ऋतुरंगचा ह्या वर्षीचा दिवाळी अंक 'लढत' विशेषांक. त्या अनुषंगाने कला, साहित्य, राजकारण, क्रीडा अश्या अनेक क्षेत्रांतल्या मान्यवंतांच्या आयुष्यातल्या लढ्याबद्द्ल वाचायला मिळालं.
ह्यापैकी गुलजार, अमिताभ बच्चन, सुशीलकुमार शिंदे, अंबरिश मिश्र, आयुष्मान खुराना, रणवीर सिंग, अरिजित सिंग, तापसी पन्नू, अशोक नायगांवकर, रामदास फुटाणे ह्या मला माहित असलेल्या व्यक्ती. त्याव्यतिरिक्त गुलाबबाई संगमनेरकर, श्रीपती खंचनाळे, सुनील मेहता आदि माहित नसलेल्या व्यक्तींबद्दलही कळलं. अंकात मेलिंडा गेटस ह्यांच्या 'द मोमेंट ऑफ लिफ्ट' ह्या पुस्तकातल्या एका भागाचा अनुवाद आणि ग्रेटा थुनबई (थॉनबर्ग नव्हे म्हणे!) हिच्यावर शुभदा चौकर ह्यांनी लिहिलेला लेखही आहेत.
मला अधिक भावलेले लेख म्हणजे अर्थात गुलजारचा 'धूप आने दो', रवी आमले ह्यांचा 'मोल हंटर आणि सुटलेली शिकार' आणि डॉ. अभय बंग ह्यांचा 'आज महात्मा गांधी असते तर'. पैकी डॉ. बंग ह्यांनी लॉकडाऊनच्या काळात मजुरांच्या झालेल्या हालाबद्दल जे काही लिहिलंय ते ह्याच अंकात 'ते चौदा दिवस' हा लेख लिहिलेल्या सुरेश प्रभू ह्यांनी नंतर का होईना वाचलं असावं अशी आशा आहे. ते वाचून स्वतःच्या लेखाच्या शेवटी 'खोटं बोला पण रेटून बोला' ह्या भाजपाच्या कार्यशैलीनुसार लिहिलेल्या 'पण आता मागे वळून पहातो तेव्हा लक्षात येतं की आपल्याकडे अगदी वेळेवर उपाययोजना करण्यात आल्या. जगातील सात ते आठ देशांशी माझा रोज संबंध येतो. माझ्याशी ते भारताच्या उपाययोजनांबद्द्ल कौतुक करतात' ह्या वाक्यांबद्दल त्यांना काय वाटलं असेल काय माहित. जनांत नाही तरी मनात तरी आपल्या चुकांची कबूली द्यावीशी वाटली असेल का?
No comments:
Post a Comment