Thursday, May 15, 2014

पांडगो इलो रे बा इलो

बऱ्याच दिवसांपासून हे नाटक पहायचं मनात होतं तरी शिवाजी, यशवंत किंवा रविंद्र यातल्या एकाही ठिकाणाची प्रयोगाची वेळ सोयीची नव्हती. पण काही दिवसांपूर्वी नाटकाच्या जाहिरातीत "शेवटचे ३ प्रयोग" असं वाचलं आणि वेळ सोयीची असो वा नसो पण जाऊन पहायचंच असं ठरवलं. १ मे ला यशवंतला दुपारी ४ चा प्रयोग आहे हे मला तिकीटविक्री सुरु झाल्या दिवशी संध्याकाळी कळलं. दुसरया दिवशी संध्याकाळी धावत धावत गेले तोवर पुढल्या किमान ७-८ रांगा तरी भरून गेलेल्या होत्या. यशवंत मध्ये तोपर्यंत एकाही नाटकं पाहिलं नसल्याने बसायची सोय कशी आहे ते माहीत नव्हतं. शिवाजी जुनं असल्याने त्यातल्या रांगा एकाच उंचीवर आहेत. समोर एखादी उंच व्यक्ती आली की संपलंच. त्यामानाने रविंद्र मध्ये प्रत्येक रांग पुढल्या रांगेपेक्षा उंच असल्याने हा त्रास नाही. शेवटी 'गणपतीबाप्पा मोरया' म्हटलं आणि तिकीट घेऊन आले.

१ मे ला दुपारच्या रणरणत्या उन्हात बाहेर पडायला असेल नसेल तेव्हढी सगळी इच्छाशक्ती एकवटावी लागली. नाट्यगृहावर पोचले तर सगळे लोक बाहेर घाम पुसत उभे. पण १०-१५ मिनिटांत आत सोडायला सुरुवात झाली. 'खाद्यपदार्थ किंवा पाण्याच्या बाटल्या आत नेऊ नका' ही सूचना लिहिलेली होतीच. खाद्यपदार्थांचं ठीक आहे पण ह्या उन्हाळ्यात पाणी आत न्यायचं नाही म्हणजे अन्याय आहे खरंच - नाट्यगृह एसी असलं तरी. आम्ही काय आत पाण्याने रंगपंचमी खेळणार आहोत का? असो. शिवाजी आणि रवींद्रला सुध्दा ही सूचना पहिली असल्याने मी पाणी नेलंच नव्हतं. त्यामुळे प्रश्नच नव्हता.

आत जाऊन बसले तरी घंटा काही होईना. अगदी ४:३० व्हायला आले तरी. बरोबर पुस्तक नेलं होतं त्यामुळे लोकांच्या तोंडाकडे पाहायची वेळ आली नाही तरी नाटक् उशिरा सुरु झालं म्हणजे उशिरा संपणार आणि बाकी वेळापत्रक कोलमडणार हे नक्की. आलिया भोगासी असावे सादर.....

शेवटी एकदाच्या तिन्ही घंटा झाल्या आणि 'मोबाईल बंद ठेवा' ह्या नेहेमीच्या सूचनेनंतर नाटक सुरु झालं. नाटकाचं बीज तसं तुम्हा आम्हा सर्वांच्या ओळखीचं. पण थोडंसं कालबाह्यसुध्दा झालेलं. ९ ते ५ नोकरी करणारा सरकारी चाकरमानी एके दिवशी रिटायर होतो आणि आता राहिलेत ते दिवस कुटुंबासोबत समाधानाने घालवायचे असे बेत करतो. पण लवकरच त्याच्या लक्षात येतं की आता घरात त्याला पूर्वीचं स्थान नाही. बायको सुनेला मदतीला घेऊन घरच्या कामात गुंतलेली. मुलगा नोकरीच्या व्यापात. ह्याने नुसता चहा मागितला तरी घरच्यांना कटकट होते कारण त्याची मदत अशी काहीच नाही - ना घर चालवायला ना घरकामाला. मग हळूहळू सून 'बसलाच आहात तर तांदूळ तरी निवडून दया' म्हणून आणून देते. बायको क्षुल्लक कारणावरून भांडण उकरून काढते. आणि शांततेने जगायचे ह्याचे बेत कुठल्या कुठे विरून जातात.

ह्या नाटकाचे नायक तात्या सावंत हे ह्याच चाकरमान्याचं प्रतिनिधित्त्व करतात. त्यातून त्यांना मटक्याचा नाद. मुलाच्या पाकिटातून पैसे काढतात. ते घरच्यांच्या लक्षात येतं आणि तिरमिरीत ते रात्री अपरात्री घर सोडून बाहेर पडतात ते शिवाजीपार्कच्या स्मशानभूमीजवळ पोचतात. इथे त्यांना भेटतो पांडुरंग उर्फ पांडग्या. खरं तर पांडग्याचं भूत. कारण तो आता ह्या जगात देहाने नसतो. पण काही इच्छा अपूर्ण राहिल्याने त्याचा आत्मा मात्र इथे भटकत असतो. पांडग्या तात्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचं आश्वासन देतो. अट एकच तात्याने त्याला त्यांच्या घरी न्यायचं. आणि श्रावणात त्याच्या अपुऱ्या राहिलेल्या काही इच्छा पूर्ण करून द्यायच्या. अर्थात तो तात्यांशिवाय दुसर्या कोणालाच दिसणार नसल्याने घरच्यांना काही कळायचा प्रश्नच नसतो. तात्या आधी त्याला विरोध करतात पण मग बायको आणि मुलाला काटशह देता येईल ह्या विचाराने तयार होतात. पांडग्याने मदत केल्यामुळे तात्यांची घरी, आणि दारीसुध्दा,  वट वाढते. यथावकाश श्रावण येतो आणि मग पांडग्याच्या एकेक इच्छा ऐकल्यावर 'घी देखा पर बडगा नही देखा' ह्या म्हणीची आठवण होऊन तात्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते. तात्या पांडग्यापासून सुटका करून घेतात का पांडग्याच्या इच्छा पूर्ण होऊन त्याला मुक्ती मिळते हे पाहायला हे नाटक पुन्हा रंगभूमीवर यायची वाट तुम्हाला पहावी लागेल. कारण सध्यातरी ह्याचे प्रयोग नाहीत.

मी सुरुवातीला हे नाटक थोडंसं कालबाह्य झालंय असं म्हटलं कारण आजकाल बहुतेक घरातून नवरा बायको दोघेही काम करतात. त्यामुळे रिटायर्ड झाले तरी त्यांना आपापलं फ्रेंड सर्कल असण्याचे चान्सेस जास्त आहेत. घरात घरकामाला नोकर माणसं असतात. मुलं आईवडीलापासून दूर राहत असतात. आताची सिनियर सिटीझन पिढी ही कदाचित ह्या नाटकात दाखवलेल्या तात्या आणि त्यांच्या बायकोच्या पठडीत बसणारी शेवटची पिढी असावी. अर्थात हे नाटक घडतं ते एका चाळीत. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाना लागणारे सर्वच निकष इथे लागू पडत नाहीत हेही सत्य आहे.

नाटक मालवणीत असल्याने भाषा समजेल की नाही ही एक भीती होती. कारण 'तुका-माका' ह्या पलीकडे ह्या भाषेचं ज्ञान मला नाही. काही अपवाद सोडले तर तशी विशेष अडचण आली नाही. तात्या झालेले वैभव मांगले म्हणजे सिम्पली रॉकींग! आधीचा बायकोच्या मुठीतला नवरा आणि नंतर पांडग्याचं पाठबळ मिळाल्यावर त्याच्यात झालेला बदल त्यांनी मस्त दाखवलाय. फक्त काही प्रसंगात मालवणी संवाद खालच्या पट्टीत आणि घाईघाईने म्हटल्याने निदान मला तरी कळले नाहीत. नाटक बघायला येणारे सर्व प्रेक्षक मालवणीच आहेत असं गृहीत न धरता संवाद म्हटले तर बरं होईल. त्यांची बायको उर्फ 'कमिश्नर' ह्या भूमिकेत लीना भागवत चोख बसल्या आहेत. मला त्यांचा अभिनय नेहमीच आवडतो. तिसरा आवर्जून उल्लेख 'बाबी' झालेल्या अंशुमन विचारेंचा करावासा वाटतो. पांडग्याने धरल्यावर एका क्षणी पांडग्या आणि दुसऱ्याच क्षणी बाबी असा अभिनय त्यांनी अफलातून केलाय. 'तू तिथे मी' फेम चिन्मय मांडलेकर पांडग्या झाले होते. त्या मालिकेपेक्षा नाटकात त्यांनी बरा अभिनय केला असावा असं वाटतं. पण त्यातला बराचसा भाग स्टेजवर उड्या मारण्याचा असल्याने आणि चेहेऱ्यावर बऱ्याच झिपऱ्या असल्याने मी ठामपणे काही सांगू शकत नाही. :-) बाकी कलाकारांनी सुध्दा छान साथ दिली आहे. चाळीतल्या खोलीचं नेपथ्य छान होतं.

फक्त गुलाब, तिची लावणी आणि त्या अनुषंगाने येणारे काही संवाद आणि प्रसंग थोडे अस्थानी वाटले. त्यामुळे सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांना पाहाता येईल असं हे नाटक होऊ शकत नाही. 'आई' वरून दिलेली एखाद-दुसरी शिवी 'चलता है' ह्या सदरात टाकली तरी तिचा वापर उगाचच सारखा सारखा झाला तर चांगलाच खटकतो.

तेव्हढ सोडलं तर दुपारच्या झोपेवर पाणी सोडून उन्हाने घामाघूम होत नाटक पहायला गेल्याचं चीज झालं असंच मी म्हणेन.

No comments: