Tuesday, April 6, 2010

आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे

सध्या हा महिना तरी मराठी पुस्तकंच वाचायची असं ठरवलंय. लायब्ररीत गेले तेव्हा सुनिताबाईंचं हे पुस्तक दिसलं. पु.ल. हे सार्‍या महाराष्ट्रासारखंच माझंही आराध्य दैवत. त्यामुळे हे पुस्तक वाचावं का वाचू नये ह्यावर ह्याआधीही मी विचार केला होता. कारण ह्या पुस्तकात बाईंनी पु.लं.चं जे व्यक्तिचित्र रेखाटलंय त्याने पुलप्रेमी नाराज झाल्याचं मी वाचलं होतं. पण पुलं. वरच्या आपल्या प्रेमाची अ‍ॅसिड टेस्ट म्हणून का होईना पण ते वाचायचंच असं ह्यावेळी ठरवलं. आणि खरं सांगू? वाचून बरं केलं असंच वाटतंय.

कारण हे पुस्तक वाचून पु.ल. हेही आणखी चार भारतीय पुरुषांसारखेच होते असंच मला वाटतंय. सुनिताबाईंनी दुसर्या कोणा भारतीयाबरोबर लग्न केलं असतं तरी त्यांना १०० तले ९६-९७ टक्के हाच अनुभव थोड्याफार फरकाने आला असता. त्यांनी स्वतःबद्दल फार प्रांजळपणाने लिहिलंय, आपल्या चुका, आयुष्याच्या अखेरीस वाटणारी खंत सच्चेपणाने लिहिली आहे हे खरंच. पण काही ठिकाणी उगाच नको इतकी स्वतःची स्तुती केली आहे असंही वाटून गेलं. परफेक्शनिस्ट असणार्‍या माणसाला 'पाट्या टा़कण्याची' सवय असलेल्यांचा त्रासच होतो तसा तो त्यांना झाला. दुर्दैवाने ही पाट्या टाकायची सवय भारतात जवळजवळ सर्वांनाच आहे ह्याचा मीही अनुभव घेतला आहे, घेते आहे. :-( असो. तरी एकूणात त्या कालावधीचं आणि त्यांच्या सहजीवनाचं फार छान चित्रण आहे ह्यात.

आणि ह्या पुस्तकाचं प्रूफ-रिडींग खुद्द पुलंनी करून दिलं होतं असं जेव्हा मला कोणीतरी सांगितलं तेव्हा मात्र मी अवाक झाले. माझी पुलंवरची भक्ती अजून वाढली. खरंच जगावेगळंच जोडपं होतं हे.

लायब्ररीत बाईंची आणखी काही पुस्तकं आहेत. ती मात्र मी वाचणार हे नक्की. :-)

No comments: