Monday, May 26, 2014

स्टार प्लसच्या 'महाभारत' चा विषय निघालाच आहे तर लिहिते. मागच्या आठवड्यातले हस्तिनापुरच्या कृष्णाच्या भेटीचे सर्व एपिसोड्स मस्त होते. शकुनी आणि दुर्योधनाच्या स्वत:च्या कृतीचं समर्थन करणाऱ्या सारयाच तर्कटांचा कृष्णाने किती सहजपणे 'मुंहतोड जवाब' दिला. कृष्णाला कैद केल्यावर त्याच्या जागी कोठडीत दुशा:सनाला पाहून दुर्योधनाचा चेहेरा कसला पडला होता. पण एव्हढं होऊनही अक्कल आली नाही ती नाहीच. म्हणतात ना 'विनाशकाले विपरितबुद्धी'. बाकी त्या दुर्योधनाने आपलं हसणं थोडं कमी केलं तर जरा बरं होईल. कृत्रिम दिसतं ते. दुशा:सनाला एखाद-दुसरा संवाद दिला तरी चालू शकेल. दर वेळी शकुनी आणि दुर्योधन काही बोलले की चकार शब्द न बोलता चेहेर्यावर नेमके काय भाव दाखवायचे हा त्याचा गोंधळ स्पष्ट दिसतो.

ह्यातले पांडव काही मला अजून पचनी पडलेले नाहीत. अर्जुन कृष्णाचा भक्त न वाटता त्याचा चमचा वाटतो. सदोदित 'त्राहि माम्' चे केविलवाणे भाव त्याच्या मुखमंडलावर असतात. युधिष्ठीर गोंधळलेला वाटतो. चोप्रांच्या महाभारतापेक्षा ह्या व्हर्जनमध्ये नकुल आणि सहदेवाच्या वाट्याला थोडे संवाद आलेत. नाही म्हणायला भीम तेव्हढा चोप्रांच्या महाभारतातल्या भीमापेक्षा उजवा वाटतो. "द्रौपदी म्हणजे रुपा गांगुली" हे समीकरण डोक्यात इतकं घट्ट बसलंय की ही नवी द्रौपदी मला आवडतच नाही. रुपा गांगुलीला द्रौपदीचं मनस्वी रूप दाखवायला अजिबात प्रयास पडत नव्हते. ही द्रौपदी उसनं बळ आणून तेजस्वीपणा दाखवतेय असं वाटतं. ह्यातल्या कृष्णाचं काम करणाऱ्या नटाला मात्र 'देवों के देव महादेव' मधल्या विष्णूच्या भूमिकेपेक्षा इथे महत्त्वाची भूमिका मिळालेली आहे. आणि त्याचं त्याने चीज केलंय. कृष्णाचा करारीपणा, त्याचा धूर्तपणा आणि खट्याळपणा तो व्यवस्थित साकार करतो. कधीकधी मात्र एखादं धूर्त वाक्य बोलताना तो मान वाकडी करून बोलतो तेव्हा थोडासा psychotic वाटतो. :-)

आता कृष्णशिष्टाई विफल झाली आहे तर कुरुक्षेत्राच्या लढाईला कधी तोंड फुटतं ते पहायचं.

No comments: