आज एका ब्लॊगवर कोणीतरी हाताने लिहिलेल्या मजकूराची इमेज पोस्ट केलेली पाहिली आणि वाटलं की खरंच माझं हाताने लिहिणं आता किती कमी होत चाललंय - टीव्हीवरचे कुकरी शोज पहाताना रेसिपीज लिहून घेण्यापुरतं. हे शोजसुध्दा बयाचदा इंग्लिशमध्ये असतात. त्यामुळे मराठी हाताने लिहिणं फ़ारसं होतच नाही. काही दिवसांपूर्वी झी मराठीच्या खवय्येत एक बयापैकी दिसणारी रेसिपी बघून टिपून ठेवायला गेले आणि माझंच अक्षर पाहून मलाच धक्का बसला. अक्षरांवर आडवी रेघ ओढायलाही आळस येत होता. ’स्वयम लिखति, स्वयमपि न वाचयति’ का काय म्हणतात तशातली गत. काही दिवसांनी पाहिलं तर माझं मलाच वाचता यायचं नाही कदाचित.
शाळेच्या दिवसात हस्ताक्षर चांगलं असणं हे कॊलर टाईट करायची गोष्ट होती. आम्हा बालमोहनच्या मुलांना तर वाईट हस्ताक्षर म्हणजे पापच वाटायचं. मराठीचा पेपर लिहायचा तर पहिल्या पानापासून शेवटच्या शब्दापर्यंत अक्षर बिघडता कामा नये हा कटाक्ष असायचा. आणि माझं हे आता असं झालंय. :-(
पूर्वी शनिवारी सकाळी शाळेत असायचं तसं आता शुध्दलेखन सुरु करायला हवं असं मनात आलं मात्र आणि हसायला आलं. कुठून काढायचा त्यासाठी वेळ? शाळा सोडून इतकी वर्ष झाली पण संस्कृतचा अभ्यास पुन्हा काही सुरु करता आला नाही. परवा आयडियलच्या जवळच गेले होते पण संस्कृतचं पुस्तक आणायचं सुचलं नाही. कसं सुचेल? त्यासाठी मनाचा निश्चय हवा ना? कधी काढणार ह्या जिव्हाळ्याच्या गोष्टींसाठी वेळ? साठी उलटल्यावर? तेव्हढं उत्तर असेल तर सांगा बुवा.
शाळेवरून आठवलं, दसयाला जायचंय की शाळेत. एका मैत्रिणीला तयार केलंय त्यासाठी. तसं मागच्याच वर्षी एक मित्र आणि त्याची बायको अमेरिकेहून आले होते तेव्हा गेले होते. पूर्वीच्या बयाच खुणा नाहियेत आता. पण प्रार्थनेचा हॊल होता तस्साच वाटला. दसयाला जाऊन देवीचं दर्शन घेऊन येते आणि बघते ह्यावर्षी तरी कॆन्टीनमध्ये सामोसे मिळतात का ते. काही वर्षांपूर्वी गेले होते तर नुसते बटाटेवडेच मिळाले होते.
निदान शाळेच्या दिवसांची थोडीतरी चव ह्या निमित्ताने परत मिळेल :-)
Tuesday, October 4, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment