बघायच्या असलेल्या नाटकांची लिस्ट मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच
चालल्याचं अलीकडेच लक्षात आलं. तेव्हा एप्रिल-मेंच्या उन्हात नाटक पाहायला बाहेर
पडायचं टाळायचं असेल तर दुपारच्या झोपेचं खोबरं करून विकांताला नाटक पहावं लागेल
हेही जाणवलं. सुदैवाने चि. सौ. कां. रंगभूमीचा प्रयोग पुढल्याच विकांताला होता
तेव्हा निर्णय बदलायच्या आधी तिकीट काढून आले.
तरी नाटक सुरु व्हायच्या आधी थोडी धाकधूक होतीच. ह्यात संगीत नाटकातली
पदं येतील तेव्हा झोप तर लागणार नाही ना. J ही भीती अनाठायी होती हे पहिल्याच पदात पक्कं झालं. मग मात्र मी सगळी पदं
आणि अख्खं नाटक मस्त एन्जॉय केलं. संगीत मानापमान, संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ
ह्यासारख्या माहित असलेल्या आणि संगीत बावनखणी ह्या कधी नावही न ऐकलेल्या नाटकातल्या,
ज्यांचे आजवर फक्त शब्द वाचले होते अशा कशी ह्या त्यजू पदाला, नरवर कृष्णासमान सारख्या
पदांवर माझी मान डोलताना पाहून ही माझीच मान आहे ह्यावर माझाच विश्वास बसेना. ‘अवघे
पाउणशे वयमान’ तर मला फार आवडलं. फक्त प्रेक्षकात बहुतकरून सिनियर सिटीझन्सचा भरणा
असल्याने त्यातल्या ‘अवघे पाउणशे वयमान’ असणाऱ्या काकांना ते ऐकून काय वाटलं असेल
ह्याची मात्र उत्सुकता राहिली J
बरं, नाटकात नुसती संगीत नाटकातली पदं नव्हती तर काही जुन्या प्रसिध्द
नाटकातले प्रसंगही होते. त्यात ‘तो मी नव्हेच’ मधला ‘तो मी नव्हेच’ म्हणणारा लखोबा
लोखंडे पाहिला. ‘नटसम्राट’ मधले आप्पासाहेव बेलवलकर आपल्या भूमिकांबद्दल बोलताना
पाहिले. ‘ती फुलराणी’ तल्या फुलराणीचा ‘तुला शिकवीन चांगला धडा’ ऐकलं. मोरूच्या
मावशीचं ‘टांग टिंग टिंगाक’ ऐकलं. काही वर्षांपूर्वी पाहिलेल्या ‘हमिदाबाईची कोठी’
तला सत्तार ग्रामोफोन कोठीवर आणतो तो प्रसंग पाहिला. मस्त वाटलं.
मला शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नाही. पण सगळे गायक-गायिका छान गायले
असं मला वाटलं. सर्वांनीच जीव ओतून अभिनय करून मराठी नाट्यभूमीचा इतिहास समोर उभा
केला. फक्त संपदा-जोगळेकरची फुलराणी थोडी वयस्कर वाटली. अर्थात आता मला कुठे
भक्ती-बर्वे पाहायला मिळणार. तेव्हा दुधाची तहान ताकावर हे आलंच.
नाटक अभी बाकी है मेरे दोस्त J
No comments:
Post a Comment