चालू असलेल्या मालिका बदलून त्याजागी नव्या मालिका आणण्याच्या झीच्या नव्या रीतीमागचं कारण मला अजून कळलेलं नाहीये. चालू मालिका कधीही दाखवल्या तरी त्या पहात असलेला प्रेक्षकवर्ग कथानकात पुढे काय होतंय ह्या उत्सुकतेपोटी त्या पहात रहाणार हे गृहीत धरून प्राईमटाईम स्लॉट ७ च्या ऐवजी ६ ला आणून ठेवायची ही युक्ती असू शकते. किंवा पॉझिटिव्ह विचार करायचा झाला तर असंही म्हणता येईल की जुन्या सासू-सून ह्या फॉर्म्युलावर आधारित, कौटुंबिक मालमसाला आणि अतर्क्य घटना असलेल्या मालिकांवरच्या टीकेची दखल घेऊन अधिक चांगल्या मालिका आणण्याचं सकारात्मक पाउल असू शकतं.
"आभास हा" जाऊन त्याजागी (निदान अजूनपर्यंत तरी!) हलकीफुलकी असलेली 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' आली हा योगायोग म्हणता येईल. नव्हे, तो योगायोगच आहे अशीच मनाची समजूत मी घातली होती. हो, उगाच निराशा पदरी पडायला नको. 'उंच माझा झोका' चे प्रोमोज सुरु झाले तेव्हाही नवर्याचे पाय स्वत:च्या पदराने पुसणारी लहान वयाची बायको पाहून डोक्यात तिडीक गेली होती. पण तरी मालिकेच्या शीर्षकावरून ही जुन्या काळातल्या एखाद्या कर्तृत्त्ववान स्त्रीच्या जीवनावर असणार अशी आशा वाटत होती. पहिलं नाव डोळ्यासमोर आलं ते 'आनंदी गोपाळ जोशी' ह्यांचं. पण मालिकेच्या नायिकेचं नाव 'रमा'. नेटवर सर्च मारला तेव्हा आनंदी जोशींचं माहेरचं नाव 'यमुना' होतं असं कळलं. त्यामुळे ती शक्यता नाही. कोणती स्त्री असेल असा विचार करत असतानाच 'झी'ने उत्तर देउन टाकलं. ही मालिका रमाबाई रानडेच्या जीवनावर आधारित आहे.
आता मालिका मूळ चरित्राशी प्रामाणिक रहाते का ह्यातही एखादी लाल आलवणातली सासू रमाचं (आणि पर्यायाने आपणा प्रेक्षकांचं!) जगण हराम करते ते बघायचं. :-)
Wednesday, February 22, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment