शाळेत जायचं होतं म्हणून की काय कोणास ठाऊक पण आज सकाळी अलार्म न लावताच लवकर जाग आली. सगळं आवरेपर्यंत ९ वाजलेच. अर्ध्या वाटेवर होते आणि मैत्रिणीचा फ़ोन ’कुठपर्यंत पोचलीस?’. ती बिचारी १० मिनिटांपासून ठरलेल्या ठिकाणी वाट पहात होती. तिथे पोचले तेव्हा एक हिरवंचुटुक आपट्याचं पान तिने हातात ठेवलं. मी इतकी गडबडीत आलेले की माझ्याजवळ तिला द्यायला पानच नव्हतं. :-(
दोघी शाळेजवळ पोचलो तेव्हा बाहेर हीsss गर्दी. ’बरं झालं बाई आपण दुसरीकडे भेटलो. तू म्हणालीस तसं इथे एकमेकींना शोधताच आलं नसतं". आत शिरलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळच ’सुस्वागतम’ सोबत दसयाच्या शुभेच्छा देणारी रांगोळी पाहून मन एकदम अनेक वर्षं मागे मागे गेलं. इथेच फ़ळ्यावर दरवर्षी वार्षिक परिक्षेत पहिला क्रमांक मिळवलेल्यांची नावं झळकत असायची. आणि तिथे आपलं नाव नाही म्हटलं की आभाळ कोसळल्यासारखं वाटायचं.
जिन्याने वर जाताना दोन्ही बाजूंना भिंतीवर शाळेतल्या मुलांनी काढलेली चित्रं पाहून मजा वाटली. गंमत म्हणून मी फ़ोटोही काढले.
एका मजल्यावर एक रिकामा वर्ग बहुतेक विद्यार्थ्यांना फ़ोटो काढायला मोकळा ठेवला होता. तिथे बाकांवर बसून फ़ोटो काढायची नुस्ती झुंबड उडाली होती. आम्हीही एकमेकींचे फ़ोटो काढले. मजा म्हणजे तेव्हा मोठे वाटणारे वर्ग आता किती छोटे वाटत होते. मागच्या वर्षी माझ्या मित्राबरोबर आले होते तेव्हा आम्ही दोघं हेच बोललो होतो आणि त्याची बायको म्हणाली होती की वर्ग छोटे झाले नाहीत, आपण मोठे झालोय. खरं आहे. मला तर शाळेतून बाहेर पडून इतकी वर्षं झाली आहेत ह्यावर विश्वासच बसत नव्हता. असं वाटत होतं की कालपरवाच बाहेर पड्लेय.
एव्हाना शाळेच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर पोचलो होतो. रसायनशास्त्राची प्रयोगशाळा बंद होती. काचेतूनच आत पाहून घेतलं. वरती शिवणाच्या खोलीकडे जाणारा रस्ता पाहून ’इथे शिवणाची खोली होती नाही?’ असं एकदम म्हणून दोघी एकदम हसलो. मग खालच्या मजल्यावर आलो. कॆन्टिनमध्ये गर्दी होतीच पण आत घुसता आलं. चक्क वडे आणि सामोसे दोन्ही दिसले. ते बांधून घेताना देवाचा प्रसाद मिळाल्यासारखे भाव होते दोघींच्या चेहेयावर.
मजल्याला असलेल्या गॆलरीतून खाली वाकून पाहिलं आणि ’आपल्या वेळेला बैठ्या इमारती होत्या नाही’ असं म्हणालो तेव्हा जाणवलं की बरीच वर्षं उलटून गेली आहेत. हॉल बंद होता पण ग्रीलच्या दरवाज्यातून पाहून श्री शांतादुर्गेचा फ़ोटॊ दिसतो का ते पहायचा मोह आवरला नाही. पुन्हा खाली येताना एका बंद असलेल्या कॉरिडोरमध्ये गेलो तेव्हा तिथे काम करत असलेला शिपाई ओरडला ’ए, तिथे जायचं नाही.’ आम्ही दोघी हसतच सुटलो. ’बघ, आपण किती तरुण दिसतो ह्याचा पुरावा मिळाला आज’ माझी मैत्रिण म्हणाली. एकदम पुन्हा शाळेत असल्यासारख वाटलं.
खाली आलो तेव्हा जनता दिसेल त्या वस्तूंचे फ़ोटो काढत होती. शेजारच्या फ़ळ्यावर द्सयाचं महत्त्व विशद करून सांगितलं होतं. मी फ़ोटो काढला तेव्हा आत कुठेतरी गलबललं.
शाळेतून पास होऊन बाहेर पडल्यावर कधीच परत जावंसं वाटलं नव्हतं. आठवी ते दहावी शाळेच्या सराव वर्गांत प्रवेश न घेता खाजगी क्लासेस लावल्यामुळे एका शि़क्षकांनी उभा दावा मांडला होता. आणि त्याचं खापर मी शाळेवर फोडलं होतं. तो कडवटपणा कित्येक वर्षं मनात होता. पुढे कधीतरी लक्षात आलं की ह्यात शाळेची काहीच चूक नव्हती. ह्या वास्तूने मला खूप काही दिलं. शाळेतून बाहेर पडल्यावर काही वर्षांत दसर्याला शाळेत गेले असते तर काही शिक्षक-शिक्षिका भेटलेही असते. पण आता त्यांच्या नुसत्या आठवणी आहेत - एक्स्ट्रा पिरियडला भुताची गोष्ट सांगणार्या परळकर बाई, शामाताई, एखाद्या पुस्तकाचं नाव सांगून 'तुम्ही वाचलं नसेलच' अशी खवचट कमेन्ट मारणार्या पण तसं करतानाच आम्हाला मराठी साहित्यातलं आणि आयुष्यातलं बरंच काही शिकवणार्या चौबळ बाई, शास्त्राचे विषय सोपे करून शिकवणार्या चौधरी बाई, इंग्लिशशी तोंडओळख करून देणाया भटबाई, चित्रकला शिकवणारे राजाध्यक्ष सर, दर नवरात्रात 'उदो उदो ग उदो उदो, आई अंबेचा उदो उदो' गाणार्या कुसुमताई....किती नावं आठवणार? असे शिक्षक मिळाले हे आमचं भाग्य होतं. तेव्हा लक्षात नाही आलं. आता कळतंय. ते काय म्हणतात ना - एखाद्या वस्तूची किंमत ती मिळेपर्यंत आणि व्यक्तीची किंमत ती निघून गेल्यावर. :-(
ती किंमत आता कळतेय. बाहेर पडलो तेव्हा बाहेरून शाळेचा एक फोटो काढायचा मोह आवरला नाहीच.
पुढल्या वर्षी नक्की येईन हं असं त्या वास्तूला सांगून मी निघाले. बाजूला एक मुलगा फोनवर बोलत चालला होता 'अरे, सोडताहेत आत. तू ये लवकर'. आज सगळ्या बालमोहनकरांची पावलं इथेच वळणार होती तर - मस्तीकी पाठशाला जिथे आहे तिथे. :-)
Thursday, October 6, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment