळ्यांसमोर नको वाटायला लागलं. मग ठरवलं की काही दिवस पुस्तकांपासून दूर रहायचं. पॉडकास्टस ऐकण्यावर जास्त भर दिला. आणि मग एक दिवस अचानक परत पुस्तकांची ओढ लागली. मग कपाटातला त्यातल्या त्यात कमी जाडजूड अंक काढला तो लोकसत्ताचा. 

लहानपणापासून लोकसत्ता वाचायचा नाद होताच. पण सध्या काही वर्षांपासून देशात जे चाललंय त्यावर 'घालीन लोटांगण वंदीन चरण' करण्यात भल्याभल्यांत अहमहमिका लागलेली असताना जे आहे त्यावर परखडपणे व्यक्त होणारा लोकसत्ता अजूनच आवडायला लागला. तर ते असो.

अंकातला पहिला लेख - प्रताप भानू मेहता ह्यांचा 'धर्म, राष्ट्रवाद आणि हिंसा' ह्या शीर्षकाचा - मोठ्या उत्सुकतेने वाचायला घेतला. सुरुवातीला कळला, पटला पण पुढेपुढे क्लिष्ट वाटत गेला. त्यामुळे फारसा भावला नाही. कदाचित ह्या विषयावरची माझी समज तोकडी असावी. किंवा एव्हढं शुध्द अनुवादित मराठी झेपलं नसावं :-) ह्या अनुभवाने सावध होऊन त्यापुढला 'तारखेचा न्याय' हा अ‍ॅड अभिनव चंद्रचूड ह्यांचा 'हेबिअस कॉर्पस' वरचा लेख भीतभीतच वाचायला घेतला. कारण हा शब्द आजवर फक्त वर्तमानपत्रांत वाचलाय. त्यातून कायदा वगैरे भाग एकूण न झेपणार्‍यातला. पण हा लेख समजला आणि आवडला देखील. हे  'हेबिअस कॉर्पस' प्रकरण आहे तरी काय ते प्रथम समजलं.

त्यापुढला लेख साहिर लुधियानवीचा 'देवेंद्र सत्यार्थी' या समकालीन कवीवरचा. हिंदी साहित्याचा आणि माझा संबंध इयत्ता सातवीनंतर तुटलेला. त्यामुळे ह्या कवीबद्दल काही माहिती असणं शक्यच नव्हतं. पण साहिरने रेखाटलेल्या ह्या सुंदर शब्दचित्राच्या निमित्ताने बंगाली कळत नाही म्हणून मूळ भाषेतून त्यातलं साहित्य वाचता येत नाही म्हणून उसासे टाकण्याऐवजी हिंदी बर्‍यापैकी कळतं तर त्यातलं साहित्य वाचायला हवं हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं. आंतरराष्ट्रीय राजकारण हा आवडीचा विषय त्यामुळे 'अरबी वसंत आणि आफ्रिकेतील आग' हा गिरिश कुबेर ह्यांचा लेख जाम आवडला.

श्याम मनोहर ह्यांचं लेखन वाचलेलं नसलं तरी त्यांचं नाव ऐकून माहित. पण त्यांचा 'टीपः माझी मलाच सूचना' ही भलीमोठी कथा ना कळली, ना आवडली. मध्येमध्ये ते नेमकं कश्याबद्दल भाष्य करू इच्छित आहेत ह्याची पुसट कल्पना यायची. पण तरी मला ही कथा कळली असं म्हणता मात्र येणार नाही. गोल्डन एरामधली गाणी सर्वांना - अगदी पिढीचं अंतर ओलांडूनही - का आवडतात आणि गुणगुणावीशी वाटतात ह्याची मीमांसा करणारा डॉ. आशुतोष जावडेकरांचा 'कधी गीत कधी नाद' हा लेख वाचनीय आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणा इतकाच 'नाटक' हा दुसरा जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे सुहास जोशींचा 'आठवणींची स्मृतीचित्रे' हा लेख मन लावून वाचला. त्यात प्रतिमा कुलकर्णींनी स्मृतिचित्रांच्या तालमीच्या वेळेस केलेल्या एका प्रयोगाबद्दल त्या लिहितात. त्यात एखाद्या प्रसंगात महत्त्वाचं पात्र कोणतं ते ठरवून ती व्यक्ती जो आंगिक अभिनय करेल तसा करतानाच दुसर्‍या पात्राचे संवाद त्या पात्राच्या आवाजात म्हणायचे असा हा प्रयोग. मी हौशी नाटक करणर्या माझ्या एका मैत्रिणीला ह्याबद्दल व्हॉटसॅपवर लिहिलं तर तिचं लगेच उत्तर आलं की हे कुठल्या पुस्तकात वाचलंस.म्हटलं पुस्तक नाही लेख आहे. हे काम किती कठीण असेल ते वाचूनच लक्षात आलं. 'नाटक' ह्याच विषयावरचा 'राजा आणि अरुप रतन' ह्या रविंद्रनाथ टागोरांच्या नाटकावरचा प्रा. शरद देशपांडे ह्यांचा लेख मात्र फारसा आवडला नाही. कदाचित नाटकातले संवाद अनुवादित स्वरुपात दिले असल्याने असेल.

ह्यापुढला विभाग ग्रामीण भागातल्या लेखकांच्या लेखनाविषयीचा आहे. माझं मराठी वाचन अत्यंत तोकडं असल्याने ह्यातल्या एकाही लेखकाचं लिखाण मी वाचलं नसणार ह्यची मला खात्री होती. पण डॉ. दासू वैद्य, नवनाथ गोरे, सदानंद देशमुख ('बारोमास' हे ऐकलं तरी आहे हे त्यातल्या त्यात समाधान!), राजकुमार तांगडे ('शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' मात्र पाहिलंय!) आणि शिल्पा कांबळे ह्यांची ओळख तरी झाली. अर्थात हे एव्हढं वास्तववादी वाचणं अपने बसकी बात नही हे मला ठाऊक आहे. त्यामुळे 'भवताल जर इतका जीवघेणा आहे तर परत तेच वास्तवाच्या नावाखाली का लिहावं' हे शिल्पा कांबळे ह्यंचं मत वाचून मी मनातल्या मनात 'द्या टाळी' म्हटलं. :-)

मंगला नारळीकर ह्यांचा 'भागम भाग भागाकार' हा भागाकार सोपं करून सांगितलेला लेख छोट्यांसाठी असला तरी वाचला. :-)

बंगाली संस्कृतीबद्दल एक कमालीचं आकर्षण मी बाळगून आहे. कधीकाळी शांतीनिकेतनला जायची इच्छाही आहे. त्यामुळे 'सत्यजित रेंच्या शोधात...शांतीनिकेतनात' हा विजय पाडळकर ह्यांचा लेख उत्सुकतेने वाचला. रे शांतीनिकेतनला शिकायला होते हे मला माहित नव्हतं. 'हिंदी सिनेमा सज्ञान होतोय' हा रेखा देशपांडे ह्यांचा लेख व्यावसायिक आणि समांतर ह्या दोन्हीचा मिलाफ घडवून आणणारे चित्रपट सध्या कसे बनत आहेत ह्यावर प्रकाश टाकतो. 'प्रांजळ पं. रविशंकर' हा रमेश गंगोळी ह्यांचा लेख वाचनीय.

अंजली चिपलकट्टी ह्यांनी हायपेशिया ह्या प्राचीन इजिप्तमधल्या गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ स्त्रीबद्दल लिहिलेला लेख आवर्जून वाचण्याजोगा.

'वुहानमधले ते दिवस' ह्या लेखात अश्विनी पाटील ह्यांनी करोनाच्या भर उद्रेकाच्या काळात वुहानमध्ये अडकल्याच्या अनुभवावर लिहिलं आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट हे नाव निदान भारतात तरी सर्वांच्या परिचयाचं. भवतालच्या लेखात त्याच्या सद्य स्थितीवर लेख वाचल्याचंही स्मरतंय. पण हे हाफकिन मुळात होते कोण त्याची ओळख 'डाँ वाल्देमार हाफकिन' हा डॉ.सुलोचना गवांदे ह्यांचा छोटेखानी लेख करून देतो. प्रशांत कुलकर्णी ह्यांची व्यंगचित्रं आर्टीफिशल इंटेलिजन्सवर नेमकं भाष्य करतात.

ताप येऊन गेला की तोंडची चव परत आणायला मऊ दहीभात आणि लिंबाचं लोणचंच लागतं तसं माझी वाचनातली हरवलेली गोडी पुन्हा आणायला लोकसत्ताचा अंक लागला. थँक यू लोकसत्ता :-)

Thursday, January 21, 2021

3. भवताल (दिवाळी अंक २०२०)

भवतालचा अंक गेल्या काही दिवाळीपासून विकत घेतेय आणि प्रत्येक वर्षी खूप आवडलेलाही आहे. त्यामुळे ह्या दिवाळीलाही डोळे झाकून आणला. पण वाचायला सुरुवात केली तेव्हा काहीसा विरस झाला.

एक तर आजच्या कोविड-१९च्या धुमाकुळाला अनुसरून अंकाचा विषय म्हणजे सूक्ष्मजीव. एरव्ही हा विषय मनोरंजक वाटला असता पण जीवाणू, विषाणू, लशीकरण, प्रतिजैविकं ह्यावर गेले काही महिने, जवळपास वर्षच म्हणा ना, इतकं काही वाचलंय आणि ऐकलंय की हा विषय नको वाटतो. पण तरी नेटाने वाचायला सुरुवात केली. तेव्हा एक लक्षात आलं की अंकाचा विषय दिला असला तरी कदाचित लेखकांनी कोणते विषय घेतले आहेत ते नीट तपासून पाहिलं गेलं नाही किंवा निरनिराळे विषय वाटून दिले गेले नाहीत. कदाचित अंकाचा विषय थोडा घाईत बदलावा लागला म्हणूनही असेल कदाचित. पण त्यामुळे झालंय काय की वेगवेगळ्या लेखांत विषयांची पुनरावृत्ती झालेय. 

बरं अंक मराठी म्हणून इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय वापरण्याच्या नादात लेख क्लिष्ट बनलेत. 'प्रतिपिंड' म्हणजे 'अँटीबॉडीज' हे सांगितल्यावर ह्या मराठी शब्दाची उत्पत्ती कशी झाली असावी हे लक्षात येत असलं तरी आधी कळत नाही. एक पूर्ण लेख मी हा अर्थ माहित नसताना वाचला. पुढल्या लेखात शब्दाचा अर्थ कळल्यावर संगती लागली. 

तिसरा मुद्दा हा की वैज्ञानिक ज्ञान सोपं आणि इंटरेस्टींग कसं करावं ही हातोटी सगळ्यांच्याकडेच असते असं नाही. ज्यांना ते जमलं नाही त्यांचे लेख कंटाळवाणे आणि माहितीचं भरताड असलेले झाले. 

असो. तर एव्हढं सांगितल्यावर अंकातले आवडलेले लेख कोणते हेही लिहायला हवं, नाही का? तर ह्या मालिकेतला पहिला लेख ('उत्क्रांतीचे मेरुमणी') हा सजीवांच्या उत्क्रांतीवरचा डॉ. मिलिंद वाटवे ह्यांचा. डॉ. जयंत नारळीकर हे नाव सर्वांच्याच परिचयाचं. त्यांचाही लेख ('पृथ्वीवर सजीव उपराच?') डोक्यावरून जातो की काय ही भीती मनात घेऊन वाचायला सुरुवात केली. पण डॉक्टर नारळीकरांनी सहजसोप्या आणि मनोरंजक पध्दतीने पृथ्वीबाहेरचे सूक्ष्मजीव शोधून काढायच्या प्रयोगांबद्दल लिहिलंय. 'फोल्डस्कोप' ह्या सिंगल-लेन्स पेपर मायक्रोस्कोपवरचा डॉ. प्रवीण राठींचा छोटासा लेखही असाच वाचनीय.

इतिहासात आलेल्या संसर्गजन्य रोगांच्या साथींबद्दल डॉ. सुभाष वाळिंबेनी लिहिलंय. माणसाच्या पोटातसुध्दा अनेक जीवाणू असतात हे प्रथम ऐकलं तेव्हा कसंसंच झालं होतं. आणि त्यातले तर चक्क काही परोपकारी असतात हे वाचून तर थक्क झाले होते. अश्याच जीवाणूंवर डॉ. राहुल बोडखे ह्यांनी 'माणसाच्या पोटाचर अधिराज्य' हा लेख लिहिलाय. साथींचा समाजमनावर कसा परिणाम होतो हे कोव्हिडकाळात आपण सगळ्यांनीच अनुभवलं आहे. त्यावर डॉ. प्रदीप आवटेंनी विस्ताराने लिहिलं आहे.

'जिन टॉनिक' बद्दल आपल्यापैकी अनेक जणांनी ऐकलं असेल. ही भानगड नक्की आहे काय हे 'टॉनिक नावाच्या औषधाची गोष्ट!' हा 'टीम भवताल' ने लिहिलेला छोटेखानी मस्त लेख समजावून देतो. Antibiotic Resistance बद्दलही आजकाल पेपरात बरंच काही छापून येतं. त्याबद्दल माहिती देणारा डॉ. निषाद मटंगे ह्यांचा 'औषधाचा मृत्यू' हा लेख आवर्जून वाचण्याजोगा आहे. रोगांच्या हद्दपारीवरल्या पाचव्या विभागात 'देवी'च्या उच्चाटनाबद्द्ल ओंकार गोडसे ह्यांचा, 'एका विषाणूचे उत्खनन' हा डॉ. योगेश शौचे ह्यांचा तर पोलिओच्या उच्चाटनाबद्द्ल डॉ. जगदीश देशपांडे ह्यांचा हे ३ लेख विशेष उल्लेखनीय.

अंकाच्या सहाव्या विभागात ह्या क्षेत्रातल्या विविध संस्थांबद्दल छोटेखानी लेख आहेत. त्यात हाफकिनबद्दल वाचून अभिमान वाटतो तर हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या सरकारी अनास्थेमुळे झालेल्या दुर्दशेबद्दल वाचून वाईट वाटतं. कोव्हिडच्या साथेमुळे सरकारला सुबुध्दी प्राप्त होवो आणि ह्या संस्थेला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त होवो अशी मनापासून इच्छा.