तसं बघायला गेलं तर मला साधू-संन्यासी ह्यांचं वावडंच. त्यांच्यावरचा लोकांचा विश्वास उडावा अश्याच गोष्टी आजकाल ऐकू येतात. पण झालं काय की नर्मदा परिक्रमेवरच्या एका पुस्तकाचं लोकसत्तेत आलेलं परिक्षण वाचलं आणि दोन मित्रांना त्याबद्दल लिहिल. दोघांनीही एकदम हे पुस्तक रेकमेन्ड केलं. मग म्हटलं वाचायलाच पाहिजे. :-) लायब्ररीत आहे का म्हणून विचारलं तर होतं मग आणलं घरी.
वाचायला सुरू करण्याआधी सहज पुस्तकाच्या किती आव्रृत्या झाल्या आहेत ते पहात होते. सातव्या आव्रृत्तीपर्यंत पोचतो लेखक "जगन्नाथ कुंटे" यांचा " जगन्नाथ कुंटे (अवधूतानंद)" झालेला होता. मग पुस्तक वाचावं का वाचू नये हा विचार करण्यात पाचेक मिनिटं गेली कारण ह्या आनंद वगैरे स्वामी मंडळींची मला अॅलर्जीच. भरीला भर म्हणून आतल्या पानांत कोणा २-३ महाराजांच्या तसबिरी पण होत्या. तरी एव्हढं आणलं आहे तर वाचू म्हणून सुरुवात केली.
प्रथम काय खटकलं ते लिहिते. शूलपाणीच्या जंगलात लुटवून घेणे हा प्रकार अजब वाटला. एके ठिकाणी लेखकाने त्याला खायला देऊन अद्र्ष्य झालेले लोक आणि त्यांची झोपडी ह्यावर लिहिलंय ते वाचून हसावं का रडावं हे कळेना. पुढे एका अव्याहत नाद ऐ़कू येणार्या माणसाबद्दल उल्लेख आहे - त्याला काही कानाचा प्रोब्लेम असावा अशी शंका आली. ही साधनेची उच्च पातळी आहे असे लेखक म्हणतो. असेलही. पण हे पचायला कठिण गेलं एव्हढं मात्र नक्की. तसंच अश्वत्थामा दिसल्याचा उल्लेखसुध्दा झेपला नाही.
पण लेखकाने पुस्तकभर विनोदाचा वापर सुरेख केलाय. त्यामुळे ते कोरडं आध्यात्मिक पाल्हाळ झालं नाहिये. एव्ह्ढ्या वेळा परिक्रमा करणं त्याला कसं जमलं देव जाणे. माझी वाचूनच दमछाक झाली.
एकूणात परिक्रमा नर्मदामाई करवून घेईल अश्या विश्वासावर बायकांना तरी हे करणं अशक्य आहे असंच माझं मत ह्या पुस्तकावरून झालंय.:-( लोकसत्तात ज्या पुस्तकाबद्दल वाचलं होतं ते मिळालं तर नर्मदा परिक्रमेला आजच्या काळाचं परिमाण लाभेल. पाहू कधी वाचायची संधी मिळाली तर.
Tuesday, April 6, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment